आईचे दूध बाळाला किती काळ पाजायला हवे?

खरे तर हा निर्णय आई आणि बाळाने घ्यायला हवा नाही का? कारण,  आईचे दूध बाळासाठी सर्वोत्तमच असते,  बाळाचे वय कितीही असले तरी!

मात्र याविषयी तुम्हाला अनेक मते मतांतरे ऐकायला मिळू शकतात.  कोणी म्हणतं बाळाला दात येऊ लागले की आईच दूध कमी करायला हवं . कोणी म्हणतं बाळ वर्षाचे झालं की आईचे दूध कमी करायला हवं . कोणी म्हणतात दीड वर्ष . अशाप्रकारे ही अशी अनेक उत्तरे ऐकल्यानंतर नक्की कधी पर्यंत बाळाला पाजणं आवश्यक असतं याविषयी संभ्रम निर्माण होतो.

आपण स्तनपान म्हणजे बाळाला केवळ अन्न देण्याची प्रक्रिया असे समजतो आणि त्यामुळे असे गैरसमज तयार होतात. बाळ मोठे होऊ लागले की मग जे भेटेल ते स्तनपान बंद करण्याबाबत सल्ला देणं सुरू करतात. “अजून बाळाला पाजतीयेस? बंद कर आईचं दूध!”

मात्र स्तनपान बाळाला केवळ अन्न व ऊर्जा देत नाही तर बाळाला स्तनपानातून आधार मिळतो, रोगप्रतिकारक शक्ती मिळते, मानसिक स्थैर्य मिळते, आईचे प्रेम मिळते , जगातील नवनव्या गोष्टी समजून घेण्यासाठी शक्ती मिळते. एखाद्या गोंधळलेल्या बाळाला स्तनपानामुळे सकून मिळतो. सुरक्षिततेची भावना मिळते. बाळाची हुशारी वाढते . बाळाच्या जबड्याची वाढ व्यवस्थित होते.  बाळाच्या एलर्जीज कमी होतात.

स्तनपानातून बाळाला एवढे सर्व फायदे मिळत असताना आणि बाळ स्तनपान थांबवण्यासाठी मानसिक दृष्ट्या तयार नसताना आपण जेव्हा स्तनपान थांबवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा बाळ आणि आई मोठ्या त्रासातून जातात.  मग विविध उपाय वापरून, बाळाला रडवून ते दूध बंद केले जाते.

स्तनपान देणारी आई स्वतःची स्तनांच्या कर्करोगाची जोखीम कमी करत असते. म्हणजेच आई जेवढा अधिक काळ स्तनपान देईल तेवढी जास्त जोखीम कमी होईल. स्तनपान लवकर बंद केले तर म्हणावा तितका फायदा होणार नाही.

तर बाळाला स्तनपान नक्की किती काळापर्यंत द्यायला हवे ?

(इथे आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे की स्तनपान देणे हे एक थकवणारे काम आहे. त्यामुळे ज्या आयांना कुटुंबाकडून व्यवस्थित सहकार्य व मदत उपलब्ध नसते अशा आयांना जास्त काळ स्तनपान देत राहणे हे इतर कामांच्या जबाबदारीमुळे अवघड जाते . त्यामुळे स्तनपान देण्याची जबाबदारी ही केवळ आईची नसून त्या संपूर्ण कुटुंबाची आहे हे आपण लक्षात ठेवायला हवे. )

माणसाचा मेंदू आणि बुद्धिमत्ता माणसाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे बनवतात.  त्यामुळे स्तनपान किती काळ द्यायला हवे हा निर्णय मेंदूच्या वाढीनुसार  ठरवला जातो. कारण मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असणारे अन्नघटक हे केवळ आईच्या दुधात सापडतात. ते इतर कोणत्याही प्राण्यांच्या दुधामध्ये सापडू शकत नाहीत.

आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातील मेंदूची वाढ

वरील चित्रातून आपल्या हे लक्षात येतंय की जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हाच बाळाच्या मेंदूची वाढ ही एकूण क्षमतेच्या 25 % एवढी झालेली असते आणि पुढील दोन वर्षात ती एकूण क्षमतेच्या 50 % म्हणजे निम्मी वाढ ही पहिल्या दोन वर्षात होणार असते आणि पाच वर्षाचे बाळ हे जवळपास 90% मेंदूची वाढ पूर्ण झालेले असते. म्हणजेच जन्मानंतर ची पहिली दोन वर्षे ही मेंदूच्या वाढीसाठी सर्वाधिक महत्त्वाची आहेत.

