(लेख ऐकायचा असल्यास लिंक पुढीलप्रमाणे: https://youtu.be/eqQky24lf54?si=4ei9b3UOSItrsRZj )
HPV_Prevention_DrPriya 9
काल संध्याकाळपासून दोन डॉक्टरांकडून एक व्हाट्सअप मेसेज फॉरवर्ड झाला आणि त्यामध्ये किती सत्य आहे असा प्रश्न मला विचारला गेला. आज बहुदा हा मेसेज इतर व्हाट्सअप ग्रुप मध्ये येईल आणि शक्यता आहे की मीडिया देखील ही बातमी मोठ्या प्रमाणात दाखवेल .
पण किती जण आहेत जे यामागील सर्व फॅक्ट्स तपासतात? आपले मत बनवण्यापूर्वी अधिक माहिती घेतात? की फक्त जे आपल्यासमोर आले तेच पुढे पाठवतात किंवा त्याची बातमी करतात? यावर या लसीकरणाचे भविष्य अवलंबून आहे.
गेले तीन चार तास मी याविषयी विविध प्रकारे माहिती घेत आहे आणि आता आपण आपली मिस इन्फॉर्मेशन ओळखण्याची टेक्निक या फॉरवर्ड वर अप्लाय करूया. .
१. मेसेज अचानक खूप जास्त ठिकाणाहून येऊ लागलाय का?
मग हा मेसेज पसरवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असण्याची शक्यता आहे.
तसेच हा मेसेज वाचून भीती वाटत असल्याने लोक स्वतःहून खात्री करण्यापूर्वीच हा मेसेज पुढे पाठवत असतात.
वारंवार मेसेज मिळाला म्हणजे तो सत्य आहे असे होत नाही.
२. मेसेज वाचल्यानंतर आपल्या मनात भीती , राग अशी एखादी नकारात्मक भावना निर्माण होत आहे का?
अर्थातच मनात भीती निर्माण होणार कारण मेसेज मध्ये वापरलेले शब्द हे भीती निर्माण करण्यासाठी तसेच शंका निर्माण करण्यासाठी वापरलेले आहेत.
३. अशा काही नोटीस पाठवल्या गेल्या आहेत का?
सदर मेसेज मध्ये दिलेल्या लिंकनुसार तरी त्या नोटीसेसचा मसुदा आणि कोणत्या राज्यात त्या दिल्या गेल्या याविषयी सदर संस्थेच्या वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे.
पैकी एका राज्याकडून पत्र केले गेले.
शक्यता आहे की या बातमीनंतर इतर राज्य देखील अशीच पत्रे तयार करतील.
कारण न्यायालयीन कामकाजाबाबत सहसा काही धोका पत्करला जात नाही व स्पष्टीकरण किंवा मार्गदर्शन उपलब्ध होईपर्यंत काम थांबवले जाते.
४. मेसेज मध्ये दिलेली माहिती संपूर्ण सत्यास अनुसरून आहे का?
- मेसेज मध्ये खूप मोठा जय झाल्याबद्दल उल्लेख आहे मात्र एखादी लीगल नोटीस देणे म्हणजे विजय झाला असे नसते.
- या 15 नोटीस 25 सप्टेंबर २०२४ चा सुमारास पाठवल्या गेल्या होत्या आणि त्या नोटीस मध्ये ‘ लस देण्यापूर्वी पालकांकडून informed consent घेण्याबाबत’ उल्लेख आहे . म्हणजेच लसीकरण देण्यापूर्वी लसीबाबतची सर्व माहिती आणि जर काही अवांछित परिणाम होणार असतील तर त्याबाबतची सर्व माहिती देऊन लसीकरणाची परवानगी घेण्याबाबत उल्लेख आहे . यासाठी काही पूर्वीच्या कोर्टनिर्णयांचा उल्लेख केलेला आहे. मात्र जो व्हाट्सअप मेसेज आहे त्यामध्ये याविषयी एकही शब्द लिहिलेला नाही. आणि जे मुद्दे त्या मेसेज मध्ये उल्लेख केले आहेत ते नोटीस मध्ये नाहीयेत.
- तसेच नोटीस मध्ये लसीकरणानंतर संभाव्य अवांछित परिणामांना खूप प्रसिद्धी देण्याबाबत मागणी आहे.
अशी माहिती सर्व पब्लिक डोमेनवर उपलब्ध आत्ताही उपलब्ध आहे.
ही माहिती समजून घेण्याची क्षमता शिक्षित लोकांमध्येही पुरेशी नसते. त्यामुळे ही क्षमता देखील लोकांमध्ये निर्माण करण्याबाबत यामध्ये काही उल्लेख नाही. तसे नसते तर डॉक्टरांनी पांडेमिक मधील लस टाळली नसती.
