दारूचा पहिला प्याला पिण्यापूर्वी हे वाचा

Written by:

(लेख ऐकायचा असल्यास शेवटी लिंक आहेत)

तुम्ही नियमितपणे दारूचे सेवन करीत असाल तर हा लेख तुमच्यासाठी नाही. कारण आता तुमचा मेंदू दारूविरुद्ध विचार करू शकत नाही.

तुम्ही अधून मधून दारू घेत असाल तर तुम्हाला या लेखाचा थोडा फायदा होऊ शकेल.

मात्र तुम्ही आजवर दारू घेतली नसेल आणि या वर्षी न्यू इयरच्या पार्टीमध्ये दारू घ्यायचा विचार करत असाल किंवा तुमचे मित्र तुम्हाला दारू पिण्यासाठी आग्रह करतील असे तुम्हाला वाटत असेल तर मात्र हा लेख नक्की वाचा.

दारू म्हणजे नक्की काय आहे ?

दारू ही कोणत्याही प्रकारची असली म्हणजे अगदी साधी बियर किंवा अगदी स्ट्रॉंग व्होडका अशी कोणतीही असली तरी त्यामध्ये असलेले अल्कोहोल हे व्यसन निर्मितीची क्षमता असणारे रसायन आहे.
अल्कोहोल आपल्या पोटामध्ये पचत नाही तर ते जसे आहे तसेच आपल्या रक्तामध्ये शोषले जाते आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा आपल्या मेंदूवर होतो.


आपण मानव इतर जनावरांपेक्षा वेगळी असण्याची खूण म्हणजे आपला बुद्धिमान मेंदू आणि दारू हे असे रसायन आहे जे त्या मेंदूवरच परिणाम करते. अल्कोहोल एक neurotoxin आहे.

दारूचा प्रत्येक थेंब हा काही ना काही नकारात्मक परिणाम नक्कीच करतो. पिण्याचे प्रमाण जेवढे जास्त तेवढी परिणामाची तीव्रता अधिक.  मात्र कमी प्रमाणातले दारूचे नियमित सेवन देखिल जीवघेणे ठरते असे अनेक अभ्यास आहेत.

एकदा दारू घेतली तर काय धोका आहे ?

असा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो. 

कारण आपल्याला असे वाटते की एकदा दारू घेतली म्हणजे काय लगेच सवय लागली असे होत नाही.
पण जर तुम्हाला दारूची सुपर पॉवर माहिती असेल तर तुम्ही असा धोका पत्करणार नाही.

दारुमुळे आपल्या मनात काही प्रमाणात आनंदी भावना निर्माण होतात.  तसेच आपल्या मनातील नकारात्मक भावना देखील बोथट केल्या जातात.  त्या जाणवत नाहीत .  यामुळे आपल्या मेंदूतील ‘रिवॉर्ड सेंटर’ कार्यान्वित होते कारण दारूमुळे डोपामिनचे प्रमाण वाढते.

मानवी मन म्हणजे बहिणाबाईंनी म्हटल्यासारखं “वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं” आहे . जी गोष्ट सकृतदृष्ट्या आनंद देणारी वाटते, मनातील नकारात्मक भावना कमी करणारी वाटते, डोपामिनचे प्रमाण वाढवून उत्साह आल्याचे भासवते- अशी गोष्ट आपले मन पुन्हा पुन्हा मागते. आणि मागतच रहाते.

सुरुवातीला काही काळ असे वाटू शकते की आपण दारू पिण्यावर नियंत्रण ठेवले आहे आणि अगदी कंट्रोल मध्ये पितोय. पण आपल्या आयुष्यभरात कधी हा कंट्रोल जाईल आणि आपले दारू पिण्याचे प्रमाण वाढेल हे कोणीही वर्तवू शकत नाही. त्यामुळे दारूच्या सापळ्यामध्ये न अडकण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पहिला प्याला प्यायचा नाही.

21 वर्षानंतर जे दारू पिण्यास सुरुवात करतात त्यातील 10-15% लोकांना दारूचे व्यसन लागते असा अभ्यास आहे. आपण त्या दहा टक्क्यांमध्ये आहोत की नाही हे व्यसन लागल्यानंतरच आपल्याला समजते.

