निकोटीनचे व्यसन सोडणे कठीण असते, पण अशक्य नाही.
एका विद्यार्थ्याने निकोटीनच्या विळख्यातून स्वतःला कसे मुक्त केले, त्याच्या संघर्षाची आणि यशाची ही खरी गोष्ट. जर तुम्ही तंबाखू किंवा निकोटीन सोडण्याचा विचार करत असाल, तर हा अनुभव तुम्हाला नक्की प्रेरणा देईल.
===================
आज माझी गोष्ट नाही. एका विद्यार्थ्याची गोष्ट आहे. त्याने मला सांगितली, मी तुम्हाला सांगेन.
ही गोष्ट शेअर करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट.
निकोटीन गम, पाउच, सिगारेट, व्हेप किंवा इतर कोणत्याही स्वरूपातील निकोटीन हे “फोकस वाढवणारे जादूचे साधन” नाही. मात्र याविषयीच्या गैरसमजातून अनेक विद्यार्थी अभ्यासाचा ताण, झोप, एकाग्रता किंवा मित्रांच्या प्रभावामुळे अशा गोष्टी वापरून पाहतात. सुरुवातीला काही फायदे जाणवल्यासारखे वाटू शकतात; पण नकळत त्याची सवय लागते आणि मग शरीर त्यावर अवलंबून राहू लागते. *प्रत्येक तंबाखू उत्पन्न व्यसन लावते आणि आरोग्याला विविध प्रकारे हानी पोचवते*. याविषयी आपल्या मुलांशी अवश्य बोला.
खालील अनुभव एका विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे सांगितला आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. काहींना निकोटीन सोडताना चिडचिड, अस्वस्थता, तीव्र ओढ, झोपेतील बदल किंवा इतर त्रास होऊ शकतात. त्यामुळे *गरज वाटल्यास डॉक्टर किंवा तंबाखू-विरोधी समुपदेशनाची मदत घेणे* योग्य ठरते.
—
*(विद्यार्थ्याचा अनुभव)*
निकोटीन सोडण्याची माझी गोष्ट ऐकून लोकांना वाटतं की मी एखादा मोठा निर्धार केला असेल, कॅलेंडरवर तारीख मार्क केली असेल, प्रेरणादायी व्हिडिओ पाहिले असतील, किंवा “आजपासून निकोटीन बंद!” अशी शपथ घेतली असेल.
पण खरं कारण खूपच साधं आहे.
मेडिकलवाल्या ताईंकडे निकोटिन गमचा स्टॉक संपला होता.
२०२३ मध्ये मी निकोटिन गम सुरू केलं. डॉक्टर असल्यामुळे निकोटीनचे फायदे आणि तोटे दोन्ही माहिती होते. क्लासमध्ये आणि लायब्ररीत मला सतत झोप यायची. त्याच वेळी माझे काही मित्र क्लासच्या आधी सिगारेट ओढून यायचे आणि मग पूर्ण लेक्चरभर एकदम जागे, सतर्क आणि लक्ष देऊन बसलेले दिसायचे. त्यांना पाहून माझ्या मनात प्रश्न पडला की निकोटीनचा हा परिणाम खरोखरच इतका जाणवतो का?
सिगारेट ओढण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे मी विचार केला, “निकोटीनचा परिणाम पाहायचाच असेल तर निकोटिन गम हा पर्याय वापरून बघूया.”
आणि तिथून माझी निकोटिन गम सोबतची ओळख सुरू झाली.
सुरुवातीला खरंच फरक जाणवला. झोप कमी यायची, फोकस वाढायचा आणि अभ्यास करताना डोकं जरा जास्त चालतंय असं वाटायचं.
