सायलेंट किलर्स

Written by:

“सायलेंट किलर्स” म्हणजे शांतपणे नकळत मृत्यू देणारे.

काही आजारांना सायलेंट किलर्स म्हटले जाते . याचे मुख्य उदाहरणे आहेत –  मधुमेह आणि उच्च रक्तदाब ! या आजारांना नकळत मृत्यू देणारे आजार म्हणजेच सायलेंट किलर्स असे का म्हटले जाते हे आज आपण समजून घेऊया म्हणजे यांच्यापासून कसे सुरक्षित राहायचे हेही आपल्याला समजेल!

काही वर्षांपूर्वी फक्त श्रीमंतांचे आजार असे समजले जाणारे हे मधुमेह आणि उच्च रक्तदाब आजकाल सर्वसाधारण जनतेमध्येही खूप जास्त प्रमाणात दिसून येतात. भारतीय जनतेच्या बाबतीत एक गोष्ट जगापेक्षा वेगळी आहे. जगाच्या तुलनेमध्ये भारतीयांमध्ये हे आजार साधारण एक दशक भर आधीच दिसून येतात. म्हणजे जर जगभरामध्ये हे आजार साधारण चाळीशी किंवा पन्नाशी मध्ये दिसून येत असतील तर भारतीयांमध्ये मात्र हे आजार तिशी आणि चाळिशीमध्येच आढळून येतात.

या आजारांना इतरही काही नावे आहेत.  ती नावे आणि त्यांचे अर्थ जर आपण समजून घेतले तर त्यानुसार आपण कसे वागायला हवे हेही आपल्याला समजते.

मधुमेह आणि उच्च रक्तदाब या आजारांना “लाइफस्टाइल डिसऑर्डर्स” असे म्हणतात म्हणजे आपल्या “जीवनशैलीमुळे होणारे आजार” . औद्योगीकरणानंतर तसेच घरामध्ये विविध यंत्रे आल्यानंतर आपली जीवनशैली ही बैठी झालेली आहे.  म्हणजेच दिवसातला बराचसा काळ आपण बसून आणि हालचाल न करता घालवतो . जंक फूड खाण्याचे प्रमाण तसेच दारू – तंबाखू – सिगरेट या व्यसनांचे प्रमाण हे पूर्वीपेक्षा बरेच वाढले आहे. टीव्ही आणि मोबाईल यामुळे लहानपणापासूनच लठ्ठपणा दिसून येतो आणि मोठे झाल्यावर त्याचे पर्यवसान या आजारांमध्ये होते. यामुळे जीवनशैलीत आरोग्यपूर्ण बदल केल्यास हे आजार टाळता येतात किंवा नियंत्रित ठेवता येतात. निव्वळ औषधांनी हे आजार नियंत्रित करणे अवघड असते.

तसेच हे आजार “फॅमिलीयल डिसीजेस” देखील आहेत म्हणजे “कुटुंबीयांमध्ये आढळणारे आजार“.  संपूर्ण कुटुंबाची जीवनशैली ही साधारणतः एकसारखी असल्याने आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील एकसारख्या असल्याने सहसा हे आजार कुटुंबांमध्ये दिसून येतात. तसेच या आजारांमध्ये काही प्रमाणात जेनेटिक भाग देखील असतो म्हणजे आपल्या आई-वडिलांना, भाऊ – बहिणींना हे आजार असतील तर ते आजार आपल्याला होण्याची शक्यता ही बरीच वाढलेली असते.  यामुळे आपल्या कुटुंबातील कोणालाही जेव्हा मधुमेह किंवा उच्च रक्तदाब आहे हे आपल्याला समजते तेव्हा आपण स्वतःची तपासणी करून घ्यायला हवी आणि आजार जर सुरू झाला नसेल तर तो टाळण्यासाठी आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारायला  हवी.

अजून एक नाव म्हणजे या आजारांना “एंड ऑर्गन डिसीजेस” असे म्हणतात म्हणजेच “अवयव निकामी करणारे आजार“. या आजारामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांच्या मार्फत विविध अवयवांची हानी होते व काळजी न घेतल्यास ते निकामी होतात आणि यामुळेच या आजारांच्या विविध गुंतागुंती देखील होतात. यामुळे या आजाराच्या रुग्णांना आपले विविध अवयव बाधित झाले आहेत की नाही हे नियमितपणे तपासावे लागते व जर हानी सुरू झाली असेल तर त्यासाठी लगेच उपचारही घ्यावे लागतात. या आजारामध्ये जे मृत्यू होतात ते सहसा गुंतागुंत झाल्यामुळे, अवयव निकामी झाल्यामुळे होतात आणि म्हणून या आजाराला आजारांना “किलर्स” म्हणजे “मृत्यू दाते आजार” असेही म्हणतात.