एकदा दारूची चव समजली आणि त्यामुळे हलके वाटणारे डोके समजले की मग नकळत दारू पिण्याची वारंवारता वाढत जाते, व्यक्ती दारू पिण्यासाठी कारणे शोधू लागतात.  दारूचे प्रमाणही वाढते आणि ह्या चक्रातून नंतर सुटका करून घेणे दिवसेंदिवस अवघड होत जाते. कोणासाठी ही वेळ लवकर येऊ शकते तर कोणासाठी आयुष्याच्या एखाद्या अवघड वळणावर येऊ शकते.

दारूचा मेंदूवर काय परिणाम होतो?

दारू पिण्याची सुरुवात ही सहसा शाळा किंवा कॉलेजमध्येच होते. वयाच्या 25व्या वर्षापर्यंत मेंदू हा परिपक्व होत असतो. त्या काळात जेव्हा दारू पिण्याची सुरुवात होते त्यावेळी मेंदूची वाढ व्यवस्थित होत नाही आणि याचे परिणाम दूरगामी होऊ शकतात . त्याचप्रमाणे असेही दिसून आले आहे की दारूमुळे मेंदूतील ग्रे मॅटर कमी होऊन मेंदूची आकलन क्षमता आणि स्मरणशक्ती देखील कमी होते . विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर याचा नकारात्मक परिणाम होतो.

दारू मृत्यूचे कारण ठरते का?

दारू हे शरीराला आवश्यक नसणारे एक रसायन आहे आणि त्याचे नकारात्मक परिणाम होत असल्याने त्याला आपण एक विषारी पदार्थ ही समजू शकतो. मात्र तो बऱ्याच जणांकडून आवडीने सेवन केला जातो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी सरासरी 30 लाख व्यक्ती दारूच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडतात. याची कारणे विविध असली तरी आपण असे म्हणू शकतो की सध्या प्रत्येक सेकंदाला एक व्यक्ती दारूमुळे आरोग्य बिघडल्याने/ विविध आजार झाल्याने मृत्युमुखी पडत आहे. तुम्ही हा लेख वाचून संपवेपर्यंत जगभरात 200-300 व्यक्ती दारूमुळे नक्कीच मृत्युमुखी  पडल्या असतील. या मृत्यूची नोंद होताना त्यामध्ये दारू हे कारण नोंदवले न गेल्याने आपल्याला ह्या संकटाचा पुरेसा आवाका समजत नाही.

सध्या दारू पिण्याचे प्रमाण वाढत आहे आणि दारू पिणे सुरू करण्याचे वय मात्र कमी होत आहे. त्यामुळे या मृत्यूच्या प्रमाणामध्ये भविष्यात नक्कीच वाढ होईल. त्या मृत्यूमध्ये आपला नंबर लागू नये असे वाटत असेल तर पहिला प्याला टाळायला हवा.

दारूचा परिणाम म्हटले की आपल्या सर्वांना केवळ दारूमुळे लिव्हर डॅमेज होते एवढे एकच कारण माहीत असते.  पण त्याखेरीजही अनेक कारणे आहेत जी दारूमुळे वाढतात आणि माणसाला मृत्यूच्या दाढेमध्ये ढकलतात . त्यातील काही कारणे पुढील प्रमाणे:

दारू पिण्याचे परिणाम कोणते?

१. लिव्हर सिरोसिस : दारूचा प्रत्येक थेंब शरीरातून बाहेर टाकण्याचे काम हे लिव्हरचे आहे आणि त्यामुळे लिव्हरवर याचा खूप जास्त ताण येतो आणि त्यातील पेशी मृत पावतात.

२. विविध प्रकारचे घरातील व रस्त्यावरील अपघात : मेंदूचे शरीरावरील नियंत्रण हे कमी झालेले असल्याने तसेच सभोवताल समजून घेण्याची मेंदूची क्षमता कमी झालेली असल्याने असे अपघात सहजपणे घडतात. यामुळे मृत्यू आला नाही तरी एखादे अपंगत्व येऊ शकते. मात्र हे अपघात गंभीर असल्याने मृत्यू येण्याची शक्यता जास्त असते. तसेच अपघातामध्ये दारू न पिलेल्या इतर व्यक्तींचाही मृत्यू होऊ शकतो.

३. हार्ट अटॅक: जे नियमितपणे दारू पितात त्यांच्यामध्ये हार्ट अटॅकचा धोका दीडपट वाढतो आणि जे अधून मधून दारू पितात त्यांच्यामध्ये सव्वा पट वाढतो.

४. मेंदूला लकवा मारणे : दारू मेंदूच्या विविध भागांवर विविध प्रकारे परिणाम करत असल्याने मेंदू संबंधित बरेचसे आजार वाढतात.

