नव्या आई-बाबांना हा प्रश्न नेहमीच पडतो.
कारण बाळाचे पोट भरले की नाही, बाळाला दूध पुरतयं की नाही हे समजत नाही आणि त्यामुळे बाळाला किती वेळा पाजायचे याबाबत नेहमीच संभ्रम असतो. त्यात आजूबाजूचे इतर लोक , डॉक्टर्स वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देतात आणि मग प्रश्न पडतो की नक्की कोणता सल्ला ऐकायचा!
त्यामुळे आज एक अगदी सोपा नियम मी सांगणार आहे, तो लक्षात ठेवला तर बाळाला किती वेळा आईचे दुध पाजायचे हा प्रश्न पडणार नाही!

बाळ जन्मल्यानंतर
बाळ जन्मल्यानंतर लवकरात लवकर बाळाला पाजणे सुरू करायला हवे, जेणेकरून तुमच्या मेंदूपर्यंत दूध निर्माण करण्याच्या सूचना पोहोचतील. यामध्ये जर उशीर झाला तर दूध निर्मितीमध्ये अडथळे येऊ शकतात. साधारणपणे जन्मानंतर एक तासाच्या आत स्तनपान सुरू करायला हवे.
बाळाने स्तन चोखणे हे दूध निर्मितीसाठी आवश्यक असते. तसेच गरोदरपणाच्या आठव्या नवव्या महिन्यापासून स्तनामध्ये जे चीक दूध उपलब्ध असते, तेही बाळाला मिळणे अत्यावश्यक असते . हे बाळाचे पहिले लसीकरण असते. यातून आईच्या शरीरातील अँटीबॉडीज बाळापर्यंत पोहोचतात.
काही माता बाळाच्या जन्मानंतर वार पडण्यापूर्वीच स्तनपान सुरू करतात. ज्याला ब्रेस्ट क्रॉल असे म्हटले जाते याचा लेखही वाचता येईल. (लिंक)
पहिले १०-१५ दिवस
प्रत्येक नवजात बाळाचे वजन जन्मल्यानंतर पहिले काही दिवस कमी होते. हे नैसर्गिक आहे .मात्र वजन बाळाच्या जन्मवजनाच्या दहा टक्क्याहून जास्त प्रमाणात कमी होणे धोक्याचे असते. बाळाचे वजन जन्मानंतर कमी का होते याविषयीचा लेख इथे वाचता येईल.
हे कमी झालेले वजन पहिल्या सात ते पंधरा दिवसांपर्यंत पुन:श्च पूर्वीसारखे होते . जोपर्यंत पुन्हा वजन जन्मवजनाएवढे होत नाही तोपर्यंत दर दोन तासांनी बाळाला स्तनपान द्यायला हवे. बाळ झोपलेले असेल तर त्याला थोडेसे जागे करून स्तनपान द्यायला हवे. स्तनपान रात्री देखील सुरू ठेवायला हवे.
सुरुवातीच्या काळात आपला मेंदू अंदाज घेत असतो की बाळाला किती दूध लागणार आहे. त्यामुळे या पहिल्या दोन आठवड्यामध्ये बाळाला वारंवार पाजल्याने आणि स्तन पूर्णपणे रिकामे केल्याने आईचे दूध लवकर वाढते आणि भविष्यातील स्तनपानामध्ये अडचणी येत नाहीत. यासाठी योग्य पकड (Latch) कशी असावी (लिंक आणि लिंक ) तसेच मिल्क ट्रान्सफर होतंय ना हे कसे ओळखावे (लिंक) याविषयीचे लेख अवश्य वाचा.
बाळाचे कमी झालेले वजन पुन्हा पूर्वीसारखे झाले की त्यानंतर बाळाला दर दोन तासाने पाजणे आवश्यक नाही. तसेच झोपलेल्या बाळांना उठवून पाजायची ही गरज नाही. त्यानंतर मागणीनुसार स्तनपान दिले तरी चालते.
