दारू विषयी खूप उलट सुलट सल्ले, माहिती मिळत राहते.
बरेच जण दारूच्या बाजूने काही ना काही तरी सांगत राहतात आणि मग कुठेतरी मनाला वाटते की थोडीशी मजा करायला काय हरकत आहे?
मात्र सल्ले काहीही असले तरी त्याविषयीचा निर्णय हा स्वतःच्या आयुष्याचा विचार करून घ्यायला हवा.
असेच काही नेहमी ऐकवले जाणारे सल्ले किंवा मते आज आपण पाहू..म्हणजे दारूविषयी निर्णय घेणे तुम्हाला सोपे जाईल..
तसेच तुम्ही आपल्या मित्रांना दारू सोडण्याविषयी सल्ला देत असाल किंवा प्रयत्न करत असाल तर त्यांचे मत परिवर्तन करण्यासाठीही या माहितीचा उपयोग होऊ शकतो.
“आपल्या परंपरेमध्ये मद्याचा उल्लेख आहे” असे म्हणता?
असले तर असू दे न !!
मात्र आता विविध अभ्यासाद्वारे जेव्हा मद्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम, विविध आजारांची वाढलेली जोखीम, तसेच वाढलेल्या ताण-तणावामुळे व्यसन निर्मितीची वाढलेली क्षमता या बाबी विचारात घेता त्यापासून दूर राहणे अधिक सुरक्षित नाही का?
आपली परिस्थिती आणि जगणे हे किती बदलले आहे. त्यानुसार मद्याचे परिणाम देखील बदललेले आहेत.
परंपरेमध्ये सर्वांनी एकत्र येऊन नाचणे गाणे हेही होते. तणावाचे हे छान व्यवस्थापन होते. अशा कितीतरी चांगल्या गोष्टी आता पाळल्या जात नाहीत, मग धोकादायक गोष्ट तेवढी का पाळायची?
“थोडी दारू घेतल्याने जास्त नुकसान होत नाही” असे म्हणता?
थोडी दारू हे ठरवणार कसे आणि जास्त नुकसान हे मोजणार कसे ? एकदा आपल्याला दारू हे न्यूरो टॉक्सिन आहे हे समजले, म्हणजे मेंदूवर परिणाम करते हे समजले, की एखादे टॉक्सीन जाणून बुजून वारंवार घेत राहण्यामध्ये कोणता शहाणपणा आहे?
दारूचे दोन प्रकारे परिणाम असतात . एक मनावर, एक शरीरावर . मनावर होणारा आनंदी परिणाम हा सुरुवातीला थोड्या दारूने जाणवेल, मात्र नंतर त्याची सवय झाल्यावर तेवढाच परिणाम होण्यासाठी अधिक दारू लागते. या अधिक दारूचा शरीरावर होणारा नकारात्मक परिणाम हाही अधिक असतो.
त्यामुळे मनाला आनंदी ठेवण्यासाठी सुरुवातीला थोडी असणारी दारू ही अतिशय नकळतपणे वाढत जाते आणि शरीरावरील परिणामही वाढत जातात. सुरुवातीला शरीर त्या परिणामांवर मात करू शकत असल्याने आपल्याला जाणवत नाही.
ज्या क्षणी शरीर त्यावर मात करू शकत नाही तेव्हा ते त्रास सुरू होतात. मात्र तोपर्यंत दारूची आपल्यावरील पकड आपल्याला थांबू देत नाही.
या अशा नकळतपणे आपल्याला स्वतःचे प्रमाण वाढवायला लावणाऱ्या या न्यूरो- टॉक्सिनच्या म्हणजे दारूच्या नादी का बरे लागायचे?
“दारूची सवय प्रत्येकालाच लागते असे नाही” असे म्हणता?
हे खरे आहे. दारूची सवय प्रत्येकालाच लागते असे नाही. दारूचे व्यसन प्रत्येक जण करतोच असे नाही.
मात्र दारू सोडायची क्षमता प्रत्येकामध्ये असतेच असे नाही.
जर दारू पूर्णपणे सोडण्याचा विचार तुम्हाला नकोसा वाटत असेल, तर दारूची सवय लागली नाही असे आपण कसे म्हणू शकतो?
दारूची सवय म्हणजे रोज दारू प्यायला हवे असे नाही. पण जेव्हा दारू पिण्याच्या संधी येतील तेव्हा तिला नाकारता न येणे किंवा अशा वेळेला अधिक प्रमाणामध्ये दारू पिली जाणे हेही दारूच्या सवयी मध्येच येईल.
दारू हे टॉक्सिन असल्याने त्याचा काही ना काही नकारात्मक परिणाम हा प्रत्येक वेळी घडत राहणार आहे. तुमच्या शरीरात इतर जोखीम निर्माण करणारे घटक असतील तर त्यानुसार प्रत्येकासाठी हा परिणाम वेगळा असणार आहे. त्यामुळे टाळता येण्यासारखी ही नवी जोखीम फक्त ‘ बहुदा सवय लागणार नाही’ या एका कारणासाठी वाढवायची का हाही विचार करायला हवा.
“दारू बरीच वर्षे घेतली की नंतरच त्याचे परिणाम होतात” असे म्हणता?
मीही पूर्वी असेच समजायचे की दारूचे परिणाम हे मध्यमवय सुरू झाल्यानंतर दिसू लागतील आणि वृद्धापकाळात त्याचा सर्वात जास्त परिणाम जाणवेल.
पण जेव्हा माझ्या 21 वर्षीय विद्यार्थ्याला दारूपायी अचानक मृत्युमुखी पडताना बघितले, त्यावेळी जाणवले की दारू ही कोणत्याही वयात, कोणत्याही प्रमाणात , कोणत्याही प्रकारात धोकादायकच आहे.
दारूने आरोग्य बिघडण्याचे आणि मृत्यू येण्याचे अनेक मार्ग आहेत.
दारूशिवायचा आपल्या आयुष्याचा ग्राफ आणि दारूसकटचा आपल्या आयुष्याचा ग्राफ हा नक्कीच वेगळा असणार आहे.
‘तात्कालीक आनंदासाठी दारू घ्यायची’ या निर्णयाची भली मोठी किंमत आपले शरीर चुकवणार असते. त्यामुळे तात्कालीक आनंदापेक्षा दीर्घकालीन सुरक्षेचा मार्ग निवडणे हे अधिक श्रेयकर आहे.
३१ डिसेंबर हा असा दिवस आहे ज्या दिवशी अनेकजण व अनेकजणी आपला दारू सोबतचा प्रवास सुरू करतात.
दारूचा पहिला प्याला पिण्यापूर्वी वाचायला हवा असा लेख गेल्या वर्षी मी लिहिला होता. तो इथे वाचता येईल.
या वर्षी दारूची नवी सुरुवात करू नका ,
भविष्यातील तुम्ही स्वतःला दुवा द्याल.
Leave a Reply