(ही २०२३ मध्ये लिहिलेली पोस्ट आहे. दीर्घकालीन आरोग्यासाठी महत्वाची असल्याने कुटुंबियांसह अवश्य शेयर करा.)
काल तासगाव मधील एका तरुणाचा डॉल्बीच्या आवाजामुळे हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला ही बातमी ऐकली ना ?
जोपर्यंत असे काही घडत नाही तोपर्यंत आपण आपल्या आरोग्याशी निगडित या महत्वाच्या बाबीकडे पूर्ण दुर्लक्ष करतो.
आज ही पोस्ट तुम्ही वाचाल अशी शक्यता आहे. पण ही पोस्ट मी गणेशोत्सवाच्या सुरुवातीला लिहिली असती तर मात्र तुम्ही धर्माच्या नावाखाली सपशेल दुर्लक्ष केले असते . आज मात्र नक्की वाचा, घरातील तरुण व मुलांशी चर्चा करा,इतर जीवलगांसोबत शेयर देखील करा. कारण ध्वनी प्रदूषण करणारे वेगळेच असतात आणि परिणाम आपण सर्व भोगतो.
सर्वात आधी दोन महत्त्वाच्या गोष्टी .
१. आवाजाने फक्त श्रवण क्षमता कमी होते असे नाही तर विविध शारीरिक व मानसिक त्रास होऊ शकतात. (फोटो शेवटी दिलेले आहेत . )
आवाज म्हणजे pressure waves (लहरी ) असल्याने त्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम कानांसह इतर शरीरावर देखील होतो.
शरीरातील स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोल वाढते, ब्लडप्रेशर वाढते, हृदयगती वाढते , तणाव वाढतो ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो . विशेषतः ज्यांचे हृदय कमजोर आहे त्यांना मृत्यूचा सर्वाधिक धोका असतो.
२. आरोग्याचे दुष्परिणाम होण्यासाठी आवाज अत्याधिक असायला हवा असे नाही . खालील पहिल्या फोटोमध्ये दाखवल्यानुसार आवाजाची तीव्रता किती आहे , त्या आवाजाच्या उगमापासून अंतर किती आहे आणि किती काळासाठी त्या आवाजाशी संपर्क येतोय यावर होणारे आरोग्याचे नुकसान ठरते.
उत्सवी वातावरणातील १०० dB हुन अधिक आवाज काही मिनिटांसाठी असेल तरीही त्याचा परिणाम अधिक असतो. स्पीकरच्या जेवढ्या जवळ असाल तेवढा जास्त परिणाम होईल आणि जेवढा जास्त वेळ असाल तेवढा परिणामही वाढेल. (सुरक्षा वाढवायची असेल तर काय करावे लागेल लक्षात येतंय ना?)
40 dB च्या वरील प्रत्येक आवाजाचा काही न काही परिणाम शरीरावर होत असतो. 85 dB च्या वरील आवाज आपल्याला त्रासदायक वाटतो . त्यामुळे आपण नेमक्या किती ध्वनी प्रदूषणामध्ये जगतोय हे आपल्याला माहीत असायला हवे.
काही दशकांपूर्वी ध्वनी प्रदूषण हे सहसा कामाच्या ठिकाणी , कारखान्यांमध्ये असायचे त्यामुळे त्यावर खूप संशोधन झाले आहे. मात्र आता आपल्या जीवनशैलीमुळे व शहरीकरणामुळे ध्वनिप्रदूषण आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित झाले आहे. व त्यामुळे आवाज व आवाजाचे अदृश्य परिणाम आपल्या शरीरावर होतच असतात.
अशी उदाहरणे आपल्या आजूबाजूला असतात – घरी कोणालाच बीपी नाही किंवा ती व्यक्ती पण आहार व व्यायामाची सर्व काळजी घेते तरीही हाय बीपी चा त्रास सुरू झाला पण कारण समजतच नाहीये . अश्या वेळी या अदृश्य आवाजाचे कारण कोणाच्या लक्षातच येत नाही.
Noise म्हणजे अप्रस्तुत व अवाजवी आवाज. गोंगाट.
