बाळाच्या तोंडातील पांढऱ्या चट्ट्यांमुळे निपल्स दुखू शकतात

Written by:

आज वर्गामध्ये शिकवताना लहान बाळांच्या तोंडाची देखील तपासणी करायला हवी असे सांगितले आणि लगेच ठरवले की आज या विषयावर माहिती लिहायची. बऱ्याचदा पाजताना आईला निपल्स जवळ दुखते. कधी ते थोडे दुखते किंवा कधी असह्य दुखणे असते.

आणि असे दुखत असताना बाळाला परत दूध पाजताना पुन्हा ते बाळ निप्पल चोखणार आहे , दूध ओढणार आहे ह्या कल्पनेने देखील आईला दूध पाजण्याची भीती वाटते. 

आईच्या मनातील भीती स्तनातून दूध बाहेर काढणारा ‘इजेक्शन रिफ्लेक्स’ थांबवू शकते आणि बाळाला स्तनपान मध्ये अडचणी येऊ शकतात .

बऱ्याचदा जेव्हा निपल्स दुखतात त्यावेळेला आई बाळाची स्तनावरील पकड व्यवस्थित आहे का नाही याविषयी जास्त लक्ष देते. कधी तज्ञांचा सल्ला घेते. पण सर्व उपाय केले तरीही कधी कधी निप्पलचे दुखणे कमी होत नाही. कारण या त्रासाचे कारण आईकडे नसतेच मुळी !

बऱ्याचदा लहान बाळांच्या तोंडामध्ये कँडिडा या पांढऱ्या बुरशीचा संसर्ग होतो ज्याला कॅन्डीडीयसिस असे म्हणतात. बाळाच्या तोंडातील ही बुरशी स्तनपान करताना आईच्या निपल्स पर्यंत देखील पोहोचते आणि निप्पलला संसर्ग झाल्यामुळे निपलला एखादी बारीक चीर पडते व असे निपल्स हे भयानक दुखू लागतात.

बाळाला तोंडामध्ये बुरशीचा संसर्ग झालाय का हे कसे ओळखायचे ?

बाळ रडत असेल किंवा आपण बाळाचे तोंड उघडून जर बघितले तर बाळाच्या जिभेवर, गालांवर आतल्या बाजूला, ओठांजवळ, मागे घशाजवळ अशा सर्व ठिकाणी दह्यासारखा पांढरा थर किंवा पांढरे ठिपके दिसतात. एखादे मऊ स्वच्छ कापड घेऊन किंवा बोटाने ते काढण्याचा किंवा पुसण्याचा प्रयत्न केला तर ते निघत नाहीत. त्याच्या आजूबाजूची जागा थोडी लालसर दिसू शकते. जेव्हा बाळाला संसर्ग होतो तेव्हा बाळ स्तनपान करणे थोडे टाळू शकते.

Oral candidiasis (from NHS site)

हा संसर्ग जेव्हा निप्पलना होतो तेव्हा सहसा दोन्ही निप्पल दुखू लागतात. जर तुम्हाला आधी पाजताना दुखत नसेल आणि अचानक दुखू लागले असेल तर अशा वेळेला हे कारण आहे का हे नक्की तपासा. हे दुखणे स्तनपान देऊन संपल्यानंतर देखील काही काळ चालू राहू शकते.

निप्पल किंवा स्तनांमध्ये दुखण्याची याखेरीज इतरही कारणे असतात . मात्र हे कारण आहे का नाही हे तपासणे अतिशय सोपे आहे.  बाळ रडत असताना किंवा बाळाचे तोंड उघडून आपण बघितले तर बाळाला झालेला बुरशीचा संसर्ग लगेच लक्षात येतो. जर असा संसर्ग झालाय असं तुम्हाला दिसून आलं तर वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्या. त्यानुसार ते सांगतील ते औषध किंवा क्रीम लावा. ही औषधे बाळाच्या तोंडामध्ये लावण्यासाठी तसेच निपलवर लावण्यासाठी सुरक्षित असतात. पाजण्यापूर्वी निप्पल पुसून बाळाला पाजता येते. औषध लावायला सुरू केल्यानंतर साधारण दोन-तीन दिवसांमध्ये हा त्रास कमी होऊ शकतो.

जर खूप जास्त संसर्ग असेल तर कधीकधी आईला तोंडावाटे बुरशी विरोधी औषधे दिली जातात. बाळ किंवा आईने एखादा अँटिबायोटिकचा कोर्स घेतला असेल तर त्यानंतर असा संसर्ग जाणवू शकतो. कधीकधी आईला इतर कारणाने स्तनाग्रावर म्हणजे निपलवर चिरा पडल्या असतील तर त्यामध्ये बुरशी संसर्गाची सुरुवात होऊन नंतर संसर्ग बाळापर्यंत पोहोचू शकतो. या कारणाने आईने नेहमी स्वच्छ कपडे ब्रा वापरावी. तसेच स्तनांना हाताळण्यापूर्वी हात धुऊन घ्यावेत. स्तनांना वारंवार साबण व पाण्याने धुणे टाळावे. दिवसातून एकदा आंघोळ केली तरी बास होते.

नेहमी लक्षात ठेवा! स्तनपान देताना दुखणे हे कधीही नॉर्मल नसते. जर स्तनपान देताना दुखत असेल तर त्याचे कारण शोधणे आवश्यक आहे. ते कारण दूर करणे आवश्यक आहे.

कारण स्तनपान ही आनंददायी कृती असायला हवी!  त्याचा तणावपूर्ण किंवा वेदनादायी अनुभव कधीही असू नये!

– डॉ प्रिया प्रभू , मिरज


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.