स्तन लहान असोत की मोठे, पण प्रत्येक पहिलटकरणीच्या मनात प्रश्न पडतो, “मला पुरेसे दूध येईल ना ?”
आणि जिचे स्तन लहान असतात (म्हणजे तिला लहान वाटतात) अश्या माता थोड्या जास्त चिंता करीत असतात.
मात्र स्तनांच्या आकारावर दुधनिर्मिती क्षमता अवलंबून नसते! हे प्रत्येक मातेने आणि तिच्या सपोर्ट सिस्टीम ने म्हणजे जोडीदार व कुटुंबीय यांनी पक्के लक्षात ठेवायला हवे.
कारण तुमच्याकडून सहज विचारला गेलेला एक प्रश्न , “तुझे स्तन गरोदरपणात जास्त वाढलेले दिसत नाहीत, पुरतंय ना दूध बाळाला?” , त्या बिचाऱ्या नव्या आईच्या मनात शंकासुर निर्माण करू शकतो, तिचा आत्मविश्वास डळमळीत करू शकतो. आणि आत्मविश्वास नसेल तर दूध निर्मिती नक्कीच कमी होते , मग स्तनाचा आकार कितीही मोठा का असेना !
मग दूध निर्मिती होते तरी कशी हे समजून घ्यायचे असेल तर आपल्याला स्तनांच्या आत काय आहे हे जाणून घ्यावे लागेल !

मला या अंतर्गत भागांची शास्त्रीय मराठी नावे माहीत नाहीत त्यामुळे मी फोटोमधील इंग्रजी नावे वापरेन (मी तेवढी हुशार नाही ना !) , चालेल ना ? 😊
स्तन हा अवयव लैंगिक समजला जात असला तरी तो मुख्यतः बाळासाठी दुधनिर्मितीचा अवयव आहे. हे कश्यावरून ओळखायचे? तर हा अवयव ज्या कामासाठी बनला आहे (म्हणजे स्तनपान देण्यासाठी) ते काम (म्हणजे स्तनपान) जर दिले नसेल किंवा कमी काळ दिले असेल तर त्या स्त्रीचा स्तनांच्या कर्करोगाचा धोका वाढतो. आणि म्हणून तुमचा ब्रेस्ट कॅन्सर (स्तनांचा कर्करोग) चा धोका कमी करायचा असेल तर काय करायचे तर शक्य तेवढा जास्त काळ स्तनपान द्यायचे! (आता शक्य तेवढा काळ म्हणजे किती ते पुढील पोस्ट मध्ये बघूया )
थोडक्यात काय तर स्तन ही दूध निर्मितीची त्वचेखालील एक ग्रंथी आहे. या ग्रंथीला आधारासाठी तिच्या आजूबाजूने मेद /चरबी असते. समोरून बघितल्यास दुधनिर्मिती ग्रंथी स्तनाग्राभोवती पाकळ्यांप्रमाणे गोलकारात आढळते. (स्तनातून दूध हातांचा वापर करून कसे काढावे हे समजण्यासाठी ही माहिती खूप महत्वाची आहे) (आणि चित्र नीट बघितले तर तुम्हाला स्तनाची शेपटी देखील काखेमध्ये दिसेल , या tail of Spence बाबत नंतर सांगेन माहिती !)