गोंगाट औद्योगिक असू शकतो, सामाजिक असू शकतो आणि पर्यावरणीय असू शकतो . ( Industrial noise, Social Noise and Environmental Noise)
सामाजिक गोंगाट वैयक्तिक कृतींनी निर्माण होतो. उदा. मोबाईल मुळे किंवा हेडफोन वापरून गाणी ऐकणे
पर्यावरणीय गोंगाट समूहाच्या कृतींनी व रोजच्या जगण्यात निर्माण होतो उदा. रस्त्यांवरील आवाज
सततच्या आवाजाची आपल्याला सवय होते म्हणजे मेंदू त्याची नोंद घेणे बंद करतो मात्र त्याचा परिणाम होणे बंद होत नाही. आत्ता जागृत पणे कोणकोणते आवाज तुमच्या आजूबाजूला आहेत व त्यांची तीव्रता किती आहे याचा थोडा अंदाज घ्या, खूप वेगवेगळे आवाज ऐकू येतील! 😊
आपल्या दिवसभराच्या जाण्याच्या ठिकाणी आवाजाचे प्रमाण किती आहे हे जाणून घ्यायचे असेल तर हे अँप वापरता येईल. हे NIOSH संस्थेचे आहे जी औद्योगिक सुरक्षेसाठी काम करते.
(Click here- app) हे ios चे app आहे. याखेरीज play store मध्ये आवाजाचे decible मोजण्यासाठी काही app उपलब्ध आहेत. सर्च केल्यास सापडतील. मात्र त्यांची अचूकता माहिती नाही.
या आवाजांचे परिणाम लहान मुले (शाळेतील गुणवत्ता कमी होऊ शकते) , गरोदर स्त्रिया व वृद्ध यांवर अधिक जाणवतो. सर्वात महत्वाचे म्हणजे ऐकण्याची क्षमता – कानातील पेशींना (hairy cells) नुकसान झाल्याने कमी होते त्यामुळे ती पुन्हा मिळवू शकत नाही . तसेच आत्ता त्रास जाणवत नसला तरी नुकसान झाले नसेल असे नाही , हळूहळू नुकसान वाढत रहाते.
यावर उपाय करायचे असतील तर सर्वप्रथम या धोक्याविषयी जनतेला जाणीव हवी, तरच काही कृती होऊ शकतील.
बाहेरच्या देशांमध्ये निकड असल्याशिवाय गाडीचा हॉर्न देखील वाजवला जात नाही आणि आपण हॉर्न मध्ये गाणी लावून वाजवत जातो.
तरीही ३४० मिलियन लोकसंख्या असलेल्या पश्चिमी युरोपीय देशांमध्ये केवळ आवाजामुळे १ मिलियन person year आयुष्य दरवर्षी कमी होते ,एवढा परिणाम आवाज करू शकतो.
जिथे गोंगाट हाच स्थायीभाव आहे अश्या देशांबद्दल आपण कल्पना करू शकता किती आयुष्ये कमी होत असतील.
आत्ताची पिढी व मोठ्यांची पिढी कितपत बदलेल माहीत नाही पण पालक आणि शिक्षक पुढील पिढीला या बाबी शिकवू शकतात.
आपणही सुरक्षा वाढवण्यासाठी पुढील बाबी करू शकतो.
१. आवाज निर्मिती कमी करण्याचे प्रयत्न –
कायदा व नियमांचे पालन जेवढे जास्त लोक करतील तेवढे उत्तम.
मिरवणुकीमध्ये प्रत्येक मिरवणुकीत वेगळे गाणे वाजल्याने गोंगाट वाढतो तसेच आमचे गाणे ऐकू यायला हवे म्हणून स्पर्धा व आवाज वाढतो.
त्या ऐवजी सर्वांना सामायिक गाणे लावणे किंवा प्रत्येक मिरवणुकीच्या मध्ये ठराविक अंतर ठेवणे किंवा गाणी मिरवणुकीत न वाजता मिरवणुकीच्या मार्गांवर वाजतील अशी व्यवस्था करणे
अश्या काही उपायांनी आवाजाची तीव्रता कमी करता येईल.
