स्तनपान करताना कधी कधी अशी वेळ येते की बाळ सारखे सारखे दूध मागू लागते. कालपर्यंत 3 तासाने भूक लागत होती आणि आता अचानक एक दीड तासातच बाळाला भूक लागतेय . अर्थातच असे कश्याने होते माहीत आहे का? तुमच्या मनातील उत्तर मी ओळखू शकते बरं का! तुमचे उत्तर आहे – “आईचे दूध बाळाला कमी पडतेय म्हणून भूक लागतेय” काय? ओळखले ना मी बरोबर? (बाळ असे का वागते याबद्दल माझे उत्तर वेगळे आहे आणि लेखाच्या शेवटी सांगेन )
मग अश्यावेळी आई काय करते? ‘आत्ताच तासापूर्वी बाळाने स्तनपान केले होते तेव्हा स्तन रिकामे असतील ‘ असे समजून ती बाळाला वरचे दूध किंवा फॉर्म्युला देते आणि नकळत ‘फॉर्म्युला ट्रॅप’ मध्ये अडकून स्वतःचे दूध खरोखरच कमी करून घेते. (फॉर्म्युला ट्रॅप बद्दल पोस्ट लिहीन ती नक्की वाचा ) किंवा कधी स्तनात दूध भरू दे म्हणून ती बाळाला पाजणे टाळते कारण स्तन दाटलेले असतात तेव्हाच त्यात दूध असते असे तिला वाटते.
खरंच स्तन पाण्याच्या टाकी सारखे असतात का? नळातून पाणी यायला टाकी भरावी लागते तसे स्तन भरले की बाळाला खूप दूध मिळते का ?
लक्षात ठेवा, स्तनपानाची संपूर्ण प्रक्रिया ही प्रतिक्षिप्त क्रियेवर म्हणजे रिफ्लेक्स वर अवलंबून आहे . आईमध्ये दूध निर्मिती संबंधी २ प्रतिक्षिप्त क्रिया होतात .
१. Prolactin reflex मुळे दूध तयार होते
२. Oxytocin reflex मुळे दूध स्तनातून बाहेर येते (पान्हा फुटतो)
निसर्गाने स्तनपानासंबंधी एकच साधा नियम ठेवलाय! “मागणी तसा पुरवठा“! स्तनातून दूध बाहेर गेले की तेवढे लगेच पुन्हा बनते! स्तनातून कमी दूध बाहेर गेले की दूध कमी तयार होते . स्तनातून जास्त दूध बाहेर जाऊ लागले की दुधाची वाढीव मागणी जास्त नवे दूध तयार करून भागवली जाते ! ( हा नियम लक्षात ठेवला की आपले दूध हवे तेव्हा वाढवता येते किंवा कोणाला गरजेपेक्षा जास्त दूध तयार होत असेल तर दूध कमी देखील करता येते , यावरही पोस्ट लिहीन, हा ब्लॉग subscribe करा म्हणजे भविष्यातील पोस्ट मिस होणार नाही)

म्हणजे स्तन जसजसे रिकामे होतील तसतसे ते पुन्हा भरले जातात. विहिरीतील झऱ्यासारखे ! सतत वाहणारा झरा !
पण जेव्हा बाळ २-३ महिन्यांचे होते तेव्हा आईचे स्तन दुधाने कडक होणे कमी होते , स्तन मऊ राहतात . आणि आईला वाटते की आता माझे दूध कमी झाले म्हणून स्तन घट्ट होईनात! खरे तर शरीराला आता बाळाच्या गरजेचा अंदाज आल्याने बाळाच्या गरजेइतकेच दूध निर्माण होत असते. आई मग स्तनाला टाकीप्रमाणे समजून स्तन दुधाने भरावेत म्हणून दूध उशिरा पाजते , किंवा एखादे वेळी वरचे दूध सुरू करते. या एका समजुतीमुळे स्तन वारंवार रिकामे झाले नाहीत की ‘मागणी कमी झाली’ म्हणून शरीरातील दूध निर्मिती थंडावते. बघा, फक्त एक गैरसमज स्तनपान बंद करण्याची वेळ अनु शकतो!
लक्षात ठेवा, स्तन हे टाकी प्रमाणे नाही की टाकी भरायला वाट बघायला हवी ! स्तन विहिरी सारखे आहेत ज्यामध्ये जसा जिवंत झरा असल्याने पाणी सतत येत रहाते तसेच दूध निर्मिती सतत सुरू असते . स्तनांमधून दूध वारंवार काढून स्तन रिकामे केले की शरीर कामाला लागते आणि दूध वाढते ! विशेषतः रात्रीच्या वेळी स्तन रिकामे व्हायला हवेत . बऱ्याचदा बाळ रात्रभर झोपू दे म्हणून बाळाला रात्री वरचे दूध देतात. ते पचायला जड असल्याने बाळ झोपते आणि आईचे स्तन रिकामे होत नाहीत. आणि म्हणून नवे दूध तयारही होत नाही .
दुधाचे निर्माण वाढवायचे असेल तर एकच करा. दूध वारंवार पाजून किंवा काढून स्तन रिकामे करा. विहिरीप्रमाणे ते पुन्हा भरतील! या युक्तीने कमी झालेले दुधाचे प्रमाण नक्की वाढेल. करून तर बघा!
-डॉ प्रिया प्रभू, मिरज
(drprdeshpande2@gmail.com)
(ता. क. – बाळ सारखे सारखे दूध का मागतंय या प्रश्नाचे माझे उत्तर लिहायला विसारलेच की! बाळाच्या वाढीमध्ये काही वेळा बाळ cluster feeding करते आणि आता तुमच्या बाळाची ती फेज सुरू झालीये. (याबद्दल वाचायचे आहे का? लिहू का याबद्दल पण? काय म्हणता ? )
म्हणजे बाळ सारखे पिऊ लागले की टेन्शन लेने का नै! बाळाला पिऊ दे, म्हणजे निसर्गाच्या नियमाने दूधही वाढते व बाळाची गरज भागते! तुम्ही तुमचे पाण्याचे प्रमाण वाढवा! दूध तयार करायला तुमचे स्तन सक्षम आहेत!



Leave a Reply