मुलींमध्ये लवकर मासिक पाळी येण्याची कारणे व टाळण्याचे उपाय

अलीकडच्या काळात लहान वयातच मुलींना मासिक पाळी सुरू होण्याचे प्रमाण वाढत आहे. हे पूर्वीपेक्षा वेगळं आहे, कारण काही दशकांपूर्वी मुलींमध्ये मासिक पाळी येण्याचे वय साधारणतः १२ ते १५ वर्षे असायचे. मात्र, आता हे वय कमी होऊन अधिकाधिक मुलींना ८ ते ११ वयोगटात किंवा कधी त्याहून कमी वयात पाळी सुरू होताना दिसते. वयाच्या नऊ वर्षांआधी पाळी सुरू होण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा दुप्पट झालेले दिसून येते. अशा स्थितीत, पालक, शिक्षक, आणि समाजाने यामागील कारणे समजून घेणे आवश्यक आहे.

चला, यासाठी कारणीभूत असलेल्या वेगवेगळ्या महत्वाच्या घटकांवर एक नजर टाकूया. तसेच आपल्या मुलींची काळजी कशी घ्यावी हेही जाणून घेऊया.

मुलींमध्ये पाळी सुरू होण्याची प्रक्रिया ही साधी- सोपी आणि सरळ नाही.  यासाठी केवळ शरीरातील हार्मोनचे प्रमाण हे एकच कारण नसते. यामध्ये अनेक बाबी एकाच वेळेला कार्यरत असतात आणि त्यामुळे आपण कोणत्याही एका बाबीची काळजी घेऊन चालत नाही.  म्हणून आज जे घटक मी सांगणार आहे त्या सर्व घटकांच्या बाबतीमध्ये आपण काळजी घ्यायला हवी.

कारणे व उपाय –

लवकर मासिक पाळी येण्याची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

१. आहारातील बदल आणि प्रक्रिया केलेले अन्न

सध्याच्या आहारातील बदल काय आहेत?

मुलांचा सध्याचा आहार अधिकाधिक फास्ट फूड, साखरेचे आणि चरबीयुक्त पदार्थांवर आधारित आहे. फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, आणि खनिजांचे प्रमाण कमी असते, मात्र चरबी आणि साखर अधिक असते.
हे पदार्थ शरीरात चरबी वाढवतात, ज्यामुळे हार्मोन्समध्ये बदल होतो आणि मासिक पाळी लवकर येण्याची शक्यता वाढते.
मुलींचे वाढते वजन आणि शरीरातील चरबीचे प्रमाण हा एक महत्त्वाचा घटक आहे. मुलींचे वजन काही ठराविक प्रमाणापर्यंत पोहोचले की पाळी सुरू होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे मुलींची वजन हे त्यांच्या वयानुसार योग्यच असायला हवे.


मुलींचे वाढते वजन आणि शरीरातील चरबीचे प्रमाण हा एक महत्त्वाचा घटक आहे. मुलींचे वजन काही ठराविक प्रमाणापर्यंत पोहोचले की पाळी सुरू होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे मुलींची वजन हे त्यांच्या वयानुसार योग्यच असायला हवे.

तुम्हाला काय करता येईल?

१. मुलांच्या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य ( whole grains) , आणि नैसर्गिक पदार्थांचा समावेश करावा.
२. जंक फूड आणि प्रक्रियायुक्त पदार्थांचे (processed food) सेवन कमी करावे किंवा टाळावे.

३. जेवणातील तेलकट तसेच तवंग असलेल्या पदार्थांचे प्रमाण कमी ठेवावे.

४.मुलींचा गुटगुटीतपणा व जाडेपणा यातील सीमारेषा ओळखून पौष्टिक अन्नसेवनावर अधिक भर द्यावा.

५. पोषक आहार दिल्यास, मुलींना आवश्यक पोषण मिळेल आणि त्यांच्या शारीरिक विकासाचा वेग योग्य राहील.

२. पर्यावरणातील विविध रसायनांचा प्रभाव

पर्यावरणातील रसायने कसे नुकसान करतात?

