आपल्याला जे माहीत नसते ते आपल्याला चुकीचे वाटू शकते. कारण स्तनपानाबाबत निसर्गाचे नियम आणि मानवाने बनवलेले नियम वेगवेगळे आहेत. सोबतच्या फोटोमध्ये आफ्रिकेतील आदिवासी स्त्रिया बऱ्याच मोठ्या वयाच्या मुलांना पाजताना दिसत आहेत .

असे चित्र आपल्याकडे दिसणार नाही कारण बाळाला दुधाचे दात आले की किंवा त्यापूर्वी देखील आपल्या आजूबाजूचे लोक दूध अजून का बंद केले नाही असे विचारतात. बोलू शकणाऱ्या बाळाने आईचे दूध सर्वांसमोर मागितले तर आपल्याला लाज वाटते. या नैसर्गिक कृतीची लाज का वाटावी माहीत नाही , पण वाटते खरी !
पण माझ्या फेसबुकवरील एका पोस्टवर एक कमेंट आहे की गेल्या पिढीमध्ये गावाकडे शाळेला जाणारी 5-6 वर्षांची मुले शाळेतून आली की स्तनपान करायची. विचारून बघा बुजुर्ग लोकांना! बऱ्याच जणांना आठवतात आईचे दूध पितानाचे क्षण! आदिवासी जमातीमध्येही २-५ वर्षांच्या मुलाला पाजणे चुकीचे समजत नाहीत .
याचे मुख्य कारण म्हणजे स्तनपान हे केवळ अन्न देणे नसते , त्या बरोबरच स्तनपानाद्वारे रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे व मानसिक गरजा भागवणे देखील असते .
बाळ जेवढे कमी वयाचे असेल तेवढा जास्त त्रास दूध सोडवताना होतो कारण बाळाची गरज भागलेली नसल्याने दूध सोडण्याची तयारी नसते . मग बाळाला रडवून किंवा स्तनाला कडू पदार्थ लावून दूध तोडले जाते . कधी बाळाचे पोट सतत वरच्या दुधाने किंवा अन्नाने भरलेले असेल याची काळजी घेऊन स्तनपान बंद केले जाते. आईला आवश्यक तो सपोर्ट/ साहाय्य कुटुंबाकडून उपलब्ध नसल्याने बऱ्याचदा आई असा निर्णय घेते . किंवा पुढील गर्भ राहिला की आधीच्या बाळाला दूध देणे बंद केले जाते.
मग दूध नक्की कधीपर्यंत पाजावे?
खरे उत्तर आहे की जोपर्यंत आई व बाळाला स्तनपान हवे असेल ते देऊ शकतात . आईचे दूध हे पहिल्या वर्षानंतर अन्नाचा मुख्य स्रोत नसते त्यामुळे त्या दुधाने अन्नाव्यतिरिक्त इतर गरजांचे निवारण होते .
पहिली दोन वर्षे स्तनपान नक्की द्यावे व त्यानंतर आई व बाळाच्या इच्छेनुसार ते निर्णय घेऊ शकतात .
पण विविध अभ्यासातून दिसून आले आहे की जितक्या जास्त कालावधीसाठी स्तनपान दिले जाईल तितके जास्त फायदे आई व बाळाला मिळतात .
जेव्हा आई ठरवते की आता दूध देणे थांबवायचे तेव्हा ते mother led weaning असते .
जेव्हा बाळ कोणत्याही दबावाविना ठरवते की आता स्तनपान थांबवायचे तेव्हा ते baby led weaning असते.
जेव्हा स्तनपानाचा मानवासाठी शक्य त्या कालावधीसाठी स्तनपान दिले जाते तेव्हा ते Natural Term weaning असते.
विविध शास्त्रीय अंदाजांनुसार स्तनपानाचा नैसर्गिक कालावधी २.५ ते ७ वर्षे असा असू शकतो. ५-६ वर्षे असण्याची सर्वात जास्त शक्यता आहे .
शेवटी काही अभ्यास किंवा लेखाच्या लिंक देत आहे त्यामध्ये याविषयी अधिक माहिती आहे. जरूर वाचा!
थोडक्यात बाळाचे दुधाचे दात पडणे सुरू होते तोपर्यंत सहसा दूध पिणे बंद होते . ३-४ वर्षानंतर मुले दिवसातून १-२ वेळाच पीत असल्याने खळखळ न करता दूध पिणे बंद करू शकतात. २ वर्षाखालील मुले सहसा खूप त्रास देतात.
बाळ मोठे झाले की सहसा दिवसातून काही ठराविक वेळा दुध पिते . जर आईला त्रास जाणवत असेल तर आई partial weaning म्हणजे गरजेपुरते दूध बंद करू शकते – कोणी दिवसाचे बंद करते तर कोणी रात्रीचे !
(तिसऱ्या लिंक मध्ये दूध सोडवण्यासाठी उपयुक्त माहिती आहे )
ही माहिती वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये नाही , त्यामुळे असा सल्ला सर्व डॉक्टरांकडून मिळणार नाही. काही Breastfeeding Friendly doctors मात्र असा सल्ला आवर्जून देतील.
कारण आईचे दूध बाळाचे अमुक एक वय उलटले की अचानक धोकादायक नक्की बनत नाही. मात्र कमी वयात बाळाला मिळणारे फायदे सर्वाधिक असतात. बाळाचे वय वाढेल तसे मिळणाऱ्या फायद्याचे स्वरूप बदलते !
कोविड सारख्या नव्या आजाराच्या महासाथीमध्ये WHO ने सल्ला दिला होता की ” स्तनपान बंद करू इच्छिणाऱ्या आयांनी सध्या तसे करू नये व स्तनपान अजून काही काळ सुरू ठेवावे कारण यामुळे बाळाचे संरक्षण होईल”
बाळाच्या आयुष्यभरासाठी स्तनपान एक सर्वांगसुंदर भेट आहे , ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य जास्तीत जास्त काळ स्तनपान करावे ! आणि इतरांनी आईला याबाबत साहाय्य करावे !
२० वर्षांपूर्वी मला माहित असते तर मी २ वर्षांहून अधिक काळ स्तनपान देण्यासाठी प्रयत्न नक्कीच केला असता हे मात्र खरे!
(ज्या आयांना त्यांच्या इच्छेएव्हढे स्तनपान देता येत नाही त्यांना समाज व वैद्यकीय सिस्टीम हवा तो सपोर्ट देऊ शकलेले नसतात मात्र याचे ओझे आईच्या मनावर रहाते! म्हणून परिस्थितीनुसार व उपलब्ध मार्गदर्शनानुसार जमेल तेवढे स्तनपान देणे हे सर्वोत्तम. मात्र योग्य तज्ज्ञांची मदत घेणे स्वतःचे स्तनपान विषयक goals पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे . कारण शेवटी स्तनपान हा reflexes चाच खेळ आहे )
अधिक माहितीसाठी विविध लेखांच्या लिंक्स पुढीलप्रमाणे :
१. तज्ज्ञांचा लेख
https://www.researchgate.net/publication/265185534_A_Natural_Age_of_Weaning
२. अजून एक माहितीपूर्ण लेख
https://www.attachmentparenting.org/apifaqs/feed/weaning
३. दूध सोडवण्याच्या विविध मार्गांविषयी लेख
https://www.laleche.org.uk/thinking-of-weaning/
असे नाही की केवळ आफ्रिका व आदिवासी अश्या न पुढारलेल्या जमाती जास्त काळ स्तनपान देतात . विविध देशांमध्ये याविषयी जागृती निर्माण होत आहे !

