WHO आणि ट्रम्प

Published on

in

,

ट्रम्पने ठरवल्यानुसार WHO या युनायटेड नेशन्सच्या आरोग्य संघटनेतून अंग काढून घेण्याची घोषणा राज्यकारभाराच्या पहिल्याच दिवशी केली. त्याच बरोबर पॅरिस करारातून देखील त्याने अंग काढून घेतले आहे.

WHO मध्ये १९४ देशांचे सदस्यत्व आहे आणि हे देश IHR म्हणजे आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमावली नुसार आरोग्यविषयक माहितीची देवाणघेवाण करतात. आता यातून अमेरिकेसारख्या WHO च्या संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत देशाने अंग काढून घेतले म्हणजे याचे अनेक दूरगामी परिणाम होणार आहेत.

कोविड काळात WHO बाबत देखील अनेक misinformation निर्माण झाली.
त्यामुळे ही अमेरिकेची बातमी ऐकून इथे भारतातही अनेकांना बरे वाटलेले असू शकते.
डॉक्टर ग्रुप मध्ये एक दोन जोक बघितले. सामान्य जनतेमध्ये अर्थातच याहून अधिक प्रतिक्रिया असतील.

WHO ला समजून घेताना ही नियामक संस्था नसून मार्गदर्शक व सहाय्यकारी संस्था आहे हे विसरता कामा नये. आणि मार्गदर्शक संस्था म्हणून WHO ने गेली ७५ वर्षे जगाला खूप काही दिले आहे.  7+5 आरोग्य कथा आहेत ज्या ७५ वर्षपूर्ती निमित्त त्यांनी साईटवर प्रसिद्ध केल्या होत्या. त्याची लिंक

जर ट्रम्पसाठी चीनचा प्रभाव कमी करणे हा प्रामाणिक उद्देश्य असता तर मेंबरशिप सोडणे हा उपाय होऊ शकत नाही. प्रत्येक मेंबर देशाला त्यांच्या GDP च्या प्रमाणात पैसे द्यावे लागतात . अमेरिका सर्वात श्रीमंत देश असल्याने त्यांना द्यावे लागणारे पैसे हे अर्थातच जास्त असणार. याखेरीज यु एन आणि इतर संस्थांकडून आरोग्य विषयक कामासाठी विविध प्रकारे डोनेशन घेतले जातात. त्यामुळे WHO US कडून पैसे उकळते असे समजणे म्हणजे परिस्थितीची योग्य जाणीव नसणेच आहे.

US आणि आता त्या पाठोपाठ जाऊ शकणारे इतर देश यांच्याकडून मिळणारे पैसे कमी झाल्यानंतर WHO च्या कामावर त्याचा अर्थातच परिणाम होणार आहे. म्हणजेच हा परिणाम जगातील विविध देशातील आरोग्य विषयक कामांवरही होऊ शकतो. कारण ज्या गतीने नवनवीन माहिती उपलब्ध होणे आवश्यक असेल त्या रीतीने ते काम होणार नाही किंवा जिथे संकटे असतील तिथे योग्य ती मदत पोहोचवणे शक्य होणार नाही. तसेच बाहेर पडलेले देश हे आरोग्य विषयक माहितीची देवाण-घेवाण देखील करणार नाहीत आणि त्यामुळे जगभरासाठी अंदाज बांधणे देखील अवघड होईल.

शक्य आहे की वाचकांपैकी बऱ्याच जणांना WHO ची पूर्ण माहिती नसल्याने किंवा मिस इन्फॉर्मेशन वर विश्वास बसल्याने WHO वर राग वाटत असेल.
त्यामुळे विनंती आहे की साफ मनाने सोबतचे फोटो पहावे.

Response of WHO

१. ट्रम्प ने WHO च्या बाहेर पडण्याची ऑर्डर दिल्यानंतर WHO ने दिलेला प्रतिसाद. ज्यामध्ये अमेरिकेच्या लीडरशिप मध्ये देवीच्या रोगाचे उच्चाटन केल्याचे सांगितले आहे.
श्रीमंत देशाने जगभराच्या आरोग्यासाठी खर्चाचा बोजा उचलला नाही तर गरीब देशांमध्ये आरोग्य परिस्थिती अतिशय गंभीर होणार आहे.

An Antivaxxer replying to my comment

२. या WHO च्या प्रतिसादाच्या पोस्टवर मी ‘ही दुःखद घटना आहे’ अशी कमेंट केली होती.
त्यावर एका अमेरिकन antivaxxer गटाच्या स्त्रीने केलेली कमेंट स्क्रीन शॉट मध्ये आहे.
तिने सांगितलेले दावे हे किती निरर्थक आहेत हे जर तुम्ही माझ्या पोस्ट नियमितपणे वाचत असाल तर तुमच्याही लक्षात येईल.
तिथेही लोक फॉरवर्ड मेसेज वर विश्वास ठेवून असे जनरल स्टेटमेंट करत असतात . ज्याला काहीही पुरावा द्यायची गरज नसते, फक्त भावना उद्दीपित केल्या की काम भागते.