स्तन लहान असणार की मोठे हे स्तनातील आधारासाठी असलेली चरबी जास्त आहे की कमी यावर ठरते. जर दुधनिर्मिती स्तनातील चरबी करत नसेल तर जवळजवळ प्रत्येक आईचे स्तन दुधनिर्मितीसाठी सक्षम असतातच. हजारांत एखाद्या स्त्रीमध्ये जर स्तनातील ग्रंथीची वाढ झाली नसेल (आनुवंशिक कारणांमुळे ) तर आणि तरच आई दूध निर्माण करू शकत नाही! ( हमखास दूध कसे निर्माण होऊ शकेल यावरही लिहिणार आहेच)
पहिल्या फोटोमध्ये दाखवल्यानुसार प्रत्येक स्तनामध्ये १२ ते १५ दुग्धग्रंथीचे lobe (भाग) असतात . जे स्तनाग्राभोवती वर्तुळाकार दिसतात. (हे दुसऱ्या फोटोत दिसेल) प्रत्येक lobe असंख्य lobules चा बनलेला असतो .प्रत्येक lobule मध्येही अनेक दुग्धनिर्मितीच्या पेशी फुग्यासारख्या गोलाकार मांडणीमध्ये (alveola) असतात.
समजा, एक द्राक्ष म्हणजे एक alveola ज्यामध्ये असंख्य पेशी दूध निर्मिती करतात . अश्या द्राक्षाचा घड म्हणजे एक lobule आणि अशी असंख्य lobules (घड) एकमेकांना जोडून एक lobe बनतो. असे १२-२० lobe एका स्तनात असतात ! म्हणजे ही दुधाची फॅक्टरी खूप मोठी असते!
या alveoli मधील पेशींनी निर्माण केलेले दूध सूक्ष्म दुग्धनलिकांद्वारे पुढेपुढे नेले जाते आणि संपूर्ण lobe मधील दूध एका दुग्धनलिकेवाटे स्तनाग्राशी जोडलेले असते . याचा अर्थ लक्षात आला का ? स्तनातील दूध बाहेर येण्यासाठी निप्पलमध्ये बाटलीप्रमाणे प्रमाणे एक छिद्र नसते तर प्रत्येक lobe मधील दूध बाहेर येण्यासाठी स्वतंत्र दुग्धनलिका असते . अश्या १२ ते १५ नलिकांच्या द्वारे दूध बाहेर येते.
या पूर्ण सिस्टीम मध्ये कुठेही दूध तयार करून साठवून ठेवायची जागा दिसतेय का ? नाही ना ! मग बऱ्याच आया, “आता मी ४ तास दूध नाही पाजाणार, म्हणजे बाळासाठी खूप दूध जमा होईल” असा जेव्हा विचार करतात तेव्हा नकळत स्वतःचे दूध कमी करत असतात (कसे ते ब्लॉग मध्ये इतरत्र सापडेल)
ज्यांनी पहिला फोटो लक्षपूर्वक पाहिला असेल ते मात्र ऑब्जेक्शन घेतील. Lactiferous Sinuses मध्ये असते ना साठवलेले दूध, मग?
अहो, ते sinuses असतात तांदळाच्या दाण्याएवढे! त्यात दूध असते काही थेंब! आणि हे sinuses असतात स्तनांच्या काळ्या भागाखाली म्हणजे areola च्या खाली!
तुम्ही म्हणाल , ही काय चेष्टा लावलीये निसर्गाने ? एव्हढेसे दूध साठवून काय उपयोग?
याचा खूप मोठा उपयोग असतो ! बाळाने स्तनपान सुरू केले की आईला पान्हा फुटून दूध बाहेर यायला काही क्षणांचा अवधी लागतो . त्या क्षणांमध्ये भुकेले बाळ शांत व्हावे , दूध येणार आहे हे बाळाला समजावे आणि म्हणून बाळाने जोरजोरात स्तन चोखून पान्हा फुटण्यास आईला मदत करावी यासाठी या sinunses मधील दूध कामी येते. स्तनावरील पकड योग्य असेल म्हणजे निप्पल भोवतीचा काळा भाग देखील बाळाच्या तोंडामध्ये असेल तर बाळाच्या ओठांच्या हालचालीमुळे ही sinuses दाबली जाऊन त्यातील दुधाचे थेंब बाळाला मिळतात व स्तनपान सुरळीत सुरू होते!
निसर्ग चुकत नाही, चुकतो ते आपण! जेव्हा स्त्री गरोदर असते तेव्हा ते ९ महिने बाळाच्या वाढीसोबतच स्तनांची वाढ, स्तनांमध्ये अधिक रक्ताभिसरण होण्याची तयारी, दुग्धग्रंथींची मशागत प्रत्येक गरोदर स्त्रीमध्ये केली जाते. स्तन त्यांच्या मूळ कामासाठी म्हणजे दुग्धनिर्मितीसाठी पूर्ण तयार असतात.

गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे शेवटच्या काही आठवड्यांमध्ये तर दुधनिर्मिती सुरूही झालेली असते. काही स्त्रियांना स्तनातून स्त्राव येण्याचा अनुभव येतो. आणि जेव्हा बाळाच्या जन्मानंतर प्रत्यक्ष दुग्धनिर्मिती वाढते तेव्हा काही स्त्रियांमध्ये स्तनांचा आकारही थोडा अजून वाढतो .
मला वाटते की हा लेख जर प्रत्येक गरोदर स्त्रीने वाचला तर तिच्या मनात स्तनांच्या लहान किंवा मोठ्या आकारामुळे दूध तयार होईल की नाही ही शंका नक्कीच येणार नाही ! प्रत्येक आईचे स्तन दुधनिर्मितीसाठी निसर्ग तयार करतो. मात्र स्तनपान यशस्वी होण्यासाठी बऱ्याच घटना योग्य प्रकारे घडाव्या लागतात किंवा आपोआप घडत नसतील तर सुधाराव्या लागतात ! आणि आपण इथे कमी पडलो की आईला इच्छेनुसार स्तनपान देता येत नाही! तिची आणि निसर्गाची काहीही चूक नसताना !
योग्य माहिती पसरवूया, गैरसमजुती व गैरप्रथा दूर करूया आणि प्रत्यर्क मातेला कमीतकमी दोन वर्षापर्यंत स्तनपान देण्यासाठी सक्षम बनवूया !
आहात ना माझ्या सोबत?
- डॉ. प्रिया प्रभू
- drprdeshpande2@gmail.com



Leave a Reply