आई होण्यापूर्वी मला ‘या’ ३ गोष्टी माहीत असत्या तर… असे मला नेहमी वाटते..
आई होणं हा जगातला सर्वात सुंदर अनुभव मानला जातो. पण बाळ हातात आल्यावर पहिल्या काही दिवसांत, विशेषतः स्तनपान (Breastfeeding) करताना होणाऱ्या धडपडीबद्दल आपल्याला आधी कोणीच पूर्णपणे सांगत नाही!
डिलीव्हरीनंतर जेव्हा बाळ रडायला लागतं आणि “माझं दूध बाळाला पुरतंय का नाही?”, “मला जमणार आहे का?” या विचाराने मन कासावीस होतं, तेव्हा वाटतं की ” खरंच, काही गोष्टी मला आई होण्यापूर्वीच माहीत असत्या तर माझा स्तनपान देण्याचा प्रवास सोपा झाला असता!”
डॉक्टर म्हणून रुग्णांशी बोलताना आणि स्वतः या प्रवासातून जाताना मला शिकायला मिळालेले, स्तनपानाशी संबंधित ३ सर्वात महत्त्वाचे धडे आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे.
१. गरोदरपणातच स्तनपानाची पूर्वतयारी करा (Prepare during Pregnancy)
अनेकदा गरोदरपणात आपलं सगळं लक्ष डिलिव्हरी कशी होणार, बाळाचे कपडे, हॉस्पिटलची बॅग यावरच असतं. आपण असा विचार करतो की बाळ जन्माला आलं की स्तनपान आपोआप जमेल.
पण सत्य हे आहे की— स्तनपान ही नैसर्गिक गोष्ट असली, तरी ती आई आणि बाळ दोघांसाठी शिकण्याची एक कौशल्य (Skill) आहे.
* काय करायला हवं?
✓ गरोदरपणाच्या शेवटच्या ट्रायमेस्टरमध्येच (७ ते ९ व्या महिन्यात) स्तनपानाबद्दल वाचन करा. त्याविषयी व्हिडिओ बघा. शक्य असल्यास त्याविषयीच्या माता सभा अटेंड करा.
✓ बाळाची पकड (Latch) कशी असावी, सुरुवातीचे चिकाचे दूध (Colostrum) बाळासाठी किती महत्त्वाचे असते आणि वेगवेगळ्या पोझिशन्स (Cradle, Football hold) कोणत्या असतात, हे आधीच समजून घ्या.
✓ शक्य असल्यास तुमच्या गायनाकॉलॉजिस्ट किंवा लॅक्टेशन कन्सल्टंटशी (Lactation Consultant) आधीच चर्चा करा. पूर्वतयारी केली की डिलिव्हरीनंतर पहिल्या दिवशी घाबरे व्हायला होत नाही!
२. ‘लॅचिंग’ (Latch) योग्य असणं सर्वात महत्त्वाचं आहे
स्तनपान करताना जर तुम्हाला तीव्र वेदना होत असतील, निप्पलला चिरा (Cracked nipples) पडत असतील किंवा बाळ तासनं तास अंगावर असूनही रडत असेल, तर त्याचं एकच प्रमुख कारण असतं— बाळाची लॅचिंग योग्य नसणे.
✓ बाळाने फक्त निप्पलच्या टोकाला पकडून चोखणे चुकीचे आहे. यामुळे आईला प्रचंड वेदना होतात आणि बाळाच्या पोटात पुरेसे दूध जात नाही.
✓ योग्य पद्धत: बाळाने तोंडाचा मोठा आ वासून निप्पलसोबतच त्याच्या मागचा काळसर भाग (Areola) जास्तीत जास्त तोंडात घेतला पाहिजे.
✓ जेव्हा लॅचिंग अचूक असतं, तेव्हा स्तनपान करताना आईला अजिबात वेदना होत नाहीत आणि बाळाच्या तोंडात दुधाचा प्रवाह व्यवस्थित पोहोचतो. हा एकच नियम जर तुम्ही आत्मसात केला, तर स्तनपानातील ५०% पेक्षा जास्त त्रास तिथेच संपतो!
३. आईचा आत्मविश्वास आणि मानसिक शांतता दूध वाढवते (Mother’s Confidence Increases Milk)
“तुला पुरसं दूध येत नाहीये वाटतं!”, “बाळ खूप रडतंय, वरचं दूध सुरू करूया का?”—असे आजूबाजूच्या लोकांचे प्रश्न नवीन आईचे मनोबल पूर्णपणे खचवून टाकतात. आणि या तणावातूनच दुधाचे प्रमाण खरोखर कमी व्हायला लागते!
यामागचं वैज्ञानिक सत्य समजून घ्या:
✓ दुधाची निर्मिती ही पूर्णपणे तुमच्या मेंदूतील हॉर्मोन्सवर अवलंबून असते. दूध बाहेर येण्यासाठी ‘ऑक्सिटोसिन’ (Oxytocin) नावाचा हॉर्मोन आवश्यक असतो, ज्याला आपण ‘हॅपी हॉर्मोन’ म्हणतो.
✓ जेव्हा आई तणावात असते, भीतीखाली असते किंवा स्वतःवर संशय घेते, तेव्हा ऑक्सिटोसिनचा स्राव रोखला जातो.
✓ उलट, जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता, मनाशी ठाम ठरवता की “माझ्या शरीरात माझ्या बाळासाठी पुरेसं दूध तयार होत आहे”, शांत राहून बाळाला जवळ घेता (Skin-to-skin contact) आणि वारंवार अंगावर पाजता, तेव्हा मेंदूला आपोआप जास्त दूध तयार करण्याचा संदेश मिळतो.
नवीन आईला एकच सांगणं आहे…
आईपण हा काही परफेक्ट असण्याचा किंवा कोणासोबत competition करण्याचा मार्ग नाही. सुरुवातीला चुका होणे, थकवा येणे आणि मनात भीती वाटणे हे पूर्णपणे स्वाभाविक आहे.
स्वतःला थोडा वेळ द्या, गिल्ट सोडून द्या आणि स्वतःच्या शरीरावर विश्वास ठेवा. तुम्ही तुमच्या बाळासाठी सर्वोत्तम आई आहात! ❤️
डॉ प्रिया प्रभू
Insta – DrPriya.Insights


Leave a Reply