प्रत्येकीचा मासिक पाळीचा अनुभव वेगळा असतो. काहींसाठी तो अगदी सहज असतो तर काहींसाठी पाळीची भीती वाटेल एवढा त्रासदायक असतो.
बर्याच महिलांना मासिक पाळी दरम्यान किंवा नंतरही तीव्र वेदना, जडपणा किंवा असह्य थकवा जाणवतो. बऱ्याचजणी हा त्रास अंगावर काढत राहतात मात्र काहीजणींचा हा त्रास इतका वाढतो की दैनंदिन कामं करणंही कठीण होतं.
जर तुम्हालाही अशी लक्षणं वारंवार जाणवत असतील, तर त्याची विविध कारणे असू शकतात. त्यामध्ये “ॲडेनोमायोसिस” हे एक संभाव्य कारण असू शकते. पण नक्की हे काय आहे? चला, समजून घेऊया!
ॲडेनोमायोसिस म्हणजे काय?
सामान्यतः गर्भाशयाच्या आतील अस्तर (Endometrium) हे गर्भाशयाच्या स्नायूंपासून (Myometrium) वेगळे असते. पण जर हे ऊतक (endometrial tissue) गर्भाशयाच्या स्नायूमध्ये वाढू लागलं, तर त्याला “ॲडेनोमायोसिस” म्हणतात. यामुळे मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव, वेदना आणि गर्भाशयाचा आकार वाढण्यासारखी लक्षणं दिसू शकतात.
ॲडेनोमायोसिसचे प्रमाण आणि लक्षणं
सर्व महिलांमध्ये याची लक्षणं सारखीच नसतात. कितीतरी स्त्रियांना याचे एकही लक्षण दिसून येत नाही. त्यामुळे याचे प्रमाण नेमके किती आहे हे माहित नाही. वेदनापूर्ण मासिक पाळी असणाऱ्या 2- 5% कुमारवयीन मुलींमध्ये हा त्रास असू शकतो.
काही प्रमुख लक्षणं अशी आहेत:
• तीव्र पोटदुखी – मासिक पाळी दरम्यान आणि कधी कधी दरम्यानच्या काळातही.
• अधिक रक्तस्त्राव (Heavy bleeding) – दीर्घकाळ चालणारी किंवा जास्त प्रमाणात होणारी पाळी.
• गर्भाशयाचा वाढलेला आकार – ओटीपोटात वजन किंवा जडपणा किंवा गच्चपणा जाणवणे.
• संभोगादरम्यान वेदना – (Dyspareunia) काही महिलांना संभोग करताना वेदना होतात.
• थकवा आणि अशक्तपणा – जास्त रक्तस्त्रावामुळे शरीरात लोहाची कमतरता आणि त्यामुळे थकवा जाणवू शकतो.
• गर्भधारणेतील समस्या – काही महिलांना गर्भधारणेस अडथळा येऊ शकतो.
कोणत्या महिलांना धोका अधिक असतो? (High-Risk Groups)
• ३० ते ५० वयोगटातील स्त्रिया – वय जसे वाढते तसे धोका वाढू शकतो.
• पूर्वी गर्भधारणा झालेल्या स्त्रिया – गर्भधारणेनंतर काहीजणींमध्ये हा त्रास जाणवतो.
• सी-सेक्शन किंवा गर्भाशयावर शस्त्रक्रिया झालेल्या स्त्रिया – यामुळे गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये बदल होऊ शकतो.
• हार्मोनल असंतुलन असलेल्या स्त्रिया – एस्ट्रोजेन हार्मोन जास्त प्रमाणात असणे हे एक कारण असू शकते.
ॲडेनोमायोसिस का होतो?
गर्भाशयाच्या अस्तराचा भाग येथील स्नायूंमध्ये असणे हे आधीपासून असू शकते किंवा काही कारणाने तसे घडू शकते. याची विविध कारणे आहेत.
हार्मोनल बदल (Hormonal Changes) – एस्ट्रोजेन हार्मोनचा जास्त प्रभाव.
गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये बदल – प्रसूती, गर्भपात किंवा शस्त्रक्रियेमुळे होणारे बदल.
जनुकीय कारणे (Genetics) – काही स्त्रियांमध्ये हे अनुवांशिक असू शकते.
सतत गर्भाशयावर ताण येणं – गर्भाशयातील ऊतक अनियमित पद्धतीने वाढू शकते.
विविध उपचार पद्धती
हा आजार नाहीसा होत नसल्याने त्याबद्दल लक्षणानुसार उपचार केले जातात.
• औषधोपचार :
✓वेदनाशामक गोळ्या (Painkillers – NSAIDs)
✓हार्मोनल थेरपी – जसे की गर्भरोधक गोळ्या, Mitena सारखी आययूडी (IUD), किंवा हार्मोनचे इंजेक्शन्स
• शस्त्रक्रिया :
✓ ॲडीनोमायोक्टॉमी (adenomyectomy) – गर्भाशयाचा बाधित भाग काढणे.
✓ हिस्टेरेक्टॉमी (Hysterectomy) – गर्भाशय काढून टाकणे (शेवटचा उपाय म्हणून विचार केला जातो).
• घरगुती उपाय :
✓ संतुलित आहार – लोह आणि फायबरयुक्त पदार्थांचा आहार घ्या. थकवा कमी होऊ शकतो.
✓ वजन नियंत्रणात ठेवा – जास्त वजनामुळे एस्ट्रोजेन हार्मोन वाढू शकतो.
✓ योगा आणि व्यायाम – हलक्या व्यायामामुळे रक्तसंचलन सुधारते आणि वेदना कमी होतात.
✓ गरम शेक घेणे (Heat Therapy) – पोटावर गरम पाण्याची पिशवी ठेवणे वेदना कमी करू शकते.
ॲडेनोमायोसिस टाळता येऊ शकते का?
या आजाराचे ठोस प्रतिबंधात्मक उपाय नाहीत, पण काही गोष्टी केल्यास धोका कमी होऊ शकतो –
✓ हार्मोनल संतुलन राखण्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैली ठेवा.
✓ अनावश्यक गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया टाळा.
डॉक्टरांकडे केव्हा जावे?
– पाळी अतिशय तीव्र आणि असह्य होते आहे का?
– रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होतोय का?
– पोट खूप फुगल्यासारखं जाणवतंय आणि वारंवार वेदना होतात का?
– तुम्हाला गरोदर राहण्यास अडचण येतेय का?
जर या समस्या वारंवार जाणवत असतील, तर गायनॅकॉलॉजिस्टला भेटणं आवश्यक आहे.
स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं!
स्त्रियांनी आपले आरोग्य लक्षात घेऊन शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नये. मासिक पाळीतील कोणताही बदल किंवा सततचा त्रास हा ” सर्वांनाच असतो” म्हणून दुर्लक्षित करू नका.
आपल्या शरीराचं ऐका, वेदना सहन करण्याची सवय लावू नका आणि गरज वाटल्यास तज्ञांचा सल्ला घ्या!
आरोग्य महत्त्वाचं – कारण तुम्ही आनंदी असाल, तर तुमचं संपूर्ण कुटुंब आनंदी राहील!
पूर्वप्रसिद्धी श्रेष्ठ महाराष्ट्र लिंक
WA channel join करण्यासाठी link


Leave a Reply