सेक्स (लिंग) , जेंडर आयडेंटिटी (लिंगभाव ) आणि सेक्शयुअल ओरिएंटशन (लैंगिक कल/ओढा) यात फरक काय ?
#GenderMatters_DrPriya 12
गेले दोन दिवस gender sensitivity बाबत वैद्यकीय विद्यार्थी आणि नर्सेस साठी काही सेशन्स घेतले. त्यांची तयारी करताना हा फोटो सापडला नेटवर . आणि वरील तीन संकल्पना समजण्यासाठी आता हा माझा फेव्हरेट फोटो आहे .
सेक्स म्हणजे व्यक्तीचे लिंग काय आहे हे शरीरातील बाह्य लैंगिक अवयवांवरून जन्मतः ठरवले जाते. बाळाला जर शिश्न असेल तर पुरुष आणि नसेल तर स्त्री. सहसा त्यानुसार शरीरातील हार्मोन्स असल्याने शरीर पुरुष किंवा स्त्री सारखे वाढते .
*यामध्ये जे “दिसते” तसेच लिंग असते .*
जेंडर आयडेंटिटी ही त्या व्यक्तीला आतून जाणवणारी गोष्ट आहे . ती व्यक्ती स्वतःला स्त्री “समजते” की पुरुष हे त्या व्यक्तीलाच माहीत असते . डोळे बंद करून स्वतःचा विचार केला की आपल्याला आपण स्त्री रुपी दिसतो की पुरुष रुपी हे समजते .
सहसा आपले जे शरीर असते ते आपल्याला मान्य असते . पण काही व्यक्तींमध्ये त्यांच्या शरीरानुसार लिंग ठरले असले तर मनानुसार त्यांना त्याहून वेगळे लिंग आहे असे वाटते . म्हणजे शरीराची आणि मनाची जोडी जमत नाही.
*यामध्ये व्यक्तीच्या स्वतःच्या “मानण्याला” महत्व असते.*
म्हणजे मनाला शरीर मान्य असेल तर cis man किंवा cis woman .
आणि मनाला शरीर मान्य नसेल तर trans man किंवा trans woman .
लिंग’भाव’ म्हणजे स्वतःच्या मनाची समजूत महत्वाची.
आता जेंडर norms हा असा प्रकार आहे जो कुटुंबीय व समाज आपल्याला शिकवतात .
बाळाचे शरीर मुलाचे असेल तर मुलासारखे वागायला , बोलायला, कपडे घालायला, खेळायला, नोकरी करायला शिकवतात. मुलासारखे गुण शिकवतात .
बाळाचे शरीर मुलीचे असेल तर मुलीसारखे वागायला, बोलायला, कपडे घालायला , घर व मुले सांभाळायला शिकवतात . मुलींसारखे वागणे व गुण शिकवतात.
स्त्री असो की पुरुष , कोणी काय करायचे , कसे जगायचे याचे अलिखित नियम पिढ्या दर पिढ्या चालत आलेले आहेत . हे अलिखित नियम आपण सर्व कमी अधिक प्रमाणात पाळतो . कधी त्याला वागण्याची रीत म्हणतो तर कधी परंपरा .
आणि या नियमानुसार जेव्हा स्त्री आणि पुरुष जगतात , बाह्य रूपके स्वीकारतात जसे स्त्रिया बांगड्या घालतात किंवा टिकली लावतात , पुरुष दाढी मिश्या वाढवतात किंवा पॅन्ट शर्ट घालतात त्याला जेंडर एक्सप्रेशन म्हणतात . लिंगभाव वर्तन म्हणता येईल .
समाजात वावरताना आपण कोणाला तुमचे लिंग कोणते असे विचारत नाही . आयुष्यात प्रथमच भेटणारी व्यक्ती देखील स्त्री आहे की पुरुष हे आपण नावावरून , कपड्यावरून , हालाचालींवरून चटकन ओळखतो.
*म्हणजे स्त्री सारखे किंवा पुरुषासारखे “वागणे- दिसणे” म्हणजे जेंडर एक्सप्रेशन .*
आणि व्यक्तीला कोणाविषयी प्रेमभाव वाटतो , कोणासोबत आयुष्य घालवायला आवडू शकते , कोणाचा जोडीदार होणे आवडते ते सेक्शयुअल ओरिएंटशन .
*हे आवडणे म्हणजे “दिलाची” बाब !*
तुझपे मेरा दिल आ गया असे म्हणतात ना !
हे ठरवून घडत नाही . आकर्षण ठरवून निर्माण होत नाही . बस , हो जाता है !
जेव्हा वेगळ्या लिंगाची व्यक्ती आवडते तेव्हा विरुद्धलिंगी आकर्षण . याची संख्या जास्त आहे ! याची सर्वांना माहिती आहे.
जेव्हा आपल्याच लिंगाची व्यक्ती आवडते तेव्हा समलिंगी आकर्षण . तुलनेने याची संख्या कमी आहे आणि आपला याविषयी अनुभव देखील कमी आहे.
त्यामुळे या तीनही वेगवेगळ्या गोष्टी आहेत , एक शरीराची , एक मनाची आणि एक हृदयाची .
आणि या फोटोमधून या तीनही गोष्टी अगदी सहजपणे समजतात .
– डॉ. प्रिया प्रभू
(२८/१०/२०२३)
(हे सर्व खरे तर आपल्या संस्कृतीनुसार समजायला जास्त सोपे आहे.
आपण “मी” म्हणजे “आत्मा ” असे समजतो , जो अमर असतो. जन्माला येताना “आत्म्याला” कपडे मिळतात म्हणजे आत्म्याचे शरीर . शरीर पुरुषाचे किंवा स्त्रीचे असते.
काही आत्म्यांना जन्मतः मिळालेले स्त्री / पुरुषी शरीर पटत नाही . त्यांना वाटते ‘माझे शरीर याहून वेगळे असायला हवे होते’ , ते trans व्यक्ती असतात .
जन्माच्या गाठी जर आधीच ठरलेल्या असतात तर त्या आत्म्यांच्या असणार कारण शरीर तर नश्वर आहे . आणि आत्मा स्त्री किंवा पुरुषी शरीरात असला तरी जर या जन्मी एकत्र येणार असतील तर तसे घडणार ना . आत्मा समलिंगी शरीरात असला तरी!
सध्या समाज आत्म्याचे महत्व विसरला असल्याने शरीरानुसार आत्म्याने बदलायला हवे असे समजतो ! पण जे आतून आत्म्याला वाटते ते बदलणे मुश्किल ही नही , नामुमकीन असते! )



Leave a Reply