सुरुवातीला २-४ मिग्रॅ. मग हळूहळू डोस वाढत गेला. वाढ इतकी हळूहळू झाली की ती वाढतेय हेही जाणवलं नाही. अभ्यासासाठी घेतलेलं निकोटिन नकळत रोजच्या आयुष्याचा भाग बनलं. राग आला, टेन्शन आलं, मूड खराब झाला की घे लगेच निकोटिन गम . काही विशेष कारण नसतानाही सहज म्हणूनही निकोटिन गम. बघता बघता दिवसाला १८-२० मिग्रॅ आणि काही दिवशी तब्बल २४ मिग्रॅपर्यंत मजल गेली. गंमत म्हणजे त्या वेळी हे काही विशेष वाटत नव्हतं. उलट मला वाटायचं की सगळं नियंत्रणात आहे. प्रत्येकाला असंच वाटतं ना की ” मी पूर्ण कंट्रोल मध्ये आहे, मला सवय लागली नाहीये”.
आणि या सगळ्यात मेडिकलवाल्या ताई माझ्या निकोटीन प्रवासातील महत्त्वाचं पात्र होत्या. कारण त्या मला नेहमी २० रुपये डिस्काउंट द्यायच्या. त्यामुळे मला एक वेगळाच आनंद असायचा — निकोटीनही मिळत होतं आणि बचतही होत होती!
एक दिवस मी नेहमीप्रमाणे दुकानात गेलो.
“ताई, निकोटिन गम द्या.”
ताई म्हणाल्या, “संपलंय.”
मी म्हटलं, “ठीक आहे, उद्या येतो.”
उद्या गेलो. नाही.
परवा गेलो. नाही.
तिसऱ्या दिवशी अचानक विचार आला, “अरे, तीन दिवस झाले की!”
आणि मग मनाशी म्हटलं, “चला, अजून तीन दिवस बघू.”
*असं करत करत तीन दिवसांचे छोटे-छोटे टप्पे वाढत गेले. आणि कधी दोन महिने झाले ते कळलंच नाही*.
गमतीची गोष्ट म्हणजे मला काही फार मोठे विथड्रॉवल झाले नाहीत. थोडी जास्त झोप यायची. सुरुवातीला थोडं बद्धकोष्ठतेसारखं वाटलं, पण गरम पाणी प्यायल्यावर ठीक व्हायचं. उलट झोप चांगली लागू लागली, रात्री कमी जाग यायला लागली, ऍसिडिटी कमी झाली आणि अधूनमधून छातीत होणारी धडधडही बरीच कमी झाली.
पण सगळ्यात मोठा बदल शरीरात नाही, तर विचारांमध्ये झाला.
निकोटिन गम घेत असताना मला नेहमी वाटायचं की “सगळं ठीक चाललंय. अभ्यास ठीक, काम ठीक, आयुष्य ठीक.”
निकोटीन सोडल्यानंतर पहिल्यांदाच मी स्वतःकडे थोडं प्रामाणिकपणे पाहिलं.
माझे मित्र अभ्यासात पुढे गेले होते. त्यांचं थीसिसचं काम पुढे सरकलं होतं. डेटा कलेक्शन होत होतं. आणि मी? मी स्वतःला खूप प्रॉडक्टिव्ह समजत होतो, पण प्रत्यक्षात तितकी प्रगती करत नव्हतो. कदाचित निकोटीनने मला फोकस दिला असेल, पण त्याचबरोबर “सगळं छान चाललंय” असं वाटण्याचीही सवय लावली होती.
आजही मला वाटतं त्या निकोटिन गमने मला सुरुवातीला थोडी मदत केली होती. त्यामुळे मला त्याबद्दल पश्चात्ताप नाही. पण जर एखाद्या विद्यार्थ्याने मला विचारलं की “फोकस वाढवण्यासाठी असे काही सुरू करू का?”, तर माझं उत्तर नक्कीच “नाही” असेल.
आज मी अभ्यास, थीसिस आणि बाकीची कामं हळूहळू पण सातत्याने करतो आहे. फार वेगाने नाही, पण खरंच करतो आहे.
आणि म्हणून आजही निकोटिन गमची आठवण आली की मला सर्वात आधी मेडिकलवाल्या ताई आठवतात.
