बाळाचे बाबा आणि स्तनपान

स्तनपान म्हटले की डोळ्यासमोर आई आणि बाळ येते आणि या पोस्टमध्ये बाळाच्या बाबांचा उल्लेख का केलाय?

बाळाचे बाबा प्रत्यक्ष स्तनपानाचे कार्य करत नसले तरी स्तनपान यशस्वी होण्यासाठी बाळाचे बाबा खूप महत्त्वाची कामगिरी बजावू शकतात.

तुम्ही बाळाचे बाबा असाल आणि आपल्या बाळाला जास्तीत जास्त कालावधीसाठी स्तनपान मिळावे असे तुम्हाला वाटत असेल तर याबाबत तुम्ही कोणकोणत्या प्रकारे मदत करू शकता ही माहिती आज आपण घेऊया.

ज्यांना मोठ्या पोस्ट वाचायच्या नाहीत त्यांच्यासाठी थोडक्यात माहिती आधी सांगते.

बाळाला स्तनपान देणे हे एक खूप मोठे काम असते आणि याची जाणीव जेव्हा आईच्या कुटुंबीयांना आणि विशेषतः तिच्या पार्टनरला असते तेव्हा तिला होणाऱ्या कष्टांचा त्रास कमी होतो.

वरील फोटोमध्ये सांगितल्यानुसार आईला तिच्या स्तनपान करण्याच्या प्रयत्नांबाबत धन्यवाद देणे , तसेच ती स्तनपान देताना आरामशीर असेल याची काळजी घेणे आणि तुम्हाला तिचा अभिमान आहे हे तिला सांगणे हे एवढे काम तरी प्रत्येक बाबा नक्कीच करू शकतात .त्याचबरोबर बाळाची काळजी घेण्यासाठी शक्य त्या सर्व बाबींमध्ये मदत करणे हेही बाबा करू शकतात.  हे केवळ एकदा करायचे नाही तर संपूर्ण स्तनपानाच्या प्रवासामध्ये करायचे आहे.  ही एवढी छोटीशी गोष्ट जरी सर्व बाबांनी लक्षात ठेवली तरी स्तनपान देणाऱ्या आया नक्कीच खुश होतील.

आता ज्या बाबांना याहून अधिक काही करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही पुढील माहिती.

स्तनपानाच्या प्रवासात बाळाच्या जन्मापूर्वीपासून बाबांची सोबत महत्त्वाची ठरू शकते आणि त्यासाठी या फोटोमध्ये सांगितलेल्या विविध मार्गांनी बाबा मदत करू शकतात. तुम्ही या सर्व बाबी अंगिकारू  शकता किंवा यातील जमतील तेवढ्याच गोष्टी करू शकता.  तुमचा सहभाग आईला खूप आनंद देणारा असणार आहे हे नक्की.

१. स्तनपानाविषयी संपूर्ण माहिती घ्या

स्तनपान हे एक कौशल्य आहे आणि हे आईला आणि बाळाला शिकावे लागते. अशावेळी आईसोबत तुम्ही देखील स्तनपानाबाबत संपूर्ण माहिती घेतली तर आईला हे कौशल्य शिकताना अडचणी सोडवणे सोपे जाईल. त्याचप्रमाणे स्तनातून दूध काढणे , पंप वापरणे,  पंप स्वच्छ करणे, पंप निर्जंतुक करणे, काढलेले दूध साठवणे अशा स्तनपानसंबंधी इतर कृतींबाबतही माहिती घेऊ शकता.  म्हणजे जर वेळ आली तर ही कामे तुम्ही करून आईला थोडीशी विश्रांती मिळू शकते.

२. इतरांच्या नकारात्मक सल्ल्याविरुद्ध आईला आधार द्या

स्तनपानाच्या प्रवासामध्ये आईला विविध टप्प्यावर विविध लोकांकडून बऱ्याच नकारात्मक टिप्पणीला व टीकेला तसेच सल्ल्याला सामोरे जावे लागते आणि यामुळे तिचा आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो. तिचा आत्मविश्वास कमी होऊ नये यासाठी जेव्हा असे नकारात्मक सल्ले मिळतील त्यावेळेला आईला तुमचा सपोर्ट मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे तिच्यासाठी तुम्ही चीअर लीडर होऊ शकता.