पंधरा दिवस ते सहा महिने
सहा महिन्यापर्यंतचा कालावधी हा निव्वळ स्तनपानाचा कालावधी आहे. (Exclusive breastfeeding) या काळात आईच्या दुधाखेरीज पाणी किंवा इतर काहीही बाळाला द्यायची गरज नसते. या काळात बाळाला मागणीनुसार स्तनपान (Demand Feeding) द्यायचे आहे. बाळाच्या भुकेच्या खुणा कशा ओळखायच्या याविषयीचा लेख अवश्य वाचा. (लिंक)
मागणीनुसार स्तनपान म्हणजे बाळ जेव्हा दूध मागेल त्या त्या वेळेला, जेवढा वेळ दूध पिऊ इच्छील तेवढा वेळ आणि जेवढ्या वेळा दुध मागेल तेवढ्या वेळा बाळाला दूध द्यायचे आहे.
बाळाची दुधाची गरज ही बाळाच्या वाढीच्या टप्प्यानुसार बदलत असते आणि बाळ वाढलेली गरज वारंवार दूध मागून आईच्या स्तनांना कळवते. त्यानुसार स्तन दुध निर्मिती वाढवतात.
त्यामुळे बाळाने जर वारंवार दूध प्यायला मागितले तर चिंता करू नये. ही बाळाची स्तनांशी बोलायची भाषा आहे. जेव्हा दूध जास्त हवे असते तेव्हा बाळ वारंवार दूध मागते आणि बाळ जेवढ्या वेळा दूध पिते तेवढे अधिक दूध स्तनांमध्ये निर्माण होते. अश्या वेळी आपले दूध कमी झाले अशी चुकीची शंका मनात आणून वरचे दूध चालू केल्यास आईचे दूध कमी होण्यास सुरुवात होते.
सहा महिने ते दोन वर्षे
बाळाला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाला वरचे अन्न सुरू करता येते. सुरुवातीला एखाद्या वेळेस वरचे अन्न द्यावे आणि हळूहळू त्याचे प्रमाण वाढवावे. नऊ महिन्याचे होईपर्यंत दिवसातून दोन ते तीन वेळा वरचे अन्न देता येते . त्याखेरीज उरलेल्या वेळांमध्ये बाळाला मागणीनुसार स्तनपान द्यायला हवे. नऊ महिन्यानंतर वरचे अन्न अजून एक किंवा दोन वेळा देता येईल .
आईचे दूध व्यवस्थित असेल तर इतर कोणतेही दूध बाळाला देण्याची आवश्यकता नाही. कारण मानवी बाळासाठी जे अतिशय योग्य आहे ते दूध केवळ आईच्या स्तनांमध्येच निर्माण होते.
बाळ एक वर्षाचे होईपर्यंत आईचे दूध हेच त्याच्या अन्नाचा मुख्य स्त्रोत असते. एका वर्षानंतर वरचे अन्न मुख्य स्त्रोत होऊन आईचे दूध हे त्याच्या सहाय्यासाठी मागणीनुसार सुरू ठेवायला हवे. बाळाच्या मेंदूची वाढ व्यवस्थित व्हावी यासाठी कमीत कमी दोन वर्षे बाळांना स्तनपान सुरू ठेवायला हवे. दिवसातून एकदा किंवा दोनदा ही जर स्तनपान मिळाले तरीही त्याचे फायदे बाळाला मिळत राहतात. विशेषतः बाळे आजारी असताना अन्न खाणे नाकारतात त्यावेळी आईच्या दुधातून बाळाला ऊर्जा मिळते तसेच रोगप्रतिकारक शक्तीही मिळते. आईच्या स्तनांना बाळ आजारी असल्याचे कसे समजते याचा लेखही अवश्य वाचा. (लिंक)
आईचे दूध बाळासाठी अतिशय महत्त्वाचे असते. आधुनिक जगात आपण निसर्गापासून दूर आल्याने या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. मात्र योग्य माहिती असेल तर स्तनपानातील अनेक अडचणी आपण सोडवू शकतो किंवा टाळूही शकतो. ही माहिती इतरांपर्यंत अवश्य पोहोचवा.
तसेच ब्लॉगला सबस्क्राईब केल्यास प्रत्येक लेख तुमच्या मेलमध्ये पोहोचेल.
तुमच्या मनातील प्रश्नांचे स्वागत आहे. कमेंट मध्ये प्रश्न विचारले तर त्यानुसार नवीन लेख लिहू शकेन.
डॉ प्रिया प्रभू , MD, IYCN (BPNI)




Leave a Reply