तुमचे बाळ पण आहे ‘बाहुबली’

Published on

in

,

बघितलाय ना हा व्हिडीओ (रिल) सर्वांनी , ज्यामध्ये एक नवजात बाळ दवाखान्यातील ट्रे दोन्ही हातात घट्ट पकडून उचलून धरते.

तुम्हाला वाटेल किती शक्तिमान आहे हे बाळ! पण तुमचे बाळ देखील एवढेच शक्तिमान आहे , हे पटेल का तुम्हाला?

नुकतेच जन्मलेले बाळ एव्हढेसे आणि नाजूक दिसते पण प्रत्येक बाळ जन्मताना काही क्षमता घेऊन जन्मते. बाळाचा मेंदू अजून पूर्ण विकसित झालेला नसतो आणि मेंदूचे नियंत्रण देखील सुरू झालेले नसते. मात्र या जगात आल्यानंतर जगण्यासाठी व सुरक्षित राहण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या क्षमता मात्र प्रत्येक बाळाकडे असतात. यातील काही क्षमता बघितल्या की पटते की माणूस माकडापासून उत्क्रांत झाला आहे! जाणून घ्यायचीय का ही माहिती?

या क्षमतांना नवजात प्रतिक्षिप्त क्रिया किंवा neonatal reflexes किंवा primitive reflexes असे म्हणतात. प्रतिक्षिप्त क्रिया कोणत्याही विचाराशिवाय, हेतू शिवाय, इच्छेशिवाय घडणाऱ्या क्रिया असतात म्हणजेच या क्रियांमध्ये मेंदू सहभागी नसतो.

यातील काही क्षमता 22 ते 32 आठवडे वयाच्या गर्भामध्येही जन्मापूर्वीच दिसून येतात . या सर्व प्रतिक्षिप्त क्रिया जन्मानंतर ४ महिने ते १ वर्ष वयापर्यंत नाहीश्या होतात!

म्हणजेच जन्मताना प्रत्येक बाळ अगदीच असहाय्य नसते तर! अश्या बऱ्याच गोष्टी बाळ करू शकते! यातील काही प्रमुख प्रतिक्षिप्त क्रियांची माहिती आज घेऊया! शेवटी काही लिंक व व्हिडीओ देईन त्यामध्ये प्रत्यक्ष बघू शकता हे रिफ्लेक्सेस कसे असतात ते!

वरच्या फोटोतील बाळ palmar grasp reflex मुळे ऑटोमॅटिकली तो ट्रे उचलत आहे!

बाळांमध्ये २ प्रकारचे grasp reflex असतात म्हणजे बाळ “धरण्याची” क्रिया जन्मजात करू शकते. १. हाताने धरणे आणि २. पायाने धरणे (माकडासारखे) . हाताला काही स्पर्श झाला की धरलेच घट्ट ! आणि गम्मत म्हणजे जेवढे ओढले जाईल तेवढी अधिक घट्ट मूठ वळते! आईचे केस किंवा बाळाचे स्वतःचे केस ओढण्याचे प्रकार त्यातून घडतात! तसेच पायाच्या बोटांच्या खाली कशाचा स्पर्श झाल्यास पायांची बोटे वळवून धरण्याची ऍक्शन होते. या दोन्ही क्रिया म्हणजे जणू झाडाची फांदी किंवा आईलाच घट्ट धरायचे आहे . ही जीव रक्षक क्रिया आहे ! मूठ एवढी घट्ट वळते की बाळाचे वजनही त्यावर तोलून धरते!

त्यानंतर steping reflex (पाय उचलणे) , crawling reflex (पुढे सरपटणे) आणि swimming reflex (पाण्यात तरंगणे) आहेत जे बाळाला टिकून राहण्यासाठी व सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करतात! बाळाला उभे धरले की बाळ जणू पाय उचलून चालण्याची क्रिया करते ! किंवा नवजात बाळाला पोटावर झोपवले व पायाला थोडा आधार दिला की ते पाय ढकलून पुढे सरकते! तसेच पाण्यामध्ये पालथे ठेवल्यास पोहण्याप्रमाणे कृती करू शकते!

