बाळाला स्तनावर पाजले किंवा बाटलीने दूध दिले तरी त्यानंतर ढेकर काढणे ही एक महत्त्वाची कृती असते. विशेषतः बाळ जेव्हा लहान असते म्हणजे पहिल्या दोन ते तीन महिन्यांपर्यंत याचे जास्त महत्त्व असते.
लहान बाळ दूध पिताना थोडी हवा देखील पोटात जाते . कधी latch व्यवस्थित नसेल किंवा दूध खूप जोरात येत असेल अशावेळी जास्त हवा पोटात जाऊ शकते . याविषयी काळजी घेतल्यास याचे प्रमाण कमी होऊ शकते.
मग ही हवा कधी ढेकरेसारखी बाहेर येते व सोबत येताना दह्यासारखे दूध आणते. ही काही उलटी नसते. पण बाळाचे oesophageal sphincture पूर्ण तयार झाले नसल्याने पिलेले दूध सहजपणे बाहेर येते.
जर ती हवा बाहेर आली नाही तर पोटात पुढे सरकल्यानंतर गॅसेस बनतात आणि मग संध्याकाळच्या वेळेला बाळे अत्याधिक रडतात किंवा किरकिर करतात. कारण त्यांच्या पोटामध्ये गॅसेसमुळे दुखत असते. त्याला Evening Colic म्हणतात. व्यवस्थित ढेकर काढली गेली असेल तर याचे प्रमाण थोडे कमी होते. त्याचप्रमाणे बाळाला काही मिनिटे टमी टाईम (Tummy Time) दिला तर त्यानेही त्रास कमी होतो. (याविषयी देखील माहिती लिहिणार आहे.)
ढेकर काढणे म्हणजे burping चे काम आई करू शकते किंवा बाबा देखील करू शकतात किंवा कुटुंबातील तर कोणीही व्यक्ती यामध्ये मदत करू शकते. तेवढाच आईला आराम. त्यामुळे ढेकर काढण्याच्या या पद्धती सर्वांनाच माहिती असायला हव्यात.
ढेकर काढताना सहसा बाळाच्या पाठीला जोरजोरात थपके दिले जातात. पण फक्त थपके दिल्याने पोटातील हवा निघेलच असे नाही. त्यामुळे बाळाच्या शरीराची थोडीशी हालचाल होणे हेही आवश्यक असते. त्यामुळे काही पद्धती ह्या बाळाच्या पाठीवर थपके देणाऱ्या तर काही बाळाच्या शरीराची हालचाल करणाऱ्या अश्या आहेत. एखाद्या पद्धतीने ढेकर निघत नसेल तर पद्धत बदलून आपण वेगळ्या पद्धतीने ट्राय करून बघू शकतो. कारण कोणत्या बाळाला कुठली पद्धत अधिक जास्त सूट होईल ते प्रयोग केल्यानंतरच लक्षात येईल.
बाळाची ढेकर काढण्यासाठीच्या विविध पद्धती पुढीलप्रमाणे:
१. खांद्यावर धरून ढेकर काढणे
ही पद्धत आपल्या सर्वांना माहित आहे .
अशा पद्धतीने ढेकर काढताना लक्षात ठेवायच्या काही गोष्टी – बाळ खांद्यावर बऱ्यापैकी वर धरायला हवे, जेणेकरून बाळाच्या पोटावर थोडा दाब येईल. तसेच बाळाच्या पाठीवर थपके देताना ते दोन्ही खांद्यांच्या मध्ये द्यायला हवेत. तसेच दुखण्याएवढ्या जोरात द्यायचे नाहीयेत. त्याचप्रमाणे बऱ्याचदा थपके देण्याऐवजी बाळाच्या पाठीवरून हात फिरवला जातो, तो खालच्या बाजूने वरच्या बाजूला फिरवायचा. समजा लगेच ढेकर निघत नसेल तर बाळाला एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर घेतले किंवा खांद्यावरून काढून थोडे शरीर हलवले आणि पुन्हा खांद्यावर घेतले तर ढेकर निघू शकते. पोटावर दाब आल्याने ढेकरे सोबत थोडेसे दूधही बाहेर येण्याची शक्यता असते, त्यामुळे खांद्यावर एखादा टॉवेल अवश्य घ्या.
२. मांडीवर बसवून ढेकर काढणे
या पद्धतीमध्ये बाळाला मांडीवर बसवले जाते आणि एका हाताने त्याच्या चेहऱ्याच्या खाली समोरून आधार देऊन त्याची मान सरळ केली जाते. त्यानंतर दुसऱ्या हाताने बाळाची पाठ जर थोडी सरळ केली तर बऱ्याचदा ढेकर निघते. किंवा अशा पद्धतीने बाळाला धरून दुसऱ्या हाताने बाळाचे बूड जरासे गोल किंवा बाजूला हलवले तरीही ढेकर निघू शकते. कधी असे बसवून बाळाच्या पाठीवर थपकेही देतात. खाली दिलेल्या रील्समध्ये हे कसे करतात ते दिसेल.
३. मांडीवर किंवा हातावर झोपवून ढेकर काढणे
बाळाला खांद्यावर धरणे थोडेसे अवघड जात असल्याने बाळाचे पोट आपल्या एका मांडीवर येईल अशा पद्धतीने बाळाला मांडीवर धरले जाते आणि मग बाळाच्या पाठीवरून हात फिरवून किंवा पाठीवर थपके देऊन ढेकर काढली जाते. तशीच पद्धत एका हातावर बाळ पालथे धरून देखील करता येऊ शकते.

याविषयीच्या काही रिलच्या लिंक देत आहे , म्हणजे नक्की काय करायचे हे लक्षात येईल . प्रत्येक रीलमध्ये burping च्या पद्धतीचे काही ना काही व्हेरिएशन्स दाखवलेले आहेत.
1.
2.
https://www.facebook.com/share/v/hjAH6sAaGZGFqdoC/?mibextid=D5vuiz
3.
https://www.facebook.com/share/r/5uaoHSSMsL7pjiNH/?mibextid=D5vuiz
4.
https://www.facebook.com/share/r/aQnqA9Pxx8bCuXQB/?mibextid=D5vuiz
तुमच्याकडे फेसबुक नसेल तर हा एक youtube वरचा व्हिडिओ ही आहे, ज्यामध्ये बेसिक तीन पद्धती सांगितल्या आहेत. पण वरील व्हिडिओमध्ये काही काही वेरिएशन किंवा थोडे वेगळे प्रकार अशा गोष्टीही सांगितलेल्या आहेत.
https://youtu.be/VCJDvRi9zM4?si=nSvjnPAajiycv5iV
बाळाच्या पोटात खूप हवा जात असेल तर अशावेळी लॅच व्यवस्थित आहे ना याविषयी देखील काळजी घ्यायला हवी. त्यामुळे Latch बाबतची पोस्ट ही अवश्य वाचा. तुम्हाला वरीलपैकी कोणत्या पद्धतीने ढेकर काढणे सोपे वाटते हे कमेंट मध्ये अवश्य सांगा.
तसेच बाळाला पाजत असताना मध्येच एखादी ढेकर काढून पुन्हा पाजले तर थोडे अधिक दूध देखील बाळ पिऊ शकते. त्यामुळे आपले बाळ आपल्याला काय सुचवते याकडे लक्ष देऊन त्यानुसार आपण ढेकर कधी काढायची ते ठरवू शकतो.
डॉ प्रिया प्रभू, MD PSM IYCN


Leave a Reply