
आरोग्यासाठी पाण्याचे महत्त्व आपण सर्व जाणतो, आणि स्वतःच्या आरोग्यासाठी आवश्यक तेवढे पाणी दररोज पिण्याचा प्रयत्नही करतो. डॉक्टरही पुरेसे पाणी पिण्याबाबत वारंवार आठवण करून देत असतात आपल्याला.
पण मग जेव्हा डॉक्टर सांगतात की आपल्या छोट्याशा बाळाला पाहिले सहा महिने पाणी द्यायचं नाहीये त्यावेळेला समजत नाही काय बरोबर आणि काय चुकीचं? चिंता वाटते की पाणी न दिल्याने बाळाचे काही नुकसान तर होणार नाही ना?
डॉक्टर का सांगतात की बाळाला पाणी द्यायचे नाही?
नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे अन्न हे आईचे दूध असते आणि त्या दुधामध्ये बाळाला आवश्यक सर्व अन्नघटक पाण्यासह असतात. दुधामध्ये सर्वात जास्त प्रमाण हे पाण्याचे असते.
याचाच अर्थ बाळाला जेवढे पाणी आवश्यक आहे तेवढे पाणी हे आईच्या दुधाद्वारे मिळत असते .
मग बाळाला पुरेसे अन्न व पाणी मिळतंय हे ओळखायचे कसे?
तर २४ तासात बाळाला किती वेळा सुसू होते यावर लक्ष ठेवायचे . सहा पेक्षा जास्त वेळा फिकट पिवळ्या रंगाची सुसू जर होत असेल तर बाळाला दूध पुरेसे मिळते असे आपण समजू शकतो.
सहा महिन्यापूर्वी बाळांना पाणी न देण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे नवजात बाळाची किडनी म्हणजे मूत्रपिंड हेही अजून नाजूक असतात आणि त्यांचे काम अजून हळूहळू सुरू झालेले असते. जर बाळाला आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी दिले गेले तर ते पाणी शरीराबाहेर न पडता ते रक्त पातळ करू शकते आणि इलेक्ट्रोलाईट कमी झाल्याने त्याचा त्रास बाळाला होऊ शकतो.
याखेरीस जेव्हा बाळाच्या छोट्याश्या पोटातील जागा आपण दिलेल्या पाण्याने भरते आणि त्यातून बाळाला काहीच अन्नघटक मिळत नाहीत, तेव्हा बाळाच्या पोषणामध्ये अडथळा येतो. त्याऐवजी आईच्या दुधाने जर बाळाची तहान भागली तर पाणी आणि त्यासोबत अन्नघटक अशा दोन्ही गोष्टी बाळाला मिळतात आणि मग बाळाच्या छोट्याशा पोटावर ताणही येत नाही.
या प्रश्नाविषयी भीती वाटणार नाही अशा पद्धतीने माहिती सांगणारा (fear mongering नसलेला) हा एक लेख सापडला आहे. हवा असल्यास तुम्ही तोही वाचू शकता.
https://www.healthline.com/health/baby/why-cant-babies-have-water#age-when-water-is-ok
यावरून आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे ?
१. सहा महिन्यापेक्षा छोटे बाळ असेल तर अश्या बाळांना केवळ आईचे दूध (किंवा फॉर्म्युला देत असाल तर फॉर्म्युला) एवढेच द्यायचे आहे.
२. सहा महिन्यानंतर आपण वरचं अन्न सुरू करतो तेव्हा बाळांना पाणी देखील देता येईल. मात्र ते अगदी बाटली भरून असं न देता गरजेनुसार वाटी चमच्याने द्यायचे. पाणी देताना काही चमचे अशा प्रमाणामध्ये द्यायला सुरुवात करायची आणि जसं बाळ वाढेल तसं पाण्याचे प्रमाण देखील वाढवत न्यायचे.( बाळाच्या सुसूचा रंग बाळाला अजून पाण्याची गरज आहे का हे आपल्याला दाखवण्यात मदत करेल.)
सहा महिन्याखालील बाळांची तहान भागवण्यासाठी देखील आईच्या दुधाचा वापर केला तर तहान तर भागेलच आणि बाळाला आवश्यक असणारे अन्नघटक देखील मिळतील.
बऱ्याचदा घरातील ज्येष्ठ मंडळी डॉक्टरांच्या या सल्ल्यावर ऑब्जेक्शन घेतात. कारण त्यांच्या वेळी हे असे काही नियम नव्हते. मात्र आपण हे लक्षात ठेवायला हवे की जसजशी नवी शास्त्रीय माहिती पुढे येते , त्यानुसार आरोग्यविषयक सल्ले देखील बदलत राहतात.
मी बाळ असताना माझ्या आईला असा सल्ला मिळाला होता की ‘दर दोन-तीन तासांनी एक बाटली दुधाची द्यायची आणि एक त्यानंतर परत दोन-तीन तासांनी एक बाटली पाण्याची द्यायची.’ पण जेव्हा मी माझ्या मुलीला स्तनपान देत होते त्यावेळी ‘पहिले सहा महिने निव्वळ आईचे दूध द्यायचे आणि स्तनपान दोन वर्षांसाठी सुरू ठेवायचे’ असा सल्ला मला मिळाला होता. आणि आता जेव्हा पुढची पिढी तरुण झाली आहे, त्या वेळेला लहान बाळांना पाणी देण्याच्या बाबत तसेच प्राणिज दूध देण्याच्या बाबतीत अधिक काटेकोर नियम सांगण्यात येत आहेत.
त्यामुळे याविषयी अधिक चिंता न करता आपण बाळाला योग्य रीतीने स्तनपान कसे देऊ शकतो हे समजून घेऊन त्यानुसार सहा महिन्यानंतर बाळाला पाणी देण्यास सुरुवात करूया.
मात्र लहान बाळांना जर जुलाबाचा त्रास झाला तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक असल्यास ORS देण्यास हरकत नसते. आणि त्याची गरज नसेल तर आईने स्तनपान देण्याचे प्रमाण वाढवायचे म्हणजे बाळांना निर्जलीकरण म्हणजे डीहायड्रेशन होत नाही.
डॉ प्रिया प्रभू, मिरज

Leave a Reply