लक्षात घ्या, मेंदूने ही कौशल्ये शिकायला अजून भरपूर वेळ आहे . पण नवजात बाळ नकळत प्रतिक्षिप्त क्रियेने या सर्व गोष्टी करू शकते ! भविष्यातील कौशल्ये शिकण्याची ही तयारी!

याखेरीज moro’s reflex मुळे बाळ दचकून रडू शकते . अचानक आवाज आला किंवा बाळ खाली ठेवताना बाळाचे डोके जास्त खाली झाले की बाळ दचकून हात लांब पसरवून नंतर जवळ घेते व रडू लागते. एखाद्या धोक्याबाबत आईला लगेच सूचित करण्यासाठी बहुदा हे कामी येते ! Tonic neck reflex मुळे बाळाचे डोके ज्या बाजूला वळवले जाईल त्या बाजूचे हात व पाय ताठ लांबवले जातात व दुसऱ्या बाजूने हात व पाय दुमडून अंगासरशी येतात!

याखेरीज Rooting reflex, Sucking reflex आणि swallowing reflex देखील असतात. पहिल्या रिफ्लेक्समुळे बाळ ओठाला स्पर्श झाल्यास तोंड वळवून मोठा आ करते , दुसऱ्यामुळे तोंडात टाळूला काही स्पर्श झाल्यास चोखणे सुरू करते आणि तिसऱ्या रिफ्लेक्समुळे तोंडात घश्याला काही स्पर्श झाल्यास गिळण्याची क्रिया करते! अपुऱ्या दिवसाच्या बाळांमध्ये ३२ आठवड्याआधी sucking reflex नसल्याने दूध पाजण्यास अडचण निर्माण होते. या तीन प्रतिक्षिप्त क्रिया बाळाला स्तनपान करण्यासाठी सुरुवातीचे काही महिने सहाय्य करतात!

या आणि अश्या अजून कितीतरी लहानमोठ्या क्षमता घेऊन आपण जन्मतो. काही जन्मजात प्रतिक्षिप्त क्रिया कधी बंद होत नाहीत जसे जिभेचा मागील भाग किंवा घश्याला स्पर्श झाल्यास ओकारी येणे किंवा शिंकताना डोळे बंद होणे !

बरेचश्या प्रतिक्षिप्त क्रिया बाळ वाढेल व मेंदूचा कंट्रोल वाढेल तश्या बंद होत जातात! जर १ वर्षांनंतर देखील या क्रिया बंद झाल्या नसतील तर बाळाची व्यवस्थित तपासणी व्हायला हवी! तसेच मेंदूचे काही आजार किंवा इजा झाली असल्यास काही primitive reflex पुन्हा दिसू लागतात जसे Babinaski’s sign !

आपल्या नाजूक नवजात बाळाला कमजोर समजण्याची चूक करू नका! बाळाचे पोट भरावे व बाळ सुरक्षित रहावे याची पूर्ण तयारी करून या जगात येते! पण आता आपण झाडावर रहात नाही आणि आपण कपडे घालू लागलोय हे मात्र बाळाला माहीत नसते आणि सगळा घोळ सुरू होतो!

या रिफ्लेक्सेस चा स्तनपानाशी काय संबंध हे जाणून घ्यायचंय का? कमेंट मध्ये नक्की सांगा !

अधिक माहिती साठी लिंक

https://flo.health/being-a-mom/your-baby/baby-health-and-safety/newborn-reflexes

आणि या व्हिडीओ मध्ये काही प्रतिक्षिप्त क्रियांची माहिती आहे , लिंक

youtube placeholder image

बाहुबली बाळाच्या स्तनपान प्रवासाबद्दल जाणून घेणेही रोमांचकारी आहे! नव्या आई बाबांना व नव्या आज्जी आजोबांना ब्लॉग चा पत्ता दिला ना ?

*डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे)

(जयांनी ब्लॉग लाईक केलाय त्यांना ही व पुढील पोस्ट मेल मध्ये पोचेल)


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

2 responses to “तुमचे बाळ पण आहे ‘बाहुबली’”

  1. […] बाहुबली बाळाच्या पोस्टमध्ये ‘आपलं बाळ कसं जन्मतः हुशार आहे’ […]

  2. […] “बाहुबली” बाळाची पोस्ट तुम्ही वाचली असेल तर तुम्हालाही […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com