गिलान बार सिंड्रोम (GBS) म्हणजे वाट चुकलेली इम्युनिटी

Written by:

विविध रोगजंतूंपासून आपला बचाव करणारी आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती जेव्हा आपल्याच शरीरावर हल्ला करते तेव्हा काय होऊ शकते हे या गिलान बार सिंड्रोम मध्ये आपल्या लक्षात येते.

गिलान बार सिंड्रोम (Guillain-Barré Syndrome) म्हणजे GBS हा एक दुर्मिळ परंतु गंभीर स्वरूपाचा आजार आहे.

हा दुर्मिळ आजार आहे कारण हा सहसा लाखांमध्ये एखाद्या वेळेस होतो.

आणि हा गंभीर आजार आहे कारण काही GBS रुग्णांची श्वसन करण्याची क्षमता जर बाधित झाली की त्यांना व्हेंटिलेटरची गरज पडू शकते. तसेच या आजाराने कमकुवत झालेले शरीरातील स्नायू पुन्हा दुरुस्त होण्यासाठी काही महिनेदेखील लागू शकतात.

हा आजार आपल्या स्वतःच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीमुळे होत असल्याने हा आजार संसर्गजन्य नाही. त्यामुळे घरातील एखाद्या वक्तीला तो आजार झाला असेल तर तो इतरांना होईल का याची काळजी करू नये. या आजारामध्ये आपली प्रतिकारशक्ती चुकीने नर्व्ह (नसा किंवा मज्जा तंतू) वर हल्ला करते. हा आजार नेमका काय आहे, याची लक्षणं, सुरुवातीच्या खुणा आणि योग्य काळजी कशी घ्यावी याविषयी आज आपण माहिती घेऊया.

GBS आजार का होतो?

GBS हा एक ऑटोइम्यून आजार आहे, म्हणजे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती चुकीने आपल्याच नसांवर हल्ला करते.
सहसा हा आजार होण्यापूर्वी 1 ते 6 आठवड्यांमध्ये एखादे पोटाचे किंवा श्र्वसनसंस्थेचे इन्फेक्शन होते आणि ते झाल्यानंतर ज्या अँटीबॉडी तयार होतात, त्यातील काही नसांच्या विरुद्ध देखील हल्ला करू लागतात.
या हल्ल्यामुळे नर्व्हच्या भोवती असलेलं “मायलीन शिथ” नष्ट होतं, ज्यामुळे विविध स्नायुंपर्यंत नर्व्ह संदेश देण्यात अडथळा निर्माण होतो. आणि मग त्यामुळे स्नायू काम करेनासे होतात –  म्हणजेच शरीराला लकवा मारल्यासारखे चित्र दिसते.

या आजाराला ट्रिगर करणारे घटक पुढीलप्रमाणे:

व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन (उदा. सर्दी, फ्लू, जुलाब, पोट बिघडणे )
कॅम्पिलोबॅक्टर जेज्यूनी बॅक्टेरिया या पोटाचा विकार निर्माण करणाऱ्या जिवाणूमुळे साधारण 40 % केसेस होतात. सायटोमेगालो व्हायरस , एब्स्टिन बार व्हायरस यामुळे 35% केसेस होतात. झिका व्हायरस आणि कोविड व्हायरस संसर्गानंतर देखील हा आजार आढळून आला आहे.
लसीकरणानंतर (अत्यंत दुर्मिळ घटना)
फ्लू सारख्या आजाराच्या लसीकरणानंतर याच्या काही केसेस आढळून येऊ शकतात.
शस्त्रक्रियेनंतर किंवा इतर वैद्यकीय प्रक्रियेनंतर.
यानंतरही काही दुर्मिळ वेळा असे घडू शकते.

GB सिंड्रोमची लक्षणं कोणती?

GBS ची लक्षणं हळूहळू वाढत जाणारी असतात आणि सामान्यतः शरीराच्या खालच्या भागापासून (पाय) वरच्या भागाकडे (हात आणि चेहरा) पसरतात.