४. या लेखात खूप सारी माहिती आहे जी तुम्हाला निर्णय घेण्यास मदत करू शकेल . कुटुंबाचे सहकार्य असल्यास हे निभावता येते !
https://www.human-milk.com/feeding-beyond-babyhood
आई दीर्घकाळ स्तनपान देत असेल तर हे एक शारीरिक व मानसिक दृष्ट्या थकवणारे काम आहे हे जाणा व तिला योग्य तो आधार द्या – पती म्हणून , कुटुंब म्हणून, समाज म्हणून.
जास्त काळ स्तनपान करणारी आई समाजाच्या विरोधाशीही झगडत असते, जे अधिक थकवणारे असते.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनातही बाळाला शक्य तितका काळ व जास्तीत जास्त काळ स्तनपान देणाऱ्या आया नक्कीच विशेष कौतुकास्पद आहेत, कारण स्तनपान देणे हे नक्कीच सोपे नाही!
तुम्ही करता का कौतुक अश्या स्तनदा मातांचे? 💝
-डॉ. प्रिया प्रभू, मिरज
drprdeshpande2@gmail.com
ता.क.
संपूर्ण जगामध्ये मानव हा एकच असा प्राणी आहे जो निसर्गाने बनवलेले मानवी बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी सर्वोत्तम असे आईचे दूध बंद करून इतर कमी बुद्धिवान प्राण्यांचे दूध आपल्या बाळाला देऊन खुश होतो! 😉

Leave a Reply