यावर्षीच्या स्तनपान सप्ताहाची थीम स्तनपानासाठी सपोर्ट सिस्टीम निर्मिती बाबत आहे.
*Prioritise Breastfeeding – Create Sustainable Support Systems*
म्हणजे
*स्तनपानाला प्राधान्य द्या – शाश्वत आधारप्रणाली निर्माण करा*
स्तनपान आई देत असली तरी पती, कुटुंबीय , आरोग्यव्यवस्था आणि समाजाच्या पाठिंब्याशिवाय सुयोग्य स्तनपान शक्य होत नाही.
बऱ्याचदा अनेक छोटे निर्णय स्तनपान बंद होण्यापर्यंत जातात.
उदा.
बाळाला बाटली देणे .
बाळाला वरचे दूध किंवा फॉर्म्युला देणे .
रात्रीचे पाजणे बंद करणे .
दोन्ही स्तनांतून काही मिनिटे म्हणजे अर्धवट पाजणे .
पहिले तीन दिवस बाळ स्तनाला न लावणे .
इ. इ.
अनेक गैरसमज देखील चुकीचे निर्णय घेण्यास भाग पडतात .
जसे –
स्तन घट्ट होणे बंद झाले म्हणजे दूध कमी झाले .
बाळ वारंवार दूध मागते म्हणजे दूध कमी झाले .
बाळ सारखे रडते म्हणजे दूध कमी झाले .
बाळाला दात आले की दूध बंद करायचे.
आईच्या दुधापेक्षा गाईचे दूध अधिक चांगले.
काही वेळा स्तनपान संबंधी गुंतागुंत होते आणि मग स्तनपान कमी होत थांबते.
उदा.
निप्पलला चिरा पडणे किंवा जखमा होणे.
स्तनांमध्ये दुधाची गाठ होणे.
स्तनामध्ये गळू होणे.
कधी दूधनिर्मिती किंवा दूधस्त्रवनाची प्रतिक्षिप्त क्रिया घडण्यात अडथळे येतात.
जसे –
दोन्ही स्तन पूर्ण रिकामे न होणे
केवळ एका बाजूने पाजणे
आईच्या मनात ताण असणे किंवा आई दुःखी असणे
या आणि अश्या बाबींमुळे स्तनपान बंद पडू शकते आणि अश्यावेळी आईला योग्य सल्ला आणि सहाय्य देण्यासाठी कोणीतरी आवश्यक असते.
याची मुख्य जबाबदारी डॉक्टरांवर असली तरी आपण प्रत्येक जण ओळखीच्या किंवा कुटुंबातील आईसाठी आधार बनू शकतो.
आज सांगलीतील भारती वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक व्याख्यान दिले. Doctors as breastfeeding enablers. भविष्यातील डॉक्टर्सपर्यंत स्तनपान प्रेम पोचवणे महत्वाचे आहे.
आपण सर्वांनी सर्वाधिक महत्व सुयोग्य स्तनपानाला दिले तर आई आणि बाळाचा स्तनपान प्रवास सहज शक्य होईल.
कारण स्तनपान संबंधी गैरसमज आणि अडचणी कोणीही दूर करू शकतात. गरज योग्य माहितीची आहे.
स्तनपान जमले नाही म्हणून आईने दुःखी होता कामा नये कारण जर तिच्या आजूबाजूचे सर्व स्तनपान माहिती जाणत असते तर तिला आधार मिळून तिचा प्रवास सुकर झाला असता.
*स्तनपान पाठीराखे किंवा रक्षक* म्हणून तुम्ही इतरांना मदत करू इच्छित असाल तर ऑनलाईन माहितीसेशन घेण्याचा विचार आहे. विविध गैरसमज दूर करून योग्य मार्ग कसा शिकवायचा यावर आपण बोलू शकतो.
कोणी इच्छुक असल्यास सांगा. या महिन्यात एखादी मीटिंग करूया.
योग्य त्या पाठिंब्यामुळे स्तनपान दोन वर्षापर्यंत देणे आईला शक्य होईल.
त्यासाठी आपण सर्व स्तनदा मातांच्या आधारप्रणालीचा भाग होऊया.
डॉ. प्रिया प्रभू, मिरज.
MD (PSM), IYCF
(7/8/2025)
#WBW25
माहिती इतरांपर्यंत अवश्य पोचवा.




Leave a Reply