चंडीपुरा विषाणूचा आजार आणि सुरक्षेचे उपाय

Written by:

चंडीपुरा विषाणूच्या मेंदूज्वराची साथ सध्या गुजरातसह चार राज्यांमध्ये सुरू आहे आणि काल अखेर साधारण 38 मुलांचा यामुळे मृत्यू झालेला आहे.

हा आजार व त्याचा प्रतिबंध, त्यापासून सुरक्षा याची माहिती थोडक्यात बघूया.

१. चंडीपुरा वायरस हा नवा विषाणू आहे का?

चंडीपुरा व्हायरस हा विषाणू नवा नाही पण अजून सर्वत्र पसरलेला देखील नाही.
हा मुख्यतः मध्य भारतातील विविध राज्यांमध्ये अधून मधून दिसून येतो आणि या आजारामुळे लहान मोठ्या साथी येतात.
हा विषाणू सर्वप्रथम १९६५ साली नागपूर जवळच्या चंडीपुरा गावातील दोन तापाच्या रुग्णांमध्ये सापडला होता. त्यामुळे याचे नाव चंडीपुरा विषाणू ठेवण्यात आले. भारताखेरीज इतर देशात याचे प्रमाण अजून जास्त नाही.

२००३-४ साली या आजाराची एक मोठी साथ आंध्र प्रदेश, गुजरात, आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये आली होती आणि या साथीमध्ये एकूण ३२२ मुले मृत्युमुखी पडली.

2. हा आजार मुख्यतः लहान मुलांनाच का होतो?

हा विषाणू मुख्यतः मेंदू व चेतासंस्थेला संसर्गित करत असल्याने , तसेच लहान मुलांमध्ये ब्लड ब्रेन बॅरियर हे मेंदूला सुरक्षित ठेवणारे संरक्षक-कवच पूर्णतः विकसित नसल्याने जेव्हा या विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा लहान मुलांच्या मेंदूपर्यंत हा विषाणू अतिशय सहजपणे पोहोचतो व आजार निर्माण करतो.
त्यामुळे या आजाराचे सर्व रुग्ण हे १५ ते १६ वर्षाखालील मुले असतात.

3. चंडीपुरा विषाणू कसा पसरतो?

Sand fly नामक अतिशय छोट्या अशा चावणाऱ्या माशी पासून हा विषाणू पसरतो.
ही माशी अतिशय लहान असून साधारण एक ते चार मिलिमीटर एवढाच तिचा आकार असतो. सोबतच्या फोटोमध्ये डासाशेजारी त्या माशीचा आकार लक्षात येईल.

डासाशेजारी sandfly रक्त पिताना

या माशीच्या अंगावर व पंखांवर बारीक बारीक असे खूप सारे केस असतात . माशीचे पंख हे अंगापासून दूर उभे राहिल्यासारखे दिसतात. तसेच या माशीचे मागील पाय हे तुलनेने जास्त लांब असतात.

Sandfly female

ही माशी चावताना लक्षात येत नाही, मात्र चावलेल्या ठिकाणी लाल रंगाची गांधी उठते व ती जागा खूप जास्त खाजवते. सोबतचा फोटो बघा.

Sandfly चावल्यानंतर येणारी पुरळ

4. चंडीपुरा विषाणू आजाराची लक्षणे कोणती?

अतिशय वेगाने वाढणारा तीव्र ताप या आजारामध्ये दिसून येतो. त्याचबरोबर मुलांना उलट्या किंवा पातळ संडास होऊ शकतात. बऱ्याच मुलांना झटके येतात किंवा संभ्रमित अवस्था असते. काही मुलांमध्ये डोकेदुखी मानदुखी अशा प्रकारचे त्रासही दिसून येतात. काही मुलांमध्ये तोल जाणे , बोलायला त्रास होणे, दिसायला त्रास होणे अशा प्रकारची लक्षणे दिसतात.

या आजाराची गंभीरता अतिशय वेगाने वाढते.
हा विषाणू चेतापेशींना संक्रमित करून त्यामध्ये वेगाने वाढतो. तसेच त्या पेशींचा मृत्यू घडवून आणतो.
यामुळे मेंदूशी संबंधित विविध लक्षणे मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात.

तसेच जी मुले या आजारातून वाचतात त्या मुलांमध्ये पुन्हा सर्व ठीक होण्यासाठी बराच कालावधी उलटू शकतो.

5. या आजाराविरुद्ध औषध किंवा लस उपलब्ध आहे का?