  1. सुरुवातीची लक्षणं:

दोन्ही पायांमध्ये सुन्नपणा किंवा मुंग्या येणे.
पायातून चपला निसटून जाणे
हलकी वेदना किंवा अस्वस्थता. (मुलांमध्ये आढळू शकते)
हाता पायांमध्ये जडपणा किंवा जाणीव कमी होणे

लक्षणे कमी न होता एक-दोन दिवसांमध्ये त्याची वाढ होण्यास सुरुवात होते. ही लक्षणे अगदी साधी असल्याने यांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकते.

  1. प्रगतीशील लक्षणं:

ही लक्षणे शरीराच्या दोन्ही बाजूंमध्ये सारख्या प्रमाणातच दिसून येतात. प्राथमिक लक्षणानंतर ही वाढत जाणारी लक्षणे सुरू होतात आणि साधारण दोन आठवड्यात सर्वाधिक परिणाम दिसून येतो.

स्नायूंमध्ये कमकुवतपणा (पाय, हात, चेहरा) आल्याने हालचाल न करता येणे
हालचालींमध्ये अडथळा किंवा असमर्थता
संतुलन बिघडणं.
गिळताना किंवा बोलताना त्रास होणं.
लघवी करता न येणे

  1. गंभीर लक्षणं:

केवळ हाता-पायाऐवजी इतरही नसा बाधित झाल्या असतील तर गंभीर लक्षणे देखील दिसून येतात. जसे –
श्वास घेण्यास त्रास (रेस्पिरेटरी फेल्युअर).
हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता.
रक्तदाबामध्ये अत्याधिक चढ-उतार.

या आजाराच्या काही धोक्याच्या खुणा किंवा चेतावणी चिन्हं (Warning Signs) आहेत. जसे –

पायांपासून सुरू झालेला सुन्नपणा जो हळूहळू वर पसरतो आहे.
स्नायूंमध्ये अचानक कमजोरी वाटणे.
गिळण्यास त्रास होणं किंवा आवाजात बदल होणं.
श्वास घेण्यास त्रास जाणवणे.

वरीलपैकी कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
आजाराचे निदान जेवढ्या लवकर होईल तसेच जेवढ्या लवकर उपचारांना सुरुवात होईल तेवढाच कमी काळ हा आजार बरा होण्यासाठी लागेल. आजाराचे निदान करण्यासाठी पाठीच्या मज्जारज्जू भोवतीचे पाणी म्हणजे CSF तपासले जाते, रक्ताच्या आणि नर्व्ह कंडक्शनच्या तपासण्या केल्या जातात. मात्र आजाराचे निदान हे मुख्यतः लक्षणांवरूनच केले जाते.

या आजारातील मुख्य लक्षण हे स्नायूंमध्ये कमजोरी हे असले तरी त्यानंतर रुग्ण हा सुरुवातीला आयसीयु मध्ये आणि नंतर काही आठवडे सतत शय्याबद्ध ( झोपून ) असल्याने विविध अडचणी निर्माण होतात.
स्नायूंची हालचाल बंद झाल्याने स्नायू आकुंचन पावू शकतात. तसेच सतत झोपून असल्याने पाठीवर जखमा होऊ शकतात किंवा लघवीचे किंवा फुफ्फुसाचे इन्फेक्शन होऊ शकते.

लक्षणांची सुरुवात झाल्यानंतर साधारणपणे चार आठवड्यांमध्ये लक्षणे कमी होऊ लागतात.
मात्र शिथिल झालेल्या स्नायूंमध्ये पुन्हा ताकद निर्माण होणे आणि शरीरातील मज्जातंतू पुन्हा योग्य प्रकारे काम करू लागणे यासाठी काही आठवडे किंवा महिन्यांचा काळ लागू शकतो. प्रत्येक रुग्णासाठी लक्षणे वेगळी असू शकतात, त्यांचे प्रमाण कमी अधिक असू शकते आणि त्यानुसार बरे होण्याचा कालावधी देखील वेगळा असू शकतो.
गंभीर लक्षणे निर्माण झाल्यास 3-10% रुग्ण दगावू शकतात.

GB सिंड्रोममध्ये काय काळजी घ्याल?