५. विविध प्रकारचे संसर्गजन्य रोग होतात : जसे  टी बी.  कारण दारुमुळे शरीराची इम्युनिटी कमी झालेली असते.

६. कर्करोग: दारूमुळे विविध प्रकारचे कर्करोग होऊ शकतात.  ज्या बियरला आपण अगदी साधे समजतो त्या बियरने देखील मोठ्या आतड्याचा कॅन्सर होतो. कारण दारू ही शेवटी एक विषारी रसायन आहे आणि आपल्या आतड्यातून पुढे जाताना ती आतड्यांना इजा करतच पुढे जाते.

७. खून व आत्महत्यांमुळे मृत्यू: दारूमुळे बंधने कमी झाल्याने अशा प्रकारच्या कृती घडू शकतात.

८. स्वादुपिंडला सूज येणे : याचाही धोका वाढतो.

९. कुपोषण : दारुमुळे विविध क्षार कमी झाल्याने तसेच शरीराची पचनशक्ती कमी झाल्याने व्यक्ती कुपोषणाला बळी पडते.

१०. मानसिक अनारोग्य: दारूमुळे मानसिक आरोग्य खराब होते की मानसिक आरोग्य खराब झाल्याने दारू पिणे वाढते हा एक मोठाच प्रश्न आहे. मात्र जेव्हा दारूचे व्यसन लागते तेव्हा मात्र ती व्यक्ती अनेक मानसिक अनारोग्यांशी लढत असते.

दारू मृत्यूचे कारण तर ठरतेच, पण तत्पूर्वी दारू ही स्वतःच्या व कुटुंबीयांच्या आयुष्याची प्रतवारी – क्वालिटी – कमी करते.  आयुष्यातील आनंद कमी करते आणि अडचणी वाढवते.  खर्च वाढवते.

बऱ्याच जणांचा असा समज असतो की दारूमुळे स्वतःची लैंगिक क्षमता वाढते . मात्र यामध्ये काही तथ्य  नसून दारूमुळे व्यक्तीची लैंगिक कामगिरीही दिवसेंदिवस कमी होते तसेच वीर्याची प्रतवारी देखील कमी होते.

हे सर्व परिणाम आणि संभाव्य मृत्यू टाळायचा असेल तर त्यासाठी खात्रीचा मार्ग एकच आणि तो म्हणजे पहिला प्याला नाकारायचा.

दारूचा शरीरातील प्रवास कसा असतो?

तुम्ही दारूचा घोट घेतला रे घेतला की दारू तुमच्या रक्तामध्ये शोषली जाण्यास सुरुवात होते.

2 मिनिटे:  साधारण 20% दारू जठरामधून शोषली जाते आणि बाकीची पुढे आतड्यांपर्यंत पोहोचते. जर पोट रिकामे असेल तर अशावेळी दारू रक्तामध्ये वेगाने शोषली जाते.

5 मिनिटे: दारु मेंदूपर्यंत पोचून परिणाम सुरू करते आणि ऐच्छिक कृती जसे हालचाली किंवा विचार करणे आणि अनैच्छिक कृती जसे श्वास घेणे किंवा तापमानावरील नियंत्रण अशा सर्व प्रकारे मेंदूची कार्यक्षमता कमी होते. रक्तातील दारू अंगातील पाणी शोषून घेते व त्यामुळे पेशींमध्येही पाणी कमी होऊन त्याचेही मेंदूवर दीर्घकालीन परिणाम दिसू शकतात.

30 मिनिटे : तुम्ही फक्त एक युनिट अल्कोहोल घेतले असेल तर अर्ध्या तासात रक्तातील प्रमाण हे सर्वाधिक पातळीवर पोहोचते.

60 मिनिटे: एक युनिट अल्कोहोल पूर्णपणे रक्तातून बाहेर काढण्यासाठी लिव्हरला एक तासाचा वेळ लागतो.  हा वेळ कमी होऊ शकत नाही . त्यामुळे यापुढेही जर दारू घेतली असेल तर ती अधिकची दारू तेवढा काळ रक्तामध्येच फिरत राहते आणि विविध प्रकारे शरीराची हानी करत राहते.
10% दारू श्वासाद्वारे बाहेर पडते आणि उरलेली CO2 आणि पाण्यामध्ये बदलली जाते व लघवीद्वारे बाहेर टाकली जाते.

