मला नेहमी हा प्रश्न पडायचा ! एवढा हुशार माणूस पण माणसाचे बाळ मात्र बिलकुल हुशार नसते का?
प्रत्येक सस्तन प्राण्याचे बाळ जन्मतः आपल्या आईच्या स्तनांना लुचते पण माणसाचे बाळ का असे नाही करू शकत? माकड सोडून इतर प्राण्यांना तर हात देखील नसतात पिल्लांना पकडायला! तरी त्या पिल्लांना जमते स्तनपान !
तुम्हाला पडला का हा प्रश्न कधी?
स्तनपानाचे जग हे इतके विशाल आणि अद्भुत आहे कि त्यातील कितीतरी माहिती आपल्याला अविश्वसनीय वाटते! मेडीकलच्या विद्यार्थ्यांना हा विषय तपशीलवार शिकवायला मी सुरु केला तेव्हा अधिक माहिती मिळत गेली आणि या प्रश्नाचे उत्तर देखील मिळाले!
माझी “बाहुबली” बाळाची पोस्ट तुम्ही वाचली असेल तर तुम्हालाही उत्तर समजले असेल! माणसाचे बाळ देखील जन्मतः स्तनपान सुरु करण्यासाठी आवश्यक त्या सर्व क्षमता घेऊन जन्मते ! बाळाला फक्त आपले सहाय्य हवे असते थोडेसे! या क्षमता प्रतिक्षिप्त क्रिया असल्याने योग्य ते संकेत देण्याचे काम आपले ! मग बाकीचे बाळ बघून घेते !

स्तनपानासाठी जशी बाळाची तयारी झालेली असते तशीच आईच्या स्तनांची देखील झालेली असते हे मी लिपस्टिक सारखी स्तनाग्रे च्या पोस्ट मध्ये सांगितले होते, लक्षात आहे न? गरोदरपणामध्ये स्तनाग्राभोवतीचा काळा भाग ( areola) अधिक गडद होतो, त्याचा आकार वाढतो. याने बाळाला स्तन कुठे आहेत हे समजते. तसेच त्यावरील उंचवटे म्हणजे मोंटगोमेरीच्या ग्रंथी असतात ज्या तैलीय स्त्राव तिथे तयार करतात . यामुळे स्तनाग्रे मऊ रहातात. गम्मत म्हणजे त्या स्त्रावाचा गंध गर्भाशयातील पाण्याप्रमाणे ( amniotic fluid) प्रमाणे असतो. आणि बाळाला ९ महिने तो एकच गंध तर सवयीचा असतो ना! म्हणजे बाळाला स्तनापर्यंत आणायची तयारी पूर्णपणे झालेली असते !
स्तनपान सुरु करण्याच्या पद्धतीला breast crawl म्हणतात. नुकतेच जन्मलेले बाळ पूर्णपणे जागृत असल्याने त्यावेळी स्तनपान करण्यास इच्छुक असते. जन्माच्या वेळी आईच्या योनीतून बाहेर येण्याने भुकेले देखील असते. गुंतागुंत नसलेल्या जन्मानंतर बाळाला सुरक्षित पणे आईच्या उघड्या पोटावर छातीजवळ पालथे झोपवले कि बाळाचा crawling reflex सुरु होतो आणि बाळ पायाने जोर देत पुढे सरकू लागते. हे वार बाहेर येण्या अगोदर देखील करता येते. आईच्या पोटावर बाळाच्या लाथा लागल्याने शिथिल पडलेले आईचे गर्भाशय पुन्हा आकुंचन पावू लागते व त्यामुळे वार लवकर पडते, रक्तस्त्राव देखील कमी होतो. बाळ आईच्या उघड्या अंगावर असल्याने बाळाच्या शरीराचे तापमान कमी होत नाही, आईची अंगाची उष्णता बाळाला मिळते. आईच्या अंगावरील आरोग्यदायी मित्र-जीवाणू बाळाच्या शरीरावर पोचतात. बाळाच्या हृदयाचे ठोके नियमित होऊ लागतात.
बाळ थांबत थांबत पुढे जात असल्याने बाळाचे स्तनपान सुरु होईपर्यंत अर्धा ते एक तास एवढा वेळ लागू शकतो. अश्या वेळी आईजवळ कोणी प्रसूती सखी असल्यास बाळ सुरक्षित पणे आईच्या पोटावर राहील एवढीच काळजी घ्यावी लागते.