या आजाराविरुद्ध कोणत्याही औषधाच्या किंवा लसीच्या चाचण्या अद्याप झालेल्या नाहीत. त्यामुळे उपचार करताना मुलांच्या लक्षणानुसार उपचार करावे लागतात .
मेंदूमधील दाब कमी करणे तसेच गरज पडल्यास श्वासोच्छ्वासासाठी सहाय्य पुरवणे अशा प्रकारचे उपाय करावे लागतात.

6. हा आजार धोकादायक आहे का?

आजाराची गंभीरता अतिशय वेगाने वाढते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर बरेचसे मृत्यू हे पहिल्या २४ ते ४८ तासांमध्येच घडून येतात.
या आजाराचा मृत्युदर साधारण ५५% – ७५% इतका आहे.
म्हणजे यातील दहा आजारी मुलांपैकी केवळ २-४ मुले वाचू शकतात.

7. या आजाराचा धोका कोणाला जास्त आहे?

आधी सांगितल्यानुसार हा आजार मुख्यतः पंधरा वर्षाखालील मुलांमध्ये दिसून येतो.
त्याचप्रमाणे हा आजार सहसा गरीब घरांमधील मुलांमध्ये जास्त दिसून येतो.
याचे कारण म्हणजे सॅन्डफ्लायला वाढण्यासाठी सांदी किंवा भेगा असलेली ठिकाणे आवश्यक असतात आणि अशी ठिकाणे कच्च्या घरांमध्ये तसेच कच्च्या घरांच्या आसपास दिसून येतात.

8. या आजारापासून सुरक्षिततेचे उपाय कोणते आहेत?

या आजारावर औषध किंवा लस नसल्याने हा आजार होऊ नये यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
त्यामुळे सॅन्डफ्लाय या माशीचे नियंत्रण तसेच माशीच्या चाव्यापासून संरक्षण हे दोन उपाय करता येतात.
माशीच्या चाव्या पासून संरक्षण मिळण्यासाठी लहान मुलांना अंगभर कपडे घालणं आवश्यक आहे.

  1. सॅन्डफ्लाय माशीचे नियंत्रण कसे करता येईल?
    ही माशी घरातील व घरा सभोवताली असलेल्या विविध सांदी किंवा चिरा-भेगा यामध्ये वाढत असल्याने कीटकनाशकाची फवारणी करणे हा उपाय करता येऊ शकतो मात्र त्यामुळे शंभर टक्के नायनाट होऊ शकत नाही.

परिसरात स्वच्छता ठेवणे हा उपाय देखील करता येऊ शकेल.

मात्र मुख्यतः कीटकांच्या चाव्यापासून मुलांना सुरक्षित ठेवणे, त्यांना घरात व शाळेत अंगभर कपडे घालणे, गरज पडल्यास एखादे डास विकर्षक (repelent) मलम हातापायांना लावणे असे उपाय करता येतील.

चंडीपुरा विषाणूचा आजार हा कीटकजन्य आजार असल्याने ही साथ साधारणतः स्थानकेंद्रित असते व सर्व दूर पसरण्याची शक्यता कमी असते. मात्र तुमच्या गावात किंवा गावाशेजारी चंडीपुरा विषाणूचा रुग्ण आढळला असल्यास तुम्ही भविष्यातही नियमितपणे काळजी घेणे आवश्यक आहे.

सॅन्डफ्लाय हे कीटक ओलसर दमट जागेमध्ये वाढत असल्याने पावसाळा सुरू झाल्यानंतर या कीटकांचे प्रमाण वाढते व अशावेळी सर्वांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील विदर्भ भागामध्ये यापूर्वी या आजाराचे रुग्ण आढळून आलेले आहेत.

या आजाराला घाबरून न जाता योग्य ती काळजी घेणे, याची लक्षणे ओळखणे व वेळेत सपोर्टिव्ह उपचार सुरू करणे हे महत्त्वाचे आहे.


डॉक्टरांनी देखील अशी लक्षणे असणारी लहान मुले आढळून आल्यास त्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील NIV सेंटरला पाठवून त्याची तपासणी करणे आवश्यक आहे . यासाठी सरकारी दवाखान्यांमधून सहकार्य मिळू शकते.

याविषयी कोणत्याही अफवांना पडू नये. या आजाराबद्दल ICMR च्बळीkया इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च या नियतकालिकामध्ये बरेच शास्त्रीय अभ्यास १९६७ पासून प्रसिद्ध झालेले आहेत.

शास्त्रीय माहिती मनातील भीती घालवते तसेच स्वतःची व इतरांची सुरक्षा वाढवते. त्यामुळे योग्य माहिती इतरांपर्यंत पोहचावी यासाठी माहिती शेअर करा.

  • डॉ प्रिया प्रभू, मिरज MD (PSM) (साथरोग तज्ञ )
  • (२६/७/२४)

Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.