*बाळाचे वजन जन्मानंतर कमी का होते?*

Published on

in

, ,

तुम्हाला हे माहीत होते का ?

बाळ जन्मले की पहिल्या काही दिवसात बाळाचे वजन कमी होते आणि नंतर पुन्हा वाढू लागते . ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याने यावर लक्ष ठेवणे आवश्यक असते, तेही चिंता न करता ! (लक्ष ठेवायला एक भारी टूल सांगणार आहे, आजच सापडलंय!)

जर नव्या आईला ‘बाळाचे वजन कमी होऊन मग वाढणार आहे’ हे माहीत नसेल तर वजन कमी होऊ लागले की आई चिंता सुरू करेल, आपल्या दुधाला दोष देईल! आणि चिंतासुर मनात आला की तो दूध कमी करतो, लक्षात आहे ना ?

प्रत्येक बाळ , मग ते बाळ केवळ आईचे दूधच पीत असेल किंवा वरच्या फॉर्म्युलावर असेल तरी त्याचे वजन सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात कमी होतेच. म्हणून याला नैसर्गिक घटना म्हणतात. ९ महिने गर्भाशयातील पाण्यात राहिलेले बाळ लघवीद्वारे शरीरातील अनावश्यक पाणी बाहेर टाकते. तसेच आईचे दुध येईपर्यंत चीक दुध पिणारे बाळ त्याच्या शरीरातील चरबीचा साठा देखील वापरते. आईच्या पोटात असताना २४ तास पोषण मिळवणारे बाळ आता थोड्या थोड्या वेळाने मिळणाऱ्या दुधावर अवलंबून असते. या नव्या पद्धतीची सवय करून घेताना प्रत्येक बाळाचे थोडे वजन कमी होते.

‘नॉर्मली’ किती वजन कमी होऊ शकते?

बाळांचे वजन सहसा पहिल्या ३-४ दिवसांपर्यंत कमी होत रहाते. जन्मतः जे वजन असेल त्याच्या जास्तीत जास्त १०% एवढी घट नॉर्मल समजली जाते. त्याहून जास्त घट झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

म्हणजे ज्या बाळाचे जन्मतः वजन २५०० ग्राम्स असेल त्याचे वजन २२५० ग्राम्स पेक्षा कमी होता कामा नये. ज्या बाळाचे वजन ३ किलो असेल त्याचे वजन २.७ किलोपेक्षा कमी होता कामा नये. पुढील फॉर्म्युला वापरून आपल्या बाळाचे वजन किती टक्के कमी झालेय याचा अंदाज घेता येतो.

म्हणजे , एखाद्या बाळाचे जन्मतः वजन २७०० ग्राम्स होते आणि ५व्या दिवशी २५०० ग्राम्स असेल तर बाळाचे वजन एकूण २०० ग्राम्स म्हणजे ७.४% इतके कमी झाले आहे. स्तनपान व्यवस्थित सुरू झाले की वजन कमी होणे बंद होते आणि वाढण्यास सुरुवात होते .

पहिल्या २ आठवड्यांमध्ये कमी झालेले वजन पुन्हा जन्माच्या वजनाएव्हढे होणे आवश्यक आहे . जो पर्यंत बाळाचे वजन पुन्हा जन्मएव्हढे होत नाही तोपर्यंत बाळाला दर २-३ तासांनी पाजायला हवे . बाळ झोपले असल्यास त्याला हळुवारपणे जागे करून स्तन चोखू द्यावेत . याने वजन लवकर वाढते तसेच वारंवार स्तन रिकामे झाल्याने आईचे दूध वाढण्यास मदत होते. त्याच प्रमाणे ‘मिल्क ट्रान्सफर’ होत आहे याची देखील खात्री करावी, हे महत्वाचे आहे . यावर लेख इथे वाचता येईल.

७% अधिक वजन कमी झाले असेल तर किंवा ५-६ दिवसात वजन पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली नसेल तर स्तनपान व्यवस्थित सुरू आहे याची खात्री करून घेणे आवश्यक आहे . तसेच बाळ dehydrated नाही याचीही खात्री करून घेता येईल.

प्रत्येक बाळ वेगळे असल्याने प्रत्येक बाळाचा नॉर्मल वेगळा असू शकतो. (Percentile curve) एका अभ्यासामध्ये असे लक्षात आले की काही बाळांना पुन्हा जन्म-वजन गाठण्यासाठी ३ आठवडेदेखील लागू शकतात. जर बाळ पूर्णपणे नॉर्मल असेल तर अश्या वेळी थोडी वाट बघता येऊ शकेल. मात्र तत्पूर्वी स्तनपान व्यवस्थित व पुरेसे सुरू आहे याची खात्री करावी.

हा अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांनी एक फ्री वेबसाईट सुरू केली आहे ज्यामध्ये NEWT हे tool आहे. newbornweight.org या वेबसाईटला भेट दिली आणि तेथील टूलमध्ये आपल्या बाळाच्या जन्माची , जन्म कसा झाला आहे याची , बाळ निव्वळ स्तनपान करते की कसे, जन्म वजन किती होते आणि नंतरच्या तपासणीत किती वजन आहे अशी सर्व माहिती भरली की वजनाचा ग्राफ दिसतो . वजन ९५% च्या लाल रेषेखाली असू नये . त्यावरील रेषेवर असल्यास वजनावर लक्ष ठेवून लेखाच्या शेवटी सांगितलेले उपाय करणे आवश्यक आहे तसेच योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला देखील घ्यायला हवा .