2 तास : आता दारूचे मानसिक परिणाम दिसू लागतात आणि कधी कधी चिडखोरपणा,  मूड बदल किंवा आनंदावस्था वा शंकेखोरपणा असे बदल दिसतात.

6 तासांपर्यंत : वेंधळेपणा व विसरभोळेपणा वाढलेला असल्याने चार युनिट हुन अधिक दारू घेतलेली असल्यास त्या व्यक्तीची इजा होण्याची जोखीम सहापट वाढलेली असते.

10 तासांपर्यंत : झोप व्यवस्थित लागत नाही,  लघवीचे प्रमाण वाढते , घोरण्याचे प्रमाण वाढते.

18 तासांपर्यंत : आता दारूमुळे वाढलेले डोपामिन कमी झालेले असते आणि आता मात्र मूड तितका आनंदी राहात नाही . शरीरातील क्षार कमी झालेले असतात.  तसेच शरीरातील साखरही कमी होते आणि आपल्याला हँग ओव्हरचा अनुभव येतो.

या सर्व पायऱ्या दरवेळी दारू पिली जाते त्यावेळी आपल्या शरीरात घडतात आणि हे पुन्हा पुन्हा घडत राहिले की होणारे परिणाम हे कायमस्वरूपी असतात.

हे टाळायचे असेल तर तुम्हाला आता मार्ग माहित आहेच!  आणि तो म्हणजे पहिला प्याला घ्यायचाच नाही म्हणजे पुढील सर्व शक्यता दूर होतात.

हे मला पटले तरी मित्रांचा आग्रह कसा टाळायचा?

दारू पिणे हा मित्रांचा आग्रह नसून दुराग्रह आहे आणि दुराग्रह टाळणे हे बऱ्याचदा अवघड जाते.  

पण त्यासाठी पुढील काही टिप्स आहेत,  सूचना आहेत,  ज्यांचा वापर करून तुम्ही पहिला प्याला पिणे टाळू शकता.

मित्र का आग्रह करतात हे समजून घ्या .
जेव्हा दारू पिणारे कमी असतात त्या वेळेला आपण दारू पिणे अयोग्य आहे असे समजतो.  मात्र जेव्हा आपण सर्वजण मिळून दारू पितो तेव्हा मात्र ते एखादे सेलिब्रेशन असते आणि प्रत्येकाला कूल वाटते.

एकटे दारू पिताना अपराधी वाटू नये यासाठी अधिकाधिक लोक आपल्या सोबत दारू प्यावे म्हणून आग्रह केला जातो.
तसेच दारू व्यवसायिकांना देखील त्यांचा व्यवसाय वाढायचा असेल तर अधिकाधिक लोकांनी दारू पिणे हे फायदेशीर असते . त्यामुळे विविध जाहिरातीतून ‘दारू पिणे हे उच्चभ्रू / मॉडर्न आहे’ किंवा ‘दारू पिणे हे आनंद साजरा करण्यासाठी अत्यावश्यक आहे’ किंवा ‘जे प्रगत आहेत ते दारू पितात’ अशा प्रकारचे चित्र सर्वांसमोर उभे केले जाते.

आपल्या निरोगी निवडीबद्दल अभिमान बाळगा.
मित्रांना तुमचे दारू न पिणे जरी कुल नाही वाटले किंवा ते तुम्हाला तू घाबरट आहेस असे म्हणत असले तरी देखील भविष्यातील कितीतरी अडचणींना तुम्ही टाळत आहात , तसेच तुमचा मौल्यवान मेंदू सुरक्षित ठेवत आहात,  याची जाणीव ठेवा आणि तुमच्या या दारू न पिण्याच्या निवडीबद्दल अभिमान बाळगा.

ठामपणे नकार देण्यासाठी कारण तयार ठेवा.
मित्रांचा दुराग्रह असताना नकार देणे हे तेव्हाच शक्य होते जेव्हा तुमच्या मनामध्ये त्याविषयी पूर्वकल्पना असेल. तुम्ही दारू न पिण्यासाठीचे पटण्यासारखे कारण तुम्ही तयार ठेवा.
जसे मला आईने शपथ दिली आहे किंवा मी माझ्या जवळच्या नातेवाईकांना दारूमुळे मृत्युमुखी पडताना बघितले आहे, इ.

मित्रांकडून हा आग्रह वारंवार केला जाऊ शकतो याची जाणीव ठेवून प्रत्येक वेळी ठामपणे नकार द्या.

