(पोस्ट ऐकायची असल्यास लिंक शेवटी दिली आहे)
काही डॉक्टर HMPV ची तुलना कोविडशी करून HMPV ला देखील गांभीर्याने घ्यायलाच हवे, कारण ‘पुढे काय होईल कोणी सांगितले’ अशा पद्धतीचे मत व्यक्त करताना दिसून येत आहेत.
जेव्हा जेव्हा तज्ञ व्यक्तीकडून वेगवेगळ्या प्रकारची मते ऐकायला मिळतात तेव्हा तेव्हा प्रॉब्लेम असतो.
कारण मग सामान्य जनता पूर्णपणे संभ्रमित होऊन जाते आणि त्यांचा पूर्ण व्यवस्थेवरीलच विश्वास नाहीसा होतो.
या आजाराची कोविडशी तुलना का अप्रस्तुत आहे ते बघूया.
१. कोविड किंवा SARS Cov 2 हा मानवी प्रजातीमध्ये आलेला एक नूतन विषाणू होता आणि ज्याचा उगम चीनमध्ये झाला होता. आज या विषाणूचे वय फक्त 5 वर्षे आहे.
मात्र
HMPV विषाणू हा 25 वर्षांपूर्वी ओळखता आला. तत्पूर्वी कमीत कमी पन्नास वर्षे तो जगामध्ये पसरत आहे आणि ज्या पद्धतीने तो मुख्यतः केवळ मुलांना बाधित करतो, त्यावरून असे लक्षात येते की, हा विषाणू त्याहून अधिक काळ या जगामध्ये असणार आहे आणि मानवांना बाधित करत असणार आहे.
२. कोविड नूतन आजार असल्याने जगभरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या शरीरामध्ये त्याच्या विरुद्ध अँटीबोडीज नव्हत्या . त्यामुळे प्रत्येकाला या विषाणूचा धोका होता. कारण जगभरातील सर्वांची या आजाराविरुद्ध इम्युनिटी शून्य होती.
मात्र
HMPV अनेक दशके सर्वांना बाधित करणारा विषाणू असल्याने अनेक अभ्यासाद्वारे असे लक्षात आले आहे की या विषाणूच्या अँटीबोडीज प्रत्येक प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये उपलब्ध असतात. पाच वर्षाच्या वयापर्यंतच जवळपास 90% मुलांमध्येही या अँटिबोडीज दिसून येतात. त्यामुळे 0 इम्युनिटी असणारे अगदी नगण्य लोक जगामध्ये आहेत.
३. सुरुवातीला जरी हे मान्य झाले नाही तरी आता हे विज्ञानाने सिद्ध झाले आहे की कोविड हा केवळ श्वसन संस्थेचा आजार नसून या विषाणूमुळे शरीरातील विविध अवयव बाधित झाले व त्यांचे नुकसानही झाले. याचे परिणाम हळूहळू लक्षात येत आहेत. ज्यांना कोणतेही लक्षण नव्हते अशाही व्यक्तींमध्ये कोविड संसर्गामुळे नुकसान झालेले आहे.
मात्र
HMPV हा सहसा नाक कान घसा बाधित करणारा आणि काही रुग्णांमध्ये फुफ्फुसे बाधित करणारा असा आजार आहे. साधारण कोणत्या व्यक्तींमध्ये हा आजार गंभीर रूप घेऊ शकेल याचा अंदाज आतापर्यंत आलेला आहे. जे कुपोषित आहेत किंवा ज्यांची इम्युनिटी काही कारणाने कमी आहे किंवा ज्यांची फुफ्फुसे अशक्त अशांमध्ये हा आजार गंभीर होऊ शकतो.
४. Covid मध्ये लक्षण विहीन संसर्ग हा 90% हून अधिक लोकांमध्ये दिसून येत होता. असे लक्षण नसणारे लोक हे आजार पसरवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत होते.
मात्र
HMPV संसर्गामध्ये लक्षण विहीन संसर्ग नगण्य असतो. संसर्ग झाला की काही ना काही लक्षणे दिसून येतात. कमीत कमी सर्दी खोकला तरी होतोच. त्यामुळे नकळत संसर्ग फैलावण्याची शक्यता अतिशय कमी आहे.
यावरून लक्षात येईल की कोविडशी तुलना करून या HMPV बद्दल भीती निर्माण करणे योग्य नाही.
सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कोणत्याही खात्रीशीर स्त्रोतांकडून चीन मधली परिस्थिती गंभीर आहे असे आढळून आलेले नाही.
आत्तापर्यंत कोणतेही खात्रीशीर आकडे उपलब्ध नाहीत.
