कोविड रुग्णसंख्या भारतात आणि जगभरात वाढत आहे. यासंबंधी तुमच्या मनात असणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे आज बघूया. (याखेरीज काही प्रश्न मनात असतील तर FB वर कमेंट मध्ये नक्की विचारा.)
*१. आता कोविडची साथ नाहीये तरी देखील कोविडची तपासणी का करतात?*
-कोविड हा एक नूतन आजार आहे , ज्याचे वय पाच वर्षे आहे आणि हा आजार न्यूमोनिया सदृश्य लक्षणे निर्माण करतो. न्युमोनिया निर्माण करणारे इतर अनेक विषाणू असतात आणि नेमक्या कोणत्या विषाणूचा प्रसार त्या त्या काळामध्ये सुरू आहे हे समजणे आवश्यक गोष्ट असते.
कोणता विषाणू सर्वात जास्त प्रसारित होत आहे हे लक्षात आले तर ज्यांना त्या विषाणूचा सर्वात जास्त धोका असतो त्या गटातील लोकांना सुरक्षित ठेवता येणे शक्य होते. उदा. RSV विषाणू असेल तर लहान मुलांना जपायचे, flu असेल तर जोखीम गटासाठी लसीकरण करायचे असे निर्णय घेता येतात.
कोविड हा वेगाने उपप्रकार निर्माण करणारा आजार आहे, त्यामुळे जेव्हा जेव्हा नवे उपप्रकार निर्माण होतात तेव्हा तेव्हा रुग्णांची संख्या वाढते. तसेच प्रत्येक देशामध्ये तेथील वातावरणाच्या प्रभावामुळे कोणत्या महिन्यात रुग्ण संख्या वाढते हे लक्षात आले की त्यानुसार काळजी घेणे शक्य होते. ( उदा. अमेरिकेसारख्या देशांमध्ये थंडीच्या दिवसात रुग्णसंख्या वाढते, भारतासारख्या देशांमध्ये सहसा उन्हाळ्याच्या महिन्यात पावसापूर्वी रुग्णसंख्या वाढलेली दिसते आहे.)
SARS च्या २००३ च्या साथीनंतर जगभरातील देश न्यूमोनिया सदृश्य आजारांबाबत ( ILI आणि SARI) कमीत कमी पाच टक्के रुग्णांची विषाणू ओळखण्यासाठी तपासणी करतात, जेणेकरून कोणते विषाणू सर्वाधिक प्रमाणामध्ये प्रसारित होत आहेत हे समजते. तसेच एखादा नवीन विषाणू तर निर्माण झाला नाही ना हे देखील समजते.
अशा या नियमितपणे वर्षभर केल्या जाणाऱ्या तपासण्यांमध्ये जे विषाणू वाढताना दिसतात, त्यांच्या तपासण्या वाढवल्या जातात. जेणेकरून मग प्रसार कसा, कुणामध्ये , कोठे होतोय हे समजेल.
कोविड बाबत जेव्हा रुग्ण पॉझिटिव्ह येतो तेव्हा नेमक्या कोणत्या उपप्रकाराने कोविड प्रसार होतोय हे ओळखण्यासाठी काही नमुन्यांची जिनोम तपासणी देखील केली जाते. आणि ही माहिती नियमितपणे WHO बरोबर शेअर केली जाते.
त्यामुळे कोविड विषाणूची तपासणी ही सर्वेक्षणाचा भाग म्हणून काही प्रमाणात दर महिन्यात होतच राहणार आहे आणि वातावरणानुसार रुग्णसंख्या देखील कमी जास्त होत राहणार आहे.
जगभरातील ही माहिती एकत्र करून वर्षातून दोन वेळा WHO कोविड बाबतच्या बदलत्या धोक्यांविषयी पत्रक प्रसिद्ध करते, ज्याचा उपयोग करून देश स्वतःसाठी नियमावली तयार करू शकतात.
*२. जगभरात आणि थायलंडसारख्या देशांमध्ये रुग्णसंख्या एवढ्या वेगाने का वाढली आहे?*
-सध्या VOI म्हणजे Variant of Interest हा JN.1 आहे जो ओमायक्रॉन विषाणूचा उपप्रकार आहे. ओमायक्रॉन हा वुहान विषाणूचा उपप्रकार आहे आणि डेल्टा च्या तुलनेने सौम्य लक्षणे निर्माण करणारा तसेच सहजपणे पसरणारा उपप्रकार आहे.
JN.1 नंतर VOI निर्माण झाला नसला तरी त्याचे अनेक उपप्रकार जगभरात पसरलेले आहेत. त्यांना VUM म्हणजे Variant under Monitoring म्हटले जाते आणि त्यांच्या लक्षणांवर आणि परिणामांवर लक्ष ठेवले जाते.
आतापर्यंत LP 8.1 हा उपप्रकार सर्वाधिक दिसून येत होता मात्र आता NB 1.8.1 हा जानेवारी 25 मध्ये सर्वप्रथम सापडलेला उपप्रकार अतिशय वेगाने पसरत आहे. एप्रिल ते मे या चार आठवड्याच्या काळामध्ये तपासण्यांच्या २.५% पासून १०% एवढी त्याच्या प्रमाणात वाढ झालेली पुढील फोटो मध्ये दिसत आहे.