WHO day Themes

३. दरवर्षी जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल ला साजरा केला जातो आणि प्रत्येक वर्षी डब्ल्यूएचओ एखाद्या महत्त्वाच्या आरोग्यविषयक बाबीवर संपूर्ण जगामध्ये जागृती करत असते. त्या वर्षभरामध्ये त्यासाठी खूप सारी मार्गदर्शक माहिती तयार केली जाते, विविध देशांमध्ये यासाठी पॉलिसीज बनतात.
WHO ने किती विविध विषयांवर काम केले आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही केवळ या जागतिक आरोग्य दिनांची घोषणा वाक्ये बघितली तरीही तुमच्या लक्षात येईल.
२००८ आणि २००९ ची घोषणा वाक्ये बघा.
पर्यावरणीय बदल, त्यामुळे होणारे आरोग्य परिणाम, आणि अशा संकटाच्या वेळी रुग्णालये सुरक्षित कशी राहतील व काम कसे सुरू राहील यासाठीच्या विविध मार्गदर्शक सूचना त्यांनी बनवल्या होत्या .
हे परिणाम आपण आत्ता बघू लागलोय , जवळपास पंधरा वर्षानंतर. पण जगाला सावध करण्याचे काम त्यांनी तेव्हाच केले होते. केवळ सावध नव्हे तर काय तयारी करायची हे देखील तेव्हाच सांगितले होते.

असे इतरही विषय तुम्ही बघा आणि किती वर्षांपूर्वी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले आहे हे समजून घ्या.
तुम्ही प्रतिजैविकांविरुद्ध प्रतिरोध म्हणजे Antimicrobial resistance हे आता ऐकले असेल. पण 2011 मध्ये याबद्दल जागृतीचा प्रयत्न WHO ने केला होता.

WHO जे जे सांगते ते प्रत्येक देश व देशातील प्रत्येक जण ऐकत नाही हा WHO चा दोष होऊ शकत नाही.

Booklet published by WHO in 1996
  1. New, Emerging and Re-emerging diseases ही पुस्तिका 1996 ची आहे , म्हणजे जवळ जवळ 30 वर्षांपूर्वी WHO ने भविष्यात नवनवीन आजारांचा उगम होण्याची शक्यता आहे आणि अशावेळी काय काळजी घ्यायला हवी याविषयी मार्गदर्शक सूचना तयार केलेल्या होत्या.
    नेमके भविष्य कोणीच सांगू शकत नसते मात्र होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवून भविष्यात काय घडणे शक्य आहे व त्यासाठी देशांनी काय तयारी करायला हवी याबाबत डब्ल्यूएचओने नेहमीच योग्य व उपयुक्त माहिती दिलेली आहे.
  2. त्याच पुस्तिकेतील एक भाग शेवटच्या स्क्रीन शॉट मध्ये आहे, ज्यामध्ये डब्ल्यू एच ओ काय करू शकते याविषयी सांगितले आहे. त्यामध्ये IHR आधीपेक्षा अधिक चांगले असायला हवेत आणि त्याबद्दल काम सुरू केल्याचे सांगितले आहे. 2005 मध्ये त्यात बदल करण्यात आला. सर्व देशांकडून हे नवे नियम मान्य करून घेणे सोपे नसते पण सर्व मेंबर देशांना याविषयी समजावून सांगण्यात WHO ला यश आले.
Role of WHO

IHR नुसार काही देशांमध्ये जाण्यापूर्वी लसीकरण करणे बंधनकारक आहे. यामुळे आपण भारतीय yellow fever या एडीज डासापासून पसरणाऱ्या आजारापासून पूर्णपणे सुरक्षित आहोत. Yellow fever ज्या देशांमध्ये आहे त्या देशांमधून भारतात येण्यापूर्वी ती लस घ्यावीच लागते.
WHO च्या नियमांना आणि लसीला नाकारणारे तसेच बंधनकारक लसीकरण नाकारणारे पर्यटक अश्या देशांना सुरक्षित ठेवणाऱ्या लसी घेतील का? जर घेणार नसतील तर त्यांना देशात प्रवेश द्यायचा का? प्रवेश दिला तर भारतात येलोफेवरचे एपिडेमिक होऊ शकते.. असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत.

कोणताही आजार एखाद्या देशावर निर्बंध लादून थांबवता येत नाही.
कारण देशाच्या सीमा या माणसांसाठी असतात पण जंतूंसाठी पूर्ण जग हे एकच आहे .
त्यामुळे देशांवर निर्बंध हा आजार थांबवण्याचा उपाय कधीच नसतो मात्र निर्बंधांची भीती असेल तर प्रत्येक देश लपवाछपवी करू शकतो ज्याने आजार जास्त फैलावतात.

जी जागतिक महासाथ कोणीही बघितली नव्हती, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा पहिलाच अनुभव होता, आणि त्यावेळी आपण सर्वांनी सुरक्षित राहण्यासाठी ज्या कृती केल्या, त्यांना पश्चात दृष्टीने नावे ठेवणे अत्यंत सोपे आहे. विज्ञान कसे काम करते याविषयी अज्ञान असेल तर असे गैरसमज होतात.

सध्या जग भयंकराच्या दारात उभे आहे . कारण पर्यावरणीय बदलामुळे अनेक प्रकारचे आणि पूर्वी कधीही घडले नाही असे प्रसंग घडणार आहेत.

कटकारस्थान म्हणजेच कॉन्स्पिरसी थेयरीवर विश्वास ठेवणारे जेवढे वाढतील तेवढे सर्व मानव समूहाने संकटांविरुद्ध एकत्रित प्रयत्न केले जाण्याची शक्यता कमी होणार आहे.
आणि ट्रम्प च्या राज्यामध्ये हेच होण्याची सर्वात जास्त शक्यता आहे.
कारण पर्यावरणीय बदल नाकारणारे ट्रम्प आणि त्याचे समर्थक आहेत.

सार्वजनिक आरोग्यासाठीचे एक काळे पर्व सुरू झालेले आहे.

  • डॉ प्रिया प्रभू, मिरज
    (२१/१/२५)


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com