कमजोर पेल्विक फ्लोअर आणि आरोग्य समस्या


तुम्हाला लघवी रोखून धरायला त्रास होतो का? किंवा हसताना, शिंकताना किंवा उडी मारताना लघवीचे थेंब बाहेर पडतात का? असे एखाद्या वेळेस नाही तर वारंवार घडते का? जर उत्तर हो असेल, तर तुमचा पेल्विक फ्लोअर कमजोर (Pelvic Floor Weakness) असू शकतो! ही स्त्रियांमध्ये आढळून येणारी विशिष्ठ अवस्था आहे.

पेल्विक फ्लोअर म्हणजे दोन्ही मांड्यांच्या मधल्या भागात असणारी स्नायूंची रचना जी तुमच्या मूत्राशय- मूत्रनलिका, गर्भाशय- योनीमार्ग आणि गुदाशय गुदद्वार यांना आधार देते. पण जर हे स्नायू कमजोर झाले, तर अनेक अडचणी उद्भवू शकतात. चला, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पेल्विक फ्लोअर म्हणजे काय?

आपल्या पोटाच्या खालील भागात म्हणजे कंबरेजवळ प्रजनन अवयव, मूत्र विसर्जन अवयव आणि मल विसर्जन अवयव असतात.
आपण मानवी हाडांचा सापळा बघितला तर छातीचा सापळा हृदय आणि फुफ्फुसांचे संरक्षण करतो आणि कंबरेच्या 2 हाडांनी मणक्याच्या शेवटच्या भागांसह ( sacrum आणि coccyx) बनवलेल्या ‘श्रोणी ‘ नामक पोकळी मध्ये प्रजनन आणि विसर्जन अवयव सुरक्षित असतात. या प्रत्येक अवयवाचे मुख  एका नालिकेवाटे शरीराबाहेर असते. या अवयवांना आपल्या जागी सुरक्षित ठेवण्यासाठी स्नायूंनी बनलेला एक पृष्ठभाग/तळभाग म्हणजे pelvic floor  असतो ज्याला “श्रोणी- तल” असेही म्हणता येईल.

पेल्विक फ्लोअर कमकुवत होण्याची कारणे

पेल्विक फ्लोअर स्नायू अनेक कारणांमुळे कमकुवत होऊ शकतात. त्यापैकी काही महत्त्वाची कारणे पुढीलप्रमाणे–

1. गर्भधारणा आणि प्रसूती –
स्त्री गरोदर असताना गर्भाशयाचा आकार वाढतो तसेच बाळाच्या वजनाने पेल्विक फ्लोअरवर दबाव येतो. वारंवार गर्भधारणा झाल्यास ते कमकुवत होते.  तसेच प्रसूतीदरम्यान स्नायूंवर ताण येतो. ज्यांची प्रसूती अनेक तासांसाठी लांबली असेल किंवा प्रसूती दरम्यान खालचा भाग फाटला असेल तर तर अश्यावेळी देखील कमजोरपणा येतो.

2. वाढते वय –
वयानुसार सर्वच स्नायूंची ताकद कमी होते, विशेषतः रजोनिवृत्ती (menopause) झाल्यानंतर हार्मोन्समधील बदलामुळे हा त्रास वाढतो.

3. लठ्ठपणा
जास्त वजनामुळे पोटावर आणि पेल्विक भागावर जास्त ताण येतो.

4. वारंवार जड वजन उचलणे –
चुकीच्या पद्धतीने जड वस्तू उचलल्याने पेल्विक फ्लोअरवर ताण येऊ शकतो. कधीकधी मणक्यांनाही इजा होऊ शकते.

5. सततची बद्धकोष्ठता (constipation) –
कुंथून शौचाला बसल्यामुळे पेल्विक स्नायूंवर अनावश्यक ताण येतो. जेवढा जास्त दाब कडक शौच बाहेर काढण्यासाठी लागेल तेवढी स्नायूंची कमजोरी वाढेल.

6. सततचा खोकला किंवा शिंकणे –
दीर्घकाळ खोकल्याने किंवा दम्यामुळे सतत खोकला असल्यास पेल्विक फ्लोअर कमजोर होऊ शकतो.

7. हार्मोन्समध्ये बदल –
एस्ट्रोजेन हार्मोन कमी झाल्यास (रजोनिवृत्तीमध्ये) स्नायू कमकुवत होऊ शकतात.

8. शस्त्रक्रिया किंवा दुखापत –
गर्भाशय काढल्यास (hysterectomy) किंवा त्या भागात कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाल्यास पेल्विक फ्लोअर प्रभावित होण्याची शक्यता असते.

कमकुवत पेल्विक फ्लोअरमुळे होणारे परिणाम

पेल्विक फ्लोअर मजबूत असेल, तर शरीरातील ओटीपोटातील अवयवांना व्यवस्थित आधार मिळतो. पण जर तो कमजोर झाला, तर शरीराला खालीलपैकी एक किंवा अनेक अडचणी येऊ शकतात. तसेच सुरुवातीला हा त्रास कमी असतो मात्र कमजोरी वाढली की त्रासाचे प्रमाणही वाढू शकते.  –

१. यूरीन लीकेज (लघवीचे थेंब पडणे)

हसताना, शिंकताना किंवा उडी मारताना लघवी बाहेर पडते.
काही वेळा टॉयलेटला जाण्यापूर्वीच लघवी बाहेर पडते.
स्नायूंचे आकुंचन करून लघवी थांबवणे शक्य होत नाही.

२. पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्स (Pelvic Organ Prolapse)

गर्भाशय, मूत्राशय किंवा गुदद्वार खाली सरकण्याची शक्यता असते. कधीकधी गर्भाशय शरीराच्या बाहेर देखील येऊ शकते. पण ही अडचण सांगायची कशी म्हणून कितीतरी वयस्कर स्त्रिया हा त्रास अंगावर काढतात.
योनीत किंवा पोटाच्या खालच्या भागात जडपणा किंवा ताण जाणवतो.

३. बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या

मलाशयावरचा ताण कमी झाल्याने शौच व्यवस्थित होत नाही.
वारंवार गॅस धरून ठेवावा लागतो किंवा अनियंत्रितपणे सुटतो.

४. लैंगिक जीवनावर परिणाम

योनीच्या स्नायूंमध्ये घट्टपणा नसल्याने किंवा वेदना झाल्याने लैंगिक संबंधांमध्ये अडचणी येतात.

५. पाठदुखी आणि ओटीपोटात वेदना

पेल्विक स्नायूंवर नियंत्रण नसल्याने, कंबरेवर आणि ओटीपोटावर जास्त भार पडतो.

६. वारंवार होणारा जंतुसंसर्ग

लघवीच्या ठिकाणी किंवा योनीमार्गामध्ये वारंवार जंतुसंसर्ग होऊ शकतो.


यावर काय उपाय करता येईल?

१. केगल व्यायाम (Kegel Exercises)

हे सर्वात प्रभावी व्यायाम आहेत. यामध्ये लघवी अर्ध्यात अडवण्यासाठी ज्या प्रकारे स्नायू आकुंचन केले जातात तसे करून स्नायूंचा व्यायाम करायचा असतो. खाली फोटो दिला आहे.

दररोज १०-१५ वेळा या स्नायूंना घट्ट करा आणि मग सोडा.
हळूहळू स्नायू आकुंचन ठेवण्याची वेळ वाढवता येईल.

Kegal exercises च्या steps by Cleveland Clinic

या fb account वर केगल व्यायामाविषयी व्हिडिओ असतात. एक व्हिडिओ पुढीलप्रमाणे – link

२. संतुलित आहार घ्या

फायबरयुक्त आहार (फळं, भाज्या, संपूर्ण धान्य) खा, जेणेकरून बद्धकोष्ठता टाळता येईल.
पुरेसे पाणी प्या.

३. शारीरिक हालचाल व्यवस्थित ठेवा

नियमित व्यायाम, चालणे आणि हलका योगासने केल्याने पेल्विक फ्लोअर मजबूत होतो.
जड वस्तू उचलताना योग्य पद्धत वापरा. पोटावर ताण येणार नाही याची काळजी घ्या.

४. वजन नियंत्रणात ठेवा

लठ्ठपणा टाळल्याने पेल्विक फ्लोअरवरचा ताण कमी होतो. त्यामुळे चाळीशीनंतर वाढणारे वजन आटोक्यात ठेवा.

वैद्यकीय उपचार पद्धती

जर तुमच्या लक्षणांचा त्रास वाढला असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. खालील उपचार दिले जाऊ शकतात –

1. फिजिओथेरपी (Physiotherapy) –

पेल्विक फ्लोअर मजबूत करण्यासाठी विशिष्ट व्यायाम दिले जातात.

2. हार्मोन थेरपी –

एस्ट्रोजेन थेरपी काही महिलांना फायदेशीर ठरू शकते, विशेषतः रजोनिवृत्तीनंतरच्या काळामध्ये.

3. सर्जिकल उपाय (शस्त्रक्रिया) –

अत्याधिक त्रास असल्यास पेल्विक फ्लोअर दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.

पेल्विक फ्लोअरचा कमकुवतपणा टाळण्यासाठी काय करता येईल?

✓ प्रत्येक गर्भधारणेनंतर आणि प्रसूतीनंतर केगल व्यायाम सुरू करा.
✓ प्रसूतीदरम्यान खालचा भाग फाटला असल्यास स्त्री रोग तज्ञांकडून योग्य प्रकारे टाके  देऊन तो दुरुस्त करून घ्या.
✓ सर्व स्नायू बळकट ठेवण्यासाठी नियमित व्यायाम किंवा योग करा.
✓ लठ्ठपणा नियंत्रित ठेवा.
✓ प्रोटीनयुक्त योग्य पोषणमूल्य असलेला आहार घ्या.
✓ बद्धकोष्ठता टाळण्यासाठी भरपूर पाणी आणि फायबरयुक्त आहार घ्या.
✓ अत्याधिक जड वस्तू उचलण्याचं टाळा.


पेल्विक फ्लोअर कमजोर असणं ही अनेक स्त्रियांना भेडसावणारी समस्या आहे, पण ती वेळीच ओळखून योग्य उपाययोजना केल्यास अडचणी टाळता येतात.   मात्र याची लक्षणे अनेकदा स्त्रिया लवकर सांगत नाहीत. केगल व्यायाम, योग्य आहार, आणि सवयी सुधारल्यास तुमचं आरोग्य सुधारू शकतं. जर त्रास वाढला तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

तुमच्या शरीराची काळजी घ्या, कारण निरोगी शरीराचं  जास्त आनंदी आयुष्य देते!

(ब्लॉग subscribe केल्यास पुढील लेख मेल मध्ये मिळतील)

पूर्व प्रसिद्धी – श्रेष्ठ महाराष्ट्र

Link

नवनवे fB लेख मिळण्यासाठी WA channel join करू शकता – लिंक


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com