स्तनाचा कर्करोग म्हटलं की घाबरायला होतं, नाही का? पण योग्य माहिती, नियमित तपासणी, आणि वेळीच निदान झालं तर यावर प्रभावीपणे मात करता येते.
स्तनाचा कर्करोग हा महिलांमधील सर्वात सामान्य कर्करोग आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, २०२२ मध्ये जगभरात २.३ दशलक्ष महिलांना याचा सामना करावा लागला, आणि त्यात ६७०,००० जणींचा मृत्यू झाला. भारतातील एकूण कॅन्सरच्या रुग्णांपैकी 13.5% रुग्ण हे स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण असतात. 1990 मध्ये भारतातील आकडेवारीनुसार स्तनाचा कर्करोग हा चौथ्या क्रमांकावर होता पण आता स्तनाचा कर्करोग हा पहिल्या क्रमांकाचा कर्करोग झाला आहे.
कोणताही कर्करोग म्हटलं की त्याबाबत वेळेचे महत्त्व असतं . म्हणजे कर्करोगाचे निदान जेवढ्या लवकर होईल तेवढा जीवाला धोका कमी! निदानानंतर उपचार जेवढ्या लवकर सुरू होतील तेवढे उपचार यशस्वी होण्याची शक्यता अधिक ! अर्थात, हे तेव्हाच घडू शकते जेव्हा आपल्या प्रत्येकाला या कर्करोगाची माहिती असेल आणि हा कर्करोग लवकरात लवकर सापडावा यासाठी आपण सर्व योग्य ती काळजी घेऊ!
चला तर मग, जाणून घेऊयात या कर्करोगाची कारणे , लक्षणे आणि त्यापासून आपला बचाव कसा करता येईल ते.
स्तनाचा कर्करोग म्हणजे नक्की काय?
स्तनातील दुध वाहून नेणाऱ्या नलिका किंवा दूध निर्माण करणाऱ्या ग्रंथिंमधील काही पेशी अनियंत्रित रीतीने वाढू लागतात, आणि गाठ (ट्युमर) तयार होते. हा ट्यूमर वाढत गेल्यास तो लसिका ग्रंथी आणि शरीराच्या इतर भागात पसरू शकतो. सुरुवातीच्या अवस्थेत तो जरी जीवनासाठी धोकादायक नसला तरी, वेळेत उपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. म्हणून, वेळेवर निदान खूप महत्त्वाचं!
कोणत्या कारणांमुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो?
बऱ्याचश्या कर्करोगाचे नेमके कारण विज्ञानाला अजून समजले नाही. प्रत्येक कर्करोगाच्या बाबतीत विविध बाबी ह्या आपली कर्करोगाची जोखीम वाढवत असतात, त्यांना रिस्क फॅक्टर असे म्हणतात.
वय वाढणं ( 50 वर्षांहून अधिक वय) आणि स्त्री असणं (९९% रुग्ण स्त्रिया असतात) हे स्तनाच्या कर्करोगाचे सर्वात मोठे जोखीम घटक आहेत. पण इतरही काही कारणे आहेत ज्यामुळे या आजाराचा धोका वाढतो:
वजन जास्त असणे: लठ्ठपणामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
दारूचे सेवन: नियमित आणि जास्त प्रमाणात दारू पिण्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.
कुटुंबात कर्करोगाचा इतिहास: घरात इतर कोणाला स्तनाचा कर्करोग असेल तर आपलाही धोका वाढतो. 15 % रुग्णांमध्ये या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास दिसून येतो. आई, बहीण किंवा आईकडील इतर नातेवाईक यांच्यामध्ये कर्करोग झाल्याचा इतिहास असल्यास अशांनी जास्त काळजी घ्यावी.
विकिरण (रेडिएशन) किरणांचा इतिहास: पूर्वी एखाद्या दुसऱ्या कर्करोगाच्या उपचारासाठी रेडिएशन घेतलं असेल तर स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
तंबाखूचे सेवन: तंबाखूसेवन किंवा धुम्रपान हे इतर कर्करोगांप्रमाणेच स्तनाच्या कर्करोगाचाही धोका वाढवते.
जनुकीय बदल : BRCA 1 आणि BRCA 2 या प्रकारचे म्युटेशन झाले असल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
अर्थात, वरील जोखीम घटक नसले तरीही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. जसे – स्तनाचा कर्करोग हा तरुण वयात देखील होऊ शकतो. त्यामुळे सावधानता आणि नियमित तपासणी महत्वाची ठरते.
स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे काय असू शकतात?
स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं प्रत्येक वेळी ताबडतोब दिसतात असे नाही. कर्करोग हळूहळू वाढत असल्याने सहसा लक्षणेही हळूहळू वाढतात व त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते.