आजच्या जीवनशैलीत प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, ज्यात बीपीए (BPA) आणि थेलेट्स (Phthalates) यांसारखी रसायने असतात. या रसायनांना ‘एंडोक्राइन डिसरप्टर्स’ असे म्हणतात, कारण ते शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात.

मुलींना लहानपणापासूनच मेकअपचे सामान किंवा इतर ब्युटी प्रॉडक्ट आपण वापरू देतोय आणि या सर्व प्रॉडक्ट्स मध्ये थेलेट्स (phthalates) चे प्रमाण खूप जास्त असते.

तसेच हवेतील विविध प्रदूषणकारी रासायनिक घटक देखील आपल्या शरीरावर अनेक परिणाम करत असतात, त्यातील एक परिणाम हा हार्मोनचे असंतुलन आहे.

सध्या आपल्या अन्नपदार्थांमध्येही अनेक कीटकनाशके मिसळलेली असतात.  ती पोटात गेल्यास त्याचेही परिणाम होऊ शकतात.

या अश्या विविध रसायनांचा परिणाम लहान मुलींच्या शरीरावर होऊन मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते.

तुम्हाला काय करता येईल?

१. प्लास्टिकचा वापर होता होईल तो कमी करावा विशेषतः पाण्याच्या बाटल्या प्लास्टिकच्या असू नये.

२. लहान मुलांना प्लास्टिकची खेळणी घेऊ नयेत. विशेषत: जी खेळणी तोंडात घातली जातात अशी खेळणी प्लास्टिकची नसावीत.

३. प्रक्रिया केलेल्या रसायनांच्या वस्तू कमी वापराव्यात. लहान मुलींना मेकअप, परफ्यूम पासून दूर ठेवावे.

४. नैसर्गिक पदार्थ, काचेच्या वस्तू, स्टील आणि इतर पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करावा.

५. हवेतील प्रदूषण आणि अन्नातील कीटकनाशके कमी करण्यासाठी सरकारने आणि समाजानेच प्रयत्न करायला हवेत.

३. मानसिक आणि सामाजिक ताण

तुम्ही कधी विचार केला आहे का की सध्या मुलांवर किती ताण असतो?

आजच्या स्पर्धात्मक जगात, शाळेतील अभ्यास, इतर सह-अध्यायी उपक्रम, स्पर्धा, आणि करिअरची तयारी अशा अनेक कारणांनी मुलांवर ताण येतो.

सततचा मोबाईल वापर देखील एक प्रकारे स्ट्रेस वाढवत असतो. लहान वयातच ताण येण्याने शरीरात कॉर्टिसोलसारखे ताण-संबंधित हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि परिणामी मासिक पाळी लवकर येऊ शकते.

तुम्हाला काय करता येईल?

१. मुलींवर अभ्यासाचा अतिरेकी दबाव न आणता त्यांना मानसिकदृष्ट्या आनंदी ठेवावे.

२. मुलींना ताण कमी करण्यासाठी योगा, ध्यान, आणि मैदानी खेळात सहभाग घेण्यासाठी प्रेरित करावे. यामध्ये शिक्षक आणि शाळा मदत करू शकतात.

३.मोबाईल वापराचे प्रमाण मर्यादित ठेवावे.

४.त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करावे.

५.मुलांना पुरेशी झोप मिळत आहे ना याची काळजी घ्यावी.

४. शारीरिक हालचालींची कमतरता

शारीरिक हालचाली कमी होण्याचे परिणाम काय असतात?

हल्लीच्या मुली स्क्रीन टाइम वाढल्यामुळे शारीरिक हालचालीमध्ये कमी वेळ घालवतात. त्यांचा बराचसा वेळ हा टीव्ही समोर बसून कार्टून बघताना किंवा मोबाईल मध्ये गेम किंवा व्हिडिओ बघताना जातो.

