MPox हा आजार सर्वप्रथम १९७० साली माणसांमध्ये सापडला असला तरी याचा जगभरामध्ये प्रसार होण्याची सुरुवात २०२२ मध्ये झाली आणि त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने इमर्जन्सी जाहीर केली. मात्र ती २०२३ मध्ये संपली. त्यानंतर लगेच दोन वर्षांमध्ये १४ ऑगस्ट २०२४ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा Mpox बाबत इमर्जन्सी जाहीर केलेली आहे, जिला PHEIC असे म्हटले जाते.
Public Health Emergency of International Concern (PHEIC) म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होईल अशा प्रकारची परिस्थिती. Mpox च्या विषाणूला एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला बाधित करण्याची क्षमता प्राप्त होणे आणि अनियंत्रितपणे आफ्रिकेच्या विविध देशांमध्ये याचा प्रसार होणे ही घटना एक इमर्जन्सी समजली आहे.
MPox हा Small Pox (देवी) विषाणूच्या कुटुंबातीलच ,मात्र त्याहून सौम्य असा एक विषाणू आहे. देवीच्या आजाराचा मृत्यूदर ३० ते ५०% होता. MPox चा मृत्यूदर विषाणूच्या प्रकारानुसार १ ते १०% पर्यंत असू शकतो. आफ्रिकेमध्ये सुरू असलेला Mpox आजाराचा मुक्त प्रसार हा देवीच्या आजाराच्या निर्मूलनाचा साईड इफेक्ट आहे असेही म्हणता येईल.
देवी आजाराविरुद्धच्या लसीचा शोध लागल्यानंतर लसीकरणाचा वापर करून देवीच्या विषाणूचे जगभरातून उच्चाटन करण्यात आले. देवीच्या रोगाचा सर्वात शेवटचा रुग्ण १९७७ साली सोमालियामध्ये सापडला होता. १९८० साली देवीच्या आजाराचे संपूर्णतः निर्मूलन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आणि त्यानंतर देवीच्या आजाराविरुद्ध दिली जाणारी लस देणे देखील बंद केले. ही प्रभावी लस देवीचा आजार तर टाळायचीच पण त्यासोबतच देवीच्या आजारासदृश्य जे इतर काही आजार होते जसे cow pox, monkey pox असे इतर आजारही या लसीमुळे टाळले जात होते.
१९८० नंतर ज्यांचा जन्म झालाय अशा सर्व व्यक्तींना देवीच्या आजारावरची लस मिळालेली नाही. यामुळे गेल्या ४ दशकांमध्ये या आजाराविरुद्ध प्रतिकारशक्ती उपलब्ध नसलेल्या लोकांची संख्या जगभरात हळुहळू वाढत आहे. अश्यावेळी MPox विषाणुमध्ये म्युटेशन झाल्याने या विषाणूची प्रसारक्षमता वाढली आणि Mpox चे रुग्णही वाढू लागले.
यातही गंमत अशी आहे की २०२२ साली Mpox चा जो प्रसार झाला तो प्रसार Clad II b या गटातील विषाणूमुळे झाला. याचा आजार हा सौम्य लक्षणांचा असतो. तसेच याचा मृत्यू दर देखील कमी असतो. २०२२ पासून जगभरामध्ये ९९००० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. भारतातही एकूण ३० रुग्ण सापडले होते. सद्यस्थितीत याचा प्रसार हा अतिनिकटच्या स्पर्शातून तसेच फोडातील रसाद्वारे घडून आला. २०२२ मध्ये हा आजार मुख्यतः लैंगिक साथीदारांमध्येच पसरला.
२०२४ साली आता पुन्हा जो Mpox चा प्रसार सुरू झालाय तो मात्र Clad I b या गटातील विषाणूंमुळे होतोय. याचा आजार हा अधिक गंभीर समजला जातो आणि याचा मृत्यूदर ३ ते १०% पर्यंत असू शकतो.
यावेळी या आजाराच्या प्रसारासाठी अनेक मार्ग आहेत. निकट सहवास किंवा स्पर्श हा मुख्य मार्ग आहेच. तसेच, कधी फोडातील रस किंवा जखमेची खपली तसेच कधी रुग्णाला झालेल्या सर्दी खोकल्यामुळे उडणारे तुषार किंवा कधी रुग्णांनी हाताळलेल्या वस्तू यामुळे आजार पसरतो. तर कधी संसर्गित आईपासून पोटातील बाळाला तर कधी बाधित प्राण्यापासून माणसाला तर कधी बाधित माणसापासून प्राण्याला हा विषाणू संसर्गित करू शकतो. याच्या प्रसाराचे मार्ग अनेक असल्याने घ्यावी लागणारी काळजीही अधिक आहे. यामुळे आफ्रिकेमध्ये प्रौढ व्यक्तींबरोबरच पंधरा वर्षाखालील मुलांमध्येही या आजाराचे प्रमाण दिसून आले आहे. आणि ही खरी चिंतेची बाब आहे.
