मेन्स्ट्रुअल कप – वापरावा की नाही?

Written by:


स्त्रियांना सृजनाची शक्ती निसर्गाने देऊ केलेली आहे. मात्र त्या शक्तीसोबत दर महिन्याला येणारी पाळी जोडलेली आहे. मासिक पाळीच्या पाच ते सात दिवसांमध्ये प्रत्येक स्त्रीला कमीअधिक रक्तस्त्रावाला सामोरे जावे लागते. या काळात योनीमधून बाहेर येणारे गर्भाशयातील रक्तरुपी अस्तर शोषून घेण्यासाठी आधी कपडा घेतला जायचा आणि आता पॅड वापरले जातात.

” पाळीमध्ये पॅड वापरण्यापेक्षा इतर काही पर्याय आहे का?”
“मासिक पाळीच्या products चा कचरा कमी करायचा आहे, पण काय वापरू?”
” पॅडमुळे येणारी रॅश  कमी करण्यासाठी Menstrual Cup  वापरता येईल का?”

जर तुम्हालाही असे प्रश्न पडले असतील, तर menstrual cup हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मेन्स्ट्रुअल कप म्हणजे पाळीच्या वेळी वापरायचे कपसारखे उपकरण असते.

हा मासिक पाळीतील एक आधुनिक, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे. 

त्याचा उपयोग, फायदे-तोटे आणि वैज्ञानिकदृष्ट्या त्याचे परिणाम काय आहेत, हे जाणून घेऊया!

Menstrual Cup म्हणजे काय?
Menstrual Cup हा एक मेडिकल ग्रेड सिलिकॉन किंवा TPE (thermoplastic elastomer) पासून बनवलेला लवचिक आणि गळती न होणारा (leak-proof) कप आहे, जो योनीमध्ये ठेवला जातो आणि जो पाळीदरम्यानचे रक्त गोळा करतो. तो पॅड किंवा टॅम्पॉनपेक्षा वेगळा आहे, कारण तो रक्त शोषत नाही तर गोळा करतो.
हे कप सलग ६ ते १२ तास वापरले जाऊ शकतात आणि योग्य प्रकारे स्वच्छ केल्यास अनेक वर्षे टिकतात!

मेन्स्ट्रुअल कप कसा वापरायचा?

मेन्स्ट्रुअल कप शरीराच्या आतमध्ये म्हणजे योनीमध्ये बसवला जातो , त्यामुळे याविषयी स्वच्छतेचे महत्व सर्वाधिक आहे. हा कप आत घालताना, काढताना आणि साठवताना स्वच्छतेची काळजी घेणे सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

१. Cup योनीमध्ये घालण्याची पद्धत (Insertion):
✓ हात स्वच्छ धुवा.
✓ कप दुमडून (C-Fold किंवा Punch-Down Fold) तो योनीत सरकवा.
✓ योग्य जागी पोहोचल्यावर तो आपोआप उघडतो आणि एक seal तयार करतो. कधीकधी तो थोडा फिरवला की मग उघडतो.

२. Cup योनीमधून काढण्याची पद्धत (Removal):
✓ कप बाहेर काढण्याआधी खालच्या भागाला हलकासा दाब द्या, जेणेकरून seal सुटेल.
✓ तळाचा भाग हलकेच धरून कप बाहेर ओढा.
✓ रक्त फ्लशमध्ये टाकून कप स्वच्छ धुवा आणि पुन्हा वापरा.

३. स्वच्छता आणि साठवणूक (Storage):
✓ प्रत्येक पाळीनंतर ५-१० मिनिटं उकळत्या पाण्यात निर्जंतुक करा.
✓ कप हवेशीर ठिकाणी साठवा (प्लास्टिक पिशवीत ठेवू नका).