मात्र, खालील लक्षणांपैकी काही जाणवले तर आपण डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा:
स्तनात गाठ तयार होणे – सुरुवातीला गाठ अगदी वाटण्याएवढी लहानही असू शकते. (कोणत्याही आकाराची गाठ स्तनांमध्ये किंवा स्तनाच्या त्वचेखाली किंवा काखेखाली असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा)
स्तनाचा आकार किंवा आकारमान व ठेवण बदलणे – स्तन अचानक थोडे लहान किंवा एखाद्या भागात मोठे वाटू लागते.
त्वचेचा पोत बदलणे– त्वचा खडबडीत होणे, छोटे खड्डे पडणे, लालसरपणा येणे, किंवा रंग बदलणे किंवा कमी न होणारी पुरळ येणे ( त्वचा संत्र्याच्या सालीसारखी वाटते)
निप्पलच्या भागात ( स्तनाग्र) बदल होणे– ते आत वळणे, रॅश येणे
निप्पलमधून एखादा स्त्राव येणे (रक्तयुक्त लालसर किंवा पाण्यासारखा स्त्राव)
यातील लक्षणं नक्की कॅन्सरच असल्याचं सूचित करतात असे नाही, पण सावधगिरी म्हणून ही लक्षणं लक्षात ठेवावीत. उदाहरणार्थ त्वचेतील बदल हे एखाद्या इन्फेक्शन मुळेही होऊ शकतात मात्र त्याविषयी योग्य निदान होणे महत्त्वाचे असल्याने दुर्लक्ष करू नये. तसेच कर्करोगामध्ये वरील सर्वच लक्षणे दिसतील असेही नाही. स्तनातील गाठ सहसा वेदनारहित असते. त्यामुळे त्या गाठीकडे दुर्लक्ष होऊ शकते.
मात्र स्तनाच्या पूर्ण भागांमध्ये कोणतेही बदल जाणवले तर त्याबद्दल आपल्या डॉक्टरांचा सल्ला लवकरात लवकर घ्यायला हवा. काही गाठी या कॅन्सरशिवायच्या देखील असतात. मात्र याविषयी आपण वेळेवर खात्री करून घेणे आवश्यक असते.
स्तनाचा कर्करोग पुरुषांना होऊ शकतो का?
तसेच , स्तनाचा कर्करोग हा केवळ स्त्रियांना होतो असाही एक गैरसमज आहे. मात्र प्रमाण कमी असले तरी पुरुषांनादेखील स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. त्या कर्करोगाची लक्षणे देखील साधारण वरील प्रमाणेच असतात, ज्यामध्ये स्तनाच्या आसपासच्या भागांमध्ये तसेच काखेमध्ये गाठ किंवा इतर बदल दिसू शकतात. पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण हे साधारण 0.5 ते 1% एवढे आहे. म्हणजेच 2022 सालची वरील आकडेवारी जर आपण बघितली तर जगभरातील साधारण 12000 ते 23000 एवढ्या पुरुषांना कर्करोग स्तनाचा कर्करोग झाला होता असे दिसते.
निदान आणि उपचार
आपल्याला प्रश्न पडतो, याचे निदान कसे करतात? वरीलपैकी कोणतीही लक्षणे असतील तर डॉक्टर कधी कधी मेमोग्राफी किंवा अल्ट्रासाऊंड करतात, आणि काही वेळा बायोप्सीची गरज भासते. निदान झाल्यावर कर्करोगाच्या प्रसारानुसार कर्करोगाची पायरी ठरवली जाते व त्यानुसार उपचार ठरवतात. तसेच कर्करोगाचा प्रकार ठरवण्यासाठी ही काही तपासण्या केल्या जातात ज्यामध्ये ती गाठ हार्मोनला प्रतिसाद देईल की नाही हे बघितले जाते.
उपचार पद्धतींमध्ये पुढील गोष्टी येतात:
शस्त्रक्रिया: गाठ काढणे किंवा स्तनाचा काही भाग काढून टाकणे किंवा पूर्ण स्तन व जवळच्या लसिका ग्रंथी काढणे. कर्करोग एवढ्या लवकर लक्षात येईल तेवढी छोटी शस्त्रक्रिया आवश्यक असते. आणि जेवढ्या उशिरा लक्षात येईल तेवढी मोठी शस्त्रक्रिया करावी लागते.
किरणोपचार (रेडिएशन थेरेपी): उरलेल्या कॅन्सर पेशींवर क्ष किरणांचा वापर करून आघात करणे.
किमोथेरपी व इतर औषधोपचार: कर्करोगाचे प्रकार लक्षात घेऊन विशिष्ट औषधोपचार केला जातो. यात हार्मोनल थेरपी, किमोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी यांचा समावेश असतो.
कर्करोगाच्या प्रकारानुसार व टप्प्यानुसार कोणते उपचार कधी करायचे व किती प्रमाणात करायचे हे ठरवले जाते.
