विविध कारणांनी बाळाचा जन्म योनीमार्गाऐवजी शस्त्रक्रिया करून म्हणजे सिझरद्वारे होतो.
सिझर करण्यासाठी कधी आईच्या आरोग्याशी संबंधित कारणे असतात, तर कधी गरोदरपणाशी संबंधित कारणे असू शकतात. कधी बाळाच्या आरोग्याला किंवा जीवाला धोका असतो.
जे कारण असेल त्यानुसार सिजर हे पूर्वनियोजित असू शकते किंवा आकस्मित करावे लागू शकते.
मात्र सिझरने बाळाचा जन्म झाला असेल तर त्यानंतर स्तनपान सुरू करताना काही अधिक काळजी घ्यावी लागते, जी घेतली नाही तर स्तनपानाची सुरुवात होण्यास उशीर होऊ शकतो.
लोकांचा जो समज आहे की “सिझर झाले तर दूध व्यवस्थित येत नाही”, हा चुकीचा आहे. सिझर झाल्यानंतरही एका तासाच्या आत स्तनपान सुरू करण्यासाठी जर प्रयत्न केले गेले आणि बाळाला वारंवार पाजण्यासाठी आईजवळ दिले तर स्तनपान हे सिझरनंतरदेखील व्यवस्थित होऊ शकते.
आज आपण सिझर जन्मानंतर बाळाला स्तनपानासाठी जवळ कसे घेता येईल, कसे पकडता येईल याचे विविध होल्ड्स (breastfeeding holds after LSCS) बघूया.

वरील फोटोमध्ये सिजर जन्मानंतर स्तनपानासाठी बाळाला धरण्याच्या विविध पद्धती दाखवल्या आहेत. या सर्व पद्धतींमध्ये एक मुख्य काळजी घेतली गेलेली आहे, ती म्हणजे बाळाचे वजन आईच्या पोटावर आलेले नाही किंवा शस्त्रक्रियेच्या जखमेवर बाळाचा धक्का लागत नाहीये. ही काळजी सुरुवातीचा काही काळ म्हणजे आठ ते दहा दिवस घेतली की नंतर आई कोणत्याही पद्धतीने बाळाला पाजू शकते. हे holds मुख्यतः आईला उठून बसता येईपर्यंत आणि जखम भरेपर्यंत वापरण्यासाठी सुचवले आहेत . त्यानंतर हे किंवा इतर कोणतेही hold वापरून आई पाजू शकते, आई व बाळाच्या सोईनुसार ठरवायचे !
ऑपरेशन झाल्या झाल्या आईला उठून बसणे जेव्हा शक्य नसते त्या वेळेला आई झोपलेली असताना बाळ आईजवळ नेता येते मग कधी आई एका कुशीवर वळून ( side lying position) बाळाला पाजू शकते किंवा बाळ आईच्या स्तनाला लावताना तिच्या खांद्याच्या बाजूने आईजवळ नेता येते. पोस्टच्या नावाजवळ एक फोटो दिसला असेल ज्यामध्ये बाळ आईच्या खांद्याजवळून स्तनापर्यंत पोचलेले दिसतेय. अर्थात असे करण्यासाठी इतर कुटुंबीयांचे मदत आवश्यक आहे. यासाठी रेलून बसून पाजणे , ज्याला laid back position असेही म्हणतात, ती पद्धतही वापरता येऊ शकते.
आईला थोडे उठून बसता येऊ लागल्यानंतर मात्र आई फुटबॉल पोझिशन ( football position) मध्ये तसेच सुधारित पाळणा पद्धतीने म्हणजे क्रॉस cradle position मध्ये बाळाला पोटावर उंच धरून पाजू शकते. तसेच नियमित रेलून बसण्याची पद्धती ( laid back position) ही वापरता येऊ शकते. (फुटबॉल पद्धतीमध्ये बाळाचे शरीर आईच्या खांद्याखाली असते आणि केवळ त्याचे डोके आईच्या स्तनाजवळ असते. )
जर आईला प्रत्यक्ष स्तनपान देता येत नसेल तर हाताने किंवा पंपने स्तनातील दूध काढून देखील बाळाला कप द्वारे ( cup feeding) देता येऊ शकते.
सिझरनंतर आईला कमीत कमी त्रास होऊन बाळाचे स्तनपान मात्र सुरू ठेवता येईल यासाठी काय करावे याविषयी माहिती नसल्याने स्तनपान सुरू होण्यास अडचणी येतात. सिझर नंतर स्तनपान देण्यासाठी ज्या विविध पद्धती उपलब्ध आहेत त्यातील कोणतीही पद्धत वापरून स्तनपान सुरू करता येते व नियमितपणे देता येते. मात्र यासाठी कुटुंबीयांची साथ अत्यावश्यक आहे.
नियमितपणे स्तन रिकामे केल्याने दूध लवकर येते आणि यासाठी दर दोन तासांनी बाळाला स्तनाला लावले पाहिजे. अन्यथा दूध काढून स्तन रिकामे करायला हवे .
डॉ प्रिया प्रभू , मिरज
(सबस्क्राईब/लाईक करून ईमेल द्वारे लेखाच्या लिंक मिळवा )




Leave a Reply