३. बाळाच्या इतर कामांची जबाबदारी घ्या

बाळाला हाताळण्याबाबत भीती न बाळगता स्तनपानाव्यतिरिक्त बाळाची काळजी तुम्ही घेऊ शकता म्हणजे आईला अधिक विश्रांती मिळू शकेल . जसे बाळाचे डायपर बदलणे,  स्तनपान नंतर बाळाची ढेकर काढणे,  बाळाला झोपवणे , रात्री रडणाऱ्या बाळाला सांभाळणे,  बाळाला त्रास होत असल्यास बाळाला ‘टमी टाईम’ देणे इ.

४. आई विश्रांती घेत असताना बाळाला सांभाळा

आई विश्रांती घेत असेल तेव्हा बाळाला खेळवणे, गरज असल्यास बाळाला ‘अनावृत्त स्पर्श’ म्हणजे ‘स्किन टू स्किन’ देणे , बाळाला बाहेर फिरवून आणणे इ . अशा प्रकारची कामे करता येतात. आई पंप करत असेल तर काढलेले दूध बाळाला देण्याची जबाबदारी तुम्ही घेऊ शकता.

५. आई बाळाला पाजत असताना तिला आवश्यक ते सहकार्य करा

आई बाळाला पाजत असताना तिला विविध गोष्टींची गरज लागू शकते.  जसे तिला तहान लागल्यास पाणी,  भूक लागल्यास काहीतरी खाण्यास देणे.  बाळाला व्यवस्थित धरता यावे यासाठी उश्या देणे, तिच्या पाठीला उशांचा आधार देणे , तिला मोबाईल किंवा टीव्हीचा रिमोट जवळ हवा असेल तर तो देणे इ . जेणेकरून आई विना अडथळा बाळाला पाजू शकेल.

६. स्तनपानासाठी पोषक वातावरण निर्मिती करून स्तनपान संरक्षक व्हा

स्तनपान योग्य रीतीने व्हावे यासाठी कुटुंबातील इतरांचे सहकार्य मिळवणे , सुरुवातीच्या काळात भेटण्यासाठी खूप सारे पाहुणे येणार नाहीत याची काळजी घेणे किंवा घराबाहेर असताना बाळ रडत असेल आणि आईला पाजायचे असेल तर त्याबाबत आवश्यक सहकार्य करणे अशा बाबी करून तुम्ही स्तनपान संरक्षक होऊ शकता.

७. स्तनपानामध्ये जाणवणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घ्या.

स्तनपानाचा प्रवास हा खूप मोठा असतो आणि त्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या अडचणी जाणवू शकतात.  अशावेळी या अडचणी सोडवण्याबाबत अधिक माहिती मिळवणे व आवश्यकता असल्यास स्तनपान तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवणे या बाबी तुम्ही करू शकता.

८. आईच्या मानसिक तणावासाठी आउटलेट बना

बाळाच्या जन्मानंतर आई खूप साऱ्या तणावामध्ये असल्यामुळे बऱ्याचदा ती भावनिक दृष्ट्या नाजूक झालेली असते . कधी कधी तिची चिडचिड वगैरे होत असेल किंवा तिला काही अडचणी असतील तर याबाबत तिला तुमच्याशी बोलता येईल अशा संधी निर्माण करा व तुम्ही तिला समजून घ्या.

९. घरातील इतर कामांची जबाबदारी घ्या.

घरातील इतर कामे करण्यामध्ये तुमचा वाटा असू दे.  तसेच आई वेळेवर व व्यवस्थित खात आहे व पुरेसे पाणी पीत आहे यावरही लक्ष असू द्या.

१०. इतर बाबांशी नेटवर्किंग करा

स्तनपान विषयी माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी, शंका विचारण्यासाठी किंवा सपोर्ट मिळवण्यासाठी तुमच्यासारख्याच इतर बाबांसोबत नेटवर्किंग करा. बाळाचा बाबा होणे ही एक मोठी जबाबदारी आहे. मिळेल तेवढी मदत कमीच वाटत असते.

याखेरीस अजून काही मार्ग तुम्हाला माहित आहेत का? माहित असतील तर कमेंट मध्ये अवश्य सांगा म्हणजे इतर बाबांना याचा फायदा होईल. 

तुमच्या घरी छोटासा पाहुणा येणार असेल किंवा आला असेल तर तुम्हाला “स्तनपान संरक्षक बाबा” होण्यासाठी शुभेच्छा!

– डॉ प्रिया प्रभू, मिरज


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com