मित्रांच्या प्रतिवादाला उत्तर देऊ नका.
बऱ्याचदा मित्रांकडून काही ना काही कारणे सांगितली जातात. पण अशा कारणांचे काही उत्तर देण्याची व त्यांना आपले मत पटवण्याची काही गरज नाही.
त्यामुळे फक्त ‘माझी इच्छा नाही त्यामुळे मला दारू घ्यायची नाही‘ हे एवढेच कारण पुरेसे असते.
आनंद साजरा करताना एखादे कोल्ड्रिंक पिऊन देखील त्यांच्यासोबत साजरा करता येतो.
थोड्या प्रमाणात दारू पिणे आरोग्यासाठी चांगले आहे असा एक गैरसमज आहे मात्र मेटा एनालिसिस सारख्या मोठ्या अभ्यासामध्ये हे चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहे.

आग्रह थांबत नसेल तर तेथून निघून जा.
तुमच्या मताचा आदर केला जात नसेल तर त्यावेळी तेथून दूर जाणे हे अधिक योग्य आहे.

आवश्यकता भासल्यास मैत्रीबद्दल पुनर्विचार करा.
तुमच्या आयुष्याची दिशा ठरवण्यामध्ये तुमच्या मित्रांचाही खूप मोठा वाटा असतो.  त्यामुळे जर अशा घटना वारंवार घडत असतील तर अशावेळी मैत्रीबाबत पुनर्विचार करण्यास हरकत नाही.  खरी मैत्री असेल तर ती कधीच दुराग्रह करणार नाही.

आनंद साजरा करण्याचे इतर मार्ग निवडा.
दारूची पार्टी म्हणजे सगळ्यात मोठी असे आपल्याला दारू व्यवसायिकांच्या जाहिरातीने समजावले आहे. मात्र ते त्यांच्या फायद्यासाठी आहे.
डोपामीन मिळवण्यासाठी केवळ दारूच हवी असे नाही.  मिरवणुकीमध्ये नाचण्यासाठी केवळ दारूच हवी असे नाही.  दारू शिवाय देखील आपण आनंद साजरा करू शकतो.  त्यासाठी विविध मार्ग निवडा.

दारू केवळ व्यक्तीवरील नाही तर कुटुंबावरील संकट

दारूचे खरे स्वरूप ज्यांना माहित आहे अशा व्यक्ती दारू पिण्याची सुरुवात करणे सहसा टाळतात.  नकळत्या वयामध्ये मित्रांच्या दुराग्रहामुळे जेव्हा दारूचा पहिला प्याला समोर येतो आणि तो पिल्यानंतर दारूच्या आनंदापासून कसे दूर व्हायचे हे ताण-तणावाच्या आयुष्यामध्ये जमत नाही, तेव्हा त्या व्यक्तीसोबतच त्या व्यक्तीचे संपूर्ण कुटुंब फरफटले जाते.
दारू पिल्यानंतर कौटुंबिक हिंसाचारांच्या घटनेमध्येही वाढ होते. विशेषतः मुलांवर याचे अनेक नकारात्मक परिणाम होतात. तसेच मुले आपल्या पालकांची नक्कल करत असल्याने भविष्यात त्यांना देखील दारू पिण्याची इच्छा व सवय होऊ शकते. दारू पिल्याने आपले जीन्स खराब होतात आणि ते आपल्याकडून मुलांमध्येही जातात व त्याचे परिणाम आपल्या मुलांमध्येही दिसून येतो. ( Epigenetic effect)

दारू पिणाऱ्या कोणालाही व्यसनी होण्याची इच्छा नसते तरी देखील बरेच जण व्यसनी होतात . दारू मेंदूवर परिणाम करत असल्याने आणि मेंदूला आनंद देत असल्याने दारूपासून दूर होण्याचा निर्णय घेणे अवघड असते. मात्र मेंदूपर्यंत दारू पोहोचण्यापूर्वीच दारूपासून दूर राहणे हे आपण ठरवू शकतो.

आपण काय करू शकतो?

सध्या समाजातील तरुण मुला-मुलींमध्ये दारू पिण्याचे प्रमाण हे वाढत आहे. अशावेळी याबाबत आपण आपल्या मुला मुलींसोबत व विद्यार्थ्यांसोबत याविषयी बोलायला हवे . हा लेख त्यांना अवश्य वाचायला द्या.  सोबत दिलेल्या लिंक मधील डॉक्टर धरव शहा यांचा व्हिडिओ देखील तुम्ही शेअर करू शकता. (https://youtu.be/XzKsEqv143Q)

बऱ्याच मुलांना दारू घ्यायची नसते . मात्र मित्रांचा दुराग्रह टाळता येत नाही.  या कारणास्तव ते दारू पिणे सुरू करतात आणि मग दुष्टचक्रामध्ये अडकतात.

