स्तनदा मातांची सुपरपॉवर

Written by:

माझा स्वतःचा स्तनपानाचा प्रवास साधारण दोन दशकांपूर्वी पार पडला. मात्र माझी एक इच्छा अपुरी राहिली. त्यामुळे आता माझी चाळीशी उलटून गेली आहे तरी कधीतरी मध्येच विचार येतो की “ती अपुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा ब्रेस्ट मिल्क artificially induce करायचे का?” 

ती अपुरी इच्छा म्हणजे स्तन्याचे ( आईच्या दुधाचे) दान करणे! स्वतःला कोणताही धोका निर्माण होऊ न देता जिवंतपणी आपण करू शकणारी अशी दोन दाने आहेत – एक आहे रक्तदान आणि एक आहे स्तन्यदान! मी रक्तदान बऱ्याच वेळा केलं मात्र दोन दशकांपूर्वी मिल्क बँक उपलब्ध नसल्याने स्तन्यदान मात्र मला करता आले नाही.

भारतातील पहिली मिल्क बँक जरी १९८९ साली मुंबईमध्ये सुरू झाली तरी २००५ नंतरच नवनवीन मिल्क बँक सुरू होण्याचे प्रमाण वाढले. ज्या आया आपल्या बाळाला पाजत आहेत अशा सर्व आया स्तन्यदान करू शकतात. जवळच्या मिल्क बँक मध्ये तुम्ही गेलात तर योग्य ती नोंदणी व तपासणी झाल्यानंतर पंपच्या सहाय्याने स्तनातून दूध काढले जाते,  ज्याचे पाश्चरायझेशन होऊन नंतर ते गरजू नवजात शिशूंना दिले जाते.

“मागणी तसा पुरवठा” या तत्त्वावर स्तनांचे काम सुरू असल्याने आईने स्तन्यदान केले तर आईचे दूध हे कमी न होता वाढते. त्याचप्रमाणे स्तन्यदान करणाऱ्या आईच्या बाळांना दुधाची कमतरताही भासत नाही.  मात्र याबाबत योग्य माहितीचा अभाव असल्याने खूपशा आया हे स्तन्यदानाचे पवित्र काम करीत नाहीत. अर्थात तुमच्या गावी एखादी मिल्क बँक असायला हवी तरच तुम्ही स्तन्यदान करू शकता.

LT hospital , Mumbai started the first milk bank.

पुण्यासारख्या शहरांमधील काही मिल्क बँक (उदा. डी वाय पाटील रुग्णालयाची मिल्क बँक ) या तुमच्या घरी कर्मचारी पाठवून तुम्ही घरीच काढून साठवलेले दूध देखील घेऊन जाऊ शकतात.  मात्र तुम्ही योग्य प्रकारे काळजी घेऊन ते दूध काढायला हवे , तसेच ते साठवण्यासाठी योग्य प्रकारचे फ्रिजर/ सुविधा तुमच्याकडे उपलब्ध हवेत . अन्यथा मिल्क बँक मध्ये जाऊन स्तन्यदान करणे हा सर्वात सोपा उपाय आहे.

अपुऱ्या दिवसाच्या किंवा कमी वजनाच्या किंवा आजारी बाळांसाठी आईचे दूध हे जीवन रक्षक ठरते.  अशावेळी गरज भासल्यास अगदी सांगली कोल्हापूर भागांमधील बाळांसाठीही पुण्यातील काही मिल्क बँक दुधाचा पुरवठा उपलब्धतेनुसार करतात.

काही आयांना अतिरिक्त प्रमाणात दूध तयार होते.  अशावेळी ते वाया जाण्याऐवजी किंवा आईला दुधाच्या गाठी होऊन त्रास होण्याऐवजी ते दूध पंप करून काढून नंतर दान करणे हे योग्य ठरते.  अशा काही आया आहेत ज्यांनी ६०-६५ लिटर दूध दान केले आहे. आपल्या दुधामुळे एखाद्या नवजात शिशू चा जीव वाचणार असेल तर किती आनंदाची बाब आहे.

बाळाला जर आईचे दूध मिळणार नसेल तर इतर कोणत्याही आईचे दूध हा सर्वात पहिला पर्याय असतो. ह्युमन मिल्क ला पर्याय ह्यूमन मिल्क ! जर हा मार्ग उपलब्ध नसेल तरच मग फॉर्मुला देण्याचा विचार केला जातो. पूर्वीच्या काळी दाईमा किंवा दूध-आई अशा इतर बाळांना पाजायच्या.  आता सर्व तपासण्या केलेले सुरक्षित दूध मिल्क बँक मार्फत NICU मधील बाळांना दिले जाते.

आपल्या जुळ्या मुलांना स्तनपान देणारी माझी फेसबुक मैत्रीण तेजल हिने लिहिलेली स्तनपानसंबंधी लघुकथा आज ऐकली आणि वाटले की स्तन्यदानाबद्दल लिहायला हवे! दुधाने स्तन दाटण्याचा अनुभव आलेल्या प्रत्येक मातेला दूध काढण्याचे महत्व माहित आहे. त्या भोवती गुंफलेली ही एक मजेशीर गोष्ट आहे. 

गोष्टीची लिंक – https://youtu.be/aK2utM-2KGw?si=GdvQhDf6vOXcYg5-&sfnsn=wiwspwa

तुम्ही स्तनदा माता असाल आणि तुमच्या शहरांमध्ये मिल्क बँक असेल तर एकदा तरी स्तन्यदान करण्याचा संकल्प करा. कारण ही संधी आयुष्यात नेहमी उपलब्ध नसते.  फक्त आपल्या बाळाला पाजतानाच आपण इतर बाळांचा जीव वाचवू शकतो. ही सुपर पॉवर नक्की वापरा. करके देखो अच्छा लगेगा!

डॉ प्रिया प्रभू , मिरज


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.