वाढलेली रुग्णसंख्या ही किती प्रमाणात HMPV बाधित आहे याची आकडेवारी उपलब्ध नाही. तसेच ही कथीत वाढ significant आहे का असेही उल्लेख नाहीत.
HMPV मध्ये काही जनुकीय बदल झाल्याबाबत कोणताही अभ्यास प्रसिद्ध नाही. तसेच प्रत्येक देशामध्ये हा विषाणू वेगवेगळ्या उपप्रकारामुळे होतो असे आत्तापर्यंत आढळून आलेले आहे.
त्या समशीतोष्ण देशातील हिवाळा आणि भारतातील हिवाळा हे वेगळ्या प्रकारचे असतात.
त्या देशांमध्ये हिवाळ्याच्या आधी सर्व लोकांना फ्लूची लस देतात. भारतामध्ये असे सर्वांसाठी करण्याची गरज नसते.
त्या देशांमध्ये RSV या विषाणूमुळे अनेक रुग्ण आजारी पडतात , भारतामध्ये असे मोठे प्रमाण कधी दिसून आलेले नाही.
प्रत्येक देश वेगळा असतो , प्रत्येक देशातील भौगोलिक व पर्यावरणीय परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे एका देशाचे नियम शंभर टक्के दुसऱ्या देशासाठी कधीच लागू होत नाहीत.
मात्र जेव्हा वैद्यकीय व्यवसायिकच ‘पुढे प्रॉब्लेम आला तर काय ‘ या अतिशय अशास्त्रीय वाक्याचा वापर करून लोकांना “काळजी घ्या, मास्क वापरा” अशा पद्धतीचे सल्ले देत असतील तर नक्कीच संभ्रम निर्माण होईल. आणि संभ्रम निर्माण झाला की भीती किंवा राग निर्माण होतो आणि मग योग्य कृती केली जात नाही.
वरील सर्व बाबींवरून आपल्या लक्षात आलेच असेल की कोविड आणि ह्या HMPV विषाणूची तुलना करणे अतिशय अप्रस्तुत आहे आणि अशास्त्रीय देखील आहे. आणि अशी तुलना करण्याने समाजाचे नुकसानच होणार आहे.
श्वसन संस्थेचे आजार मुलांमध्ये टाळणे हे सोपे आहे.
मुलांची काळजी घेणे हे त्यांच्या पोषणाची काळजी घेणे इतके सोपे आहे. कुपोषित मुलांमध्ये आजार गंभीर रूप धारण करतात.
मुलांची काळजी घेणे म्हणजे आजारी व्यक्तीपासून त्यांना दूर ठेवणे इतके सोपे आहे. म्हणजे प्रत्येक सर्दी खोकला असलेल्या व्यक्तीने काळजी घेतली तर आपली मुले सुरक्षित राहतील.
मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्दी खोकल्याने आजारी असताना आजार पसरू नये यासाठी काय काय करावे लागते हे समजवणे सोपे आहे. शिंकताना , खोकताना हाताच्या दंडाने तोंड झाकणे आणि चेहऱ्याला हात न लावणे, हात धुणे या महत्त्वाच्या कृती आहेत.
इतर मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आजारी मुलांना शाळेत न पाठवणे किंवा पाठवल्यास त्यांना इतर मुलांपासून थोडे विलग बसवणे एवढे सोपे आहे. वर्गातील वायुविजन खिडक्या उघडून व्यवस्थित ठेवणे हेही सोपे आहे.
विषाणूजन्य आजारी व्यक्तींना विश्रांतीची आणि खूप सार्या द्रव पदार्थांची आवश्यकता असते. ही काळजी घेणे अतिशय सोपे आहे.
त्यामुळे योग्य माहिती घ्या .
योग्य काळजी घ्या .
उगीच एखाद्या जुन्या आजाराला गांभीर्याने घेऊन स्वतःचा ताण वाढवू नका .
जेव्हा एखादा खराच नूतन विषाणू येईल तेव्हा आपल्याला सुरक्षेसाठी विविध कृती कराव्या लागणार आहेत.
मात्र आत्ता त्यांची खास गरज नाही.
तुम्हाला सुरक्षित वाटेल इतपत काळजी तुम्ही नेहमीच घेऊ शकता.
HMPV विषाणू कोविडसारखा नसल्याने या आजाराला घाबरायची गरज नाहीये कारण याचे pandemic येण्याची शक्यता अतिशय नगण्य आहे.
- डॉ. प्रिया प्रभू, GMC , मिरज.
(८/१/२५)
YouTube वर पोस्ट ऐकण्यासाठी लिंक
https://youtu.be/akN6524JoT4?si=0PL_wzyM7pUD_DI4




Leave a Reply