थायरॉईडचा आजार-  किती गंभीर?

Published on

in

थायरॉईड या ग्रंथी बद्दल आपण जास्त ऐकलेलं नसतं. या ग्रंथीचं नक्की काय काम आहे हे देखील आपल्याला माहीत नसतं आणि अचानक एखादा रक्ताचा रिपोर्ट बघितल्यानंतर डॉक्टर सांगतात की “तुम्हाला थायरॉइडचा आजार झालाय आणि त्यावरची गोळी ही नेहमी घ्यायला लागेल.” मग रुग्णाला हे काही पटत नाही आणि औषधोपचारासाठी टाळाटाळ केली जाते.
आज आपण याविषयी सर्व माहिती घेऊया म्हणजे तुमच्याच लक्षात येईल की हा आजार गंभीर समजायचा की नाही.

या थायरॉईड ग्रंथीला ‘अवटू ग्रंथी’ असेही म्हणतात. ही ग्रंथी गळ्याच्या समोरच्या बाजूला कंठमण्याच्या खाली असते आणि थोडीशी फुलपाखरासारखी वाटते. त्या ठिकाणी हाताने स्पर्श केल्यास ती ग्रंथी तिथे आहे हे जाणवत देखील नाही . मात्र काही आजारांमध्ये या ग्रंथीला जर सूज आली तर गळगंड झालाय असे म्हटले जाते.

मानवी शरीराचे सर्व कार्य हे विविध रासायनिक संप्रेरकांच्या मदतीने घडत असते. यासाठी अंत:स्त्रावी आणि बाह्यस्त्रावी अशा विविध ग्रंथींची मालिकाच आपल्या शरीरात आहे. थायरॉईड ही अंत:स्त्रावी ग्रंथी आहे.  म्हणजे यातील संप्रेरक ग्रंथीबाहेर सोडण्यासाठी नलिका नाही.  हे स्त्राव ग्रंथीमधून प्रत्यक्ष रक्तामध्येच सोडले जातात आणि रक्ताद्वारे संपूर्ण शरीरामध्ये पसरून शरीरातील विविध अवयव आणि क्रिया यामुळे नियंत्रित केल्या जातात.

कोणत्याही ग्रंथीचे काम जेव्हा बिघडते तेव्हा दोन शक्यता असतात – त्या ग्रंथीमधून एक तर अल्पस्त्राव होऊ शकतो किंवा अतिस्त्राव होऊ शकतो. थायरॉईडच्या बाबतीमध्ये अल्पस्त्राव झाल्याने म्हणजेच थायरॉईडचे कार्य अपुऱ्या प्रमाणात घडत असल्याने होणारा आजार हा सर्वसामान्यपणे दिसून येतो.  याला हायपोथायरॉईड असेही म्हटले जाते.  भारतामध्ये दर दहा व्यक्ती मागील एक व्यक्ती हायपोथायरॉईड-ग्रस्त आहे – एवढे जास्त प्रमाण आहे.  इतर विकसित देशांमध्ये हे प्रमाण केवळ २-४% एवढेच आहे मात्र भारतात एका अंदाजानुसार कमीत कमी ११% लोकांमध्ये हा आजार दिसून येतोय. हायपोथायरॉईड या आजाराची लक्षणे खूप सारी आणि लगेच लक्षात न येणारी असल्याने याचे निदान योग्य प्रकारे होत नाही. मात्र या ग्रंथीतील स्त्राव वाढल्याने होणारा आजार म्हणजे हायपरथायरॉईड याची लक्षणे ही ओळखण्यास थोडी सोपी असल्याने हा आजार कमी प्रमाणात असला तरी याचे निदान लवकर होऊ शकते. आजच्या लेखामध्ये अधिक सामान्यपणे दिसून येणाऱ्या हायपोथायरॉईड या आजाराबाबत आपण अधिक माहिती घेऊया.

थायरॉईड ग्रंथी मधून T3 आणि T4 ही संप्रेरके स्त्रवतात. याशिवाय कॅल्सीटोनिन नावाचाही एक स्त्राव निर्माण होतो.  T3 व T4 या स्त्रावांमुळे आपल्या शरीरातील संपूर्ण चयापचयक्रिया ही नियंत्रित केली जाते. म्हणजेच अन्नापासून जी काही ऊर्जा आपल्याला मिळणार असते , ती ऊर्जानिर्मिती आणि  त्या ऊर्जेचा वापर कसा , कुठे,  आणि किती प्रमाणात करायचा असे काही महत्त्वाचे निर्णय या स्त्रावांच्या प्रमाणावर ठरतात. हे कार्य अतिशय महत्त्वाचे तसेच केंद्रीभूत असल्याने शरीरातील जवळजवळ प्रत्येक क्रियेवर आणि प्रत्येक अवयवावर या स्त्रावांचा परिणाम होतो.