हे आजार “मेटाबोलिक डिसऑर्डर्स ” देखील आहेत म्हणजे “चयापचय क्रियेशी संबंधित आजार”. चयापचय क्रिया ही आपले शरीर व्यवस्थित काम करावे यासाठी अतिशय महत्त्वाची असते आणि जेव्हा या क्रियेमध्ये काही दोष निर्माण होतात त्या वेळेला त्यांचे परिणाम हे शरीरातील विविध अवयवांवर दिसून येतात. तसेच त्यामुळे एकाहून अधिक शारीरिक क्रिया बाधित होऊ शकतात. यामुळे या आजारांचे नियंत्रण करण्यासाठी रुग्णाला विविध प्रकारे प्रयत्न करावे लागतात. तरच आरोग्याची गाडी पुन्हा रुळावर येते.

या आजारांची अजून एक गंमत म्हणजे या आजारांची सुरुवात झालेली आपल्या लक्षात येत नाही म्हणजेच मुख्य आजारापूर्वी काही वर्षे शरीरामध्ये हे दोष निर्माण होत असतात. पण काही लक्षणे दिसत नसल्याने आपल्याला हे बदल जाणवत नाहीत. मात्र ते आपल्या शरीराचे नुकसान करतच असतात. म्हणून हे आजार सायलेंट आहेत , नकळत होणारे आजार आहेत.

उदाहरणार्थ रुग्णाला मधुमेह होण्यापूर्वी साधारण पाच ते आठ वर्षे रुग्ण हा प्री-डायबेटिक स्टेजमध्ये म्हणजे मधुमेह-पूर्व पायरीवर असतो .  या काळात रुग्णाच्या शरीरातील इन्सुलिन अवरोध हा वाढत जातो. यामध्ये काही साधी लक्षणे असतात जसे लठ्ठपणा विशेषतः पोटाच्या भागातील लठ्ठपणा वाढणे , मानेवर काळसरपणा वाढणे,  मानेवर छोटे स्किन टॅग्ज वाढणे.  या लक्षणांकडे आपण सहसा लक्ष देत नाही आणि हळूहळू शरीराची चयापचय क्रिया अधिकाधिक बिघडते आणि शेवटी रुग्णाला मधुमेह होतो. या काळात जर आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारली तर हे आजार टाळणे शक्य असते.

हे आजार “सायलेंट” म्हणजे “मूक आजार” आहेत. म्हणजेच आजार कधी सुरू होतो याची आपल्याला काहीही कल्पना येत नाही . कारण या आजाराची विशिष्ट अशी लक्षणे नाहीत आणि जी लक्षणे असतात ती इतक्या हळूहळू व कमी प्रमाणात वाढतात की बऱ्याचदा रुग्णाला त्रास लक्षातही येत नाही.  बऱ्याचदा इतर कुठल्या कारणाने रक्ताची किंवा बीपीची तपासणी केली जाते आणि मग समजते की रक्तातील साखर तर खूपच जास्त आहे किंवा बीपी खूपच जास्त आहे. तपासणी आत्ता झाली असली तरी आजाराची सुरुवात त्यापूर्वी काही वर्ष असू शकते.

हे आजार सहसा लक्षण-विहीन असल्याने जेव्हा अचानक रुग्णाचा रिपोर्ट दाखवतो की रुग्णाला मधुमेह आहे किंवा उच्च रक्तदाब आहे , तेव्हा रुग्ण हे स्वीकारायला तयार होत नाही . त्याला वाटते की “मला तर काहीच त्रास नाही, मग डॉक्टर हा आजार आहे असे का सांगतात बरे?”.  समाजात ऍलोपथीच्या डॉक्टरांबाबत अनेक गैरसमज पसरवलेले असल्याने रुग्णाला वाटते की “डॉक्टर विनाकारण आपल्याला गोळ्या सुरू करायला सांगत आहे ” आणि रुग्ण डॉक्टरांचा सल्ला मानत नाहीत,  नियमितपणे औषधे घेत नाहीत.  अर्थातच यामुळे त्यांना कोणतीही लक्षणे जरी जाणवत नसली तरी शरीराच्या आतमध्ये शांतपणे नकळत हे आजार विविध अवयव निकामी करत असतात आणि मग अचानक या रुग्णांना आजाराच्या गुंतागुंतीमुळे गंभीर त्रास होतो आणि रुग्णालयात दाखल करावे लागते तर कधी कधी त्यांचा मृत्यू ओढवतो.