तुम्ही दारू पिण्याच्या कोणत्याही टप्प्यावर असाल, म्हणजे अजून पिणे सुरू केले नसेल किंवा अधून मधून घेत असाल किंवा नियमितपणे घेत असाल तर हीच वेळ आहे की तुम्ही त्या पायरी पासून मागे फिरू शकता किंवा या प्रवासाची सुरुवात होण्यापासून थांबू शकता.
लक्षात ठेवा दारूचे नकारात्मक परिणाम हे प्रत्येक थेंबापासून होत असतात . त्यामुळे दारू शक्य तेवढी टाळणे हेच आपल्यासाठी हितकारक आहे.

 

– डॉ प्रिया प्रभू, MD , रोगप्रतिबंधक शास्त्र तज्ञ, मिरज

लेख ऑडिओ स्वरूपात ऐकायचा असल्यास पुढील लिंक वापरा. https://open.spotify.com/episode/1ATtIoy1wmWDPWzBYZgq0B?si=g_F5SauWSIugv7w3XjIw6Q

Or

https://youtu.be/YIoGqwFW77s?si=wjFMbg9o_v7-WbPk

लेखाचे इंग्रजी भाषांतर

https://askdrpriya.in/2024/12/saying-no-to-alcohol-to-stay-safe/

 

श्रेष्ठ महाराष्ट्र या साइटवर पूर्व प्रसिद्ध

दारुचा पहिला प्याला पिण्यापूर्वी हे वाचा

 

(नुकताच याच कारणाने अपघात घडून मृत्यूमुखी पडलेल्या किशन या माझ्या २१ वर्षीय विद्यार्थ्याच्या स्मृतीस अर्पण)

 


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

7 responses to “दारूचा पहिला प्याला पिण्यापूर्वी हे वाचा”

  1. प्रकाश avatar
    प्रकाश

    पण समाजात चित्र वेगळे दिसते …म्हणजे मॅडम माझे तरी मत असे आहे की वर्षानुवर्षे दारू पिणारे असंख्य आहेत पण त्यांना काहीच न झालेले मी पाहिले आहे आणि या उलट कॅन्सर झाल्यापैकी बहुतांश रुग्ण कोणतेही व्यसन नसलेले आहेत . इतर अनेक कारणाने कॅन्सर होण्याचे प्रमाण खूप म्हणजे खूप आहे ..उदाहरणार्थ केमिकल युक्त अन्न ..प्रदूषण , अनुवंशिकता इत्यादी.

    1. Dr Priya avatar
      Dr Priya

      तुमचा अनुभव योग्य आहे. कर्करोग हा असा आजार आहे ज्याला अनेक कारणे असू शकतात. यातील काही कारण आहे आपण नियंत्रित करू शकतो मात्र काही नियंत्रित करता येत नाही. दारू हे नियंत्रित करता येण्यासारखे कारण आहे.
      जेव्हा लाखो व्यक्तींचा अभ्यास केला जातो तेव्हा त्यामधून हे असे धोके लक्षात येतात.
      तसेच दारूचे परिणाम हे अनेक वर्षानंतर दिसून येत असल्याने ओळखणे अवघड जाते.
      मात्र दारूचा प्रत्येक थेंब हा शरीरावर नकारात्मक परिणाम करतो याविषयी तरी आता सर्व शास्त्रज्ञांमध्ये एकमत आहे.

    2. Dr Priya avatar
      Dr Priya

      सर्व प्रकारची उदाहरणे असणारच ना.. मात्र याविषयी जे अभ्यास केले गेले आहेत, ज्यामध्ये अनेक लोकांना एकत्र आणून त्यांचा अभ्यास केला गेला आहे, अशा अभ्यासामध्ये दारूमुळे परिणाम होतात असे दिसून आले आहे.

  2. Charudatta kulkarni avatar
    Charudatta kulkarni

    Very well penned

    1. Dr Priya avatar
      Dr Priya

      Thank you sir. 🙏

  3. Sardar avatar
    Sardar

    Great job

    1. Dr Priya avatar
      Dr Priya

      Thank you.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.