तुमच्या थायरॉईड ग्रंथीचे काम व्यवस्थित चालले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी रक्तातील T3, T4 आणि TSH या घटकांचे प्रमाण मोजले जाते. या तपासणीला ‘थायरॉईड फंक्शन टेस्ट’ असेही म्हटले जाते. ही तपासणी दिवसभरात कोणत्याही वेळी करता येते. TSH म्हणजे थायरॉईड स्टीम्युलेटिंग हार्मोन . हे संप्रेरक पियुषिका ग्रंथीतून स्त्रवले जाते . ही मेंदूमध्ये स्थित असणारी पियुषीका ग्रंथी थायरॉईड ग्रंथीच्या कार्याचे नियंत्रण करते. रक्तातील मुख्यतः T4 कमी झाले की TSH वाढते.  त्यामुळे थायरॉईड ग्रंथी अधिक काम करून T3 आणि T4 च्या प्रमाण वाढवू शकते. मात्र एक वेळ अशी येते की TSH कितीही वाढले तरी थायरॉईड ग्रंथीचे स्त्राव मात्र वाढत नाहीत आणि मग हायपोथायरॉईडचे शरीरावरील परिणाम दिसण्यास सुरुवात होते.

हायपोथायरॉईड या आजारामध्ये शरीरातील सर्व क्रिया व्यवस्थित न होण्याचा / मंदावण्याचा त्रास असतो.  हा आजार कोणत्या वयात सुरू झाला, आजार सुरू होऊन किती दिवस झालेत आणि संप्रेरक कमी असल्याचे प्रमाण किती आहे यावर  विविध लक्षणे आणि त्यांची तीव्रता ठरते.

Hypothyroidism या आजाराची सर्वसाधारण लक्षणे पुढील प्रमाणे आहेत.
वाढणारे वजन,  थंडी सहन न होणे , पचनक्रिया मंदावणे,  बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होणे , त्वचा व केस कोरडे होणे,  थकवा जाणवणे,  रक्तक्षय, हृदय गती मंद होणे,  केस गळणे,  स्नायू कमजोर होणे,  नैराश्य , स्मरणशक्ती कमी होणे. तसेच रक्तातील धोकादायक कोलेस्ट्रॉलचे (LDL) प्रमाण देखील वाढते.
ही लक्षणे इतर आजारांमध्येही दिसत असल्याने तसेच ही लक्षणे हळूहळू वाढत असल्याने याचे निदान लवकर होत नाही.

याखेरीज स्त्रियांमध्ये हायपोथायरॉईड असल्यास गर्भधारणा होण्यास अडचणी येतात .  तसेच गर्भधारणा झाल्यानंतरही गर्भपात होणे किंवा बाळ अपुऱ्या दिवसाचे जन्मणे अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. तसेच पाळीच्या विविध तक्रारीही होऊ शकतात.


गर्भवती मातांमध्ये हायपोथायरॉईड असल्यास तिच्या पोटातील बाळावर अनेक परिणाम दिसून येतात, जसे- त्या बाळाची वाढ व्यवस्थित होत नाही, त्याचप्रमाणे बाळाचा मानसिक आणि बौद्धिक विकास देखील योग्य प्रमाणात होत नाही. बाळ मतिमंद देखील जन्मू शकते. म्हणून गरोदर स्त्रियांमध्ये संप्रेरक योग्य  प्रमाणात असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


मुलांच्या वाढत्या वयात जर हायपोथायरॉईड झाला तर त्यांची शारीरिक बौद्धिक आणि मानसिक वाढ ही व्यवस्थित होत नाही. मुलांची पौगंडावस्था देखील लांबू शकते. हाडांची वाढ व्यवस्थित न झाल्याने त्यांची उंची कमी राहू शकते.

या माहितीवरून तुमच्या लक्षात आलेच असेल की थायरॉईड ग्रंथीचे काम हे आपल्या शरीराच्या केंद्रस्थानी असल्याने हायपोथायरॉईड आजाराचे परिणाम हे सर्वव्यापी असतात आणि यामुळे आपले शरीर इतर आजारांना बळी पडू शकते.  जसे की – रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो,  वजन वाढल्याने डायबिटीसचा धोका वाढतो , मानसिक आरोग्य बाधित झाल्याने नैराश्य आणि त्यामुळे आत्महत्येचा धोका वाढतो.

प्रत्येकामध्ये ही सर्वच लक्षणे दिसतील असे नाही. त्यामुळे या आजाराची सुरुवात लक्षात आल्यास डॉक्टर लगेच उपचार सुरू करतात जेणेकरून पुढील गुंतागुंती होत नाहीत.

या आजाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक आहे असे दिसून आले आहे. तसेच जसे वय वाढत जाते तसा या आजाराचा धोकाही वाढत जातो. सहसा अन्नामध्ये आयोडीनचे प्रमाण कमी असल्यास हा आजार होऊ शकतो. यासाठीच १९८३ पासून आयोडीनयुक्त मिठाचा वापर आपण जेवणामध्ये करतो . जेणेकरून प्रत्येकाच्या जेवणामध्ये काही ना काही प्रमाणात आयोडीन नक्की असते. पर्यावरणातील प्रदूषण तसेच अन्नातील कीटकनाशकांचे वाढते प्रमाण यामुळेही या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचा अंदाज आहे. कधीकधी मात्र शरीरामध्ये स्वयंप्रतिकार प्रक्रिया (Auto-immune process)सुरू झाल्यानेही हायपोथायरॉईड हा आजार होऊ शकतो.

या आजाराचे काही कारण समजल्यास ते दूर करण्याचा प्रयत्न करता येतो. मात्र सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे T4 हार्मोन हे गोळ्यावाटे शरीरामध्ये देणे. T3 व T4 हार्मोनचे प्रमाण जेवढे कमी असेल आणि TSH हार्मोनचे प्रमाण जेवढे जास्त असेल त्याबरहुकूम आपल्याला थायरॉईड हार्मोन च्या गोळ्या घ्याव्या लागतात. त्यामुळे काही लोकांचा डोस हा ७५ किंवा १०० मायक्रोग्रॅम किंवा १५० मायक्रोग्रॅम असा जास्तही असू शकतो. औषध सुरू केल्यानंतर सुरुवातीला दर तीन महिन्यांनी तपासणी करून तो डोस व्यवस्थित आहे का नाही हे ठरवले जाते आणि त्यानुसार कमीजास्त बदल केला जातो. त्यामुळे एकदा डॉक्टरांना भेटून नंतर पुन्हा न भेटणे हे चुकीचे आहे . तसेच मनाने औषध बदलणे किंवा बंद  करणेही चुकीचे आहे.
त्याचप्रमाणे कधी कधी फक्त TSH हार्मोन वाढलेले असते जर ते ४-५ microIU/ml पेक्षा अधिक वाढलेले असेल आणि T4 नॉर्मल असेल तर याला सबक्लिनिकल हायपोथायरॉईड असे म्हटले जाते. अजून आजाराची लक्षणे व्यवस्थित सुरू झालेली नसतात, मात्र शरीरामध्ये नुकसान होण्यास सुरुवात झालेली असते. त्यामुळे कमी डोसच्या गोळ्यांद्वारे थायरॉक्सिन हार्मोन दिले जाते.


औषधोपचार सुरू करायचे की नाही याचा निर्णय आपल्या डॉक्टरांना घेऊ द्यावा. डोस किती द्यायचाय हा निर्णय देखील डॉक्टरांना घेऊ द्यावा.
हे कोणतेही औषध नसून या गोळ्यांमध्ये आपल्या शरीरातील हार्मोनच असल्याने याचे कोणतेही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाहीत. त्यामुळे चिंता न करता या गोळ्या आपल्याला नेहमीसाठी अगदी न चुकता घ्यायच्या असतात. आणि या गोळ्या चुकावायच्याही नसतात. क्वचित कधी हा आजार तात्पुरत्या स्वरूपातही दिसून येतो , अश्या वेळी thyroxin संप्रेरकाच्या गोळ्या देणे आवश्यक नसते. त्यामुळे या आजाराच्या योग्य निदान व उपचारासाठी  तुम्ही MD मेडिसिन किंवा DM endocrinologist अश्या  तज्ञ डॉक्टरांना भेटू शकता.

हायपोथायरॉईड हा आजार शरीरावर विविध गंभीर परिणाम घडवून आणणारा असला तरीही उपचार करण्यासाठी सोपा आजार आहे.  रोज घ्यायची फक्त एक गोळी तुम्हाला विविध मेटाबोलिक परिणामांपासून दूर ठेवू शकते.  त्यामुळे या आजाराची भीती न बाळगता याविषयी तपासणी करून घ्या आणि त्रास असल्यास त्यावर योग्य तो उपाय पण करा. Hypothyroidism चे वेळेवर निदान व उपचार भविष्यातील कित्येक आजार टाळू शकते.

डॉ प्रिया प्रभू ,MD PSM ,
रोगप्रतिबंधक औषधवैद्यकशास्त्र तज्ञ,
शा. वै. म. मिरज
drprdeshpande2@gmail.com

(ब्लॉग सबस्क्राईब केल्यास भविष्यात पोस्ट लिंक मेल मध्ये मिळतील)

लेख पूर्वप्रसिद्ध झाल्याची लिंक (श्रेष्ठ महाराष्ट्र )

(इतर विषयावरील लेखही तेथे प्रसिद्ध झाले आहेत )

एका अभ्यासाची लिंक


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com