*नवीन लसी उपलब्ध झाल्या कि लोकसंख्येचे नियंत्रण होईल असे बिल गेट्स का म्हणाले?*
#Fighting_Myths_DrPriya 21
हा 2021 मध्ये लिहिलेला लेख आहे.
(Trigger alert – नकारात्मक माहिती वाचण्याची मनस्थिती नसल्यास कृपया पुढे वाचू नये)
आज आहे जागतिक लोकसंख्या दिवस. वाढती लोकसंख्या ही मानवजातीच्या अनेक समस्यांचे मूळ आहे. आणि लोकसंख्या नियंत्रण करून लोकसंख्या स्थिरत्व मिळवणे ही काळाची गरज आहे. याविषयी जनतेचे प्रबोधन करणे , तसेच याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत प्रशासकांची जागृती करणे असे आज कार्यक्रम असतात.
ही कोविडची महासाथ नियंत्रणात येण्यास देखील लोकसंख्येमुळेच अडचण येत आहे , कारण आपण जवळजवळ ८०० कोटीच्या उंबरठ्यावर आहोत (जगाबद्दल बोलतेय.. सध्याचा लोकसंख्येचा आकडा आहे – ७.९ बिलियन ) आणि जोवर यातील ८०-८५ % जनतेचे लसीकरण दोन डोस देऊन पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रत्येक देशामध्ये वारंवार उद्रेक होण्याची शक्यता आणि नवनवे म्युटेशन घडण्याची शक्यता असते. हे एवढे प्रचंड काम संपूर्ण जग एकत्र येऊन गरीब देशांना मदत करू लागल्याखेरीज शक्य नाही.
लोकसंख्या वाढीबद्दल म्हणाल तर दर दिवशी जगामध्ये साधारण २ लाख ४३ हजार बालके जन्म घेतात. म्हणजे दर तासाला साधारणपणे १०,००० ने लोकसंख्या वाढलेली असते. म्हणजे बघा, मिनिटाला १५०-१६० जन्म असा दर असेल तर तुम्ही हा लेख वाचून संपेपर्यंत लोकसंख्या साधारण ५०० ने वाढलेली असेल. म्हणजे आता तुम्हीच हिशोब करा!
आपल्या घरी दोना ऐवजी अचानक चार पाहुणे आले कि महिन्याचे किराण्याचे नियोजन कोलमडते. आणि जगामध्ये तर तासाला दहा हजार नवीन पाहुणे जन्म घेत आहेत आणि त्यांचा मुक्काम आयुष्यभर असणार आहे.
पण आपण घरातील पाहुण्यांसाठी दुकानातून किंवा शेजाऱ्यांकडून उसनवारीवर धान्य आणू शकू. जगातील पाहुण्यांसोबत मात्र सध्या पृथ्वीमध्ये उपलब्ध आहे तितकीच जमीन, पाणी , हवा, झाडे, अन्न , खनिजे वाटून घ्यावी लागणार आहेत. आपल्या शेजारी उसनवारीवर काही देऊ शकेल असा दुसरा ग्रह नाही………..
……….. इथे थोडा पॉज घेऊन विचार करा , विशेषतः आपल्या मुलांचा व नातवंडांचा! त्यांना जे आयुष्य जगावे लागणार आहे, त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. जेव्हा भविष्याची जाणीव होते तेव्हा ग्रेटा थनबर्ग सारखी मुले जगाला विनाशापासून वाचवण्यासाठी विद्यार्थीदशेपासूनच का लढतात हे समजते, कारण जगच राहण्यायोग्य असणार नाही तर शिक्षणाला काहीही किंमत नसेल.
भारत २०२४ ते २०२७ च्या दरम्यान जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश होणार आहे. अर्थात यामध्ये अभिमान बाळगण्यासारखे काहीही नाही . आणि ही शक्यता नाहीये, तर हे अटळ सत्य आहे. लोकसंख्या वाढीचा दर आपण प्रयत्नपूर्वक कमी करू शकलो तर यासाठी थोडा अधिक काळ लागेल इतकेच ! पण आपला पहिला नंबर येणारच. आजचे मरण उद्यावर ढकलणे इतकेच सध्या आपल्या हातामध्ये आहे.
तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल कि या सर्वाचा आणि लेखाच्या शीर्षकाचा काय संबंध ? हो ना? सद्य परिस्थिती व भविष्य समजून घेतल्यावर तुम्ही बिल गेट्स चे शब्द समजून घेऊ शकाल अन्यथा नाही. ( हवे तर वरील माहिती पुन्हा वाचू शकता. )
काही दिवसांपूर्वी मला WA वर एक व्हिडीओची लिंक आली. ३ मिनिटाचा व्हिडीओ होता बिल गेट्सच्या ted talk चा. म्हणजे मूळ Ted Talk ३० मिनिटाचा आहे. त्यातील फक्त ३ मिनिटाची क्लिप कापून व्हायरल केली होती.