ज्या देशांमध्ये या नव्या विषाणूने अजून प्रवेश केलेला नाही त्या देशांनी काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या हा आजार प्रथमतः आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या प्रवाशांमध्ये आढळून येत आहे . आज अखेर पाकिस्तान, स्वीडन आणि थायलंड (आणि आता भारत ) या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासी बाधित झालेले आढळून आले आहेत. त्यामुळे या अजाराचा शोध घेणे हे सध्या शक्य आहे.
शरीरामध्ये जंतूचा प्रवेश झाल्यानंतर साधारणत: ६ ते १३ दिवसांमध्ये याची लक्षणे दिसू लागतात मात्र यासाठी जास्तीत जास्त २१ दिवस लागू शकतात. म्हणजेच प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवाश्याने भारतात परत आल्यानंतर तीन आठवडे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे आणि तापासह शरीरावर फोडी उठणे व लिंफनोड म्हणजे लसिका ग्रंथी वाढणे अशी लक्षणे आढळल्यास याविषयी सरकारला माहिती देणे आवश्यक आहे. या खेरीज एखाद्या वायरल आजाराची सर्व लक्षणे दिसू शकतात जसे अंगदुखी, डोकेदुखी, पाठ दुखी, स्नायू दुखी, सर्दी, खोकला इत्यादी.
या आजाराला बरे करणारे औषध उपलब्ध नसल्याने तसेच हा आजार देशामध्ये स्थिरस्थावर होऊ नये यासाठी सध्या प्रत्येक रुग्ण ओळखून रुग्णाचे विलगीकरण करणे म्हणजेच रुग्णाला इतर व्यक्तींपासून दूर ठेवणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. हा आजार मुदतीचा आजार आहे आणि सर्वसाधारणपणे दोन ते चार आठवडेपर्यंत रुग्ण इतरांना संसर्ग देऊ शकतो. त्यामुळे या कालावधीसाठी रुग्णांना चिन्हीत केलेल्या (ठरवलेल्या) विशिष्ट दवाखान्यांमध्ये दाखल केले जाईल , जेणे करून हा आजार पुढे पसरणार नाही . प्रत्येक रुग्णाच्या निकट सहवासितांची माहिती घेऊन त्यांच्यावर २१ दिवस लक्ष ठेवले जाईल म्हणजे आजार पुढे पसरला असेल तर लगेच लक्षात येईल. सद्यस्थितीमध्ये हा आजार भारतात प्रवेश करू नये, प्रवेश केल्यास लगेच लक्षात यावा आणि त्या रुग्णापासून पुढे पसरू नये हेच सर्वात महत्त्वाचे आहे. आणि यासाठी विलगीकरण करण्याशिवाय इतर चांगला उपाय उपलब्ध नाही. प्रसाराचा सर्वाधिक धोका हा रुग्णाच्या कुटुंबीयांना आहे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना आहे.
मात्र भारतात प्रवेश करणारे रुग्ण ओळखण्यात तसेच त्यांच्यापासून पुढे प्रसार रोखण्यात जर आपण यशस्वी ठरलो नाही तर मात्र विषाणू प्रसाराचे अनेक मार्ग उपलब्ध असल्यामुळे हळूहळू काही वर्षांच्या काळामध्ये हा आजार आपल्या देशामध्ये स्थिरस्थावर होऊ शकतो. आणि असे झाले तर या आजाराचा धोका हा लहान मुले, गरोदर स्त्रिया, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या व्यक्ती यांना जास्त असेल.
MPox ला देशात प्रवेशापूर्वीच थांबवणे हे सरकार व सर्व जनतेच्या सहकार्य शिवाय शक्य नाही. सर्व जनतेला विनंती आहे की याविषयी योग्य शास्त्रीय माहिती घ्या आणि जे वेळोवेळी निर्देश दिले जातील त्यांचे पालन करा. अन्यथा एक नवा आजार आपण भारतात घेऊन येऊ. या आजाराला घाबरण्याची गरज नाही तसेच याविषयी काही लपवाछपवी करण्याचीही गरज नाही. तापासह अंगावर फोड आले असतील तर डॉक्टरांना त्याची कल्पना अवश्य द्या. संपूर्ण देशाला सुरक्षित ठेवण्यासाठीचे हे एक महत्त्वाचे कार्य आहे.
डॉ प्रिया प्रभू (देशपांडे) , MD (PSM)
साथरोगतज्ञ, मिरज.
( श्रेष्ठ महाराष्ट्र या साईटवर हा लेख यापूर्वी पूर्वप्रसिद्ध झाला आहे https://shreshthmaharashtra.com/knowledge_bank/mpox-viral-infection/ )


Leave a Reply