मेन्स्ट्रुअल कप सुरक्षितपणे वापरण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत . जसे –
१. घरी आणि घराबाहेर तो काढणे व घालणे यासाठी स्वच्छतागृहाची सोय.
२. रक्त टाकून पुन्हा आत सरकवण्यापूर्वी धुण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध असणे आवश्यक

मेन्स्ट्रुअल कपचे प्रकार :

मेन्स्ट्रुअल कप विविध आकारामध्ये उपलब्ध आहेत. 30 पेक्षा कमी वय असल्यास आणि गर्भधारणा झाली नसल्यास small (लहान) कप वापरावा, अन्यथा large (मोठा) कप वापरावा.
योग्य आकाराचा कप वापरल्यास गळती होत नाही तसेच वेदनाही होत नाहीत.
याखेरीज काही ब्रँड्स स्त्रावाच्या प्रमाणानुसार लहान मोठ्या क्षमतेचे कप बनवतात.

मेन्स्ट्रुअल कपचे फायदे :
याच्या वापराचे अनेक फायदे आहेत.

१. पर्यावरणपूरक (Eco-friendly) पर्याय:
✓ प्लास्टिकचा कचरा टाळतो – पॅड आणि टॅम्पॉन मध्ये प्लास्टिकचा वापर केलेला असतो. हा कप पॅडप्रमाणे दर वापरानंतर टाकण्याची गरज नाही. त्यामुळे खूप सारा कचरा तयार होत नाही.
✓ एकच कप ५+ वर्ष टिकतो! – योग्य वापर आणि स्वच्छता राखल्यास हा कप अनेक वर्षे वापरता येतो.

२. आर्थिकदृष्ट्या परवडणारा (Cost-effective) पर्याय:
✓ मासिक पाळीसाठी दर महिन्याला पॅड किंवा टॅम्पॉनवर पैसे खर्च करण्याची गरज नाही.
✓ एकच कप वर्षानुवर्षं वापरता येतो, त्यामुळे पैसे वाचतात.
✓ प्रथम खरेदी करताना महाग वाटला तरी दीर्घकालीन वापराच्या दृष्टीने किफायतशीर आहे.

३. जास्त वेळ टिकणारा (Long-lasting Protection) वापर शक्य:
✓ कप एकदा आत बसवला की सलग ६-१२ तास वापरता येतो, त्यामुळे वारंवार बदलण्याची गरज नाही.
✓  रात्रीही सुरक्षित वापर करता येतो.

४. आरोग्यासाठी सुरक्षित (Health Benefits):
✔ कापसाच्या पॅडमधील केमिकल्स आणि परफ्यूमचा त्रास होत नाही.
✔ टॅम्पॉनप्रमाणे “Toxic Shock Syndrome (TSS)” चा धोका असतो, जो  दुर्मिळ ( rare) आहे. मात्र स्वच्छता राखल्यास आणि वेळेवर बदलल्यास हा धोका अतिशय कमी.
✔ योनीतील नैसर्गिक ओलसरपणा टिकून राहतो, टॅम्पॉनप्रमाणे कोरडी पडत नाही.

५. अधिक आरामदायक (Comfortable & Leak-proof):
✓ योग्यप्रकारे बसवल्यास कप जाणवतही नाही.
✓ पोहणे, धावणे आणि व्यायाम करणे आरामशीर होते.
✓ पॅड वापराने जाणवणारा त्रास नसतो आणि अधिक मोकळेपणा मिळतो.

मेन्स्ट्रुअल कपचे तोटे

X प्रथमच वापरताना अवघड जाऊ शकते. योग्य पद्धत शिकून घ्यायला हवी.
X योग्यरित्या घालण्यासाठी थोडा सराव लागतो. सवयीने वापर सोपा होतो.
X योग्य स्वच्छता न ठेवल्यास संसर्गाचा धोका. याविषयी मात्र पूर्ण काळजी घ्यायला हवी.
X काहींना सुरुवातीला अस्वस्थ वाटू शकते. विशेषतः रक्त बघणे किंवा हाताळणे नकोसे वाटू शकते. तसेच योग्य आकार निवडल्यास त्रास होणार नाही.