(तुम्हालाही आला असेल हा मेसेज. मी मेसेजची लिंक देणार नाही. मात्र पृथ्वीवरील पर्यावरणीय संकटाला कसे तोंड देता येईल याविषयी बिल गेट्स यांनी २०१० साली (जेव्हा जगाची लोकसंख्या साधारणपणे फक्त ६८० कोटी होती ) दिलेल्या संपूर्ण भाषणाची लिंक देईन, जरूर ऐका . लिंक – https://www.youtube.com/watch?v=JaF-fq2Zn7I )
यामध्ये साधारण ४:३० मिनिटांनंतर “Now if we do a really great job on new vaccines, healthcare, reproductive health services, we could lower that by perhaps 10 or 15 percent” हे वाक्य लोकसंख्येविषयी बोललेले आहे आणि याचा विपर्यास करून WA फोरवर्ड तयार झाले आहे.
“नव्या लसीमुळे लोकसंख्या कमी होते “ असा अर्थ काढून लस घेण्याविरुद्ध प्रचार केला आहे.
“लस घेतली कि मुल होणार नाही” या मेसेज चा मूळ उद्गम देखील येथे असू शकतो. जेव्हा विषयाचे ज्ञान नसते तेव्हा अर्धवट समजुतीमधून अर्थातच चुकीचे निष्कर्ष काढले जातात . आणि याविषयी अनभिज्ञ जनता आलेला प्रत्येक मेसेज विशेषतः भीती निर्माण करणारा मेसेज खरा मानते. जरा शिकलेले लोक असतील तर म्हणतात कि दुसरी बाजू समजून घ्यायला बघतोय मेसेज. पण अश्या *छद्मवैज्ञानिक मेसेजेस मुळे केवळ बुद्धीभेद होतो व मग महत्वाचे निर्णय चुकतात.*
मूळ वाक्य असे आहे – “जर आपण नवनवीन लसींचे संशोधन , प्रजननासंबधी आरोग्य सेवा व सर्वसाधारण आरोग्यसुविधा या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली तर लोकसंख्या वाढीचा दर १०-१५ टक्क्यांनी कमी करू शकू” ! आहे कि नाही संपूर्ण वेगळा अर्थ !
म्हणून मी वारंवार सांगत असते कि कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवण्यापूर्वी व फोरवर्ड करण्यापूर्वी त्याविषयी अधिक माहिती घ्या , काही जीव वाचवण्याचे पुण्य नक्कीच मिळेल. सांगा बरे ३ मिनिटाचा व्हिडीओ बघून काही जणांनी तरी लस घेणे टाळले असेल कि नाही!
तुमच्यामधील काही चाणाक्ष वाचक प्रश्न उपस्थित करतील, “ लसीकरण, चांगल्या आरोग्य सुविधा यामुळे लोकसंख्या वाढायला हवी ना , मग कमी होणार असे का म्हटलेय? “ प्रश्न अगदी बरोबर आहे. आणि तुम्हाला हा प्रश्न पडलाय कारण तुम्हाला समूह आरोग्य विज्ञान / जन औषधवैद्यक शास्त्र / Public health या विषयाबद्दल काही माहिती नाही. यामध्ये एकेकट्या माणसाचा विचार केला जात नाही तर एखाद्या कृतीने समूह म्हणून संपूर्ण मानवी गटावर काय परिणाम होणार हे बघितले जाते. व त्यानुसार उपाय केले जातात उदा. नवजात बाळ कुपोषित नसावे म्हणून बाल विवाहास प्रतिबंध करणे हा एक उपाय आहे!
लसीकरणामुळे वैयक्तिक , समूह आणि सामाजिक स्तरावर कोणकोणते प्रत्यक्ष फायदे होतात याविषयी हा लेख जरूर वाचा. लिंक – https://www.who.int/bulletin/volumes/86/2/07-040089.pdf
लसीकरणाचे प्रत्यक्ष होणारे सामाजिक फायदे पुढीलप्रमाणे आहेत – आरोग्यावरील खर्च कमी होणे , antibiotic (प्रतिजैविके ) औषधांचा प्रतिरोध निर्माण न होणे, सामाजिक समानता वाढीस लागणे, आयुर्मान वाढणे, स्त्री-सबलीकरण , बाल-मृत्यू कमी होणे , जैविक युद्धांपासून सुरक्षा, आर्थिक प्रगती इत्यादी. आता हे कसे घडते यासाठी मूळ लेख वाचायाला हवा.
*लोकसंख्या वाढीचा दर कमी होणे हा लसीकरणाचा अप्रत्यक्ष फायदा आहे.
