यावर्षीची स्तनपान सप्ताहाची थीम आहे – Let’s make breastfeeding and work, work!
ज्या आयांनी बाळ लहान असताना नोकरी केली त्या नक्कीच कबुल करतील की नोकरीसाठी घराबाहेर पडल्यामुळे बाळाला २ वर्षापर्यंत पाजणे शक्य झाले नाही .
होय, बाळाच्या मेंदूची सर्वाधिक वाढ पहिल्या दोन वर्षांमध्ये होत असते. त्यामुळे आईने बाळाला ‘कमीतकमी’ दोन वर्षापर्यंत स्तनपान द्यावे असे मार्गदर्शक तत्व आहे . मात्र नोकरी करणाऱ्या खूप कमी स्त्रिया २ वर्षांचा टप्पा पार करू शकतात!
काही कामाच्या ठिकाणी आईला पहिले ६ महिने मातृत्व रजा मिळते कारण पहिले ६ महिने बाळाला केवळ आईचे दूध द्यायचे असते. आणि काही ठिकाणी किंवा काही व्यवसायांमध्ये एवढीही सुट्टी मिळत नाही. भारतात आईला ६ महिने मातृत्व रजा कायद्याने अनुज्ञेय आहे , पण इतर अनेक देश जसे अमेरिका जिथे फक्त काही आठवडे मातृत्व रजा दिली जाते जे आई व बाळासाठी अन्यायकारक आहे .
यामुळे जर आई कामासाठी घराबाहेर पडणार असेल तर या कारणाने बाळाचे स्तनपान थांबता कामा नये हे महत्वाचे आहे. आणि यासाठी कामाच्या ठिकाणी स्तनपानपुरक वातावरण असणे आवश्यक आहे. ही जबाबदारी कामाच्या ठिकाणच्या प्रशासनाची असते.
सर्वप्रथम स्तनपान मिळणे हा प्रत्येक बाळाचा हक्क आहे हे आपण मान्य करायला हवे. आणि स्तनपान मिळाल्याने भावी पिढी सुदृढ होणार आहे हेही समजून घ्यायला हवे . बाळासाठी इतर पर्याय आता उपलब्ध असले तरी आपल्या सर्वांची प्रथम निवड नेहमी स्तनपान असणे आई, बाळ व कुटुंबाच्या फायद्याचे असते! आणि कंपनीचा देखील फायदाच असतो बरं का! कारण आनंदी कर्मचारी मन लावून काम करतात! आणि बाळ कमी आजारी पडल्याने आई कमी सुट्ट्या मागते! 😊
कामाच्या ठिकाणी बाळाला सोबत ठेवण्याची म्हणजे पाळणाघराची सोय असल्यास ती सर्वोत्तम कारण मग आई व बाळ हवे त्या वेळी प्रत्यक्ष स्तनपान करू शकतात. पण अश्या सुविधा फार कमी ठिकाणी उपलब्ध असतात. अश्यावेळी अप्रत्यक्ष स्तनपान म्हणजे दूध काढून बाळाला इतरांनी पाजणे सुरू ठेवता येते .
आई कामासाठी घराबाहेर तासंतास रहाते आणि वेळेवर बाळाला पाजत नसल्याने आईला दुधाच्या गाठी होऊ शकतात किंवा आईचे दूध नियमितपणे न काढल्याने दूध आटून स्तनपान बंद होऊ शकते. स्तनदा स्त्री कर्मचाऱ्यांना स्तनातील दूध काढण्यासाठी ब्रेक घेण्याची परवानगी असायला हवी . आणि कामाच्या ठिकाणी दूध काढायची आणि साठवण्याची सोय असायला हवी जेणे करून अप्रत्यक्ष स्तनपान सुरू राहील.
आई जवळ नसेल तेव्हा काढून ठेवलेले दूध बाळाला सांभाळणारी व्यक्ती बाळाला देऊ शकते. हेही स्तन्यपानच आहे! मात्र अप्रत्यक्ष!
आईच्या दुधामध्ये रोगप्रतिकारक घटक असल्याने आईचे दूध विकतच्या दुधाप्रमाणे लगेच खराब होत नाही.
* आईचे दूध फ्रिजशिवाय ४ तास ठेवता येते .
* फ्रीज मध्ये ठेवल्यास ४ दिवस चांगले रहाते.
* डीप फ्रिजर मध्ये गोठवल्यास ६ महिन्यांपर्यंत ते दूध वापरता येते .
मात्र यासाठी दूध काढण्याची टेक्निक शिकायला हवी .
स्तनातून दूध हातांनी काढता येते किंवा त्यासाठी पंप वापरता येतात . विजेवर चालणारे आणि एकच वेळी दोन्ही स्तनातून दूध काढू शकणारे पंप अतिशय उपयुक्त ठरू शकतात . अश्या पंप मुळे कमी वेळेत दोन्ही स्तन रिकामे होतात.
यासाठी कामाच्या ठिकाणी प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे .
स्तनपान वा स्तनातून दूध काढणे यासाठी वापरता येईल अशी स्वच्छ खोली , यासाठी दर २-३ तासानंतर काही काळाचा ( २०-३० मिनिटे) ब्रेक , खोलीमध्ये विजेची व स्वच्छतेसाठी पाण्याची सोय, काढलेले दूध संध्याकाळपर्यंत साठवण्याची सोय अश्या काही सुविधा अत्यावश्यक आहेत . तसेच बाळ मोठे होईल तशी दूध काढण्याच्या वेळेमध्ये बदल होऊ शकतात हे समजून घ्यायला हवे .
अश्या सुविधा व सोयी उपलब्ध असतील आणि कामाच्या ठिकाणचे वातावरण स्तनपानाला सहाय्यकारी असेल तर नोकरी करणाऱ्या स्त्रियांची मुले देखील २ वर्षापर्यंत स्तनपान करू शकतील!
फोटोमध्ये मल्टिटास्किंग करणारी एक स्त्री जी काम करता करता पंपिंग करताना दिसतेय ! पंप करण्यासाठी सुयोग्य कपडे मिळतात . आणि सह कर्मचाऱ्यांनाही स्तनपानाच्या महत्वाविषयी माहिती असेल तर पंपिंग ब्रेक घेताना मातेला लाज न वाटता सकारात्मक भावना येईल!

कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक्ष किंवा अप्रत्यक्ष स्तनपान करायचे असेल तर आपल्या HR विभागाशी चर्चा करण्यासाठी पुढील मुद्दे साहाय्य करू शकतात .

आपण सारे मिळून याविषयी जागृती करूया आणि कामाच्या ठिकाणी स्तनपानास सर्वतोपरी सहाय्य करूया! प्रत्येक बाळाचा स्तनपान करण्याचा हक्क मिळवून देण्यात आपलाही हातभार हवा ना !
- डॉ. प्रिया प्रभू , मिरज .
पूर्व प्रसिद्धी फेसबुक वॉल (०१/०८/२०२३) - जागतिक स्तनपान सप्ताह २०२३
- drprdeshpande2@gmail.com

Leave a Reply