घोरणे आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते

Written by:


घोरणारी माणसे तशी सुखी असतात.  कारण ते घोरतात किंवा किती मोठ्या प्रमाणात घोरतात हे त्यांना स्वतःला कधीच समजत नाही. मात्र त्यांच्या घोरण्यामुळे त्यांचा जोडीदार किंवा घरातील इतर व्यक्ती मात्र व्यवस्थितपणे झोपू शकत नाहीत. घोरणे हे सहसा पुरुषांमध्ये दिसून येते . मात्र स्त्रियांमध्येही त्याचे प्रमाण भरपूर आहे. विशेषतः वय झाल्यानंतर किंवा वजन वाढल्यानंतर घोरण्याचे प्रमाणही वाढते असे दिसून येते.  तसेच कधी कधी लहान मुलांमध्येही घोरण्याची समस्या दिसून येऊ शकते.  अशा या घोरण्याविषयी आज आपण माहिती घेऊया.

घोरणे – आरोग्य समस्येचे एक लक्षण

आपण सर्वजण आयुष्यामध्ये कधी ना कधी थोडेफार घोरत असतो. अधून मधून घडणारे घोरणे हे तेवढे धोकादायक नसते.  मात्र हे घोरणे नियमितपणे घडत असेल आणि त्यामुळे झोप व्यवस्थित होत नसेल तर अशावेळी मात्र ते आरोग्य समस्येचे एक लक्षण असू शकते.

घोरणे म्हणजे नक्की काय?

घोरणे म्हणजे झोपेत श्वास घेताना श्वसनमार्गात होणाऱ्या अडथळ्यामुळे येणारा आवाज.
गळ्याच्या मागच्या मऊ स्नायूंवर (टाळूचा मागचा भाग) हवा आदळल्यामुळे कंपन होते आणि त्यातून आवाज निर्माण होतो. हा आवाज सौम्य किंवा खूपच मोठा असू शकतो. घरातील इतरांनाही झोपेतून उठवण्याइतकाही हा आवाज मोठा होऊ शकतो.
श्वसन मार्गातील हा अडथळा नाकापासून घशापर्यंत असा कुठेही असू शकतो आणि त्यानुसार या घोरण्याच्या आवाजाचे प्रकार बदलत राहतात.
जर हा अडथळा जास्त असेल तर घोरताघोरता मध्येच श्वास घेणे काही काळासाठी बंद होते आणि ती व्यक्ती पुन्हा थोडीशी जागी होऊन पुन्हा श्वास घेणे सुरू करू शकते.  याला sleep  apnea असे म्हणतात.

घोरण्याचे कारण काय असते?

घोरण्याची अनेक कारणं असू शकतात, त्यातील काही प्रमुख कारणं खालीलप्रमाणे:

1. शारीरिक रचना: गळ्याच्या मागच्या भागातील टॉन्सिल्स मोठे असणं, नाकामागील adenoids वाढणे , मऊ टाळू किंवा जीभ जाड असणं किंवा नाकाच्या हाडाचा आकार वेगळा असणं ( deviated septum) यामुळे यामुळे श्वसनमार्ग अरुंद होतो.

2. अतिरिक्त वजन: जास्त वजनामुळे गळ्याभोवती चरबी जमा होते, ज्यामुळे श्वसनमार्ग अरुंद होतो आणि घोरणं सुरू होतं.

3. अल्कोहोलचा किंवा झोपेच्या गोळ्यांचा वापर: झोपण्यापूर्वी अल्कोहोल घेतल्याने / गोळी घेतल्याने घश्यातील स्नायू शिथिल होतात, ज्यामुळे श्वसनमार्गात अडथळा निर्माण होतो.

4. नाकासंबंधित समस्या: सर्दी, नाक बंद होणं किंवा ऍलर्जीमुळे श्वास घेताना अडथळा निर्माण होतो.

5. वयोमान: वय वाढल्यावर स्नायूंमध्ये शिथिलता येते, ज्यामुळे घोरण्याची समस्या जास्त जाणवते.