जेव्हा आर्थिक सुबत्ता येते, मृत्यूचा धोका कमी होतो, स्त्रियांचे सबलीकरण होते , बाल-मृत्यू व माता मृत्यू कमी होतात तेव्हा आपोआपच कुटुंबातील मुलांची संख्या कमी होऊ लागते.*
पटत नाही का? मग स्वतःच्या कुटुंबाचे उदाहरण घ्या . पणजोबांच्या पिढीपासून सुरु करा. तेव्हा माता मृत्यू मुळे एकाहून अधिक पत्नी असत आणि एकूण १०-१२ बाळंतपणे व्हायची. मात्र त्यातील ६-८ मुले जगायची. आजोबांच्या पिढीमध्ये ६-७ बाळंतपणामधून ३-४ भावंडे मोठी व्हायची. तेव्हा “अष्टपुत्रा सौभाग्यवती भव” हा आशीर्वादच दिला जायचा. वडिलांच्या पिढीमध्ये २-४ बाळंतपणे झाली आणि सहसा सर्व मुले जगली असे चित्र दिसते कारण १९०० च्या शतकामध्ये विशेषतः स्वातंत्र्यानंतर सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम सुरु झाले आणि बाल मृत्यू व माता मृत्यू चे प्रमाण कमी झाले. आपल्या पिढीमध्ये सहसा १-२ मुले असतात आणि बाल मृत्यू होत नाहीत. बाल मृत्यू सहसा गरीब घरांमध्ये दिसून येतात आणि त्यामध्ये कुपोषणाचा मोठा वाटा आहे. पुढील पिढीमधील काही तरुणाई तर एकच मुल किंवा मुल नको अश्या विचारांची देखील असते आणि त्यामध्ये काहीच चूक नाही.
आता पटतेय का बिल गेट्स चे वाक्य ? झालाय ना लोकसंख्या वाढीचा दर कमी ? एकदम १०-१२ मुलांपासून १-२ मुलांपर्यंत आपण ४ पिढ्यामध्येच आलोय !
आता एक करायचे , भारतातील विविध राज्यांमध्ये लोकसंख्या वाढीची काय परिस्थिती आहे हे शोधायचे. आपापल्या नेत्याला या लोकसंख्या वाढीच्या भस्मासुराविषयी काही जाणीव आहे का हेही लक्षपूर्वक तपासायचे. कारण धोरणे हे सरकार ठरवत असते आणि परिस्थितीची आणि भविष्याची जाणीव असणारे सरकार आपल्या पुढील पिढीला सुरक्षित ठेवू शकते. जर कोणी म्हणत असेल कि भरपूर मुले होऊ द्या , तर त्याला भविष्यातील संकट व लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम माहित नाहीत हे समजून जा!
या संकटाबद्दल जगातील काही द्रष्टे व्यक्ती व विविध शास्त्रज्ञ गेली अनेक दशके जागृती निर्माण करायचा प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी कॅनडा मध्ये आलेली उष्णतेची लाट ही एक झांकी आहे. आणि पिक्चर अभी बाकी आहे हे जाणा!
नव्या विषाणूपासून लपून आपण काही काळ तरी घरी बसू शकू , मात्र लोकसंख्या वाढ आणि त्यातून निर्माण होणारे एकाहून एक भीषण प्रश्न जर वेळेत सोडवले नाहीत तर काही जणांच्या लोभापायी व काही जणांच्या मूर्खपणापायी संपूर्ण मानवी जमात नष्ट होऊ शकते ही शक्यता विसरून चालणार नाही.
घड्याळाचा काटा पुढेपुढे चाललाय , point of no return म्हणजे अशी परिस्थिती जी एकदा आली कि आपण होणारे नुकसान थांबवू शकण्याच्या पलीकडे गेलेलो असू , ती जवळ येतेय.
२००० सालापासून वारंवार येणारे नित्य नूतन विषाणूचे आजार आणि अनिश्चित पर्यावरणामुळे येणारे महापुर धोक्याची घंटा वाजवताहेत ! ऐकताय ना? प्रत्येक घटना वेगवेगळी बघाल तर संकट समजून घेण्यात चुकाल!
*गावाच्या, राज्याच्या , देशाच्या आणि जगाच्या एकजुटीला पर्याय नाही. संकट मानव जातीवर आलेले आहे. हळूहळू आल्याने जाणीव होत नाहीये इतकेच! जेवढ्या लवकर जागे होऊ, जेवढ्या लवकर एकजूट होऊ तेवढे सुखी आयुष्य आपल्या पुढील पिढीला मिळेल !*
सध्या करोनाविरुद्ध एकजूट होते का बघुया !
नियम पाळणारे वाढण्यासाठी माहिती सर्वांपर्यंत पोचावूया!
धोकादायक मेसेज नीट समजून घेवून फॉरवर्ड करणे टाळूया !
भविष्यातील संकटाला समजून घेवूया , चर्चा करुया , मार्ग शोधुया!
तोपर्यंत काळजी घ्या ! सुरक्षित रहा !
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. (Community Medicine) साथरोग तज्ञ , मिरज.
११/७/२०२१ रोजी फेसबुकवर प्रसिद्ध झालेला लेख
(follow for More info @DrPriyaInsights in FB and YouTube)





Leave a Reply