गर्भवती मातांनी HIV तपासणी का करावी?

Written by:

सर्व गरोदर स्त्रियांना माझे सांगणे आहे की ‘तुम्ही एकदा तरी एचआयव्हीची तपासणी करून घ्या.’

हा असा सल्ला ऐकून एकदम गोंधळल्यासारखे किंवा वेगळे वाटू शकते. मात्र ही तपासणी प्रत्येक गरोदर स्त्रीने करणे हे खूप महत्त्वाचे आहे. असे का ते या लेखामध्ये पाहूया!

एचआयव्ही म्हटले की डोळ्यासमोर काही एक चित्र उभे राहते. त्यामध्ये ‘ एच आय व्ही (एड्स) हा एक लैंगिक संबंधाद्वारे विशेषतः विवाहबाह्य किंवा विवाहपूर्व संबंधांमुळे पसरणारा आजार आहे’, तसेच ‘या आजाराने मृत्यू ओढवतो’ या दोनच गोष्टी मुख्यतः डोळ्यासमोर येतात.
पण एचआयव्ही प्रसाराचे इतरही मार्ग आहेत हे सर्वांना माहीत नसते. तसेच एचआयव्ही संसर्ग हा पूर्णपणे बरा होत नसला तरी संपूर्णपणे नॉर्मल आयुष्य जगण्यासाठी सहाय्यकारी अशी विविध औषधे अगदी मोफत उपलब्ध आहेत हेही सर्वांना माहीत नसते.

एचआयव्ही संसर्गाची सद्यपरिस्थिती

80 च्या दशकामध्ये एचआयव्ही विषाणूचा भारतामध्ये प्रवेश झाला आणि तेव्हापासून गेली चार दशके हा संसर्ग संपूर्ण भारतभर पसरलेला आहे. मात्र नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रॅम या राष्ट्रीय नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध योजना प्रभावी पद्धतीने राबवल्याने आता एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण हे खूपसे नियंत्रित झाले आहे. तसेच 2004 पासून भारतामध्ये एचआयव्ही बाधित व्यक्तींसाठी एआरटीची औषधे विविध सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत उपलब्ध आहेत. यांचा वापर करून एचआयव्ही बाधित व्यक्ती पूर्णतः सामान्य जीवन जगू शकतात. तसेच यामुळे एचआयव्ही प्रसारालाही प्रतिबंध होतो.

2000 साली दर हजारात 5- 6 व्यक्ती एचआयव्ही बाधित होत्या . हे प्रमाण आता कमी होऊन 2021 साली हजारातील साधारण 2 व्यक्ती एचआयव्ही बाधित आहेत असे दिसून येते. 
एका अंदाजानुसार 2021 साली भारतामध्ये साधारण 24 लाख एचआयव्ही बाधित व्यक्ती राहत आहेत आणि महाराष्ट्रात यांचे प्रमाण बरेच जास्त आहे.


एचआयव्ही प्रसाराचे लैंगिक संबंध खेरीज आहे इतर मार्ग आहेत . जसे-  ज्या व्यक्ती नशेसाठी इंजेक्शन घेतात व त्यासाठी एकमेकांची सुई वापरतात अशा लोकांमध्ये हे प्रमाण अधिक दिसून येते . या प्रकारच्या संसर्गाचे प्रमाण हे सर्वाधिक आहे . सध्या तरुणाई मध्ये नशा करण्याचे प्रमाण वाढत असल्याने याविषयी त्यांनी काळजी घ्यायला हवी.

एचआयव्ही प्रसाराचे इतर मार्ग

याखेरीज कधीकधी वैद्यकीय कारणास्तव जसे- वापरलेल्या इंजेक्शनची सुई चुकून टोचली असेल तरी देखील एच आय व्ही बाधा होऊ शकते.

ज्यांना कोणत्याही कारणास्तव वारंवार रक्त चढवण्याची गरज पडत असेल तसेच कधी रक्त हे प्रमाणित रक्तपेढीतून घेतले गेले नसेल तर एचआयव्ही बाधा होऊ शकते.

मुलगा किंवा मुलगी अश्या कोणावरही लहानपणी लैंगिक अत्याचार झालेले असतील आणि  याबाबत कोणतीही वैद्यकीय मदत घेतली गेली नसेल तर अशावेळी त्यांना बाधा झालेली असण्याची शक्यता असते.

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाधित असलेल्या गरोदर किंवा स्तनदा मातेकडून बाळापर्यंत एचआयव्ही संसर्ग पोचू शकतो. बाधित मातेपासून अशा प्रकारच्या संसर्गाचा धोका हा 20 ते 40 % एवढा आहे.

तपासणी का महत्त्वाची?


एचआयव्ही प्रसाराचे विविध मार्ग असले तरीही या मार्गे होणारा प्रसार थांबवण्याचे उपाय देखील आता उपलब्ध आहेत.


विशेषतः गरोदर मातेपासून नवजात बाळाला जन्मतः व जन्मल्यानंतर जी एचआयव्ही ची बाधा होऊ शकते , ती पूर्णपणे टाळणे आता शक्य आहे.


क्युबा आणि थायलंड सह एकूण पाच देशांना आईपासून बाळापर्यंत होणारा एचआयव्हीचा प्रसार पूर्णतः थांबवण्यामध्ये यश मिळाले आहे. म्हणजेच या पाच देशातील एकाही बाळाला जन्मतः एचआयव्ही संसर्ग होत नाही.


आपल्या भारतातील बाळांनाही जन्मतः एचआयव्ही बाधा होऊ नये यासाठी पहिली पायरी म्हणून प्रत्येक गरोदर स्त्रीने एचआयव्हीची तपासणी करायला हवी.

