पंप करताना दुखते का?

Written by:

प्रत्यक्ष स्तनपान असो किंवा पंप वापरून दूध काढणे असो, या दोन्ही गोष्टींमध्ये आईला दुखणे अपेक्षित नाही. 

जर सुरुवातीचे पंधरा-वीस सेकंद सोडून अधिक काळासाठी आईला वेदना जाणवत असतील तर स्तनपान किंवा पंपिंग दोन्ही मध्ये काही ना काही सुधारणा आवश्यक आहे असा त्याचा अर्थ होतो.

प्रत्येक आईला पंप करण्याची गरज भासत नसली तरी काही आयांसाठी ही आवश्यकता असते. 

Electric pump वापरणारी आई

कधीकधी कितीही प्रयत्न केला, तज्ञांचा सल्ला घेतला तरी देखील बाळ स्तनावर व्यवस्थित पकड (Latch) घेऊ शकत नाही. अशावेळी स्तनपान सुरू ठेवण्यासाठी काही माता संपूर्णपणे पंपिंगद्वारेच बाळाला स्तनपान देण्याचा पर्याय निवडतात. कधी बाळ जन्मतः नवजात अतिदक्षता केंद्रामध्ये (NICU) दाखल असल्याने त्या बाळांना दर दोन तासाने आईचे दूध काढून पाठवावे लागते, अशावेळी पंप करणे सोयीचे पडते. ज्या आयांना काही महिन्यात कामावर हजर व्हावे लागणार आहे अशा आया दोन वर्ष स्तनपान सुरू ठेवण्यासाठी पंपिंगचे सहाय्य घेऊ शकतात.  घरी व कामाच्या ठिकाणी पंप करून ते दूध साठवून बाळाला हवे तेव्हा देता येते.

मात्र पंप करताना आईला वेदना होत असतील आणि त्या वेदना काही मिनिटे किंवा पंपिंग संपल्यानंतरही जाणवत असतील तर अशावेळी याकडे तातडीने लक्ष द्यायला हवे.  पुढे सुचवलेले काही बदल केल्यानंतरही जर वेदना कमी होत नसतील तर अशावेळी वैद्यकीय तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

१. सक्शनचे प्रमाण कमी करा.

इलेक्ट्रिक पंपमध्ये सक्शन किती असावे यासाठी सेटिंग्स असतील तर ते सेटिंग कमी करून आधी कमी सक्शनने पंप वापरा आणि गरज पडली तरच सक्शन वाढवा. पंप वर vaccum नावाचे जे बटण असेल त्याचा वापर करून हे कमी करता येते .

प्रत्येक मशीनमध्ये वेगवेगळे सेटिंग असू शकतात कमी सेटिंग वापरून सुरुवात करून हळूहळू ते सेटिंग वाढवता येते.

२. योग्य आकाराचा flange वापरा.

Different flange sizes

तुमचा जो भाग स्तनावर जोडला जातो तो नरसाळ्यासारखा दिसणारा भाग म्हणजे flange. याच्या पाईप मध्ये स्तनाग्र म्हणजे निपलचे टोक असते आणि पंपच्या सक्शननुसार ते सारखे आत बाहेर सरकत असते.

विविध आकाराच्या flange चा परिणाम

पंप विकत घेताना सहसा २४ – २८ मिलिमीटर आकाराचा flange सोबत दिला जातो.  मात्र प्रत्येक स्त्रीच्या निपलचा आकार हा वेगळा असल्याने पंप करताना जर तो फ्लांज गरजेपेक्षा लहान असेल तर निप्पल पाईपच्या बाजूला घासले जाऊन दुखावते व वेदना होतात.  तसेच जर तो फ्लांज आवश्यकतेपेक्षा मोठा असेल तर निप्पल सोबत त्याभोवतीचा काळा भाग देखील पाईप मध्ये ओढला जाऊन वेदना होतात . त्याचप्रमाणे व्यवस्थित सक्शन न झाल्याने स्तन रिकामे होत नाहीत व दूधही कमी निघते.  त्यामुळे योग्य आकाराचा प्लांज वापरणे आवश्यक आहे,  ज्याने वेदना होत नाहीत , इजा होत नाही , स्तन रिकामे होतात, आणि दुधाचा पुरवठाही व्यवस्थित राहतो.

योग्य आकाराचा flange कसा निवडावा?

निप्पलच्या आकाराहून ४ मिमी मोठा flange निवडावा

एखादी साधी पट्टी घेऊन असताना स्तनाग्र म्हणजे निप्पलची रुंदी किती आहे हे मोजावे. रुंदी निपलच्या टोकाजवळ नाही तर वरील चित्रात दाखवल्यानुसार पायथ्याजवळ मोजायची आहे. 

उदा.  निप्पलची रुंदी २० मिलीमीटर असेल तर त्याहून चार मिलिमीटर अधिक आकाराचा फ्लांज (२४ मिमी ) निवडावा जेणेकरून निप्पल पाईपला घासून इजा व वेदना  होणार नाही.

फ्लांजचा आकार योग्य नसणे हे पंप करताना वेदना होण्याचे सर्वात कॉमन कारण आहे.

३. दुग्ध नलिकेमध्ये अडथळा येणे (milk duct blockage)

कधी कधी एखादी दुग्धनलिका ब्लॉक होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक स्तनपान किंवा पंपिंग सेशन संपल्यानंतर आईने स्तनाच्या एखाद्या भागामध्ये वेदना आहेत का किंवा घट्टपणा जाणवत आहे का यावर लक्ष ठेवावे .

असे जर वाटले तर त्या भागाला स्तनाग्राच्या बाजूने थोडे चोळल्यानंतर हा त्रास कमी होऊ शकतो.

तसेच स्तनातून दूध काढण्यापूर्वी त्याच्या पूर्वतयारीच्या पायऱ्या देखील व्यवस्थित कराव्यात. तसेच पंपिंग नंतर स्तन व्यवस्थित रिकामे होतात ना याकडेही लक्ष ठेवावे. हाताने दूध काढून देखील स्तन रिकामे करता येतात.

४. स्तन घट्ट होणे. (Breast engorgement )

वारंवार पंप वापरल्याने काही मातांमध्ये दुधाचे प्रमाण वाढवू शकते आणि अशावेळी पंपिंगची वेळ पुढे मागे झाल्यास स्तनामध्ये दूध साठून स्तन घट्ट होऊ शकतात.

स्तन घट्ट झाल्यास काय करावे यासाठी स्वतंत्र पोस्ट लिहीन.

स्तनपान आणि वेदना यांची जोडी कधीच जुळत नाही त्यामुळे स्तनपान देताना किंवा पंप करताना वेदना असतील तर तज्ञांची मदत घेण्याची आवश्यकता आहे असा त्याचा अर्थ असतो.

डॉ प्रिया प्रभू, मिरज.

(२७/७/२४)


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.