GB सिंड्रोम हा पूर्णपणे बरा होण्यासाठी काही महिने लागू शकतात. सुरुवातीच्या काळात रुग्णाचा जीव वाचवणे याला प्राधान्य दिले जाते आणि त्यानंतर निर्माण झालेल्या विविध त्रासांमधून रुग्णाचे पुनर्वसन करणे हाही उपचाराचा एक भाग आहे.

आजाराच्या आधी आजार टाळण्यासाठी किंवा आजाराच्या सुरुवातीच्या काळात घ्यावयाची काळजी:

संक्रमण टाळा:
सर्दी, खोकला, फ्लू यांसारख्या संसर्गजन्य आजारांपासून स्वत:ला वाचवा.
आरोग्यपूर्ण सवयी संपूर्ण कुटुंबाने पाळल्या तर असे आजार टाळता येऊ शकतात.

हा आजार मुख्यतः दूषित अन्न किंवा पाण्यापासून होऊ शकत असल्याने त्याविषयी विशेष काळजी घ्या. बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा . अन्न, दूध व्यवस्थित गरम करा.

तंदुरुस्त राहा:
संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत हवी. त्यासाठी पोषणयुक्त आहार घ्या, पुरेशी झोप घ्या आणि व्यायाम करा.

लक्षणांकडे लक्ष द्या:
पायांपासून सुरू होणारा सुन्नपणा किंवा कमजोरी जाणवल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा.

आजाराच्या काळात घ्यावयाची काळजी:

GBS ची उपचारपद्धती हे एक टीम वर्क असते.  आजाराच्या उपचारासोबतच गुंतागुंत टाळण्यासाठीदेखील हॉस्पिटलमध्ये काळजी घेतली जाते.

  1. इम्युनोथेरपी:
    शरीराच्या प्रतिकारशक्तीचा हल्ला कमी करण्यासाठी औषधं दिली जातात. यामध्ये इम्युनिटी व्यवस्थित काम करावी यासाठी इम्यूनोग्लोब्युलिन ( IVIG ) हे अँटिबॉडीचे औषध शिरेवाटे दिले जाते. याचा डोस वजनानुसार ठरत असल्याने हा प्रकार खर्चिक आहे. त्याचप्रमाणे काही वेळा रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा बदलणे असाही उपाय केला जातो.
    या आजारामध्ये स्टिरॉइडचा वापर करू नये कारण यामुळे काही फायदा होत नाही .
  2. व्हेंटिलेटर सपोर्ट:
    छातीच्या पडद्याला लकवा मारल्याने श्वसनासाठी अडचण आल्यास व्हेंटिलेटरचा उपयोग होतो. रुग्ण सर्व लक्षणे कमी होईपर्यंत काही आठवडे व्हेंटिलेटरवर असू शकतात.
  3. फिजिओथेरपी:
    स्नायूंच्या हालचालींची क्षमता सुधारण्यासाठी तसेच स्नायू कमकुवत होऊ नयेत यासाठी अगदी सुरुवातीपासून फिजिओथेरपी केली जाते.

गुंतागुंती बाबत उपचार :
रुग्ण झोपून असल्याने ज्या गुंतागुंती होऊ शकतात त्या टाळण्यासाठी प्रयत्न करणे तसेच गुंतागुंत झाल्यास त्याबाबत उपचार करणे आवश्यक असते.
जसे – बेड सोअर्स होऊ नयेत म्हणून एअरबेड वापरणे तसेच काही तासांनी रुग्णाच्या शरीराची स्थिती बदलणे.

आजारानंतर घ्यावयाची काळजी:

स्नायूंची ताकद परत मिळवणं:
नियमित व्यायाम आणि फिजिओथेरपी केल्याने स्नायूंमधील ताकद वाढते व हळूहळू रुग्ण स्वतंत्रपणे हालचाल करण्यास सक्षम होतात. 60-80% रुग्ण सहा महिन्यांमध्ये आधाराशिवाय चालू शकतात.

पुनरावृत्तीची शक्यता:
2-5% रुग्णांमध्ये GBS पुन्हा होण्याची शक्यता असते, त्यामुळे कोणतंही नवीन लक्षण जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

मानसिक आधार:
काही वेळा या गंभीर व दीर्घकालीन आजाराच्या परिणामी मानसिक तणाव किंवा नैराश्य जाणवतं. अशा वेळी कुटुंबीय आणि मित्रांचा मोठा आधार असू शकतो.