हे आजार चयापचय क्रियेशी संबंधित असल्याने हे पूर्णपणे बरे करणे सहसा शक्य नसते, मात्र ते नियंत्रित ठेवता येतात.  मात्र इतर काही तज्ञ हे आजार पूर्ण बरे होण्याचा दावा करतात तसेच एलोपथीच्या औषधांच्या साईड इफेक्टचा बागुलबुवा उभा करून रुग्णांना घाबरवतात.  त्यामुळे रुग्ण त्यांच्या रक्तातील साखर किंवा रक्तदाब नियंत्रित ठेवून आजार वाढू न देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी अशा फसव्या उपायांच्या मागे लागतात . मग त्यांचा आजार वेगाने वाढतो आणि विविध गुंतागुंती निर्माण करतो. एकदा गुंतागुंत होऊ लागली की मग आयुष्य पुन्हा पूर्वीसारखे व आरोग्यपूर्ण राहत नाही.

हे आजार होण्याची कारणे अनेक असल्याने त्यावरील उपचार ठरवताना रुग्णाच्या गरजेनुसार वेगवेगळे मार्ग निवडता येतात.  तसेच एकाहून अधिक उपायांचा वापर केल्यास अधिक चांगले नियंत्रण शक्य होते.  तसेच, रुग्णाच्या सहकार्या शिवाय आणि रुग्णाने आरोग्यपूर्ण जीवनशैली स्वीकारल्याशिवाय हे आजार नियंत्रित होत नाहीत.  निव्वळ औषधे खाऊन आजार नियंत्रित करणे थोडेसे अवघड असते. रुग्णांना आहार-विहाराचे तसेच व्यायामाचे व्यवधान / पथ्य पाळावे लागते आणि जर काही व्यसने असतील तर ती थांबवावी लागतात. रुग्णाने स्वतःचे वजन देखील नियंत्रणात ठेवायला हवे तसेच ताण-तणावाचे नियोजन करायला हवे. रुग्णाने स्वतःची दैनंदिन काळजी घेणे तसेच गुंतागुंत ओळखण्यासाठी व टाळण्यासाठी नियमित तपासण्या करणे अत्यावश्यक असते. या आजारासाठी बरीच औषधे उपलब्ध असल्याने प्रत्येक रुग्णाचे उपचार हे वेगळ्या प्रकारे होऊ शकतात तसेच जसजसा काळ पुढे जाईल त्यानुसार औषधे बदलावी लागू शकतात . यासाठी रुग्णांनी नियमितपणे आपल्या डॉक्टरांची भेट घ्यायला हवी आणि वेळोवेळी नियंत्रण व्यवस्थित आहे ना याची खात्री करायला हवी. मात्र बरेच रुग्ण असे करणे टाळतात. नियमित तपासण्या व व डॉक्टरांना नियमित भेटणे या गोष्टी न केल्यास आजार वाढलेला लक्षात येत नाही आणि अचानक गुंतागुंत होऊ शकते.

हे आजार जरी “सायलेंट किलर्स ” असले तरीही विज्ञानाच्या प्रगतीमुळे त्यांचे नियंत्रण कसे करावे याची माहिती डॉक्टरांकडे असते.  तुम्हाला हे आजार असतील तर या आजारांना व्यवस्थित समजून घ्या.  याच्या उपचारांना समजून घ्या.  औषधोपचारासोबतच आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारा आणि आपल्या डॉक्टरांना नियमितपणे भेट देऊन त्यांच्या सल्ल्याचे पूर्णपणे पालन करा.  हे आजार नियंत्रित ठेवून अधिकाधिक काळासाठी आरोग्यपूर्ण जगणे हे शक्य आहे. मात्र त्यासाठी मनाचे नियमन करावे लागते. आणि तुम्हाला हे आजार अजून झालेले नसतील तर आत्तापासूनच आरोग्यपूर्ण जीवनशैली स्वीकारा आणि हे आजार सुरू होताच लवकर समजावे यासाठी नियमितपणे रक्ताच्या व बीपीच्या चाचण्या आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करत रहा.

या आजारांनी आपल्या शरीराचे नुकसान करण्यापूर्वीच त्यांना ओळखून पूर्णपणे काबूमध्ये ( नियंत्रणात) ठेवणे हा या आजारांशी लढण्याचा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. असे केल्यास हे “सायलेंट किलर्स” तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत.

  • डॉ प्रिया प्रभू ( देशपांडे) MD PSM
    रोगप्रतिबंधक शास्त्र तज्ञ
    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , मिरज.
    drprdeshpande2@gmail.com
  • पूर्वप्रसिद्ध झालेली लिंक ( श्रेष्ठ महाराष्ट्र )
  • https://shreshthmaharashtra.com/knowledge_bank/diabetes-health-blood-pressure/

Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

One response to “सायलेंट किलर्स”

  1. Cardiac arrest – आकस्मित हृदयगती अवरोध – Dr Priya Insights

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.