स्तन वारंवार धुण्यातील धोके

Written by:

“म्हणजे स्तन धुवायचे नसतात? काहीतरीच काय?”

“2-3 तासापूर्वी बाळाला पाजले होते आणि आत्ता परत पाजताना स्तन धुवायला नको का ? काही जंतुसंसर्ग झाला तर मग? आम्हाला तर सांगितलंय की पाजण्यापूर्वी स्तन धुवा म्हणून मग मी अगदी साबणाने धुवून मगच पाजते !”

अरे हो हो , आधी ऐकून तर घ्या आणि मग जे योग्य वाटते तसे करा , बस ?

निसर्गाचे स्तनपानाचे नियम आणि माणसाने ठरवलेले स्तनपानाचे नियम वेगळे असू शकतात . माझा निसर्गाच्या नियमांवर जास्त विश्वास आहे . स्तनपान जेवढे नैसर्गिक नियमांनुसार होईल तेवढे ते यशस्वी होण्याची शक्यता वाढते . मग स्वच्छतेबाबत निसर्गाचे काय म्हणणे आहे?

स्तनपानासाठी तयारी निसर्ग स्त्री गरोदर असताना सुरू करतो. स्तन मोठे होतात. स्तनाग्राचा भाग (areola) मोठा होऊ लागतो , त्याचा रंग बदलून जास्त गडद , काळा दिसू लागतो. त्यावर लहानलहान उंचवटे दिसू लागतात. (फोटो पहा )

या प्रत्येक कृतीला अर्थ असतो .

नवजात शिशूला स्तनाग्र कुठे आहे हे दिसावे म्हणून ते मोठे व गडद होते . स्तनांची दिशा समजावी म्हणून त्या उंचवट्याखालील ग्रंथी तैलीय पदार्थ बनवतात त्याचा गंध गर्भाशयातील पाण्यासारखा असतो आणि हा गंध बाळाला परिचयाचा असतो. ते उंचवटे म्हणजे Montgomery’s tubercles जो तैलीय स्त्राव सोडतात त्याने बाळ पिताना स्तनाग्राशी घर्षण कमी होते आणि स्तनाग्रे मऊ राहण्यास मदत होते .

मानवाने ठरवलेल्या नियमानुसार जर स्तन धुतले तर निसर्गाची तयारी आणि संरक्षक व्यवस्था निकामी होते आणि बऱ्याच वेळा स्तनाग्रे कोरडी पडून त्याला भेगा पडू लागतात . हे टाळायचे असेल तर स्तन वारंवार धुऊ नयेत . दिवसातून एकदा व्यवस्थित अंघोळ करणे आणि सुती कपडे वापरणे स्वच्छतेसाठी पुरेसे आहे .

तुम्ही म्हणाल की स्तनांवर जे दूध रहाते त्याचे काय ? ते खराब होऊन जंतू नाही का वाढणार ?

नाही वाढणार जंतू आणि याचे कारण आहे की स्तन्य म्हणजे आईचे दूध हे जिवंत असते म्हणजे त्यामध्ये पांढऱ्या पेशी व अन्य रोगप्रतिकारक घटक असतात . त्यामुळे या स्तनावर उरलेल्या दुधाने बाळाला काहीही धोका होत नाही. उलट आईच्या शरीरावरील चांगले बॅक्टेरिया बाळाच्या शरीरात जाऊन बाळाची इम्युनिटी बळकट होते , microbiome तयार होऊ लागते!

आईची स्तनाग्रे कोरडी पडून भेगा पडू नयेत म्हणून आईला शेवटी येणाऱ्या दाट दुधाचा थेंब स्तनाग्राला चोळून ठेवण्याचा सल्ला दिला जातो .

अश्या रीतीने निसर्गाच्या विरुद्ध जाऊन स्तनांची अती स्वच्छता कराल तर पस्तावायची वेळ येऊ शकते आणि तुम्हाला समजणारही नाही की माणसाने ठरवलेला हा छोटा नियम स्तनपान वेदनादायी बनवू शकतो .

लक्षात ठेवा, रोजची अंघोळ स्तनांच्या स्वच्छतेसाठी पुरेशी आहे ! बाळ रडू लागले की लगेच बाळाला जवळ घ्यायचे , त्यापूर्वी स्तन धुवायला पळायचे नाही ! 😊

डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे)

drprdeshpande2@gmail.com


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

2 responses to “स्तन वारंवार धुण्यातील धोके”

  1. Ashish Ambadas Deshmukh avatar
    Ashish Ambadas Deshmukh

    Extremely important scientific information to enrich the microbiota of the baby!

    1. drprdeshpande avatar
      drprdeshpande

      Thank you !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.