भारतामध्ये कर्करोगाचे उपचार मध्येच सोडून देण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याचप्रमाणे कर्करोग पूर्णपणे बरा करणारा उपचार हा कोणत्याही वैद्यकी शाखेमध्ये अद्याप सापडलेला नाही हे आपण लक्षात ठेवायला हवे. आधुनिक उपचारांमुळे रुग्ण पुढील 5 वर्षे जगण्याची शक्यता पुढीलप्रमाणे आहे – स्टेज 1 : 99%, स्टेज 2 : 92% , स्टेज 3 : 70% आणि स्टेज 4 : 21% .
प्रतिबंध आणि स्वतःची काळजी कशी घ्याल?
कर्करोगांच्या बाबतीमध्ये प्रतिबंध हाच सर्वोत्तम असतो, तसेच विविध जोखीम घटकांबाबत काळजी घेऊन स्वतःची जोखीम कमी करणे हे सर्वाधिक महत्त्वाचे असते.
स्तनाचा कर्करोग वेळीच ओळखण्यासाठी स्तनाची नियमित तपासणी महत्त्वाची आहे. ही तपासणी स्वतः देखील करता येते. याला सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन असे म्हणतात. दोन्ही स्तनांचे सर्व भाग तसेच काखेमध्ये एखादी गाठ नाही ना हे बोटे सपाट ठेवून स्तनांवर दाबून तपासता येते. वर्षातून एकदा किंवा दोनदा अशी तपासणी आंघोळ करताना प्रत्येक स्त्री नक्कीच करू शकते. स्तन मोठे असल्यास ही तपासणी झोपून देखील करता येते. याविषयी तिचे कुटुंबीय ही तिला आठवण करून देऊ शकतात.
तसेच दोन-तीन वर्षातून एकदा आपल्या स्त्रीरोग तज्ञांकडून स्तनांची तपासणी केल्यासही कर्करोगाचे निदान लवकर होऊ शकते. स्त्री रोग तज्ञ ही स्तनांची हाताने तपासणी करणे किंवा मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफी अशा तपासण्या करायला सांगू शकतात.
तसेच, स्तनाच्या आकारात कोणताही बदल किंवा गाठ आढळल्यास, त्वरित तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा कर्करोगाला घाबरून तुम्ही डॉक्टरांची भेट टाळली तर त्याचा फायदा कर्करोगाला होईल , व त्यामुळे उपचार खर्चिक व आजार जीवघेणा ठरू शकेल. मात्र जर कर्करोग पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात सापडला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. जशी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कॅन्सरच्या पेशींना शोधशोधून नष्ट करत असते , त्याचप्रमाणे आपणही आपल्या शरीरातील बदलांवर योग्य लक्ष ठेवून, तसेच स्क्रीनिंगच्या तपासण्या नियमितपणे करून कॅन्सरला पहिल्या टप्प्यातच पकडण्याचा प्रयत्न करायला हवा.

तसेच, आरोग्यपूर्ण जीवनशैली ठेवण्याचा प्रयत्न करा – संतुलित आहार, आहारामध्ये फळे व भाजीपाला यांचा भरपूर वापर, नियमित व्यायाम, वजन नियंत्रित ठेवणे – या गोष्टी आवश्यक करा आणि मांसाहार करताना रेड मीट शक्यतो टाळा, तंबाखू-दारू यांचा वापर टाळा. ही व्यसने सर्व तरुण मुलींमध्ये वाढत असल्याने आपल्या तरुण मुलींना या सवयींच्या भविष्यातील धोक्यांबद्दल आवश्यक कल्पना द्या.
तसेच अधिक काळासाठी स्तनपान दिल्यास स्तनाच्या कर्करोगांचा धोका कमी होतो. त्यामुळे मातांनी आपल्या मुलांना कमीत कमी दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी स्तनपान देणे हे त्यांच्या स्वतःच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहे.
( स्तनपानाविषयी माहितीचा प्रसार केल्यास बाळाला स्तनपान तर मिळेलच पण आईचाही कर्करोगाचा धोका कमी होईल. या ब्लॉग वरील इतर स्तनपान विषयक लेख इतरांपर्यंत अवश्य पोहोचवा. )
जागरूकता का गरजेची?
स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता वाढवून आपण या आजाराचे वेळेवर निदान करू शकतो. सर्व कुटुंबीयांनी या आजाराबाबत चर्चा करावी आणि आवश्यक असेल तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यामुळे लवकर निदान करून उपचार अधिक प्रभावी ठरतील.
स्तनाचा कर्करोग हा आपल्यासाठी आव्हानात्मक असला तरी त्यावर मात करता येते. प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी, आपल्या शरीरात येणाऱ्या बदलांना ओळखावे, आणि आवश्यक असल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आपल्या स्तनांची स्वतः केलेली तपासणी ही जीवन रक्षक ठरू शकते!
- डॉ प्रिया प्रभू , MD PSM
रोगप्रतिबंधक शास्त्र तज्ञ
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज.
drprdeshpande2@gmail.com
सदर लेख श्रेष्ठ महाराष्ट्र साईट वर पूर्वप्रसिद्ध झाला होता –
स्तनाचा कर्करोग: जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि प्रतिबंधक उपाय




Leave a Reply