बाळाचा जन्म झाला कि प्रत्येक आई दुध कधी येणार याची वाट बघत असते. तिला माहितच नसते कि चीकदुध असताना दुध येण्याची वाट बघण्याची आवश्यकताच नाही. चीकदुधाचे काही चमचे देखील वाटीभर दुधापेक्षा अधिक पौष्टिक असतात.
जन्मानंतर आई जर दर दोन तासांनी बाळाला चीकदुध देण्यासाठी स्तनाशी लावत असेल तर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आईचे स्तन दाटून येतात. स्तन दाटून आले किंवा कडक झाले कि आईला दुध आले हे समजते. त्यानंतर एखादेवेळेस बाळाला उठायला उशीर झाला कि आईचे स्तन दाटून कडक होतात. आई कामात असेल तर स्तन दाटले म्हणून आईला समजते कि बाळाला पाजायची वेळ झालीए.
बऱ्याचदा स्तन दाटून आले कि पाझरतात – leak होतात. याने कपडे खराब होतात पण आईला ही दुध उपलब्ध असण्याची खूण वाटू लागते . तिला वाटते कि स्तन भरून उतू जाणे म्हणजे पाझरणे.
साधारण दुसऱ्या महिन्याच्या आसपास स्तन कडक होणे कमी होते किंवा बंद होते. स्तन मऊ रहातात, त्यातून दुध पाझरणे देखील कमी होते. आणि आईच्या मनामध्ये शंकासुराचा प्रवेश होतो. तिला वाटू लागते कि माझे दुध कमी झाले आहे म्हणून स्तन आता दुधामुळे घट्ट होत नाहीत. पाझरत नाहीत.
आणि अश्या वेळी बाळ देखील वाढत असल्याने कधीकधी cluster feeding करते. एकत्रित / एकगठ्ठा स्तनपान करणे म्हणजे cluster feeding. हा बाळाच्या वाढीचा नॉर्मल टप्पा आहे. कधीकधी ते एकगठ्ठा पितात, कधीकधी एकगठ्ठा झोपतात. जर बाळाच्या वाढीचे टप्पे आणि त्यानुसार बदलणारे बाळाचे नॉर्मल वागणे आपल्याला माहित नसेल तर आई बिचारी किंवा तिचे सल्लागार तिचे दुध कमी झाले असे समजू लागतात. कारण cluster feeding सुरु असताना बाळ वारंवार दुध मागते, रडते. आधी एकदा पिल्यावर २ तास झोपणारे बाळ cluster feeding सुरु असताना मात्र अगदी अर्ध्या तासातच पुन्हा रडू लागते . आणि आईला आपले दुध नक्कीच कमी झालेय याची जणू खात्री पटते.
मग आई बाळाला सारखी भूक लागतेय आणि माझे दुध तर कमी झालेय अश्या विचाराने वरचे दुध किंवा फॉर्म्युला देणे सुरु करते. फॉर्म्युला / वरचे दुध जेव्हा सुरु होते तेव्हा आईचे दुध कमी व्हायला खरी सुरुवात होते. जर बाळाची गरज बाहेरच्या दुधाने भागत असेल तर आईचे शरीर कमी दुध निर्माण करणार. लक्षात आहे ना – मागणी तसा पुरवठा. वरचे दुध पिऊन झोपलेले बाळ आईच्या स्तनांना कमी वेळा चोखते त्यामुळे शरीर हळूहळू दुध बनवणे कमी करू लागते. म्हणजे बघा- बाळ cluster feeding करते हे माहित नसल्याने विनाकारण त्या आईचे व्यवस्थित येत असणारे दुध कमी व्हायला सुरुवात झाली कि नाही?
आणि जर वरचे दुध/ फॉर्म्युला देण्यासाठी त्या आईने बाटलीचा वापर केला आहेस आणि paced bottle feeding केले नसेल तर मग ते बिचारे बाळ nipple confusion मुळे स्तन नाकारते. बाटलीने अगदी सहज विनासायास मिळणारे दुध असेल तर आईच्या स्तनातून दुध चोखून ओढण्याचे कष्ट कोण बरे करेल? बाळाने स्तन चोखणे नाकारल्याने आईचे दुध वेगाने कमी होऊ लागते किंवा कधीकधी आईला दुधाच्या गाठी होऊन त्रास देखील होऊ शकतो. किंवा दुध पंप करून बाटलीने देत बसावे लागते.
बघा बरे, एवढा सगळा प्रोब्लेम आईच्या व तिच्या सल्लागारांच्या (म्हणजे आज्जीच्या) मनातील शंकासुराने केला. म्हणून स्तनपानाविषयी फक्त आईलाच नाही तर तिच्या जोडीदाराला आणि तिच्या कुटुंबियांना देखील योग्य शास्त्रीय माहिती असायला हवी.

पण मुळात स्तन दाटणे / घट्ट होणे का बंद होते?
बाळ जन्मल्यावर मेंदूतील pituitary ग्रंथीच्या हार्मोन्स मुळे स्तनपान सुरु होते. सुरुवातीला बाळाला दुधाची किती गरज आहे हे शरीराला माहित नसते. पहिले २-३ महिने मानवी बाळ वेगाने वाढत असल्याने वारंवार दुध पिते आणि शरीर देखील दुध निर्मिती नियमन करण्याचा प्रयत्न करत असते. अश्या वेळी वारंवार स्तन दाटून येतात. मात्र २ महिन्याच्या आसपास दुध निर्मितीचे नियंत्रण मुख्यतः मागणी तसा पुरवठा तत्वाने सुरु होतो. याचे नियंत्रण प्रामुख्याने स्थानिक म्हणजे स्तनांच्या स्तरावर सुरु होते. बाळाच्या गरजेचा अंदाज आल्याने मागणीनुसार हवे तसे दुध निर्माण होते. हवे तेव्हा वाढते . बाळाने पिणे कमी केले कि कमी होऊ लागते. म्हणून स्तन दाटण्याचे प्रमाण कमी किंवा बंद होते.
आईला या बदलाची काहीच कल्पना नसल्याने ती दुध कमी झालेले नसले तरी लगेच स्वतःला दोष देते. दुध कमी झाले असा समज करून बाळाला वरचे दुध सुरु करते. मग आईच्या दुधाची मागणी कमी होते आणि म्हणून मग दुध कमी व्हायला सुरुवात होते. आईने स्वतःच्या शरीरावर विश्वास ठेवला आणि स्तन पूर्णपणे रिकामे करणे सुरु ठेवले कि आईचे दुध कमी होत नाही.
बाळ ८+ वेळा व्यवस्थित सुसु करीत असेल आणि बाळाचे वजन वाढत असेल तर आईचे दुध बाळाला पुरत आहे असे समजायला हरकत नसते. त्यामुळे “स्तन घट्ट होत नाहीत” किंवा “स्तन पाझरत नाहीत” किंवा “बाळ वारंवार प्यायला मागत आहे” या कारणांसाठी कधी वरचे दुध सुरु करू नका. मनात काही शंका असल्यास योग्य तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
शंकासुराला मनातून दूर ठेवा. स्तनपान आणि बाळाच्या वाढीविषयी योग्य शास्त्रीय माहिती मिळवा. म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे स्तनपान करणे सहज शक्य होईल. योग्य माहिती इतरांना विशेषतः गरोदर स्त्रियांना सांगायला विसरू नका.



Leave a Reply