घोरण्याचे आरोग्यावर होणारे परिणाम

घोरणं ही फक्त इतरांसाठी त्रासदायक गोष्ट नाही, तर ती आरोग्यासाठीही हानीकारक ठरू शकते. यामुळे होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.

1. स्लीप एपनिया: घोरणं हे स्लीप एपनियाचं (Sleep Apnea) लक्षण असू शकतं. स्लीप एपनियामध्ये झोपेत काही काळासाठी श्वास थांबतो, ज्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही.

2. हृदयविकाराचा धोका: सतत घोरण्यामुळे आणि ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे हृदयावर जास्त ताण येतो, ज्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

3. थकवा आणि निद्रानाश: चांगली झोप न झाल्यामुळे दिवसभर थकवा, चिडचिड आणि लक्ष केंद्रीत करण्यात अडथळा येतो.

4. कुटुंबातील तणाव: सतत घोरण्यामुळे जोडीदार किंवा घरातील इतरांना झोपेत व्यत्यय येतो, ज्यामुळे कुटुंबातील विशेषतः जोडीदारासोबतच्या नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. प्रदेशात तर या कारणासाठी घटस्फोट देखील झाले आहेत.

घोरणे साधे आहे की गंभीर हे कसे ओळखावे?

केवळ घोरण्याच्या मोठ्या आवाजामुळे गंभीरपणा ओळखता येत नाही.  मात्र घोरत असताना मध्येच जर श्वास काही काळासाठी थांबत असेल आणि त्यानंतर दचकून पुन्हा सुरू होत असेल तर अशावेळी मात्र डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्यावा.  

त्याचबरोबर झोपेमध्ये खूप जास्त हालचाल होत असेल किंवा तोंड कोरडे पडून जाग येत असेल,  सकाळी उठल्यावर डोके दुखत असेल , चिडचिडेपणा होत असेल,  दिवसभर थकवा जाणवत असेल तर अशावेळी घोरण्याबाबत तपासण्या करून उपचार घ्यायला हवेत.

ही सर्व लक्षणे शरीराला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्यामुळे निर्माण झालेली आहेत . झोपेमध्ये शरीराला विश्रांती मिळणे व पुरेसे ऑक्सिजन मिळणे हे शरीराची झीज भरून काढण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.

घोरणे आणि त्याची कारणे समजून घेण्यासाठी केल्या जाणाऱ्या चाचण्या

घोरण्याच्या समस्येचे निदान करण्यासाठी काही महत्त्वाच्या चाचण्या केल्या जातात.

1. शारीरिक तपासणी : श्वसन मार्गातील एखादा अवयव हा वाढला आहे का किंवा काही अडथळा निर्माण झाला आहे का हे ओळखण्यासाठी व्यवस्थित तपासणी केली जाते.

2.स्लीप स्टडी (पॉलिसोमनोग्राफी): रुग्ण झोपेत असताना श्वासोच्छ्वास, ऑक्सिजन पातळी, हृदयाचे ठोके आणि मेंदूच्या लहरींची नोंद घेतली जाते. झोपेच्या प्रकारांबाबतही यामध्ये अभ्यास केला जातो. यातून खूप महत्त्वाची माहिती मिळते.

2. नाक व श्वसनमार्ग तपासणी: नाकातील अडथळा किंवा श्वसनमार्गाचा अभ्यास करण्यासाठी नाकाजवळील भागाची एंडोस्कोपी किंवा इतर चाचण्या केल्या जातात.

3. इमेजिंग चाचण्या: श्वसनमार्गाच्या रचनेत कोणताही अडथळा आहे का, हे समजण्यासाठी सीटी स्कॅन किंवा एमआरआय केलं जातं.

रुग्णाच्या त्रासानुसार यातील हव्या त्या तपासण्या डॉक्टर सांगतात.  काही नाक कान घसा तज्ञांनी झोपेबाबत अधिकचा अभ्यास देखील केलेला असतो आणि अशा ठिकाणी याबाबत योग्य मार्गदर्शन मिळू शकते.

