आईच्या दुधात व्हिटॅमिन डी नसते ना?

Written by:

फेसबुकवरील माझ्या एका पोस्टवर एका वाचकाने प्रश्न विचारला की “आईचे दूध जास्त काळ दिले की व्हिटॅमिन डी तयार करता येत नाही असे ऐकलंय, खरंय का?” माझी पहिली रिऍक्शन होती की “व्हिटॅमिन डी तर उन्हातील UV किरणांमध्ये आपली त्वचा तयार करते ना ? दुधाचा काय संबंध?”

आईच्या दुधात व्हिटॅमिन डी नसते म्हणून ते बाळासाठी चांगले नाही असा एक समज बहुदा सार्वत्रिक असावा ! गेले दोन दिवस या प्रश्नाविषयी बरीच माहिती घेतली आणि यावर माझे मत सांगत आहे !

व्हिटॅमिन डी हे असे व्हिटॅमिन आहे जे प्रत्येक प्राण्याच्या शरीरात आपोआप तयार होते , फक्त यूव्ही बी किरणे उघड्या अंगावर पडली की ही क्रिया सुरू होते . सुर्यप्रकाशामध्ये काही मिनिटांमध्ये हे व्हिटॅमिन तयार होते आणि ते लिव्हर आणि शरीरातील चरबी मध्ये साठवले जाते . सूर्यप्रकाश हा हे व्हिटॅमिन मिळवण्याचा मुख्य मार्ग आहे !

बाळ जन्मताना आईकडून बाळाच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी चा पुरवठा होऊन साठा केलेला असतो आणि त्यानंतर बाळाचे शरीर स्वतः देखील व्हिटॅमिन डी बनवू शकते .

काही प्रमाणात प्राणिजन्य अन्नपदार्थातून तोंडावाटे व्हिटॅमिन डी मिळू शकते . मात्र यामध्ये दुधाचा क्रमांक सर्वात तळाशी आहे कारण प्राणिजन्य दुधामध्ये व्हिटॅमिन डी अगदी कमी प्रमाणात असते . मुख्य स्रोत काही मासे, माश्यांचे तेल, प्राण्यांचे लिव्हर असेच आहेत. (फोटो पहा) तसेच विविध अन्नपदार्थांमधील व्हिटॅमिन डी ची मात्रा सोबत दाखवली आहे . (फोटो)

म्हणजेच पूर्णतः शाकाहारी लोक आणि vegan लोक व्हिटॅमिन मिळवण्यासाठी सुर्यप्रकाशावरच अवलंबून असतात . तसेच मांसाहारातून आवश्यक तेवढे म्हणजे प्रौढ व्यक्तीला रोज ४०० IU व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी रोज १० तरी अंड्यातील बलक खावे लागतील जे सहजी शक्य नाही !

पूर्वी आदिवासी मोकळ्या हवेत व सूर्यप्रकाशात असायचे आणि अंगावर कपडेही कमी असायचे . आता आपण सतत बंदिस्त इमारतींमध्ये असतो, आणि सभ्यतेच्या नावाने किंवा सूर्यप्रकाशामुळे त्रास होऊ नये म्हणून सनस्क्रीन लावणे , अंगभर कपडे घालणे , चेहरा झाकणे असे प्रकार करतो. याशिवाय त्वचेमध्ये जेवढे मेलानिन जास्त असेल (त्वचेचा रंग जेवढा डार्क असेल) तेवढ्या प्रमाणात यूव्ही किरणे त्वचेमध्ये पोचू शकत नाहीत . या कारणांमुळे जगभरातील लोकांमध्ये व्हिटॅमिन डी कमतरता दिसून येत आहे .

आता विविध दुधांमध्ये किती प्रमाणात व्हिटॅमिन डी आहे ते बघा ! (फोटो) तुमच्या लक्षात येईल की नैसर्गिक दुधांमध्ये हे प्रमाण कमी आहे , केवळ विकतच्या पॅकबंद दुधामध्ये बाहेरच्या देशात व्हिटॅमिन डी मिसळले जाते . कारण तेथे वर्षातील काही दिवस सूर्यप्रकाश मिळत नाही तसेच थंडीमुळे लोक बाहेरही कमी पडतात . मात्र भारतासारख्या देशामध्ये सूर्यप्रकाशाची कधीच कमतरता नसते .