कारण माझ्या आयुष्यातला सर्वात यशस्वी डी-ॲडिक्शन प्रोग्राम हा कोणत्याही डॉक्टरने, पुस्तकाने किंवा मोटिवेशनल स्पीकरने नाही…
तर २० रुपये डिस्काउंट देणाऱ्या मेडिकलवाल्या ताईंनी आणि त्यांच्या दुकानात निकोटिन गमचा स्टॉक संपल्याने केला होता!
—
आहे की नाही भन्नाट अनुभव? कधी कधी व्यसन सोडणे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
आरोग्यतज्ज्ञ म्हणून मला या अनुभवातून काही महत्त्वाच्या गोष्टी दिसतात.
पहिली गोष्ट म्हणजे *व्यसन नेहमी “वाईट सवय” म्हणूनच सुरू होत नाही*. कधी ते चांगले गुण मिळवण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी, जागे राहण्यासाठी किंवा फक्त उत्सुकतेपोटी सुरू होते. पण हळूहळू आपल्याला वाटू लागते की हे पदार्थ आपल्याला मदत करत आहेत, आणि तेव्हाच त्यांच्याशिवाय राहणे कठीण होत जाते.
दुसरी गोष्ट म्हणजे *तंबाखू किंवा निकोटीन सोडण्यासाठी नेहमी एखाद्या मोठ्या प्रेरणादायी क्षणाची गरज नसते*. या विद्यार्थ्याच्या बाबतीत जसा “स्टॉक संपला” हा योगायोग कारण ठरला, तसंच अनेकदा छोटे निर्णय मोठे बदल घडवतात. एक दिवस, मग तीन दिवस, मग एक आठवडा – व्यसनमुक्तीचा प्रवास अनेकदा अशाच छोट्या टप्प्यांतून पुढे जातो.
जर तुम्ही निकोटीन किंवा तंबाखू सोडण्याचा विचार करत असाल, तर हे काही उपाय मदत करू शकतात:
✔️ स्वतःला “आयुष्यभरासाठी सोडायचं” असं सांगण्याऐवजी *आजचा दिवस पार करण्यावर लक्ष द्या.*
✔️ *तंबाखूची इच्छा झाली की ५-१० मिनिटे थांबा*. अनेकदा ती लाट काही वेळाने आपोआप कमी होते.
✔️ *भरपूर पाणी प्या, चालायला जा किंवा एखाद्या मित्राशी बोला*.
✔️ कोणत्या परिस्थितीत तंबाखूची जास्त आठवण येते हे ओळखा आणि त्यासाठी *पर्यायी सवयी तयार करा*.
✔️ सिगरेट किंवा तंबाखूजन्य पदार्थ सोडण्यामध्ये अपयश आलं तरी स्वतःला दोष देऊ नका. *पुन्हा प्रयत्न करणं हीच यशाची सुरुवात असते*.
लक्षात ठेवा, निकोटीनमुळे मिळणारा फोकस तात्पुरता असू शकतो; पण चांगली झोप, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि सातत्यपूर्ण अभ्यास या गोष्टी दीर्घकाळ टिकणारी एकाग्रता देतात.
आज या विद्यार्थ्याने स्वतःचा अनुभव मोकळेपणाने सांगितला, हेच कौतुकास्पद आहे. कारण *व्यसनमुक्तीच्या प्रवासात सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे स्वतःशी प्रामाणिक होणे*.
तुम्हीही तंबाखू किंवा निकोटीन सोडण्याचा प्रयत्न करत असाल, तर लक्षात ठेवा — *प्रगती नेहमी मोठ्या प्रयत्नांनी होत नाही. कधी कधी ती फक्त “आजचा दिवस वापरणार नाही” या एका छोट्या निर्णयापासून सुरू होते*.
— डॉ. प्रिया प्रभू, मिरज
(६/६/२०२६)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , मिरज


Leave a Reply