NB 1.8.1 या उपप्रकारमध्ये 6 नवे म्युटेशन आढळून आले आहेत. यामुळे हा विषाणू ACE रिसेप्टरला अधिक सहजपणे चिकटतो आणि शरीरातील इम्युनिटीला देखील सहजपणे चुकवतो. मात्र जगभरात आजाराच्या गंभीरतेचे प्रमाण वाढलेले आढळून आलेले नाही. यापूर्वीच्या उपप्रकारांपेक्षा सहजपणे प्रसार होणारा मात्र आधीप्रमाणेच गंभीरता आणि मृत्यूचा धोका असणारा हा उपप्रकार आहे.
*३. भारतात काय परिस्थिती आहे?*
-भारतात तामिळनाडू आणि गुजरात येथे NB 1.8.1 आणि LF 7 हे उपप्रकार सापडल्याची बातमी आहे. इतर ठिकाणी देखील असू शकतात. जुने इतर उपप्रकार तर आहेतच.
पुढील फोटो बघितला तर लक्षात येईल की २०२४ मध्ये देखील याच काळामध्ये कोविड रुग्णसंख्या वाढली होती आणि जून-जुलै मध्ये कमी झाली होती.

त्यामुळे २०२५ मधील भारतातील वाढ ही वातावरणामुळे होणारी नियमित वाढ असू शकते किंवा नव्या व्हेरियंट मुळे होणारी देखील असू शकते. नव्या व्हेरियंटचे प्रमाण तपासणीमध्ये वाढत असेल तर ते लवकरच समजेल. तोपर्यंत ही वाढ नियमित समजण्यास हरकत नाही. सरकारकडून प्रसारित होणाऱ्या सूचनेची वाट बघूया.
*४. याविषयी काय खबरदारी घेतली जात आहे?*
-कोविड पॉझिटिव्ह तपासण्या वाढत असल्याने सुरक्षेची खबरदारी म्हणून सर्व रुग्णालये सज्ज ठेवण्यात येत आहेत. तसेच जीवनदायी ऑक्सिजन निर्मितीसंच देखील सज्ज ठेवले जात आहेत.
ही पूर्वतयारी आहे.
मात्र ज्या देशात रुग्णसंख्या वाढत आहे त्या देशांमध्ये गंभीर रुग्णांचे प्रमाण किंवा आयसीयू मध्ये भरती होण्याचे प्रमाण तुलनेने वाढलेले नाही.
त्यामुळे सध्या उपलब्ध माहितीनुसार रुग्ण गंभीर होण्याची जोखीम कमी आहे.
कोविडबाबत जनसामान्यांसाठी देखील माहिती प्रसारित केली जात आहे जेणे करून आपण आपल्या सुरक्षेची काळजी घेऊ शकू.
*५. नव्या व्हेरियंटमुळे होणारा कोविड कसा आहे?*
-कोविड विषाणू प्रामुख्याने श्वसनसंस्थेला बाधित करत असला तरी देखील शरीरातील इतर अवयव देखील बाधित होतात हे आपल्याला माहित आहे.
त्यामुळे मुख्य लक्षणे ताप, सर्दी ,खोकला , घसा दुखणे अशा प्रकारचे असू शकतात.
याखेरीज थकवा येणे, पोट दुखणे, जुलाब होणे, अंग दुखणे अशीही लक्षणे असू शकतात.
ही सर्व लक्षणे अतिशय साधी वाटत असल्यामुळे आजाराकडे दुर्लक्ष होऊ शकते, तसेच आजारी व्यक्तीकडून इतरांना नकळत संसर्ग दिला जाऊ शकतो.
सध्या कोविड वाढत असल्याने जर श्वसनसंस्थेचा कोणता आजार झालेला असेल तर अशा व्यक्तींवर लक्ष ठेवून त्यांच्या आजाराची गंभीरता वाढत असेल, ताप खूप जास्त असेल , श्वास घेण्यास त्रास होत असेल, धाप लागली असेल, खूप अशक्तपणा आला असेल अशावेळी वेळ न घालवता रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करणे आवश्यक आहे. SPO2 वर देखील लक्ष ठेवता येईल.
हा कोविड निघेल का याची चिंता करू नका. डॉक्टरांनी तपासणी करण्याचा सल्ला दिला तर अवश्य तपासणी करा. कारण आपल्याला कोविड झाला होता की नाही ही भविष्यात आरोग्याच्या तक्रारी निर्माण झाल्या तर महत्त्वाची माहिती आहे.
*६. सध्या कोविडचा धोका कोणाकोणाला आहे?*
-गेल्या पाच वर्षांमध्ये कोविडचा धोका कोणाला जास्त असतो हे आपल्या लक्षात आलेले आहे.