५. ट्विटरवरील (X ) मेसेज मध्ये एक सरकारी पत्र आहे ते काय आहे?
बहुदा सदर नोटीस प्राप्त झाल्यानंतर हरियाणा मधील डेप्युटी डायरेक्टर यांनी ‘इतर सामाजिक संस्थांमार्फत जे लसीकरण सत्र चालवले जाते ते सत्र थांबवण्याबाबत’ दिलेली ती सूचना आहे.
कोणत्याही पत्रामध्ये असते त्यानुसार प्राप्त नोटीस मधील काही वाक्ये त्यांनी सुरुवातीला वापरली आहेत.
याचा अर्थ ती लस असुरक्षित आहे असे नाही.
६. सिरम इन्स्टिट्यूट ची लस ही एखादी नवी लस आहे का?
HPV विषाणू विरुद्ध लस ही 2006 मध्ये सर्वप्रथम मंजूर झाली आणि तेव्हापासून टप्प्याटप्प्याने आज अखेर 167 देशांमध्ये ही लस मुलींना दिली जाते तसेच 48 देशांमध्ये ही लस मुलांना देखील दिली जाते.
या सर्व देशांमध्ये मिळून आज अखेर करोडो डोसेस दिले गेलेले आहेत आणि या सर्व देशांमधील माहितीनुसार प्रत्येक प्रसिद्ध अभ्यासाचा उहापोह करून जागतिक लसीकरण कमिटीने HPV लस सुरक्षित असण्याबाबत निर्वाळा दिला आहे.
सिरम इन्स्टिट्युट ने बनवलेली लस ही आंतरराष्ट्रीय लसी सारखीच आहे. यामध्ये कोणतेही नवे तंत्रज्ञान वापरले गेलेले नाही.
त्यामुळे याविषयी अभ्यास करताना जी Gardasil लस गेली दोन दशके जगभरातील विविध देशांमध्ये सुरक्षितपणे वापरली जात आहे, त्या लसीच्या तुलनेमध्ये भारतीय लस देखील सारखीच सुरक्षा व सारखीच इम्युनिटी देते की नाही अशा प्रकारचा अभ्यास केला गेला आहे.
७. या लसीमध्ये HPV विषाणू आहे का?
या लसीमध्ये HPV विषाणू नाही. ही लस विषाणूच्या बाहेरील कव्हरच्या L1 या प्रोटीन पासून बनलेली आहे. म्हणजेच ही केवळ antigen vaccine आहे. लस निर्मिती करण्यासाठी देखील विषाणूंचा वापर होत नाही. एका प्रकारच्या बुरशी कडून हे प्रोटीन बनवून घेतले जाते. ज्यामध्ये कोणताही जेनेटिक पार्ट नाही. हे प्रोटीन विषाणू सारखे दिसते म्हणून त्याला वायरस लाईक पार्टिकल ( VLP) असे म्हटले जाते.
आता नोटीस मध्ये नसलेले मात्र व्हाट्सअप मेसेज मध्ये उल्लेख केलेले चार मुद्दे थोडक्यात बघूया. या संदर्भात विविध लिंक्स मी कमेंट मध्येही देईन. जेणेकरून तुम्ही देखील अधिक माहिती घेऊ शकाल.
८. सरकारने ही लस राष्ट्रीय कार्यक्रमासाठी नाकारली कारण ही धोकादायक आहे हे खरे आहे का?
याविषयी सर्च केल्यानंतर कोणतीही बातमी किंवा माहिती उपलब्ध झाली नाही. एक बातमी मिळाली जिथे या गर्भाशय मुखाचा कर्करोग या आजाराबद्दल माननीय नड्डा जी यांनी माहिती दिली होती. या बातमीच्या हेडलाईन मध्ये ही लस लसीकरण कार्यक्रमात नसल्याचा उल्लेख आहे मात्र नाकारल्याचा उल्लेख नाही.
ट्विटर मेसेज मधील पत्र हे सरकारी असल्याने त्याचा वापर करून वर उल्लेख केला मुद्दा खोडसाळपणे घेतला असण्याची शक्यता आहे . असे झाले असल्यास त्याविषयी खात्रीशीर माहिती देण्याची जबाबदारी मेसेजकर्त्यांची आहे.
९. या लसीचे परिणाम मूल होण्याच्या क्षमतेवर होतात का याविषयी कोणताही अभ्यास झालेला नाही हे खरे आहे का?
अशा प्रकारचे नकारात्मक निष्कर्ष सुचवणाऱ्या सर्व अभ्यासावर जागतिक स्तरावर उहापोह झालेला आहे व त्यामध्ये पुरेसे तथ्य सापडलेले नाही. असे अभ्यास दुर्लक्ष केले जात नाहीत. कारण ते चौथ्या टप्प्यातील अभ्यासाचा भाग असतात.