वैज्ञानिकदृष्ट्या सुरक्षितता (Scientific Evidence & Safety)
✓ संशोधनानुसार, Menstrual Cup हा पॅड आणि टॅम्पॉनइतकाच सुरक्षित आहे. कोणताही वाढीव धोका आढळला नाही. मात्र भारतात टॅम्पॉनचा वापर कमी असल्याने धोका अधिक वाटू शकतो.
✓ २०१९ च्या “Lancet” जर्नलमधील मेटा ॲनालिसिस च्या अभ्यासानुसार, त्यात कोणताही मोठा आरोग्याचा धोका आढळला नाही. योग्य सपोर्ट आणि मार्गदर्शन मिळाल्यास जवळपास ७५% महिलांनी याचा वापर सुरू ठेवण्याबाबत सहमती दर्शवली.
✓ Toxic Shock Syndrome (TSS) ची शक्यता टॅम्पॉनपेक्षा कमी / तदृश्यच आहे. पाळी दरम्यानच्या काळामध्ये त्याची साठवणूक योग्य प्रकारे करायला हवी. तसेच १२ तासाहून अधिक काळ सलग वापर करू नये.
✓ कर्नाटक सरकारने किशोरवयीन मुली व स्त्रियांसाठी मेन्स्ट्रुअल कप मोफत वाटप व वापरासाठी मार्गदर्शन याचा एक पथदर्शी कार्यक्रम ( pilot project) राबवला आहे. यामध्ये स्त्रियांनी याचा स्वीकार केला आहे.

Menstrual Cup कोणासाठी योग्य आहे?

✓ नियमितपणे डिस्पोजेबल पॅड किंवा टॅम्पॉन वापरणाऱ्या मुली आणि महिलांसाठी.
✓ पर्यावरण आणि आरोग्याची काळजी घेणाऱ्या स्त्रियांसाठी.
✓ अतिरिक्त खर्च टाळू इच्छिणाऱ्या महिलांसाठी.
✓ वर्किंग वुमन, ॲथलेट्ससाठी उत्तम पर्याय.

Menstrual Cup वापरण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी!

✓ कप खरेदी करताना योग्य साईझ निवडा:
• लहान (Small) – कुमारवयीन मुली आणि अविवाहित स्त्रिया.
• मोठा (Large) – प्रसूती झालेल्या महिलांसाठी.
✓ स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या:
• प्रत्येक पाळीनंतर उकळून निर्जंतुक करणे आवश्यक.
• सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी काढताना स्वच्छ पाणी आणि टिशू जवळ बाळगा.
✓ सुरुवातीला सराव करा:
• पहिल्या काही वेळा वापरताना अडचण जाणवू शकते, पण सरावाने सहज होईल.
• सुरुवातीला पॅड बॅकअप म्हणून ठेवू शकता. जेणे करून चुकून गळती झाल्यास कपडे खराब होणार नाहीत. अंदाज आला की मग वापरणे आवश्यक नाही.

Menstrual Cup – योग्य की अयोग्य?

✓ “तुम्ही पाळीसाठी पर्यावरण-स्नेही, स्वच्छ आणि आरामदायक पर्याय शोधत असाल, तर नक्कीच योग्य!”
X “जर तुम्हाला योनीमध्ये काहीही टाकण्याची भीती वाटत असेल किंवा गर्भाशयाच्या किंवा योनीमार्गाच्या काही वैद्यकीय समस्या / संसर्ग असतील, तर हा पर्याय विचारपूर्वक आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने निवडा.”

“स्वतःसाठी आणि पर्यावरणासाठी एक चांगला पर्याय!”
Menstrual Cup हा आरोग्यदायी, पर्यावरणपूरक आणि खर्चिकदृष्ट्या लाभदायक पर्याय आहे. जर तुम्ही सुरुवातीच्या अडचणींवर मात केली, तर हा तुमच्यासाठी एक  मोकळीक देणारा बदल ठरू शकतो!
ज्या स्त्रियांनी वापरला आहे त्यांना हा आवडला आहे.

Directions for use of menstrual cup

डॉ प्रिया प्रभू, मिरज MD (PSM)

पूर्वप्रसिद्धी श्रेष्ठ महाराष्ट्र लिंक


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.