✓ वयस्कर व्यक्ती,
✓ ज्यांना सहव्याधी आहे जसे डायबिटीस, उच्च रक्तदाब, किडनीचा आजार असणाऱ्या व्यक्ती,
✓ लठ्ठ असलेल्या व्यक्ती ,
✓ ज्यांची इम्युनिटी कोणत्याही कारणाने कमी आहे अशा व्यक्ती जसे स्टिरॉईड घेणाऱ्या, एच आय व्ही बाधित इत्यादी.
अशा व्यक्तींमध्ये कोविड बाधा झाल्यास रुग्ण गंभीर होण्याची शक्यता तसेच मृत्यूचा धोका जास्त असतो.
लहान मुलांमधील न्युमोनिया गंभीर होऊ शकतो त्यामुळे त्यांची देखील काळजी घ्यावी.
वरील व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी विशेषतः वायुविजन कमी आहे अश्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. त्यांच्या घरी कोणी आजारी असेल तर त्यांनी वरील व्यक्तींना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी.
ओमायक्रॉनच्या उपप्रकारांमुळे मृत्यू होण्याचा धोका तुलनेने कमी असला तरीदेखील शरीरातील अवयव बाधित होऊन भविष्यात त्रास होण्याची शक्यता, तसेच जवळजवळ 10% लोकांमध्ये लॉंग कोविड होण्याची शक्यता मात्र असते.
त्यामुळे सर्वांनी संसर्ग टाळणे हे उत्तम.
*७. नागरिकांनी कोणती काळजी घ्यायला हवी?*
-कोविडची सध्याची लक्षणे बघितली तर जाणवेल की लक्षणांमुळे हा सर्दी खोकल्यासारखा सौम्य आजार वाटू शकतो.
त्यामुळे असा श्वसन संस्थेचा संसर्ग असणाऱ्या व्यक्तींनी तो आजार इतरांपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी .
त्यासाठी – शिंकताना खोकताना तोंड झाकणे, हातांची स्वच्छता राखणे , इतस्ततः न थुंकणे या कृती करता येतील.
स्वतःच्या जोखीम सहन करण्याच्या क्षमतेनुसार किंवा सहव्याधी आहेत की नाही , तुमची इम्युनिटी आजार रोखण्यासाठी किती स्ट्रॉंग असते यानुसार बंदिस्त आणि गर्दीच्या जागी मास्क वापरायचा किंवा नाही हे तुम्ही ठरवू शकता. सार्वत्रिक मास्कवापर करण्याची आवश्यकता नाही.
आजारी व्यक्तींवर लक्ष ठेवून आजार गंभीर होणार नाही याची काळजी घ्यावी.
लसीकरणाबाबत WHO ने पुढील लसींचा जोखीम गटांसाठी नव्या व्हेरिएंट विरुद्ध उपयोग करता येईल असे सांगितले आहे – JN.1 आणि KP 2 याविरुद्धच्या लसी.
मात्र या भारतात सध्या उपलब्ध नाहीत.
त्यामुळे इतर आजारी व्यक्तींपासून अंतर ठेवणे आणि हातांची स्वच्छता राखणे तसेच हात चेहऱ्याजवळ न नेणे या उपायांनी संसर्ग टाळण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
*८. कोविड रुग्णसंख्या वाढली की घाबरायला हवे का?*
– नाही. कारण –
✓ आता कोविडपासून कसे सुरक्षित राहायचे याविषयी आपल्याला माहिती आहे.
✓ तसेच 2020 पासून आपल्या सर्वांना एकदा तरी कोविडसंसर्ग झालेला आहे. ( लक्षणविहीन संसर्ग होऊ शकत असल्याने आपल्याला संसर्ग झाला की नाही याची खात्री कोणीच देऊ शकत नाही.)
✓ तसेच बऱ्याच जणांनी दोन किंवा तीन लसीचे डोस घेतलेले आहेत.
✓ त्यामुळे आपल्या शरीरामध्ये काही प्रमाणामध्ये इम्युनिटी देखील आहे.
✓ दवाखाने योग्य ती काळजी घेण्यासाठी सक्षम आहेत.
त्यामुळे संसर्ग झाला तरी तो सौम्य असण्याची सर्वाधिक शक्यता आहे.
त्यामुळे रुग्ण संख्या वाढत असल्याच्या बातम्या आल्या की घाबरून जाऊ नका. केवळ जोखीम जास्त असलेल्या व्यक्तींची अधिक काळजी घेणे सुरू करा.
*रुग्ण संख्या वाढत आहे हा सावधानतेचा इशारा आहे, घाबरण्याची खुण नाही.*
सर्वात जास्त भीती मीडियामध्ये ज्या पद्धतीने बातम्या सांगितल्या किंवा लिहिल्या जातात त्यामुळे वाटते.
*योग्य शास्त्रीय माहिती मिळवा आणि इतरांपर्यंत पोचवा. कारण शास्त्रीय माहिती भीती कमी करते आणि सुरक्षा वाढवते.*
– डॉ प्रिया प्रभू , मिरज
MD PSM (रोगप्रतिबंधक शास्त्र तज्ञ)
(४/६/२५)
आरोग्यविषयक नियमित अपडेट्स साठी WA channel जॉईन करा. लिंक
WHO चा माहितीपूर्ण लेख लिंक


Leave a Reply