वैयक्तिक स्तरावर हेडफोन लावून गाणी ऐकताना आवाज जाणीवपूर्वक कमी ठेवणे अत्यावश्यक आहे! मोठा आवाज हवा असेल तर हेडफोन वापरू नये.
२. स्वतःच्या सुरक्षेचे उपाय
कामाच्या ठिकाणी, रस्त्यांवर प्रवास करताना , मिरवणुकीमध्ये असताना कानांच्या सुरक्षेसाठी ear plugs वापरणे
(प्रवासात वापरणे थोडे कठीण आहे कारण हॉर्न ऐकू येणे देखील आवश्यक असते .)
नोकरीच्या ठिकाणी आवाजाबाबत सुरक्षा वाढवणे .
टाळणे शक्य नसल्यास ड्युटी पोस्टिंग ठराविक काळानंतर बदलणे.
नियमित तपासणी करून ऐकण्याच्या क्षमतेवर लक्ष ठेवणे .
घर निवडताना परिसरातील आवाजाची पातळी देखील विचारात घ्यायला हवी.
मिरवणुकीमध्ये खूप काळ थांबावे लागत असेल (उदा. पोलीस) तर कानांच्या सुरक्षेसाठी ear plug वापरणे जेणे करून तीव्रता थोडी कमी होईल!
३. अधिक आवाजाच्या काळामध्ये त्या भागापासून शक्य असल्यास दूर जाणे (अंतर)
अर्थात हे सर्वांना शक्य नाही मात्र रुग्ण किंवा कमकुवत हृदय असल्यास अश्या व्यक्तींची सोय तात्पुरत्या स्वरूपात इतर कोठे करता येऊ शकेल , विशेषतः मिरवणूक मार्गाजवळ घर असल्यास याचा विचार करता येईल.
४. आवाज ऐकण्याचा वेळ कमी करणे
जेव्हा शक्य असेल तेव्हा अधिक आवाजी वेळा टाळून प्रवास करणे
मिरवणुकीमध्ये थांबण्याची वेळ कमी करणे.
मिरवणुकीची गती वाढवून वेळ कमी करणे .
तुमच्या लक्षात आले असेल की यातील बरेच उपाय आपल्या स्वतःच्या बळावर करता येणार नाहीत .
यासाठी सामाजिक जाणिव व शहाणीव वाढायला हवी व यासाठी आरोग्य शिक्षण व चर्चा आवश्यक आहेत.
किंवा जे जनता समजू शकत नाही ते परिणाम जाणणारे राज्यकर्ते हवेत जे जनतेच्या भल्यासाठी काम करतील.
विशेषतः शाळांमध्ये व कॉलेजेस मध्ये याबद्दल जाणीव, चर्चा, नव्या आरोग्यपूर्ण प्रथा सुरू करता येतील कारण मुलांमध्ये चांगले बदल करणे सोपे असते!
गोंगाटाची जाणीव व परिणामांची कल्पना असल्यास तरुणाई देखील आरोग्याचा मार्ग निवडेल , याविषयी ज्ञानप्रसार व्हायला हवा आणि सर्वांना पटतील असे उपाय टप्प्याटप्प्याने केले गेले पाहिजेत.
ध्वनी सुरक्षेचा मार्ग अवघड असेल तरी चालावा लागणार आहेच अन्यथा आवाजाचा हा अदृश्य मृत्यूदाता आपल्या आयुष्याची प्रतवारी (quality) आणि लांबी (longavity) नक्कीच कमी करत राहील!
आपण आरोग्यपूर्ण जगून देखील आपली काहीही चुकी नसताना केवळ पर्यावरणीय गोंगाटामुळे विविध आजारांना तोंड देत राहू !
या गोंगाट रुपी राक्षसाच्या विसर्जनाची बुद्धी श्री गणेश सर्वांना देवो!
#प्रासंगिक_DrPriya 10
(27/09/2023)



CDC च्या लेखाची लिंक
लेख इतरांसोबत अवश्य शेयर करा. तसेच पुढील लेख लगेच मिळावेत यासाठी subscribe करा.




Leave a Reply