या आजारातून बरे झालेल्या रुग्णांच्या अनुभवांचाही आधार वाटू शकतो. श्री निलेश अभंग हे 3-4 महिने व्हेंटिलेटर वर होते मात्र त्यानंतर जिद्दीने त्यांनी स्नायूंची पूर्ण ताकद परत मिळवली. त्यांच्या या प्रवासाविषयी फेसबुक व युट्युब वर माहिती उपलब्ध आहे.

संस्थांचा आधार :
या दुर्मिळ आजाराच्या रुग्णांसाठी सहाय्य करणाऱ्या काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यांच्याकडून आहे मदत व सहाय्य मिळू शकते.
उदा. www.gbs-cidp.org ही आंतरराष्ट्रीय संस्था अशा रुग्णांसाठी कार्य करत आहे. या संस्थेची भारतामध्ये ही शाखा आहे. GBS CIDP India या नावाचे त्यांचे फेसबुक पेज देखील आहे. यांच्याशी संपर्क केल्यास या आजाराबाबत अधिक माहिती व मार्गदर्शन मिळू शकते.

GBS नंतर पुनर्वसन आणि सुधारणा:

GB सिंड्रोममधून बरे होण्यासाठी वेळ लागतो, परंतु बहुतेक रुग्ण 6 महिने ते 1 वर्षाच्या काळात बहुतांशपणे बरे होतात.
काही रुग्णांमध्ये स्नायूंची कमजोरी दीर्घकाळ राहू शकते, पण योग्य उपचारांमुळे त्यामध्ये सुधारणा दिसू शकते.
नियमित फिजिओथेरपी आणि पोषणयुक्त आहारामुळे बरे होण्याची प्रक्रिया जलद होते.

GBS होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

GB सिंड्रोम कोणालाही होऊ शकतो. पुरुषांमध्ये याचे प्रमाण अधिक दिसून येते आणि वय वाढताना याचे प्रमाणही वाढू शकते.
संसर्गजन्य आजारांपासून स्वत:ला दूर ठेवणे हा GB सिंड्रोम टाळण्याचा मुख्य प्रतिबंधात्मक उपाय आहे. यासाठी आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारायला हवी.
ताणतणाव कमी ठेवून शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला हवी.
पोटाच्या व्याधी होऊ नयेत यासाठी बाहेरचे अन्नपदार्थ सहसा न खाणे, खाल्ल्यास ते चांगल्या ठिकाणाहून खाणे, न शिजवलेले बाहेरील पदार्थ न खाणे व शुद्ध पाणी पिणे महत्वाचे आहे.

गिलान बार सिंड्रोम हा जरी गंभीर स्वरूपाचा आजार असला, तरी वेळेवर योग्य उपचार आणि काळजी घेतल्यास यातून पूर्णपणे बरे होता येते. यासाठी सुरुवातीची लक्षणं ओळखणं आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे.

हा दुर्मिळ आजार असल्याने प्रत्येक संसर्गानंतर होत नाही आणि प्रत्येकाला होत नाही. यामुळे याची चिंता न करता  स्वतःच्या आरोग्याची नियमितपणे काळजी घ्या आणि सुरक्षित राहा!

  • डॉ प्रिया प्रभू, मिरज , रोगप्रतिबंधक शास्त्र तज्ञ
  • ( FB प्रोफाईल वर याविषयी अधिक माहिती वेळोवेळी पोस्ट करणार आहे)

वैद्यकीय तज्ञांसाठी या पुढील माहितीचा उपयोग होऊ शकेल. GBS उपचारामधील 10 टप्पे.

हा लेख श्रेष्ठ महाराष्ट्रवर पूर्वप्रसिद्ध झाला आहे. https://shreshthmaharashtra.com/knowledge_bank/shreshth-maharashtra-what-is-guillain-barre-syndrome/


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

One response to “गिलान बार सिंड्रोम (GBS) म्हणजे वाट चुकलेली इम्युनिटी”

  1. faddisyissachar1994 avatar
    faddisyissachar1994

    excellent! Reports Highlight [Social Justice Movements] and Their Impact 2025 slick

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.