मातेची तपासणी कशी होते?


एचआयव्हीची तपासणी करण्यापूर्वी आणि तपासणी केल्यानंतर समुपदेशन केले जाते .ही एक रक्ताची तपासणी असून यामध्ये रक्तातील अँटिबॉडीज तपासल्या जातात . ज्या गरोदर मातांमध्ये एचआयव्ही बाधा आढळते त्यांच्या साठी एचआयव्ही नियंत्रक औषधोपचार सुरू केले जातात.


सद्यस्थितीत अशा गरोदर मातांना एकूण तीन प्रकारची औषधे एका गोळीद्वारे दिली जातात. या औषधांमुळे आईच्या रक्तातील एचआयव्ही विषाणूचे प्रमाण हे अतिशय कमी होते आणि एचआयव्ही  संसर्गापासून  बाळाचा बचाव होतो. या औषधांचा बाळावर कोणताही दुष्परिणाम होत नाही.


एचआयव्ही बाधित मातेने स्तनपान द्यावे का?

एच आय व्ही बाधित माता बाळाला सुरक्षितपणे स्तनपान देऊ शकते . मात्र यासाठी तिने एचआयव्ही नियंत्रक औषधे नियमितपणे घ्यायला हवीत.

पूर्वी यासाठी वेगळी मार्गदर्शक तत्वे होती. मात्र आता गरोदर स्त्रीला तीन प्रकारची औषधे दिली जात असल्याने तिच्या रक्तातील एचआयव्ही विषाणू अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित झालेला असतो. आणि अशी माता आपल्या बाळाला पहिले सहा महिने  निव्वळ स्तनपान आणि त्यानंतर एक ते दोन वर्षांपर्यंत स्तनपानासह वरचे अन्न देऊ शकते. मात्र यासाठी आईने गरोदर असताना रक्ताची तपासणी करून वेळेवर औषधोपचार सुरू करावे लागतात.

बाळ सहा आठवड्याचे झाले की त्याची एच आय व्ही साठी पहिली तपासणी होते . त्यानंतर ठराविक काळाने वारंवार ही तपासणी केली जाते.  जर बाळ एचआयव्ही बाधित झालेले असेल तर आई दोन वर्षापर्यंत पाजू शकते आणि जर बाळ हे एचआयव्ही निगेटिव्ह असेल तर आई एक वर्षापर्यंत स्तनपान देऊ शकते.


एचआयव्ही बाधित बाळाची काळजी

गरोदर स्त्रीने वेळेवर एचआयव्हीची तपासणी केली आणि एचआयव्ही नियंत्रक उपचार हे नियमितपणे घेतले तर सहसा बाळ बाधित होत नाही.  तसेच बाळाच्या जन्मानंतरही आईने ही औषधे न चुकता घ्यायची असतात म्हणजे बाळाला पाजताना बाधित होत नाही.

आणि तरीही बाळाला एचआयव्हीची बाधा झाली तर अशा बाळांसाठीही एआरटीची मोफत औषधे ही सरकारकडून उपलब्ध आहेत.  बाधित बाळांसाठीही नियमितपणे उपचार घेतले तर बाळ अनेक वर्षे कोणत्याही आजाराविना जगू शकते.

एचआयव्ही बाबत नवा दृष्टिकोन


एच आय व्ही बाधा आता सामान्य आजारांसारखीच समजायला हवी. जसे मधुमेही व्यक्ती आयुष्यभर औषधे घेऊन रक्तातील साखर नियंत्रित ठेवते,  त्याचप्रमाणे एचआयव्ही बाधित व्यक्ती आयुष्यभर एचआयव्ही नियंत्रक औषधे घेऊन विषाणूला नियंत्रित ठेवतात व एड्स पासून स्वतःचा बचाव करतात.

मधुमेही व्यक्तीने साखर नियंत्रणाची शक्ती गमावलेली असते त्याचप्रमाणे एचआयव्ही बाधित व्यक्तीने रोगप्रतिकारक शक्ती गमावलेली असते. त्यामुळे जगताना विविध नियमांचे पालन करून एचआयव्ही बाधित व्यक्ती देखील स्वतःला आजारांपासून सुरक्षित ठेवू शकते, तसेच औषध उपचारांच्या मदतीने विषाणूला नियंत्रित ठेवू शकते.

कोणाला एचआयव्हीचा संसर्ग झाला की घाबरून जाण्यासारखी आता परिस्थिती राहिलेली नाही. विज्ञानाच्या प्रगतीमुळे एचआयव्हीसह सुरक्षितपणे आणि आनंदी जीवन जगण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत.


त्यामुळे प्रत्येक बाळाला एचआयव्ही मुक्त जीवन मिळावे यासाठी प्रत्येक गरोदर स्त्रीने एचआयव्हीची तपासणी करून घ्यायला हवी हे तुम्हाला पटले ना?

ही माहिती प्रत्येक गरोदर स्त्रीपर्यंत नक्की पोहोचवा,  म्हणजे भारतातील बाळे ही एचआयव्ही मुक्त जीवन मिळू शकतील.

डॉ प्रिया प्रभू , MD PSM
रोगप्रतिबंधकशास्त्र तज्ञ
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,  मिरज.
drprdeshpande2@gmail.com
askdrpriya.in

हा लेख श्रेष्ठ महाराष्ट्र या साइटवर पूर्व प्रसिद्ध झाला होता.

https://shreshthmaharashtra.com/knowledge_bank/shreshth-maharashtra-international_aids_day_hiv_infection_in_pregnancy_precautions/


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.