बाळाला बाटली द्यायची नाही हा सल्ला आपण नेहमीच ऐकलाय. आणि तो योग्य आहे . याची दोन मुख्य कारणे असतात.
१. स्वच्छता न पाळली गेल्यास बाळाला संसर्गाचा धोका असतो
२. बाटली एक वेळ जरी दिली गेली असेल तर बाळ स्तनपान कसे करायचे हे विसरू शकते . याला निप्पल कन्फ्युजन असे म्हणतात . किंवा bottle preference असेही म्हणतात. (यावर लिहू का पोस्ट? कमेंट मध्ये सांगा)
कामासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांसाठी ही आजची माहिती फार महत्वाची आहे. ज्या नशीबवान स्त्रियांना ६ महिने सुट्टी मिळते त्या कामावर गेल्या की काही प्रमाणात वरचे अन्न देऊ शकतात . मात्र कामाच्या ठिकाणी दूध काढण्याची सुविधा किंवा बाळाला सोबत ठेवायची सुविधा नसल्याने तसेच बाळाला वरचे दूध देताना घरी बाटली वापरली गेली असल्यास तिचे दूध आटण्यास सुरुवात होते . आणि मग इच्छा असून देखील बाळाला कमीतकमी २ वर्षांपर्यंत पाजणे काही शक्य होत नाही .
बाळाला काही द्यायचे असेल तर “बॉटल नाही, वाटी चमचा वापरा” असा सल्ला सर्व देतात . पण ज्यांनी वाटी चमचा वापरलाय त्यांना माहीत आहे की एखादया रडणाऱ्या बाळाला तसे दूध पाजणे किती अवघड आहे . सहसा झोपून चमच्याने दूध पाजताना ते श्वासनलिकेत जाण्याच्या शक्यतेची भीती असतेच .
आणि मग स्तनपान लवकर बंद होते . बऱ्याचदा आईच्या इच्छेविरुद्ध !
ज्या आयांना स्तनपान सुरू ठेवायचं आहे मात्र नोकरी किंवा इतर कारणाने बाळापासून दूर आहेत त्यांनी बाटली दिली की स्तनपानास अडथळे येऊ लागतात.
या किंवा इतर कोणत्या कारणामुळे (जसे आई दवाखान्यात ऍडमिट आहे किंवा एखादा कोर्स करण्यासाठी काही दिवस नसणार आहे) स्तनपान करणाऱ्या बाळाला तात्पुरत्या स्वरूपात बाटली वापरता येईल का या प्रश्नावर मार्ग काढला गेलाय !
उत्तर आहे paced bottle feeding !
म्हणजे संथ गती / स्तनपान सदृश्य दुग्ध प्राशन.
बाटलीने दूध देण्यामध्ये ज्या अडचणी होत्या त्या दूर करून तसेच निपल कन्फ्युजन / बॉटल प्रिफरन्स होऊ नये याची पूर्ण काळजी घेऊन हे paced bottle feeding दिले जाते .
Paced bottle feeding कसे द्यायचे ?


१. बाळ बसण्याच्या स्थितीमध्ये असावे.
२. बाटली जमिनीला समांतर असावी . (फोटो २)
३. बाटली देताना स्तनपानाप्रमाणे बाळाने तोंड उघडून घ्यायला हवी. (फोटो १)
४. दूध आपोआप बाळाच्या तोंडात न जाता ते चोखून ओढल्यावरच मिळेल याची काळजी घ्यावी . गरज असल्यास यासाठी दूध हळू हळू मिळेल असे विशिष्ट निपल्स मिळतात त्यांना Slow flow nipples म्हणतात. सहसा ऑनलाइन मागवावे लागतात किंवा मोठ्या मेडिकल्स मध्ये असावेत . (नक्की माहीत नाही) त्यातील शुन्य क्रमांक किंवा नवजात बाळासाठीचे निपल अगदी हळू दूध पुढे जाऊ देतात , तेच वापरावे.
५. बाळाच्या प्रतिक्रियेनुसार दूध द्यावे , जसे दूध जोरात जात असेल तर गती कमी करावी किंवा बाळाचे पोट भरले असल्यास दूध संपवायचे म्हणून उरलेले दूध देऊ नये .
६. मधून बाळाला दुसऱ्या मांडीवर बसवावे – जसे स्तनपान करताना बाजू बदलतात तसे! एका वेळचे पिणे १५-२० मिनिटांतून अधिक काळ चालावे – हे संथ म्हणजे paced असावे।
(अधिक माहितीसाठी शेवटी लिंक व व्हिडीओ लिंक दिली आहे)