तसेच सोबतच्या फोटोमध्ये दोन अभ्यासाचे निष्कर्ष आहेत. ज्यामध्ये एका अभ्यासात ज्यांनी लस घेतली त्यांना मूल न होण्याची शक्यता ही वाढलेली नसून कमी झालेली आहे असे आढळले. दुसरा अभ्यास हा लाखो मुलींचा पाठपुरावा करून केलेला आहे आणि त्यामध्ये लसीकरणाने अंडाशयावर कोणतेही नकारात्मक परिणाम झालेले आढळून आलेले नाहीत.

वर उल्लेख केल्यानुसार भारतीय लस ही आंतरराष्ट्रीय लसी प्रमाणेच आहे. ही नवीन लस नाही. त्यामुळे ही लस जेव्हा मोठ्या प्रमाणात दिली जाईल त्यानंतर याविषयी माहिती उपलब्ध होईल. लस एकसारखीच असल्याने परिणाम देखील एक सारखे असण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
HPV लसीमध्ये वापरलेल्या भागांमुळे जननक्षमतेवर परिणाम होईल अशा प्रकारची शास्त्रीय शक्यता सिद्ध झालेली नाही तसेच जीवशास्त्रीय संभाव्यता (biological plausibility )देखील उपलब्ध नाही.
१०. या लसी वरील अभ्यास हा केवळ सात महिनेच केला गेला हे सत्य आहे का?
कोणत्याही लसीची चाचणी ही पहिल्यांदा प्राण्यांवर त्यानंतर पहिल्या टप्प्यात सुरक्षेबाबत आणि दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात उपयुक्ततते बाबत व परिणामकारकतेबाबत केली जाते.
सदर भारतीय लस देखील या तिन्ही टप्प्यांमधून पार पडलेली आहे व याविषयीचे सर्व अभ्यास हे शास्त्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत व नेट वर उपलब्ध आहेत.
२०१७ पूर्वी पहिला टप्पा पार पडला.
२०१८-२१ पर्यंत दुसरा व तिसरा टप्पा पार पडला.
भारतीय लस व आंतरराष्ट्रीय लस यांची तुलना करण्याचा हा अभ्यास होता. यापूर्वी सांगितल्यानुसार आंतरराष्ट्रीय लस गेली दोन दशके वापरात आहे आणि या लसीबाबत सर्व माहिती आधीच उपलब्ध आहे.
लसीकरणाचे नियोजित वेळापत्रक हे ०, २, ६ महिने असे असल्याने शेवटचा डोस दिल्यानंतर एका महिन्याने म्हणजे सातव्या महिन्यात किती अँटीबोडीज निर्माण झाल्या हे तपासणारा हा अभ्यास होता.
भारतीय लसीमुळे आंतरराष्ट्रीय लसीप्रमाणेच अँटिबॉडीज तयार होतात असे या अभ्यासात आढळून आले.
आंतरराष्ट्रीय लस ही महाग असल्याने सरकारकडून उपलब्ध करून देणे अवघड आहे. त्यामुळे त्या लसी इतकीच प्रभावी व सुरक्षित असलेली व त्या तंत्रज्ञानाने बनवलेली भारतीय लस ही तुलनेने स्वस्त असल्याने सरकारकडून प्राप्त होणे शक्य आहे.
११. लहानपणी घेतलेली लस मोठ्या वयात कर्करोगापासून वाचवेल यासाठी कोणताही पुरावा उपलब्ध नाही हे सत्य आहे का?
सोबत दिलेला फोटो हा अमेरिकेतील लसीकरण कार्यक्रमानंतर झालेल्या मृत्यू दरातील बदलाचा आहे. कोणताही कर्करोग होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्यामुळे याविषयीचे अधिक पुरावे हे पुढील दहा ते वीस वर्षांमध्ये निर्माण होतील आणि ज्या देशांमध्ये हे लसीकरण 2006 पासून सुरू झाले त्या देशांकडून पुरावे येण्यास सुरुवात होईल.
सोबतच्या फोटोमध्ये दाखवले आहे की लसीकरण सुरू झाल्यानंतर दहा वर्षाच्या कालावधीनंतर 25 वर्षाखालील ज्या मुलींना लवकर कर्करोग होत होता व त्या मृत्यू पावत होत्या याचे देश स्तरावरील प्रमाण कमी झाले आहे.
अपेक्षा होती की पिवळ्या रंगाच्या रेषेप्रमाणे हे दर कमी येतील. मात्र हे दर कमी होण्याचे प्रमाण हे अपेक्षेहून अधिक आहे. म्हणजेच लस उपयुक्त आहे.