कमी शारीरिक हालचाली म्हणजे शरीरात चरबी वाढण्याची अधिक शक्यता. चरबीमुळे एस्ट्रोजनचे प्रमाण वाढते, जे मासिक पाळी लवकर सुरू होण्याचे एक महत्त्वाचे कारण ठरते.

तुम्हाला काय करता येईल?

१. मुलींना दररोज व्यायाम किंवा खेळांमध्ये सहभागी करून घेणे.

२. मुलींसाठीही मैदानी खेळ, जिम्नॅस्टिक, सायकलिंग, पोहणे, इत्यादी क्रियाकलापांचा समावेश करावा.

३.स्क्रीन टाईम मर्यादित ठेवून त्यांच्या शारीरिक सक्रियतेला प्रोत्साहन देणे.

४.मुलींसाठी सूर्यप्रकाशात खेळणे महत्त्वाचे आहे.  त्यामुळे शाळेतील खेळाचा तास हा भर दुपारी असण्याऐवजी सकाळच्या वेळी असल्यास फायदा होऊ शकतो.

५. आनुवंशिक कारणे

कुटुंबातील आनुवंशिकता कितपत परिणाम करते?

कुटुंबातील इतर महिला लहान वयात मासिक पाळीला सामोरे गेल्या असतील, तर त्यांच्या पुढील पिढीतही लवकर मासिक पाळी येण्याची शक्यता असते.

तुम्हाला काय करता येईल?

या घटकांवर थेट नियंत्रण ठेवता येत नसले, तरी आहार, जीवनशैली, आणि इतर घटकांवर लक्ष देऊन मासिक पाळी लवकर येऊ नये यासाठी प्रयत्न करता येतात. आनुवंशिक बाबींची पूर्ण माहिती घेऊन आहार आणि शारीरिक क्रियेचा योग्य समन्वय ठेवता येतो.

काही गैरसमज

दुधातील हार्मोन्समुळे पाळी लवकर येते या समजाच्या बाबतीमध्ये अद्याप शास्त्रीय अभ्यासाचा आधार आढळून आलेला नाही.  कारण सहसा हे हार्मोन्स गोवंशीय असतात . तसेच दुधाच्या पाश्चरायझेशनच्या प्रक्रियेमध्ये ते नष्टही झालेले असतात आणि पचण्याच्या प्रक्रियेमध्ये ते हार्मोन जसेच्या तसे मानवी शरीरात पोहोचत नाहीत. त्यामुळे मुलींचे दूध पिणे बंद करणे हा यावरील उपाय होऊ शकत नाही.
तसेच उष्ण समजले जाणारे पदार्थ खाऊ न देणे हाही यावरील उपाय होऊ शकत नाही. कारण असे पदार्थ हार्मोनच्या प्रमाणावर कोणताही परिणाम करत नाहीत.

लवकर मासिक पाळी सुरू होण्या ( मेनार्की ) चे परिणाम आणि जोखीम

लवकर मेनार्की येणे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि भावनिक परिणामसुद्धा करते. मुलींवर यामुळे होणारे परिणाम खाली दिले आहेत.

१. शारीरिक परिणाम

लठ्ठपणाचा धोका: लवकर मेनार्की आणि भविष्यातील लठ्ठपणा यांचा संबंध असू शकतो, कारण वाढलेले हार्मोन्स चरबीच्या प्रमाणावर परिणाम करतात.

हाडांच्या विकासावर परिणाम: लहान वयात हार्मोन्सच्या वाढलेल्या प्रभावामुळे हाडे लवकर परिपक्व होऊ शकतात, ज्यामुळे हाडांची ताकद कमी होण्याची शक्यता असते. तसेच उंची देखील वाढीच्या क्षमतेपेक्षा कमी राहू शकते. उंची खूप कमी असल्यास भविष्यात गरोदरपणात त्रास होऊ शकतो.

विविध आजारांची जोखीम वाढणे: संशोधनात असे आढळले आहे की लवकर मेनार्की येणाऱ्या मुलींमध्ये अधिक काळासाठी शरीरातील हार्मोनचे प्रमाण वाढलेले असल्याने प्रौढावस्थेत टाइप २ मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, आणि विविध कर्करोग होण्याची शक्यता वाढते. उदा. स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता 20 टक्क्याने वाढते.

