ज्यांना सहज जमले त्यांना नाही पटणार पण जर चुकायचे म्हटले तर इतक्या गोष्टी चुकू शकतात या स्तनपानाच्या की बस! आणि एक साधी छोटीशी गोष्ट देखील स्तनपान वेदनादायी किंवा दुःखदायी बनवू शकते.
अडचणींवर मार्ग नाहीत का ?
नक्कीच आहेत!
योग्य निदान, योग्य सल्ला, सर्व कुटुंबाचा सपोर्ट याने स्तनपान विषयक अडचणींवर मात करता येऊ शकते ! मुख्य म्हणजे स्तनपानाविषयी सर्व माहिती स्त्रीला ती गरोदर असताना माहीत हवी!
आपण अभ्यास न करता परीक्षेला जातो का कधी ?
पण स्तनपानाची परीक्षा मात्र आईला सहसा अभ्यासाविना व मार्गदर्शनाविनाच द्यावी लागते. आणि स्तनपान अवघड जाऊ लागले की दोष मात्र तिच्या दूध निर्मितीच्या क्षमतेला दिला जातो.
आपण योग्य प्रयत्न करायचे आणि तरीही नाहीच जमले समजा तर जेवढे शक्य आहे तेवढे स्तनपान सुरू ठेवता येतेच की. दिवसातील एका वेळचे स्तनपान देखील बाळाला फायदा करून देणार आहेच . स्तनपान शंभर टक्के नाहीतर एकदम शून्य टक्के अशी रेंज नसावी ! जे शक्य ते सुरूच ठेवावे !
आपले स्तनपान विषयक गोल्स ठरले असतील तर आपल्या सोबत कुटुंबियांना देखील सर्व माहिती घेऊ दे ! कारण कुटुंबच तुमची सपोर्ट सिस्टीम आहे!
प्रत्येक आईला असे वाटते की स्तनपान फक्त मलाच जमत नाहीये आणि सगळे जग मात्र अगदी आरामात स्तनपान करते!
असे बिलकुल नाही!
मला स्वतःला डॉक्टर असून स्तनपान लगेच जमले नव्हते तेव्हा मी त्या वेळी माहिती मिळवली व शक्य ते सर्व प्रयत्न केले आणि त्यानंतर मला जिथे शक्य तिथे स्तनपान जागृती केली व अजूनही करत आहे! २० वर्षे झाली!
माझी स्तनपानाची गोष्ट मी या Drops of nurture या इंग्रजी पुस्तकात सांगितली आहेच पण माझ्या सोबत २९ इतर आयांनी (त्यातील फक्त काही डॉक्टर आहेत , बाकी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ आहेत) स्वतःची स्तनपानाची गोष्ट सांगितली आहे ! खडतर मार्गावरील त्यांचा प्रवास , अडचणी सोडवण्याचे प्रयत्न अश्या अनेक गोष्टी यामध्ये असतील. असतील कारण पूर्ण पुस्तक मीही वाचलेले नाही पण यातील बऱ्याच जणींना मी ऑनलाइन ओळखते . त्यांनी फेसबुक वरील साहाय्य गटामध्ये ज्या आत्मीयतेने व प्रेमाने इतर आयांना मदत केली ते जवळून बघितले आहे. त्यातील काहीजणी माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत! त्यांच्या सल्ल्यातून वा अनुभवातून मीही स्तनपानाविषयी शिकलेय!

कोणी वर्षानुवर्षे फक्त पंप करून पाजलं आहे , कोणी जुळ्यांना पाजलं आहे, कोणी नैसर्गिक वेळेनुसार म्हणजे ४-५ वर्षानंतर स्तनपान थांबवलंय , कोणी स्तनपान विषयक तज्ञ बनलंय, कोणी स्तनपान चळवळ सुरू केलीये, कोणी गरोदरपणाशिवाय दत्तक बाळाला पाजलं आहे , कोणी स्तनातील दुधाच्या गाठींशी मुकाबला केलाय, कोणी बाटली सोडवून पुन्हा स्तनपान सुरू केलंय, कोणी संपलेले दूध पुन्हा वाढवलंय.
कोणी एक अडचण सोडवलीये तर कोणी अनेक अडचणींवर मात केलीये ! यातील बऱ्याच जणी आता इतरांना मदत करीत आहेत कारण जिला अडचण आलीये तीच दुसऱ्या आईचे दुःख समजू शकते!
तुम्ही स्तनपान करीत असाल तर त्या एकाकी प्रवासात कधी मन खट्टू असताना वाचण्यासाठी किंवा गरोदर असाल तर आत्मविश्वास वाढवण्यासाठी , इतरांच्या स्तनपानासाठी मदत करू इच्छित असाल तर माहितीसाठी, पुरुष / कुटुंबीय असाल तर स्तनपान एकटीचं काम नाही आणि सोपे तर अजिबात नाही हे समजण्यासाठी , जोडप्याला भेट देण्यासाठी अश्या कोणत्याही कारणाने हे पुस्तक अवश्य वाचा !
Dilraz AR Kunnummal ने या सर्व breastfeeding warriers ना एकत्र आणले आहे स्वतःच्या कथा सांगण्यासाठी आणि या महिन्यात लवकरच हे पुस्तक प्रसिद्ध होणार आहे !
प्रसिद्ध झाल्यावर इथे ब्लॉगवर आणि फेसबुक वर सांगेनच!
पण पोस्ट मिस होऊ नये म्हणून ब्लॉग follow करा! किंवा वॉल ला नियमित भेट द्या! किंवा या पोस्ट वर तुमचा email id कमेंट करा म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष मेल पाठवून कळवेन.
मी तरी खूप वाट बघतेय या पुस्तकाची कारण यामुळे एका आईचा जरी स्तनपान प्रवास सोपा झाला तर मला खूप समाधान वाटेल! आणि मलाही इतर २९ अनुभव वाचायचे आहेत ना!
- डॉ. प्रिया प्रभू
- drprdeshpande2@gmail.com

Leave a Reply