जन्मतः काही गुंतागुंत नसलेल्या नॉर्मल बाळांसाठी पहिल्या ३० दिवसांसाठी ही साईट वापरता येईल – डॉक्टर किंवा पालक, दोघांसाठी! यामध्ये कमी झालेल्या वजनाचे प्रमाण तसेच वजन कमी होण्याची गती अश्या दोन्ही घटकांचा विचार केलेला आहे. हा अभ्यास लाखो बाळांवर झाला होता पण भारतीय बाळे परदेशी बाळांतून थोडी लहान असतात तेव्हा या टूलचा वापर माहितीसाठी करावा, स्व-निदानासाठी करू नये. शंका वाटल्यास बाळाची तपासणी करूनच निर्णय घ्यावेत.

बऱ्याच सीझर ने जन्मलेल्या बाळांचे वजन १०% हुन अधिक प्रमाणात कमी होऊ शकते. याची दोन कारणे असतात . बऱ्याच वेळा स्तनपान सुरू करायला उशीर होतो , वरचे दूध सुरू केल्याने आईचे दूध येण्यास वेळ लागतो . मात्र महत्वाचे कारण म्हणजे ऑपरेशन पूर्वी व ऑपरेशन दरम्यान आईला सलाईन लावलेले असते . हे अधिकचे द्रव आईसह बाळाच्या शरीरातही जातात आणि त्यामुळे बाळाचे जन्म-वजन वाढलेले असू शकते. जन्मानंतर लघवीवाटे हे वाढीव पाणी शरीराबाहेर टाकले जाते आणि बाळाचे वजन कमी होते. आणि वरील सूत्र (फॉर्म्युला) वापरून % मोजले की घट १०% हुन अधिक दिसू शकते. अश्या वेळी वरील सूत्र वापरताना जन्म वेळच्या वजनाऐवजी बाळाचे २४ तासानंतरचे वजन वापरून % काढल्यास योग्य निर्णय घेण्यास मदत होईल आणि विनाकारण चिंता होणार नाही. Tool वापरताना जन्म कसा झाला याची माहिती द्यायची असल्याने जन्म वजन वापरण्यास हरकत नाही.

बाळाच्या वजन-वाढी संबंधी पुढील recommendation आहेत (२०२१), याविषयीचे सर्व references लेखाच्या शेवटी दिलेले आहेत. पूर्वी १० दिवसात वजन पूर्ववत व्हायला हवे असे सांगितले जायचे पण सर्वसाधारणपणे २ आठवडे देखील लागू शकतात हे आता लक्षात आले आहे. ५% बाळांना ३ आठवडेही लागतात मात्र स्तनपान योग्य असावे व बाळ आरोग्यपूर्ण असावे!

बरेच डॉक्टर बाळाचे वजन पुरेसे वाढलेले नसेल तर लगेच वरचे दूध किंवा फॉर्म्युला द्यायला सांगतात. पण असे करण्यापूर्वी स्तनपानासंबंधी कितीतरी गोष्टी करायला हव्यात. पुढील फोटोमध्ये त्या सांगितल्या आहेत. जसे – जास्त वेळा पाजणे, पाजल्यानंतर स्तन रिकामे करणे, ब्रेस्ट कॉम्प्रेशन करणे, बाळाला आईच्या अंगावर त्वचा संपर्कासाठी ठेवणे (skin to skin), ब्रेस्ट कॉम्प्रेशनचा वापर करणे, आईचे दूध काढून वरच्या दुधाऐवजी ते देणे इ. वरचे दूध किंवा फॉर्म्युला स्तनपानासाठी मारक असतो. (त्यामुळे तो निर्णय काळजीपूर्वक घ्यायला हवा तसेच वरचे दूध सुरू केल्यास आईचे दूध कमी होणार नाही यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. ) latch आणि milk transfer व्यवस्थित आहे याची काळजी घ्यावी.

तुम्ही गरोदर असताना २ गोष्टींची माहिती असल्यास स्तनपान प्रवास सोपा होऊ शकतो. १. स्तनपान संबंधी सर्व मूलभूत माहिती २. बाळाच्या सुरुवातीच्या दिवसातील आणि महिन्यांतील नॉर्मल गोष्टी/वर्तणूक . ही माहिती मी या लेखांद्वारे देत आहे आणि ती प्रत्येक गरोदर आणि स्तनदा मातेपर्यंत व तिच्या कुटुंबियांपर्यंत पोचायला हवी ! पोचवताय ना?

References:

https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK536449/

https://www.nice.org.uk/guidance/ng75/chapter/Recommendations#weight-loss-in-the-early-days-of-life

https://www.nice.org.uk/guidance/ng194/chapter/Recommendations#planning-and-supporting-babies-feeding

https://www.motherandmilk.co.uk/post/newborn-weight-loss-the-magical-10


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

One response to “*बाळाचे वजन जन्मानंतर कमी का होते?*”

  1. […] जन्मानंतर कमी का होते याविषयीचा लेख इथे वाचता […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com