आईने किती वेळ बाळाला पाजावे किंवा किती वेळा बाळाला पाजावे हे ठरवण्याचा पूर्ण हक्क बाळाकडे असतो खरे तर!
बाळ सहसा पोट भरेपर्यंत पितात .
मी मागे म्हटल्यानुसार प्रत्येक बाळ व आईची जोडी युनिक असते आणि म्हणून त्यांची तुलना कधीच करू नये!
पण आपल्याकडे मात्र असे घडत नाही ! “तुझे बाळ अर्धा तास का पिते ? २ तासाने लगेच कसे रडते? माझे बाळ तर १५ मिनिटेच पिते आणि ३ तास पुन्हा पीत नाही.” अश्या चर्चा नेहमी चालतात आणि मग आईच्या मनात शंकासुर येतो. व दुध कमी होऊ शकते.
कधी डॉक्टर पण सल्ला देतात की एका बाजूला १५ मिनिटेच पाजा आणि मग दुसऱ्या बाजूला १५ मिनिटे . पण बाळाने तोपर्यंत स्तन रिकामा केला नसेल तर यामुळे पुन्हा दूध कमी होऊ शकते ! आणि बाळाला पौष्टिक दाट दुध मिळत नाही .
बाळाला दिवसभरात कमीतकमी ६ वेळा सुसू होत असेल (लंगोट ओले होत असतील व सुसू फिकट पिवळी असेल) तर बाळाला दूध पुरतंय असे समजायला हरकत नाही! मग बिल्कुल चिंता करने का नई!
स्तनपान देताना आईला स्तनाग्रे दुखत नसतील तर पकड सहसा योग्य असते आणि स्तनपान योग्यपणे सुरू असते.
मात्र खूप जास्त वेळ स्तन चोखणे किंवा 2 तासाहून कमी वेळेत पुन्हा दूध हवे असणे तसेच वजनाची अपुरी वाढ अशी लक्षणे असल्यास मिल्क ट्रान्सफर होतेय का हे तपासायला हवे. स्तनपान प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात हे महत्वाचे आहे .
आपण जर फक्त स्तनपणाचा वेळ मोजला पण त्या वेळेमध्ये बाळाला दूध घेता येतंय की नाही हे बघितले नाही तर काय उपयोग? स्तन चोखणे महत्वाचे कि बाळाने दुध पिणे?
बाळाने पकड (latch) व्यवस्थित घेतली असेल तर सुरुवातीला काही क्षण बाळ आईला पान्हा फुटण्यासाठी पटापट चोखते, स्तनाला लुचते व पान्हा फुटला की मग १-२ वेळा दूध ओढते व मग दूध गिळते. ही गिळण्याची क्रिया महत्वाची आहे . दूध ओढताना बाळाची हनुवटी खाली येते व तोंड भरून दूध ओढले जाते . स्तनातून येणारे दूध कमी होऊ लागले की ३-४ वेळा दूध ओढल्यावर मग ते दूध गिळले जाते व शेवटी फक्त ओठांच्या नाजूक हालचाली करत बाळ दूध पिणे संपवते ( व्हिडीओ लिंक शेवटी आहे)

स्तनपान यशस्वी होण्यासाठी चेन रिऍक्शन प्रमाणे बऱ्याच गोष्टी जुळून याव्या लागतात ! त्यातील एखादी लिंक जरी व्यवस्थित नसेल तर स्तनपानामध्ये अडचणी येतात. आणि स्तनावरील योग्य पकड (Latch) ही या चेन मधील सर्वात महत्वाची “कडी” आहे. त्यावर लिहिलेली पोस्ट नक्की वाचा ! ( नव्या पोस्ट मिस होऊ नयेत म्हणून like करा, मेल येईल नव्या पोस्टचा )
मला आठवते कि मी जेव्हा माझ्या नवजात बाळाला पाजत होते तेव्हा माझी आई माझ्या शेजारी उभी राहून बाळ पीत आहे का हे ऐकायचा प्रयत्न करत होती. पण यामुळे मला ताण यायचा . आणि ताण तर दुध कमी करतो, माहित आहे ना? त्यामुळे मिल्क ट्रान्सफर चे निरीक्षण स्वतःच करा . आणि काही शंका असल्यास आपल्या डॉक्टरांशी किंवा स्तनपान तज्ञांशी सल्ला मसलत करा. latch बद्दल अधिक माहिती मिळावा आणि स्तनावरील पकड सुधरवा , बाकी काम बाळ आपोआप करेल.
स्तनपान विषयक मूलभूत व महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेतल्या असतील, कुठे चुका होतात / होऊ शकतात हे जाणून घेतले असेल व योग्य तज्ञांचा सल्ला घेतला असेल आणि हे सर्व गरोदर असताना किंवा तत्पूर्वीच केले असेल तर मग स्तनपान अतिशय सोपे वाटू शकते! कारण ते नैसर्गिक आहे !
पुढील व्हिडीओ मध्ये बाळ निरनिराळ्या प्रकारे कसे चोखते व दुध पिते हे बघा. https://www.youtube.com/watch?app=desktop&v=yT5cGrkgZuY
आणि स्तनपानाविषयी कोणतीही अडचण असेल तर हिम्मत हारू नका , कारण अडचणीवर उपाय असतातच ! You already are doing great!
- डॉ. प्रिया प्रभू



Leave a Reply