मेंदुंमधील विविध क्षमतांचा वयानुसार विकास

वरील चित्र वयानुसार लहान मुलांमध्ये विविध क्षमता कशा वाढतात ही माहिती दर्शवते . आपल्या लक्षात येईल की भाषा आणि इतर संवेदी क्षमता या पहिल्या एक ते दोन वर्षांमध्ये सर्वाधिक वाढतात. तसेच आकलन विषयक क्षमता देखील पहिल्या पाच वर्षात अतिशय वेगाने वाढतात. मात्र यासाठी मुलांच्या मेंदूला योग्य तो पौष्टिक खुराक तसेच मानसिक उत्तेजन देखील मिळायला हवे. या काळामध्ये खूप मोठ्या संख्येने चेतापेशींमध्ये (neurons) संवादस्थाने (synopses) निर्माण होतात.

आयुष्याच्या पहिल्या सहा महिन्यातील बाळाच्या अन्नविषयक गरजा आईच्या दुधाद्वारे शंभर टक्के पूर्ण होतात.  त्यानंतर एक वर्षापर्यंतची निम्मी गरज आईच्या दुधाद्वारे भागू शकते आणि दुसऱ्या वर्षातील जवळपास एक तृतीयांश गरज आईचे दूध पूर्ण करू शकते.

मायलीनेशन प्रक्रियेचा कालावधी

मेंदूतील  विविध चेतापेशी सुरक्षित रहाव्यात यासाठी त्या पेशींभोवती मेदाचेआवरण असते, आवरण निर्मितीच्या प्रक्रियेला मायलीनेशन (myelination) असे म्हणतात. ही प्रक्रिया देखील मुख्यतः पहिल्या दोन वर्षांपर्यंत वेगाने सुरू असते. आणि आईच्या दुधामध्ये यासाठी आवश्यक असणारे अन्नघटक मुबलक प्रमाणात असतात.

मला वाटते वरील माहितीवरून तुमच्या लक्षात आलेच असेल की मेंदूच्या सुयोग्य वाढीसाठी बाळाला आईचे दूध मिळणे आवश्यक असते.  तसेच ते कमीत कमी दोन वर्ष मिळणे आवश्यक आहे . कमीत कमी अशासाठी की या काळामध्ये बाळाची व मेंदूची वेगाने वाढ होत असल्याने तेवढा काळ तरी आईचे दूध बाळाला मिळायलाच हवे. २ वर्षांनंतर आई आणि बाळ त्यांच्या स्वतःच्या गरजा आणि क्षमतांनुसार स्तनपान चालू ठेवायचे की नाही याचा निर्णय घेऊ शकतात.

तुम्ही स्तनदा माता असाल आणि दोन वर्ष हा खूप मोठा काळ आहे असे तुम्हाला वाटत असेल तर लक्षात ठेवा –  रोज फक्त त्या एकाच दिवसाचा विचार करायचा आणि हळूहळू दोन वर्ष कसे उलटतात हे लक्षातही येत नाही . तुमच्या पतीशी तसेच कुटुंबीयांशी याविषयी नक्की चर्चा करा आणि बाळाच्या सर्वोत्तम वाढीसाठी आवश्यक असणारे आईचे दूध बाळाला जास्तीत जास्त काळ कसे देता येईल यासाठी एकत्रित निर्णय घ्या .

काही कारणाने दोन वर्षापर्यंतचा स्तनपानाचा टप्पा जरी पूर्ण करता आला नाही तरी याबाबत दु:खी होऊ नका . कारण तुम्ही दिलेले प्रत्येक स्तनपान हे बाळासाठी नक्कीच फायदेशीर होते.  त्यामुळे तुम्हाला शक्य आहे ते सर्व तुम्ही करत आहात याची खात्री बाळगा. आजचा एक दिवस शक्य तेवढे स्तनपान द्यायचे आहे एवढेच लक्षात ठेवा. म्हणजे स्तनपानाचे ओझे वाटणार नाही!

तुमच्या बाळाला कमीत कमी दोन वर्षे आणि शक्य असल्यास त्याहून अधिक काळासाठी स्तनपान देता यावे यासाठी शुभेच्छा!

– डॉ प्रिया प्रभू (MD PSM, IYCN)

Miraj

(२३.७.२४)


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com