सध्या लसीमुळे पहिल्या टप्प्यातील कर्करोग (CIS ) प्रमाण कमी झाल्याविषयी अभ्यास उपलब्ध आहेत. म्हणजेच कर्करोगाचा पहिला टप्पा जर टाळला जात असेल तर पुढील टप्पे देखील टाळले जाण्याची शक्यता ही जास्त आहे.

१२. यामध्ये बऱ्याच डॉक्टरांचा देखील उल्लेख आहे, मग कोणते डॉक्टर खरे समजायचे?
जेव्हा आरोग्यविषयक निर्णय घ्यायचे असतात त्यावेळेला एक-एकट्या डॉक्टरांचा सल्ला ऐकण्याऐवजी मान्यताप्राप्त व खात्रीशीर संस्थांकडून जी माहिती उपलब्ध करून दिली जाते, तसेच जे अभ्यास हे मेटा अनालिसिस सारखे असतात त्यावर अधिक विश्वास ठेवावा . जे परिस्थिती बाबत सर्व माहिती न सांगता फक्त आपल्या सोयीची माहिती तेवढीच सांगून आपला मुद्दा पुढे सरकवतात, त्याबाबत थोडे सावधान असावे .
मेसेजकर्त्यांचे म्हणणे असेही आहे की या विषाणूमुळे कॅन्सर होतच नाही. जी बाब गेली अनेक दशके सिद्ध झालेली आहे त्या बाबी बाबतच शंका निर्माण करून संभ्रम वाढवल्याने लसीकरण कार्यक्रमावर नकारात्मक परिणाम नक्कीच होतील.
सर्व डॉक्टरांना प्रत्येक शास्त्रीय अभ्यासामधील योग्य व अयोग्य बाबी समजून घेऊन त्याचा उहापोह करण्याच्या बाबत एकसारखी क्षमता असेल असे नाही. सर्व डॉक्टर कोन्स्पिरसी थेअरी (ज्यामध्ये सरकार व फार्मा कंपन्या लोकांचे नुकसान करणार आहेत असा विश्वास असतो) ते अमान्य करतात असेही नाही. आपण अश्या कटापासून लोकांना वाचवून त्यांचे भले करणार आहोत असाही अनेकांचा समज असू शकतो.
त्यामुळे सध्या संपूर्ण डॉक्टर कम्युनिटीही संभ्रमात असू शकते कारण त्यांच्यावर सर्वाधिक जबाबदारी आहे.
त्यामुळे याविषयी अधिक माहिती मिळवणे हाच मनातील भीती दूर करण्याचा प्रभावी उपाय आहे.
अशावेळी एखादा मेसेज वाचून किंवा एखादा व्हिडिओ बघून निर्माण झालेल्या नकारात्मक भावनांच्या भरात कोणताही निर्णय घ्यायचा नाही. थोडी वाट बघायची. याविषयी अधिक माहिती मिळवायची.
तसेच आपल्या मनात जे प्रश्न उपलब्ध होतात त्याविषयी देखील तज्ञांकडून अधिक माहिती मिळवायची. योग्य माहिती ही नेहमीच भीतीला दूर करते तसेच निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करते.
तुम्ही आपल्या मुलीला लस दिली असेल तर घाबरू नका. तुमचा निर्णय चुकलेला नाही. मुलीच्या जननक्षमतेवर नकारात्मक परिणाम होतील असे कोणतेही पुरावे गेल्या दोन दशकात निर्माण झालेले नाहीत.
तुम्ही डॉक्टर असाल आणि तुम्ही आपल्या रुग्णांना लस घेण्याचा सल्ला दिला असेल तरीही संभ्रमात पडू नका. याबाबत खूप सारी माहिती उपलब्ध आहे. भारतीय लस नवीन नाही . ती Gardasil लसी सारखीच असल्याने त्या संदर्भातले अभ्यास तुम्हाला निर्णय घेण्यासाठी सहाय्य करतील.
लसीकरण सुरू झाल्यानंतर अशा बातम्या मोठ्या प्रमाणात निर्माण होणार याची पूर्वकल्पना असल्याने मी याविषयी दोन वर्षांपूर्वीपासून लिहिणे सुरू केले होते. तुमच्या मनातील सर्व प्रश्नांचे स्वागत आहे. टप्प्याटप्प्याने त्यांची उत्तरे नक्कीच देईन आणि त्यासाठी योग्य शास्त्रीय माहिती नक्कीच मिळवेन.
व्हाट्सअप मेसेज मधील सर्व उल्लेख हे तथ्यांना अनुसरून नसल्याने याला मिस-इन्फॉर्मेशन किंवा डिस-इन्फॉर्मेशन समजले जाऊ शकते.
- डॉ. प्रिया प्रभू, MD (PSM)
(२४/१२/२४)
Fight_Misinformation
Fb article link
https://www.facebook.com/share/p/18YoPppMJr/
Your questions are welcome.




Leave a Reply