बाळाला पालथे झोपवले असले तरी बाळ मान वळवून किंवा मान उंचावून ( होय, उंचावून) श्वास घेते तसेच आईचे स्तन दिसतील त्या दिशेने पुढे जाते. स्तनांना तैलीय स्त्रावामुळे येणारा गंध बाळाला दिशा दाखवू शकतो . कारण नवजात बाळाला जास्त दिसत नसले तरी वास घेण्याची क्षमता विकसित असते. आणि स्तनाजवळ पोचल्यावर rooting reflex सुरु होतो व बाळ स्तन शोधून काढते. मान उंचावून बाळ स्तनाची अगदी परफेक्ट अशी “असमान पकड” ( Asymmetrical Latch) घेते आणि sucking reflex मुळे स्तनपान व्यवस्थित सुरु होते. (यांची माहिती बाहुबली च्या पोस्ट मध्ये दिलीये) स्तनपान सुरु झाले कि आईच्या शरीरातील oxytocin स्त्राव वाढतो आणि गर्भाशय आकुंचन पावायला मदत होते.
अश्या रीतीने बाळाला जन्मदत्त मिळालेल्या क्षमतांचा आपण योग्य वापर केला तर आईचे स्तनपान सुरु करण्याचे टेन्शन कमी होईल! बाळ स्तन चोखू लागले कि बाळाला चिक दुध मिळेल, आणि आईचे दुध येण्याची प्रक्रिया देखील सुरु होईल. अपुऱ्या दिवसांच्या सर्व बाळांमध्ये ही क्रिया करता येणार नाही. बाळाचा जन्म जर सीझर द्वारे झाला तरी पोटाला लाथा बसणार नाही अश्या रीतीने modified breast crawl वापरून ऑपरेशन थिएटर मध्येच स्तनपान सुरु करता येऊ शकते असे युनिसेफ च्या संकेतस्थळावर सांगितले आहे! तसेच ज्या बाळांना breast crawl जमतो, त्यांच्यामध्ये स्तनपान यशस्वीपणे घडू शकते असे काही अभ्यासामध्ये दिसून आले आहे.
आहे न स्तनपानाचे विश्व अद्भुत? तरी अजून आईच्या दुधाविषयी माहिती सांगितलीच नाहीये! सांगेन लवकरच ! (ब्लॉग लाईक केल्यास कोणतीही नवी पोस्ट मिस होणार नाही)
ब्रेस्ट क्रॉल बाबत अधिक माहिती पुढील देणाऱ्या लिंक्स बघा. पहिली लिंक BPNI या भारतीय संस्थेची आहे जी स्तनपानविषयक राष्ट्रीय संस्था आहे . दुसरी लिंक एका पाश्चात्य साईटची ज्यामध्ये breast crawl च्या मूळ अभ्यासाच्या लिंक्स पण दिल्या आहेत. तिसऱ्या लिंक मध्ये हे कसे करता येईल हे सांगितले आहे!
https://babygooroo.com/articles/what-is-breast-crawl
https://milkology.org/content/breast-crawl-newborn
तुम्हाला ब्रेस्ट क्रॉल बघायचाय का ? युनिसेफ साठी आपल्या महाराष्ट्रामध्ये २००७ मध्ये हा व्हिडीओ BPNI ने बनवला होता !
वरचा मोठा व्हिडीओ बघायला वेळ नसेल तर हा माझ्या YT channel वरील एक छोटासा व्हिडीओ आहे – (या माझ्या channel वर मी स्तनपानासाठी उपयुक्त असे अजून व्हिडीओ देखील पोस्ट करत राहीन ! लक्ष असू दे )
तुम्ही गर्भवती असाल आणि काही गुंतागुंत नसेल तर अश्या वेळी बाळाच्या जन्मानंतर breast crawl करण्यासाठी प्रयत्न अवश्य करता येईल. आपल्या डॉक्टरांशी याविषयी अवश्य चर्चा करा ! अन्यथा नवजात बाळाला पाजताना skin to skin चा वापर करून बाळाला स्वतः स्तनपानासाठी प्रोत्साहित नक्कीच करू शकता ! फक्त laid back पोझिशन वापरावी लागेल ( यासाठी feeding पोझिशन बाबत ची पोस्ट लिहीन ती वाचावी लागेल! 🙂 )
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) drprdeshpande2@gmail.com

Leave a Reply