स्तन्य म्हणजे माँ का दूध.
स्तन्य आणि स्तनपानाविषयी जेवढ्या गोष्टी मला आता माहित आहेत , त्या जर मी स्तनपान देत असताना मला माहित असत्या, तर मी माझ्या मुलीला नक्कीच दोन वर्षाहुन अधिक काळापर्यंत पाजले असते. ( निसर्गनियमानुसार जास्तीत जास्त किती काळ पाजता येते माहित आहे का? लेख वाचा.)
आज एवढ्या वर्षांनी हा विचार का माझ्या मनात आला? तर आज मी एक स्तनपानाविषयी माहिती देणारे सेशन ऐकले. पंधरवड्यातून एकदा BPNI मार्फत स्तनपान विषयक तज्ञांची भाषणे आयोजित केली जातात. आज डॉ. पराग दगली यांनी माहिती दिली. ते “स्तन्य आणि त्याचे रोगप्रतिकारक सामर्थ्य” या विषयी बोलले.
आज ज्या तीन नव्या गोष्टी समजल्या त्या तुमच्याशी शेअर करत आहे.
1. चीक दूध का स्पेशल असते?

चीक दूध म्हणजे बाळाचे पहिले लसीकरण. मात्र “अजून दूध आले नाही” या गैरसमजातून बऱ्याचदा बाळाला चिक दूध दिले जात नाही.
गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यांमध्ये हे चीक दूध स्तनामध्ये तयार होते. त्यावेळी आईच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीतत्वे त्यामध्ये भरभरून जातात. त्याचप्रमाणे जेव्हा ते बाळाच्या पोटात जाते त्यावेळी देखील त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कार्यान्वित होण्यासाठी उपयोग होतो आणि हे फक्त त्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्येच होऊ शकते. कारण पहिल्या तीन दिवसांमध्ये बाळाच्या नाजूक आतड्यांमधून रोगप्रतिकारक पेशी त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात.
नियमित दुधाच्या बारापट रोगप्रतिकारक शक्ती चीक दुधामध्ये असते. याचे कारण आज समजले.
आणि आपण काय करतोय या गोल्डन मिल्कचे?
नवजात बाळाला दर दोन तासांनी पाजण्याऐवजी फॉर्म्युला किंवा गाईचे दूध दिले जाते..
सुरुवातीच्या काळात येऊ शकणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आई, कुटुंबीय, आणि डॉक्टर हे समर्थ असायला हवेत. म्हणजे हे चीक दूध बाळापर्यंत पोचेल.
2. स्तनांमध्ये अँटीबॉडीज तयार होतात.

बाळ आजारी असेल तर ते स्तनांना कसे समजते याविषयी मी ब्लॉगवर लेख लिहिला होता. Milky backwash बद्दलही माहित होते.
मात्र आईच्या दुधामध्ये सापडणाऱ्या अँटीबॉडीज या तिच्या रक्तासोबतच स्तनांमध्ये देखील तयार होतात ही नवी माहिती मला मिळाली.
बाळाचा जन्म आणि संगोपनासाठी आईचे शरीर किती प्रकारे खास गोष्टी करते हे विस्मयकारक आहे.
3. HMO म्हणजे केवळ मानवी दुधामध्ये सापडणारी शर्करा
या अनेक प्रकारच्या Human Milk Oligosaccharides चे प्रमाण मानवी दुधातील प्रोटीन्सपेक्षा जास्त असते , कारण यांच्याकडे एक महत्त्वाचे काम असते.
तुमच्या माझ्या आतड्यांमध्ये करोडो मित्रजंतू राहतात. मात्र बाळांच्या आतड्यांमध्ये त्यांची वाढ अजून झालेली नसते.
या न पचणाऱ्या मानवी दुग्धशर्करा बाळाच्या पोटात मित्रजंतू वाढवतात आणि हानिकारक जंतूंची संख्या कमी करतात.
याखेरीज आतड्यांच्या नाजूक पेशींवर आवरण निर्माण करतात आणि रोगजंतूंना तिथे थारा मिळू देत नाहीत.
सर्वात महत्वाचे काम म्हणजे immunmodulation and neuromodilation. म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आणि मेंदूच्या वाढीमध्ये सहाय्य करतात.
त्यामुळे बाळांना जेवढा अधिक काळ आईचे दूध पिता येईल तेवढा त्यांचा फायदाच होतो.
एका कोणत्यातरी फॉर्म्युला कंपनीने केवळ दोन HMO त्यांच्या फॉर्म्युला मध्ये घातले आणि त्याची किंमत दीडपट झाली.
जर स्तन्यातील सर्वच घटक फॉर्म्युला मध्ये कोणी कधी घालू शकले तर त्याची किंमत परवडण्यासारखी नक्कीच राहणार नाही.
तुम्ही किंवा तुमची जोडीदार स्तनपान देत असेल तर आपल्या बाळाला जास्तीत जास्त काळ स्तनपान मिळावे याचा प्रयत्न नक्की करा.

या लेखात या केवळ तीन गोष्टी सांगितल्या मी, पण ते सेशन एका तासाचे होते आणि स्तनपानाचा केवळ एकच फायदा सांगणारे होते.
स्तनपान एक अद्भुत गोष्ट आहे आणि कुटुंब आणि समाजाने जास्तीत जास्त बाळांना ते जास्तीत जास्त काळ मिळावे यासाठी प्रयत्न करायला हवेत.
स्तनपान विषयक माहिती इतरांपर्यंत पोचवणे हे ही स्तनपान प्रमाण वाढवण्यासाठी मदत करते.
मी माझे काम केले..
तुम्ही तुमचे कराल ना?
-डॉ प्रिया प्रभू, मिरज.
(IYCF)
( माझे WA channel (Dr Priya Insights) जॉइन केले तर विविध विषयांच्या गेल्या महिन्याभरात fb वर लिहिलेल्या सर्व महत्वाच्या आरोग्यविषयक पोस्ट WA मध्ये वाचता आणि फॉरवर्ड करता येतील. )


Leave a Reply