पुढचे आणि मागचे दूध

Written by:

गंमत वाटली ना हे शब्द ऐकून!

मी आधी यांना ‘सुरुवातीचे दूध’ आणि ‘नंतरचे दूध’ म्हणायचे पण ते अक्षरशः पुढचे आणि मागचे दूध असते हे  नुकतेच मला समजले म्हणून हेच शब्द वापरले.

यांना इंग्लिश मध्ये foremilk आणि hindmilk म्हणतात .

दरवेळी आई जेव्हा बाळाला पाजायला सुरुवात करते त्यावेळेला सुरुवातीचा काही वेळ स्तनामधून जे दूध येते त्याला फोरमिल्क म्हणतात आणि त्यानंतर शेवटी जे दूध येते त्याला हाईंडमिल्क म्हणतात.

Foremilk and Hindmilk

बाळाला पुरेसे हाईंडमिल्क जर मिळाले नाही तर त्यामुळे काय त्रास होऊ शकतो याविषयी पोस्ट लिहिली होती ती इथे वाचता येईल.

स्तनांमध्ये दूध तयार होताना ते एकसारखेच असते. मात्र ते दूध जेव्हा तयार होते आणि नलिकांमधून समोरच्या बाजूला येऊ लागते त्यावेळी त्या दुधामधील जे फॅट ग्लोब्युल्स असतात ते नलिकांच्या बाजूला चिटकून राहतात किंवा दुग्धग्रंथींच्या जवळ मागे राहतात आणि त्या फॅट शिवाय जे पातळसर दूध असते ते मात्र स्तनामध्ये पुढे येऊन निपलच्या जवळ सायनसेस मध्ये थांबते. म्हणून मी ‘ पुढचे दूध ‘ आणि ‘ मागचे दूध ‘ असा उल्लेख केला. हे दुधाचे दोन प्रकार नसून पुढे निप्पल जवळ उपलब्ध असलेले पातळसर दूध आणि स्तनात मागे ग्रंथी जवळ असणारे दाटसर दूध असते.

दोन स्तनपानांच्या दरम्यान जर जास्त अंतर असेल तर foremilk जास्त पातळ असू शकते आणि अंतर कमी असेल तेव्हा फोरमिल्क हे तेवढे पातळसर नसते.

स्तनपानाच्या सुरुवातीला बाळाला मिळणारे पातळ दूध हे चांगले नसते का? बाळाला फक्त दाटच दूध द्यायला पाहिजे का? असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो त्यामुळे या दोन्ही दुधांमध्ये नक्की काय असते हे जाणून घेऊया.

मी आधीच सांगितलं की हे दुधाचे दोन प्रकार नसून दूध साठवताना पुढे उपलब्ध असलेले आणि मागे उपलब्ध असलेले असे हे दूध आहे.

जे दूध मागे राहते त्या दुधामध्ये चरबी किंवा फॅट ही जास्त प्रमाणात असते त्यामुळे त्या दुधाचा उष्मांक हा जास्त असतो. त्यातून बाळाला जास्त कॅलरीज मिळतात.

जे दूध स्तनांमध्ये पुढे आलेले आहे, त्या दुधामध्ये मात्र जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन्स म्हणजे प्रथिने असतात आणि लॅक्टोज ही साखर ही जास्त प्रमाणात असते.  या दोन्ही घटकांची बाळाच्या शरीराला वाढीसाठी आवश्यकता असल्याने सुरुवातीला मिळणारे दूध हेही बाळासाठी महत्त्वाचे आहे. तसेच हे दूध पातळसर असल्याने बाळाची तहान भागवण्यासाठी याचे जास्त महत्त्व आहे.

