आजची पोस्ट माहिती देण्यासाठी नाही तर माहिती घेण्यासाठी आहे.
आत्ताच एक रील बघितले . तुम्हीही बघा.
तुमच्या घरी एखादे मोठे मुल असेल आणि नंतर दुसऱ्या बाळाला तुम्ही पाजत असाल तर – पहिला मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे – कधी कधी ते मोठे मुल नव्या बाळाला पाजण्याचा प्रयत्न करतात. किंवा आपल्या बाहुलीला किंवा दुसऱ्या कोणत्याही खेळण्याला आपल्या छातीशी घेऊन पाजण्याचा प्रयत्न करतात.
त्यांनी असे करणे योग्य आहे का?
मोठ्या मुलांच्या समोर आपण नव्या बाळाला पाजणे योग्य आहे का?
तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगू शकता.
आता माझे विचार सांगते.
लहान मुलांसाठी स्तनपान ही एक अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. आईचे स्तन हे मुलांसाठी अन्न मिळण्याची जागा असते.
हे आपल्याला लक्षात ठेवायला हवे की निसर्गाने स्तन हे केवळ बाळाला स्तनपान देण्यासाठीच निर्माण केलेले आहेत. मात्र स्तनांना सेक्शुअलाईज आपण आणि मीडियाने केले आहे.
त्यामुळे मोठ्या मुलाने किंवा मुलीने नवीन बाळाला पाजण्याचा प्रयत्न करणे ही एक अत्यंत नैसर्गिक कृती आहे. कारण मुले ही मोठ्यांचे अनुकरण करत असतात आणि रडणाऱ्या लहान बाळाला शांत करण्यासाठी छातीला लावले पाहिजे हे त्या चिमुकल्या दादा किंवा ताईला समजते.
त्यामुळे वरील रीलसारखी अशी एखादी घटना तुमच्या घरी घडली तर याबद्दल कोणतीही नकारात्मक भावना मनात ठेवू नका. त्या चिमुकल्या ताई किंवा दादाचे लहान बाळाला पाजण्याचे कृत्य हे नैसर्गिक आहे.
खरे तर स्तनपानाचे कौशल्य हे असेच शिकायचे असते . पूर्वीच्या काळी मुली मोठ्या होईपर्यंत आपल्या कुटुंबामध्ये कोणत्या ना कोणत्या स्त्रीला स्तनपान देताना बघायच्या आणि त्यामुळे स्तनपानाचे कौशल्य त्यांना आपोआपच आत्मसात व्हायचे.
पण आज-काल एकत्र कुटुंब नसल्याने मुलांनी वाढताना कोणाला स्तनपान देताना बघितलेले नसते आणि त्यामुळे मोठे झाल्यावर व आई झाल्यावर स्तनपान देताना अडचणी येऊ शकतात.
त्यामुळे जर कोणी लहान मुले तुम्हाला स्तनपान देताना बघत असतील तर त्यातून ती शिकत आहेत आणि त्यांच्या मुलांना स्तनपान देण्यासाठी या निरीक्षणाचा त्यांना उपयोग होणार आहे हे आपण लक्षात ठेवूया.
आणि म्हणूनच स्तनपान ही एखाद्या खोलीमध्ये कोपऱ्यात बसून लपून करण्याची गोष्ट नसून बाळाला अन्न देण्याची एक अत्यंत नैसर्गिक क्रिया आहे. त्यामुळे याविषयी मनात कोणताही किंतु न बाळगता बाळाला जेव्हा हवे असेल तेव्हा नक्की स्तनपान द्या.
न जाणो, आजूबाजूचा एखादा चिमुकला दादा किंवा ताई यातून महत्त्वाचे धडे घेतील.
डॉ प्रिया प्रभू, मिरज


Leave a Reply