२. मानसिक परिणाम

आत्मविश्वासाचा अभाव: लहान वयात शरीरात होणारे बदल समजून घेणे कठीण असू शकते, ज्यामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

नैराश्य आणि चिंता: लवकर मेनार्कीसोबत शारीरिक बदल देखील लवकर आलेले असतात, ज्यासाठी मुली मानसिकदृष्ट्या तयार नसतात. यामुळे चिंता, नैराश्य, आणि अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असते.

समाजातील दबाव: लहान वयात शारीरिक बदल आल्यास इतर लोकांच्या टीकेचा, समाजातील मतांचा ताण येऊ शकतो, ज्यामुळे मुलींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

३. शैक्षणिक आणि सामाजिक परिणाम

शाळेत अडचणी: अचानक आलेले शारीरिक बदल कधी कधी मुलींना शाळेत संकोच अनुभवण्यास भाग पाडतात. त्यामुळे शाळेतील सहभाग कमी होऊ शकतो.

मित्रमैत्रिणींशी संवादात अडचण: या वयात इतर मुलींशी तुलना होऊन संकोच, लाज किंवा स्वतःवर अविश्वास येऊ शकतो.

काय केले जाऊ शकते?

१. लवकर मासिक पाळी येण्याची कारणे आणि परिणाम विचारात घेऊन, पुढील उपाययोजना करून यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते. यासाठी विविध मार्ग वर सांगितलेले आहेतच.

२.यासाठी पालकांनी आणि समाजाने मुलींच्या आहार, जीवनशैली, आणि मानसिक स्वास्थ्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. योग्य पद्धतीने, मुलींच्या शारीरिक व मानसिक विकासाची काळजी घेऊन मासिक पाळी लवकर येण्याच्या घटनेला कमी करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो.

३.मुलींच्या शारीरिक बदलांवर लक्ष ठेवून जर स्तनांची वाढ सुरू झाली असेल तर अशावेळी त्यांना पाळी संबंधी माहिती सांगून त्यांच्या मनाची तयारी करून घ्यायला हवी जेणेकरून त्यांना अचानक धक्का बसणार नाही.

४.पाळीभोवतालची नकारात्मक भावना बाजूला ठेवून तसेच आईच्या पाळीबाबत मोकळी चर्चा करून याविषयी सामान्यीकरण ( normalization ) करता येऊ शकते.

५.मुलीला लवकर पाळी आली असेल तर तिच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाची जाणीव ठेवून त्यानुसार शाळेमध्येही सपोर्ट मिळायला हवा.

निष्कर्ष

शेवटी, लक्षात ठेवा:

मुलींना एक सकारात्मक, निरोगी, आणि आनंदी जीवन देण्यासाठी आपल्या कुटुंबातील व समाजातील विविध गोष्टींमध्ये बदल करणे महत्त्वाचे आहे. कारण लवकर पाळी येणे ही केवळ एक घटना नसून त्यानुसार मुलीच्या संपूर्ण आयुष्यावर विविध परिणाम होत असतात.

  • डॉ प्रिया प्रभू (MD PSM)
    रोगप्रतिबंधक शास्त्र तज्ञ, मिरज.
    drprdeshpande2@gmail.com

सदर लेख श्रेष्ठ महाराष्ट्र या साइटवर पूर्व प्रसिद्ध झालेला आहे . त्याची लिंक पुढील प्रमाणे:

मुलींमध्ये लवकर मासिक पाळी येण्याची कारणे व टाळण्याचे उपाय


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

2 responses to “मुलींमध्ये लवकर मासिक पाळी येण्याची कारणे व टाळण्याचे उपाय”

  1. Ajit Dhanwate avatar
    Ajit Dhanwate

    Nice and Useful Information 👌 👍

    1. Dr Priya avatar

      धन्यवाद ! 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com