घोरण्याबाबतचे उपाय आणि उपचार

घोरण्यावर योग्य उपचार घेतल्यास हा त्रास कमी होतो किंवा पूर्णतः बंद होतो. घोरण्याचे जे कारण समजले असेल त्यानुसार हे उपचार केले जातात.

1. जीवनशैलीतील बदल:

वजन कमी करा: नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराद्वारे वजन आटोक्यात ठेवा.

झोपेची स्थिती बदला: पाठीवर झोपण्याऐवजी एका अंगावर झोपण्याचा प्रयत्न करा. यामुळे श्वसनमार्ग मोकळा राहतो. विशेष प्रकारच्या उश्या वापरून देखील मान वाकले जाणार नाही याची काळजी घेता येते.

अल्कोहोल आणि तंबाखूचा त्याग: झोपण्यापूर्वी अल्कोहोल किंवा धूम्रपान टाळा. शक्य असल्यास या सवयी बंद करा.

2. वैद्यकीय उपकरणांचा वापर:

सीपीएपी मशीन: (Continuous Positive Airway Pressure) हे उपकरण श्वासमार्ग उघडा ठेवण्यास मदत करतं.

माऊथ गार्ड्स: दातांच्या संरचनेनुसार तयार केलेल्या माऊथ गार्ड्समुळे घोरणं कमी होऊ शकतं.

Nasal strips: यांच्या वापराने नाकाचा भाग उघडा राहण्यासाठी मदत होऊ शकते.

3. औषधोपचार:

सर्दी किंवा ऍलर्जीमुळे घोरणं होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधं घ्या.

4. शस्त्रक्रिया करणे:

नाकाच्या हाडाचा त्रास असल्यास शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.

टॉन्सिल्स किंवा adenoids मोठे असल्यास त्यांना काढून टाकण्यासाठी ऑपरेशन केलं जातं.

Ablation therapy वापरून अंतर्गत रचना बदलता येते.

Laser चा वापर करून पडजीभ लहान करता येते.

5. तंत्रज्ञानाचा वापर:

घोरणं ट्रॅक करण्यासाठी आता अनेक मोबाईल अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. ही अ‍ॅप्स तुमच्या झोपेचा आवाज रेकॉर्ड करून तुमच्या घोरण्याच्या पातळीचं आणि प्रकाराचे विश्लेषण करू शकतात.

घोरणे हलक्यात घेऊ नये

घोरणं हा विनोदी विषय वाटत असला तरी त्याकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक आहे. घोरणे हे श्वासोच्छ्वासाला येणाऱ्या अडथळ्याचे लक्षण आहे ज्याचे प्रमाण कमी किंवा जास्त असू शकते.

तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कुणाला सतत घोरण्याची समस्या असल्यास व  वरील प्रकारे इतर लक्षणे दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य निदान आणि उपचार घेतल्यास ही समस्या सहज सोडवता येते.

आता, पुढच्या वेळी जर कुणी घोरण्यावर विनोद केला, तर त्यांना या लेखातल्या गोष्टी सांगायला विसरू नका! चला, आरोग्यदायी झोपेचा आनंद घेऊया आणि आपले आरोग्य सुधारूया!

डॉ प्रिया प्रभू, MD PSM

drprdeshpande2@gmail.com

(हा लेख श्रेष्ठ महाराष्ट्र वर पूर्वप्रसिद्ध झाला होता. )

महत्वाचे संबंधित लेख

या विषयावर श्री वीरेंद्र माने (पुणे)  यांनी स्वानुभावावर काही लेख लिहिले आहेत त्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे.

सर्व लेख 

या लेखमालेवरून ( 5 लेख) या आजाराचे गांभीर्य लक्षात येईल.

या पेज वरील respiratory problems and blood conditions या गटात याविषयाशी संबंधित लेख आहेत. याचे निदान व उपचार होण्यासाठी किती प्रयत्न करावे लागले हे सविस्तर सांगितले आहे.

(image credits – Image by katemangostar on Freepik)


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.