म्हणजेच अन्न किंवा दूध हा व्हिटॅमिन डी चा मुख्य स्रोत नसताना देखील आईच्या दुधात व्हिटॅमिन डी नाही असा हाकारा केला जातो आणि मग फॉर्म्युला मिल्क मध्ये मात्र आम्ही व्हिटामिन डी देतोय अशी माहिती दिली जाते . सोबतच्या फोटोमध्ये आईच्या व गाईच्या नैसर्गिक दुधामध्ये व्हिटॅमिन डी नसते हे दिसून येईल, मात्र फॉर्म्युला मध्ये कृत्रिमपणे हे व्हिटॅमिन घातलेले असते .

सध्या देशाविदेशातील फॉर्म्युला न वापरणाऱ्या बालकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता दिसून येते का ? तर याचे उत्तर “हो” असे आहे आणि त्याचे कारण आहे की गरोदर असताना आईमध्ये कमतरता असलेने बाळाच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी चा साठा कमी असतो , अश्या मातेच्या दुधामध्येही कमी प्रमाणात व्हिटॅमिन डी असते आणि बाळांना उन्हामध्ये नेले जात नसलेने व्हिटॅमिन डी तयारही झालेले नसते .

यावर अनेक प्रकारे मार्ग काढता येऊ शकतील .

१. आठवड्यातून ३ वेळा १० मिनिटे किंवा एक वेळा ३०-४० मिनिटे जर ११ ते ३ दरम्यान शरीराचे हात पाय चेहरा उघडा ठेवून ऊन त्वचेवर पडू दिले की व्हिटॅमिन डी पुरेश्या प्रमाणात तयार होते . गरोदर माता व स्तनदा माता यांनी आवर्जून नियमितपणे सुर्यस्नान करावे . जेवढी जास्त त्वचा सूर्यप्रकाश घेईल तेवढा कमी वेळ लागेल . अर्थात त्वचा लाल जाऊन सनबर्न होणार नाही याची काळजी घ्यावी . तसेच ज्यांची त्वचा रंगाने गव्हाळ किंवा काळी आहे त्यांना याहून अधिक काळ लागू शकतो .

२. लहान बाळांनाही काचेशिवाय खिडकीतून जे ऊन घरात येते अश्या उन्हात अधून मधून काही काळ ठेवले की त्यांनाही फायदा होऊ शकतो.

३. आईने स्वतःच्या रक्तातील व्हिटॅमिन डी ची मात्रा तपासून जर कमतरता असेल तर व्हिटॅमिन डी च्या गोळ्या घेऊ शकते . 25(OH)D ची पातळी 20 ng/ml किंवा 50 mmol/L असल्यास कमतरता आहे असे समजले जाते . याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा .

४. याखेरीज बऱ्याचदा स्तनदा मातांना व्हिटॅमिन डी ची मोठी मात्रा देऊन दुधातील प्रमाण वाढवले जाते किंवा बाळांना व्हिटॅमिन चे सप्लिमेंट दिले जातात .

५. याखेरीज चरबी ( फॅट ) युक्त दुधामध्ये व्हिटॅमिन डी असल्याने स्तनपानाच्या शेवटी येणारे दाट दूध बाळाला जाईल याची काळजी घेता येईल . यासाठी वेळ लावून न पाजता बाळाने स्तन सोडेपर्यंत पाजणे आणि ब्रेस्ट कॉम्प्रेशन टेक्निक वापरता येईल ( याविषयी पुढील पोस्ट मध्ये माहिती देईन, लक्ष असू दे)

अर्थात यातील कोणताही एक किंवा एकाहून जास्त मार्ग निवडणे शक्य आहे !

माणसाच्या बाळाला जे जे आवश्यक असते ते आईच्या दुधातून मिळू शकते किंवा काही बदलांमधून आपण स्तनपान अधिक आनंददायी व आरोग्यपूर्ण बनवू शकतो.

मला प्रश्न विचारणाऱ्या वाचकाचे आभार कारण ही छान माहिती मला मिळवता आली आणि म्हणून तुमच्यापर्यंत ही उपयुक्त माहिती पोचवता आली ! कारण व्हिटॅमिन डी चे महत्व हाडांच्या वाढीपासून , फ्रॅक्चर टाळण्यापासून , इम्युनिटी पासून, कोविड पासून, कॅन्सर पर्यंत सर्वत्र आहे !

पुढे काही महत्वाच्या लिंक्स देत आहे , याविषयी अधिक ते माहिती घेण्यासाठी !

http://www.drmomma.org/2009/06/la-leche-league-internationals.html?m=1

Breastfeeding and Other Foods

आणि हे काही फोटो अधिक माहिती साठी –

तुमचा डेली डोस ऑफ सनलाईट घेतला ना ?

डॉ. प्रिया प्रभू


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.