Latch म्हणजे बाळाची स्तनावरील पकड.
बाळाची स्तनावरील पकड योग्य असेल तर बाळ स्तनामधून दुध विनासायास पिऊ शकते. ज्या आयांना स्तनपान देताना काहीही अडचण आली नाही त्या आयांना स्तनावरील पकड योग्य पद्धतीने जमली होती. मात्र जर ही पकड योग्य पद्धतीने झाली नसेल तर आई व बाळाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
Latch व्यवस्थित नसेल तर कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात?
Latch व्यवस्थित नसेल तर निप्पल दाबले जाऊन आईला वेदना होतात. निप्पलला चिरा पडतात. जखम होऊ शकते. (लक्षात ठेवा, स्तनपान कधीही वेदनादायी नसते. जर वेदना असतील तर तज्ञांचा सल्ला घ्या , काहीतरी बदल करणे आवश्यक आहे. ) स्तन पूर्णपणे रिकामे होत नाहीत आणि त्यामुळे दुध म्हणावे तेवढे वाढत नाही. स्तन रिकामे न झाल्याने कधी दुधाच्या गाठी होऊ शकतात. कधी एखादी दुग्धनलिका बंद झाल्याने स्तन लालसर होऊन दुखू शकतात.
Latch व्यवस्थित नसेल तर बाळाला देखील त्रासाला सामोरे जावे लागू शकते. जन्मलेल्या बाळाला चीकदुध व्यवस्थित न मिळाल्याने नैसर्गिक कावीळ जास्त काळ राहू शकते किंवा वाढू शकते. चीकदुध काढले न गेल्याने आईला दुध उशिरा येते किंवा कमी येते. दुध ओढण्यासाठी अधिक शक्ती लागू शकते. बाळ वारंवार प्यायला मागू शकते. बाळाचे वजन व्यवस्थित वाढत नाही. असे बरेच काळ राहिले तर बाळ गंभीर त्रासाला सामोरे जाऊ शकते. बाळाचा त्रास टाळण्यासाठी जर वरचे दुध सुरु झाले कि त्यामुळे आईचे दुध अजून कमी होते. बाटलीतून वरचे दुध किंवा फॉर्म्युला दिला गेला कि मग बाळ स्तनामधून दुध पिणे नाकारते व आईच्या अडचणींमध्ये अजून वाढ होते.
वरील पैकी कोणतीही अडचण तुम्हाला जाणवत असेल तर बाल स्तनांवर योग्य पकड घेतेय ना याची खात्री करून घ्या . बाळाची स्तनावरील पकड योग्य आहे कि नाही हे कसे ओळखायचे?

सर्वात महत्वाची खुण म्हणजे आईला स्तनपान देताना दुखत नाही. तसेच बाळ दुध व्यवस्थित पिऊ शकते म्हणजे मिल्क ट्रान्स्फर व्यवस्थित होते. (मिल्क ट्रान्स्फर कसे ओळखायचे याची पोस्ट इथे क्लिक करून वाचू शकता ).
वरच्या चित्रामध्ये ४ खुणा सांगितल्या आहेत.
बाळाची हनुवटी स्तनाला खालच्या बाजूने टेकलेली असते आणि बाळाचे नाक पूर्ण मोकळे आणि स्तनापासून दूर असते. तसेच बाळाने केवळ निप्पल म्हणजे स्तनाग्र तोंडात घेतलेले नसते तर निप्पल भोवतीचा काळा भाग देखील बाळाच्या तोंडामध्ये असतो. स्तन लहान असतील तर जवळजवळ सर्व भाग बाळाच्या तोंडात असतो. स्तन मोठे असतील तरीही बराचसा भाग तोंडामध्ये असतो.
मात्र latch नेहमी asymmetric असायला हवे. Asymmetric म्हणजे काय तर areola म्हणजे स्तनाचा काळा भाग (areola) निप्पल वरून आणि खालून एकसमान तोंडात जाऊ नये. त्याचा खालचा भाग जास्त तोंडात जायला हवा आणि वरचा मात्र त्याहून कमी !
आणि बाळाच्या तोंडाकडे बघितले तर बाळाचे तोंड पूर्ण आ वासलेले असावे (खालील चित्र पहा) तसेच बाळाचा खालचा ओठ बाहेर वळलेला असावा. तो आतमध्ये मुडपलेला असू नये .

हे योग्य आणि अयोग्य latch दिसतात तरी कसे?


स्तनावरील पकड योग्य जमली कि निम्मा लढा संपलेला असतो कारण खूप सारे problems मुळात येतच नाहीत. प्रत्येक नव्या आईला ही माहिती असायलाच हवी! खरे तर प्रत्येक गरोदर स्त्रीला हे माहित हवे.
आणि समजा तुमच्या लक्षात आले कि बाळाने स्तनावर योग्य पकड घेतलेली नाही तर अश्या वेळी स्तन सोडवून पुन्हा योग्य पकड देता येते. पण स्तन सोडवताना ओढून काढू नका बरे. बाळाची तोंडाची पकड खूप घट्ट असते, ओढल्याने स्तन दुखवू शकतात. स्तन सोडवायचा असेल तर बाळाच्या तोंडात एका बाजूने आपली करंगळी हळूच सरकावी . त्याने पकड मोकळी होते , suction ब्रेक होते व स्तन न दुखावता स्तन सोडवता येतो.
‘स्तनावरील पकड योग्य यावी यासाठी काय करावे’ याबद्दल माहिती लिहीन, पण बाळाने यासाठी सहकार्य करावे म्हणून बाळाला भूक लागल्याच्या खुणा दिसू लागताच बाळ रडण्यापूर्वी त्याला पाजायला सुरुवात करायला हवी. बाळाच्या भुकेच्या खुणा संगणारी पोस्ट वाचली आहे ना? ही त्या लेखाची लिंक आहे. (http://askdrpriya.in/2023/08/10/chapter-two/)
डॉक्टरांनी देखील स्तनदा मातेला काही अडचणी असतील तर आईला बाळाला तुमच्यासमोर पाजायला सांगून बाळाची स्तनावरील पकड योग्य आहे ना याची खात्री करून घ्यावी. नसल्यास योग्य पद्धत समजवावी.
ही छोटीशी गोष्ट खूप महत्वाची आहे. प्रत्येक आईला व आज्जीला माहित हवी.
- डॉ. प्रिया प्रभू , मिरज.
- (२०/११/२०२३)



Leave a Reply