बाळाला पाजताना एक स्तन पूर्ण रिकामा न करता दोन्ही स्तनातून थोडे थोडे दूध दिले तर अशा बाळांना फक्त सुरुवातीचे पातळसर दूध मिळेल. त्यामुळे बाळाची भूक भागण्यासाठी तसेच बाळाचे वजन वाढण्यासाठी अत्यावश्यक असणारे मागचे दूध म्हणजे चरबीयुक्त दूध बाळाला कमी प्रमाणात मिळेल. तसेच त्या बाळाला इतरही काही त्रासांना सामोरे जाऊ जावे लागेल. उदा. दुधामध्ये लॅक्टोजचे प्रमाण जास्त असल्याने गॅसेसचा त्रास अधिक प्रमाणात होईल. तसेच ती साखर न पचल्याने शी फेसाळ हिरवी होऊ शकेल किंवा कधी कधी बाळाला शीच्या ठिकाणी लालसरपणा येऊ शकेल. त्याचप्रमाणे हे दूध लवकर पचल्याने बाळाला लवकर भूक लागेल आणि बाळ वारंवार प्यायला मागेल आणि अशावेळी आईला मात्र आपले दूध कमी आहे असे वाटल्याने आई वरचे दूध देईल.

हिरवट फेसाळ शी होण्याचे एक कारण lactose overload असू शकते

तसेच जेव्हा स्तन पूर्ण रिकामे होत नाहीत अशावेळी आणि जेव्हा वरचे दूध सुरू केले जाते अशावेळी आईचे दूध कमी व्हायची सुरुवात होते आणि हळूहळू आई पुरेसे स्तनपान करू शकत नाही.

हे सर्व टाळण्यासाठी केवळ एक काळजी घ्यायची बाळाला पाजताना प्रत्येक स्तनातून दूध हे पूर्णपणे बाहेर निघाले पाहिजे. यासाठी बाळाने स्तन स्वतः सोडेपर्यंत त्या स्तनातून पाजायचे . नंतर बाळाला दुसरा स्तन देऊन बाळाचे पोट भरेपर्यंत पाजायचे . पुढच्या वेळी स्तनपान देताना मात्र ज्या स्तनातून नंतर दूध दिले होते तो स्तन आधी बाळाला द्यायचा म्हणजे तो स्तन देखील पूर्णपणे रिकामा होईल.

दूध पिताना बाळ मध्येच झोपी जात असेल तर अशावेळी ब्रेस्ट कॉम्प्रेशन हे तंत्र वापरून बाळाला स्तनाच्या मागील बाजूस असलेले दूध मिळेल याची काळजी घेता येते. याविषयीची माहिती इथे वाचता येईल. 

जर तुम्ही ‘पंपिंग ममा’ असाल म्हणजे पंप द्वारे स्तनातील दूध काढून बाळाला देत असाल तर अशावेळी मागील बाजूचे दूध देखील बाळाला मिळायला हवे याची काळजी घ्यावी.  यासाठी पंप करण्यापूर्वी पूर्वतयारीच्या पायऱ्या पूर्ण कराव्यात. ज्यामध्ये स्तनातील दूध सोडवणे आणि स्तनातील दूध पुढे आणणे या पायऱ्यांचा समावेश आहे.

या पुढील आणि मागील दुधाबाबत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही . कारण दुधामधील चरबीचे प्रमाण हे बाळ स्तनपान करत असताना हळूहळू वाढत जाते.  म्हणजे फक्त शेवटच्या काही मिलिलीटर दुधामध्ये सर्व चरबी असते असे नाही. 

तुम्हाला फक्त एवढेच लक्षात ठेवायचे आहे की स्तन हे रिकामे होईपर्यंत आपल्याला बाळाला पाजायचे. फक्त सुरुवातीचे काही मिनिटे दोन्ही स्तनांमधून थोडा थोडा वेळ पाजू नका. स्तन दाटलेले वाटत असतील तर थोडे दूध काढून स्तनाचा दाटलेपणा कमी करा पण एक स्तन रिकामा झाल्यावरच दुसरा स्तन बाळाला द्या.

डॉ प्रिया प्रभू


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.