बाळाला बाटली अपवादात्मक किंवा अपरिहार्य कारणांमुळे द्यावी आणि त्यानंतर बाळ स्तनपान नाकारणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊनच द्यावी. यासाठी हे स्तनपान- सदृश्य संथ गती बाटलीपान – paced bottle feeding घरातील सर्वांना शिकवून ठेवायला हवे , जेणे करून आई कामावरून परत आली की बाळाला निर्धोक पणे स्तनपान देऊ शकेल आणि स्तनपान लवकर बंद न होता कमीतकमी २ वर्षे सुरू राहू शकेल. या पद्धतीमुळे जी मुले नेहमीच बाटली वापरतात त्यांच्यामध्येही पोटात गॅस होण्याचे प्रमाण कमी होते.
नव्या जगातील नवे प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी असे नवे उपाय आवश्यक आहेत !
नोकरीसाठी आई जरी घराबाहेर पडली तरी कामाच्या ठिकाणी पंपिंग करणे आणि दूध साठवून घरी आणणे शक्य आहे. किंवा घरीच हाताने किंवा पंप वापरून बाळासाठी दूध काढून ठेवणे शक्य आहे ! (या बद्दल देखील लिहीन, हा ब्लॉग like किंवा subscribe करून ठेवा , पोस्ट मिस होणार नाहीत)
कामाच्या ठिकाणी पंपिंग आणि घरातील काळजीवाहक व्यक्तीने संथगती स्तनपान सदृश्य बॉटल फिडिंग देणे यामुळे कामकाजी स्त्रिया स्तनपान बंद होण्यापासून वाचवून नोकरी करता करता अधिक काळासाठी स्तनपान देखील करू शकतात . खालील फोटो मध्ये महत्वाचे मुद्दे आहेत!

ता. क. बॉटल फीड साठी पर्याय उपलब्ध आहेत जसे कप फिडिंग (फोटो पहा) , फिंगर फिडिंग जे कमी वयाच्या बाळांसाठी अधिक उपयुक्त आहेत. सिपर किंवा कप चा वापर मुलाच्या वयानुसार व आवडीनुसार करता येईल. बाजूच्या मेडिकल मधील साधी बाटली व साधे निप्पल स्तनपानासाठी नक्कीच मारक असते!

वर सांगितलेली नवी paced bottle feeding माहिती नोकरी करणाऱ्या व तरीही बाळाला स्तनपान देऊ इच्छिणाऱ्या आईपर्यंत अवश्य पोचवा. तिला पंपिंगची माहिती मिळावी म्हणून ब्लॉग फॉलोही करायला सांगा !
जुळ्या मुलांना आई दूध पाजून थकली असेल तर आईने पंप केलेले दूध या मार्गे देता येऊ शकते . कोणत्याही कारणाने प्रत्यक्ष स्तनपान शक्य नसेल पण भविष्यात आईला स्तनपान सुरू करण्याची इच्छा असेल तर अश्यावेळी paced bottle फिडिंग स्तनपानाची शक्यता शिल्लक ठेवते! जे साधी बाटली करू शकत नाही.
सर्वात महत्वाचे म्हणजे एखाद्या आईला आपले कमी झालेले दूध पुन्हा वाढवून बाळाने पुन्हा स्तनपान सुरू करावे अशी इच्छा असेल तर बाळाचे निप्पल कन्फ्युजन कमी होऊन बाळ पुन्हा स्तनपान करण्यास तयार व्हावे यासाठी बाटली वापरण्याची पद्धत आधी बदलायला हवी!
महत्वाचे- बाळाला NICU मध्ये असताना फॉर्म्युला किंवा आईचे काढलेले दूध द्यायचे असेल तर अश्या वेळीही हीच टेक्निक / cup feeding वापरायला हवे, जेणे करून भविष्यात आई बाळाला पाजू शकेल! त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना देखील याची माहिती असायला हवी.
अधिक माहितीसाठी लिंक्स
- डॉ प्रिया प्रभू , मिरज
drprdeshpande2@gmail.com
(पूर्वप्रसिद्धी – फेसबुक वॉल ! ४/८/२०२३)



Leave a Reply